Home Blog Page 75

अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमुळे अधिकृत विकासकांना नाहक त्रास; शासकीय अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना सर्व नियम कायदे पाळावे लागतात. मात्र बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना कुठलीही बंदी नसते. त्यामुळे अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांची बदनामी आणि डोकेदुखी होते. रेरा प्राधिकरणाला खोटी कागदपत्रे सादर करून कल्याण-डोंबिवलीतच नव्हे तर राज्यभरातून एक हजार बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र रेराकडून मिळविली असल्याचा गौप्यस्फोट कल्याण डोंबिवली ‘क्रेडीया एमसीएचआय’चे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी केला आहे.

यामुळे कल्याण-डोंबिवली शहराचे नाव खराब झाले असून अधिकृत बांधकाम धारकांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ‘रेरा’ घोटाळ्यामध्ये एमसीएचआय मधील एकाही विकासकाचा सहभाग नाही. तरीही अधिकृत विकासकांना बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी रेरा नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी तीन चार महिने वाट पहावी लागत असल्याची माहिती कल्याण-डोंबिवलीतील एमसीएचआय च्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

केडीएमसीकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी आणि त्यावरून रेरा नोंदणी प्रमाणपत्र मिळवित कल्याण-डोंबिवलीतील काही विकासकांनी शासनाची तसेच नागरिकांची देखील फसवणूक केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अधिकृतरित्या, नियमानुसार काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याविषयी माहिती देण्यासाठी शुक्रवारी कल्याणमध्ये ‘एमसीएचआय’च्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कल्याण-डोंबिवली युनिटचे अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, माजी अध्यक्ष रवी पाटील, राहूल कदम, दिनेश मेहता, संजय पाटील, रोहित दीक्षित, सुनिल चव्हाण यांसह इतर सदस्य उपस्थित होते.

पालिकेची बनावट कागदपत्र सादर करत रेराची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण वास्तूविशारद संदीप पाटील यांनी उघडकीस आणले आहे. हे प्रकरण उघडकीस आणणारे वास्तू विशारद संदीप पाटील यांच्या धाडसाचे एमसीएचआयने कौतूक केले आहे. या प्रकरणी विकासकांवर गुन्हे दाखल होत एसआयटीकडून तपास सुरु आहे.

माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी पुढे सांगितले अधिकृत काम करणाऱ्याला सर्व कायदे आणि अनधिकृत कामे करणाऱ्यांना एकही कायदा लागू नाही या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल करत हा घोटाळा केवळ एका व्यक्तीचा नसून त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अधिकृत विकासकांना लवकरात लवकर परवानगी मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेत केडीएमसी सोबतच रेरा संस्थेकडून कागदपत्रांची छाननी करण्यासाठी एक डेस्क ऑफिसर नेमणे आवश्यक आहे.

बांधकाम व्यावसायिकांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे आणि त्यानंतरही आम्हाला त्रास होत असेल तर ते योग्य नसून आम्हाला लवकरात लवकर बांधकाम परवानगी मिळाली पाहिजे अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली.

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्यापुढे ही समस्या मांडणार असल्याचे देखील यावेळी एमसीएचआय च्या सर्व सदस्यांनी सांगितले.

 

 

रामदेव बाबांच्या विधानावर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया; अमृता फडणवीस बद्दल म्हणाले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

योग गुरू बाबा रामदेव यांचा नुकताच ठाण्यात योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात महिलांबाबत विधान करताना रामदेव बाबांचा तोल सुटला व त्यांनी महिलांवर वादग्रस्त विधान केले होते, दरम्यान रामदेव बाबांच्या या विधानाने विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून रुपाली ठोंबरे यांच्यानंतर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी रामदेव बाबांबद्दल खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल चुकीचे विधान करतात, राज्यपाल वादग्रस्त विधान करतात आणि रामदेव बाबा महिलांच्या बाबतीत लज्जास्पद भाष्य करतात, असे असताना सरकार गप्प का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, रामदेव बाबांच्या योग कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या, मात्र महिलांबाबत रामदेव बाबा लज्जास्पद बोलल्यावर देखील त्या गप्प का बसल्या. त्यांनी सणसणीत कानाखाली द्यायला हवी होती. या सरकारने जीभ गहाण ठेवली आहे का?असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा येथे आज होणाऱ्या शेतकरी मेळाव्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीला जात आहे, ठाकरे गट हीच खरी शिवसेना व सरकार आहे, त्यामुळे आजची उद्धव ठाकरेंची भेट ऐतिहासिक होईल, असा विश्वास यावेळी राऊतांनी व्यक्त केला. रामदेव बाबा यांनी ठाण्यातील कार्यक्रमात महिलांच्या बाबतीत विधान करताना म्हटले होते की, महिला या साडीमध्ये चांगच्या दिसतात, सलवार सूटमध्ये देखील चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, नेमक्या याच वक्तव्याने सध्या वाद सर्वत्र पेटलेला आहे.

 

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘मविआ’चा एकमताने महाराष्ट्र बंदचा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आधी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर जोरदार टीका होत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

राज्यपालांना हटवण्याची मागणीासठी महाराष्ट्र बंदमध्ये ठाकरे गटासह मित्र पक्षांनीही सहभागी व्हावे यासाठी आता संजय राऊत यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन विचारविनिमय केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्र बंदमध्ये ताकद दाखवण्यासाठी महाविकास आघाडीची आता मदत घेतली जाणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीला बरोबर घेऊन आता पुढची रणनिती आखली गेली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असणार असून हे आंदोलन होणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र बंद होणार असा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं पाणी दाखवावं असा इशाराही त्यानी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर बोलताना सांगितले की, राज्यपालांकडून वारंवार सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले जाते. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात पेट्रोल केवळ ६६ पैशांनी तर डिझेल ६४ पैशांनी झाले स्वस्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने खाली उतरल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर गेल्या ७ महिन्यातील निचांकी स्तरावर पोहोचले आहेत. आज ब्रेंट क्रूड ऑइल ८३.६३ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यापार करत आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत.

हिमाचल प्रदेशात पेट्रोल ०.६८ पैशांनी महागले असून पेट्रोलचा भाव प्रतिलिटर ९५.७४ रुपयांवर पोहचला आहे. त्याचवेळी डिझेल ०.५८ पैशांनी वाढून ८१.९९ रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झालं स्वस्त

दुसरीकडे, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ६६ पैशांनी कमी झाले आहे. पेट्रोल पाठोपाठ डिझेलच्या दरातही ६४ पैशांची घसरण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०५.९६ रुपये आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ९२.४९ रुपयांवर आले आहेत.

महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानमध्येही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल ०.५३ रुपयांनी तर डिझेल ०.४८ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दोन्हीच्या किमती अनुक्रमे १०८.०८ रुपये प्रति लिटर आणि ९३.३५ रुपये प्रति लिटर आहेत. देशातील ४ महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

देशातील चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल ९६.०३ रुपये. डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

 

महाराष्ट्र महिला आयोगाने नोटीस पाठवल्या मुळे रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी योग गुरू बाबा रामदेव अडचणीत आले आहेत. महाराष्ट्र महिला आयोगाने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवून दोन दिवसांमध्ये वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण मागितलं आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘ठाण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना बाबा रामदेव यांनी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठेला ठेच लागेल, असं अभद्र वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची तक्रार महिला आयोगाकडे आली आहे. महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणाची माहिती घेतली.

‘आम्ही याचा तीव्र शब्दात विरोध करतो. बाबा रामदेव यांनी त्यांच्या वक्तव्याचा खुलासा दोन दिवसात आयोगाच्या कार्यालयात करावा,’ असं ट्वीट महिला आयोगाने केलं आहे.

काय म्हणाले रामदेव बाबा ?

महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असं बाबा रामदेव म्हणाले. ठाण्यातील हायलँड भागात ‘पतंजलि योगपीठ’ आणि ‘मुंबई महिला पतंजलि योग’ समितीच्या वतीने दि.२५ रोजी शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ही उपस्थित होत्या. अमृता फडणवीस यांच्यासमोरच रामदेव बाबांनी हे वक्तव्य केलं.