Home Blog Page 76

पदवीला प्रवेश घेण्यासाठी मतदार ओळखपत्र बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमासाठी (ग्रॅज्युएट) कॉलेजमध्ये प्रवेश घेताना, इतर महत्वाच्या कागदपत्रांसोबत मतदार ओळखपत्रही द्यावे लागणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

वयाची १८ वर्षे पूर्ण झाली असल्यास, काॅलेजमध्ये पदवीला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना इतर कागदपत्रांसोबत ‘व्होटर आयडी’चीही झेराॅक्स द्यावी लागेल. कॉलेजला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी झाली की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. मतदार जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, की पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. आता त्यात मतदार ओळखपत्राचीही भर पडणार आहे. विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली की नाही, याची तपासणी प्रवेश देताना कॉलेजकडून केली जाईल. जेणेकरून लोकशाहीची मूल्यं जोपासत मतदार नोंदणीचे कामही यानिमित्ताने होणार आहे.

पदवीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा

दरम्यान, पुढील वर्षीपासून पदवीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा केला जाणार आहे. यासंदर्भात यूजीसीने मसूदा तयार केला असून, त्यांच्या गाईडलाईननुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल. या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत.

शिक्षण विभागाच्या नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना तयारी करावी लागेल. त्यात काही अडचणी आल्यास, सेवानिवृत्त कुलगुरूंची समिती वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

मिरारोडच्या सृष्टी-2 प्रकल्पाला हरित लवादाचा दणका! त्रिसदस्यीय उच्च समितीची स्थापना!

सीआरझेड मध्ये पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर केलेले बांधकाम पाडण्यासाठी केलेल्या याचिकेची हरित लवादाकडून दखल! प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय उच्च समितीची स्थापना करण्याचे आदेश!

मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड पूर्व येथील विकासक मे. एव्हरस्माईल प्रा.ली. यांचे सृष्टी सेक्टर-२ (अ) मध्ये गृहनिर्माण प्रकल्प बांधणी प्रकल्प हा सीआरझेड बाधित जागेवर शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम व खोदकाम केल्याने ते बांधकाम पाडण्यासाठी हरित लवाद न्यायालय (NGT), पुणे यांच्याकडे याचिका दाखल केली होती.

त्या याचिकेची दखल घेत हरित लवाद न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करून सृष्टी प्रकल्पास दणका दिला असून यामुळे असंख्य लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आता येणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सागरी किनारा व्यवस्थापन समिती पर्यावरण विभाग यांचे अधिसूचना व पर्यावरण विभाग भारत सरकार यांच्या 2006 यांच्या अधिसूचनेनुसार बांधकाम करण्या अगोदर पर्यावरण विभागाची परवानगी घेणे आवश्यक असतानाही विकासकाने 3 लाख 23 हजार 656 मीटरची बांधकाम परवानगी घेत त्याठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता पूर्णभरण करून बांधकाम सुरुवात केले.

त्याच बरोबर महापालिकेने बांधकाम परवानगी देताना अटी-शर्तीमध्ये पर्यावरण विभागाची परवानगी घेऊनच बांधकाम करण्यात यावे असे स्पष्टपणे सांगितले असतानाही विकासकाने सदरील जागेवर खोदकाम व बांधकाम करत योग्य त्या उपाययोजना न करता बांधकाम सुरूच ठेवले.

मिरारोड पूर्व, मौजे- पेणकर पाडा येथील सर्व्हे क्रमांक ६५ व ६८, ६९ याठिकाणी सीआरझेड-१ व सीआरझेड-२ मध्ये तसेच उच्चतम भरती रेषा (Hightide line) असलेल्या ह्या जागेवर महापालिकेकडून पर्यावरण विभागाची परवानगी घेऊन बांधकाम करण्याच्या अटी-शर्तीवर परवानगी देण्यात आली होती. मात्र विकासक मे. एव्हरस्माईल प्रा. लि. यांनी सीआरझेड बाधित जागा असतानाही त्या ठिकाणी शासनाच्या पर्यावरण विभागाची कुठलीही परवानगी न घेता बेसमेंट अधिक, पोडीयम व तळ अधिक नऊ मजल्याच्या इमारती बांधले आहेत.

त्या ठिकाणी झाडे कापणे अश्या प्रकारे पर्यावरणाचे नुकसान झाल्याने पर्यावरण प्रेमी इरबा कोनापुरे व साबीर सय्यद यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्याचीच न्यायालयाने दखल घेत सिया (महाराष्ट्र पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण), एमपीसीबी(महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ), एमसिझेडिएमए(महाराष्ट्र राज्य सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण) यांची नियुक्ती करून अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे.

हे आदेश हरित लावादाचे न्यायाधीश दिनेश सिंह व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आदेश दिले आहेत. तर याचिका कर्त्यांचे काम ऍडव्होकेट नितीन लोणकर, सोनाली सूर्यवंशी, तानाजी गंभीरे यांनी कामकाज पाहिले आहे.

मिरा-भाईंदर शहरात पर्यावरणाचा ऱ्हास करून अनेक ठिकाणी सीआरझेड क्षेत्रात बांधकामं केले जात असून पर्यावरण विभागाची परवानगी न घेता उभारण्यात येणाऱ्या अशा गृह संकुल प्रकल्पामुळे अनेक लोकांची कोट्यवधीची गुंतवणूक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनेक वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या रूग्णावर मिरारोडच्या वॉक्हार्ट रूग्णालयात मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण!

कॅडेव्हर प्रोग्रामव्दारे ब्रेन-डेड झालेल्या ७३ वर्षाच्या रूग्णाच्या कुटूंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे एका तरूणाने मिळाले जीवनदान!

मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड पूर्वेकडील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे 73 वर्षांच्या ब्रेन-डेड रुग्णाच्या कुटुंबाने त्याच्या अंतिम इच्छा म्हणून रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या रुग्णाने केलेल्या मूत्रपिंड (किडनी) दानामुळे याच रुग्णालयातील एका ४३ वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.

वॉक्हार्ट रूग्णालयातील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ. पुनीत भुवानिया आणि सल्लागार यूरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. आशुतोष बघेल यांनी एकत्रितपणे ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे.

दिल्लीचा सौरव मुखर्जी हा ४३ वर्षीय पुरूष रुग्ण क्रोनिक किडनी विकारामुळे गेल्या ४ वर्षांपासून डायलिसिसवर होता. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (ZTCC) आणि वोक्हार्ट रूग्णालयाच्या कॅडेव्हर प्रोग्रामद्वारे रुग्णाला किडनी मिळाली. तो दिल्लीहून मुंबईला रवाना झाला आणि आवश्यक क्रॉस-मॅच चाचणीनंतर ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली असून मीरारोडच्या वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी मूत्रपिंड(किडनी) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. १० दिवसांनंतर त्याला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून आता तो सामान्यपणे जीवन आपले जगत आहे.

डॉ. पुनीत भुवानिया, वोक्हार्ट रूग्णालय, मीरारोड येथील कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन यांनी माहिती देताना सांगितले की, डोनर हे ७३ वर्षीय गृहस्थ होते. त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे ब्रेन डेड घोषित करण्यात आले होते. या दात्यामुळे सहा जणांचे जीव वाचवले जाऊ शकतात असे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले. त्यांच्या कुंटूंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेत मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे आणि त्वचा दान करण्यात आली. त्यापैकी श्री सौरव यांना किडनी मिळाली असून वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे.

अवयव दानामुळे एक व्यक्ती ८ लोकांचे जीव वाचवू शकते. यामध्ये मूत्रपिंड, यकृत, हृदय, आतडे, डोळे, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि त्वचेचा समावेश असतो. प्रत्येक वर्षी अंदाजे ५०,००० पेक्षा जास्त लोकांना मूत्रपिंड (किडनी) निकामी झालेल्या रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते तर त्यापैकी फक्त ५००० पेक्षा कमी रुग्णांना प्रत्यारोपणाची संधी मिळते.

आपल्या देशात अवयव दानाबद्दल जागरुकतेच्या अभावामुळे विविध उपक्रम राबविण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपले अवयव दान करण्याचे वचन दिले पाहिजे कारण आपल्या मृत्यूनंतरही आपण ८ लोकांचे जीव वाचवू शकतो. प्रतीक्षा यादीतील अधिकाधिक लोकांना अवयव मिळावेत म्हणून प्रत्येक नागरिकांनी अवयवदानाची शपथ घेणे गरजेचे आहे.

गरजू रुग्णाला मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यासाठी दोन मार्गांनी मिळू शकते, प्रथम जेव्हा त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांनी त्यांना एक किडनी दान केली किंवा दुसरी ते राज्य शव प्रत्यारोपण कार्यक्रम यादीमध्ये स्वतःची नोंदणी करतात.

“माझी किडनी निकामी झाल्यानंतर मला किडनी प्रत्यारोपणाची नितांत गरज होती. मी जगेन की नाही अशी शंका होती. पण वोक्हार्ट रूग्णालयाने घेतलेल्या अमर्याद परिश्रमामुळे वेळीच किडनी प्रत्यारोपण होण्याचे भाग्य मला लाभले. लाखो जीव वाचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे येऊन अवयव दान करावेत अशी माझी इच्छा आहे” असे रुग्ण श्री सौरव यांनी सांगितले असून त्यांनी वोकहार्ड रुग्णालयातील डॉक्टर आणि त्यांचे नर्सिंग स्टाफ यांचे आभार मानले आहे.

नौदल आणि एनडीए अकादमी परीक्षेत मराठी मुलींचे सुयश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला) आणि नौदल अकादमी (एझिमला,केरळ) यांच्यासाठी युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत अनुष्का बोर्डे आणि वैष्णवी गोर्डे यांनी देशात अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. या परीक्षेत एकूण ५१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रुबीन सिंहने या परीक्षेत पहिल्या क्रमांकाचे यश मिळवले आहे.

युपीएससी कडून १० एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्विसेस सिलेक्शन बोर्डाद्वारे मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर हा अंतिम निकाल जाहिर करण्यात करण्यात आला. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मुलींना या संरक्षण दलाच्या या परीक्षांमध्ये समान संधी देण्यात आली होती. जून २०२२ पासून एनडीए मध्ये मुलींची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी दाखल झाली. आता अनुष्का आणि वैष्णवी यांनी मिळवलेले हे यश पाहून अनेक मुलींना या स्पर्धेचे क्षितिज खुणावू लागेल असा विश्वास वाटत आहे.

 

दिव्यात रेशनिंग ऑफिस व रेशनिंग दुकानाची संख्या वाढविण्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या घरात गेली आहे. येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दिव्यात नवीन रेशनिंग ऑफिस व नवी रेशनिंग दुकानांना परवानगी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन केली. यावेळी भाजपचे शिवाजी आव्हाड यांच्या प्रत्यक्ष भेट व मागणी नंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ फोनवरून याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे जिल्ह्यातील दिवा शहराची लोकसंख्या मागील काही वर्षात वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनते येथे प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. रेशनिंग सुविधांच्या बाबत येथील नागरिकांना डोंबिवली व मुंब्रा या शहरांवर अवलंबून राहावे लागते. दिवा शहरात रेशनिंग ऑफिस नसल्याने व रेशनिंग दुकानांचे जाळे मजबूत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी या गंभीर विषयावर मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिवा शहरात रेशनिंग ऑफिस व वाढीव रेशनिंग दुकाने यांना मंजुरी द्यावी अशी मागणी केली. या मागणीची तातडीने दखल घेत मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिकारी यांना याबाबत आदेश दिले असल्याची माहिती शिवाजी आव्हाड यांनी दिली.