Home Blog Page 74

बुलढाण्यातून निवडणूक लढविण्याचे शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देत खुले आव्हान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये नेहमीच शाब्दिक खडाजंगी बघायला मिळते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी मेळावा घेतला होता, यावेळी या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर शिरसंधान केले होते. या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केलेल्या खोचक वक्तव्याचा शिंदे गटातून समाचार घेण्यात आला असून, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.

सविस्तर वृत्तानुसार, बुलढाणा जिल्हयातील चिखली येथील सभेत शिंदे गट आणि भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला उद्देशून हिम्मत असेल तर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान दिले होते. नेमक्या या वक्तव्याने खासदार प्रतापराव जाधव यांच्या वर्मावर घाव केला असून उद्धव ठाकरेंच्या या विधानाला त्यांनी तितक्याच रोखठोक भाषेत उत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, मी पुढची पाच वर्षे निवडणूक केवळ शिवसेनेच्याच तिकिटावर लढणार आहे. भाजपकडून निवडणूक लढविण्याचा प्रश्नच कुठे उपस्थित होतो. आम्ही शिवसैनिक आहोत आणि केवळ बाळासाहेबांचे विचार पुढे नेत चाललो आहे, असे स्पष्ट मत यावेळी प्रतापराव जाधवांनी मांडले. भाजप आमचा जुना मित्र पक्ष आहे व त्याच पक्षाला पुढे घेऊन आम्ही निवडणूक लढविणार आहे असे देखील मत यावेळी जाधवांनी मांडले.

 

नवीन उद्योग उभारणीबाबत ५० हजार कोटींची गुंतवणूक आणण्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांचे वचन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातून आतापर्यंत सहा प्रकल्प बघता-बघता एकापाठोपाठ दुसऱ्या इतर राज्यात गेले असल्याने राज्य सरकार आणि उद्योगमंत्र्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. हे सर्व प्रकल्प मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीक्षम असल्याने अनेक बेरोजगारांना आपल्या तोंडचा घास कुणीतरी पळविला असल्याचे याप्रसंगी जाणवले. प्रसंगी विरोधक आणि सामाजिक स्तरातून नाराजीचा सूर देखील आवळला गेला. आता मात्र, खुद्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ५० हजार कोटींची उद्योग गुंतवणूक राज्यात आणण्याचे वचन दिले आहे.

सविस्तर वृत्तानुसार, जर्मनीतील काही उद्योगसमूह महाराष्ट्रात उद्योग गुंतवणूक करण्यास उत्सुक असून, याचाच भाग म्हणून भेटीकरिता पुण्यात जर्मन शिष्टमंडळ आले असल्याची माहिती सामंतांनी दिली. या भेटीमुळे रखडलेले उद्योग सुरु होणार असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्या जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. दाओसमधील काही कंपन्यांचे ‘एमओयू’ करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली, तसेच पुण्यात ज्या जर्मन कंपन्या सोलर, विंड, ऑटोमोबाईल आणि बॉयलर इत्यादी मध्ये कार्य करत आहे, त्यादेखील मोठी गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे सामंतांनी सांगितले. येत्या काळात महाराष्ट्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक आणणार हे आश्वासन नाही तर वचन देत आहे, असे मत सामंतांनी मांडले.

एकंदरीतच उद्योगमंत्र्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यास नक्कीच रोजगार पूरक उद्योगउभारणी होण्यास हातभार लागणार आहे, यामुळे अनेक बेरोजगारांचा प्रश्न सुटणार आहे. लवकरच सिनारामस हा १० हजार ५०० कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते, त्यामुळे या सर्व बाबी सत्यात उतरण्याची सर्वांना आशा लागून राहणार आहे.

 

“राणी लक्ष्मीबाई पुरस्कार” मिळाल्याबद्दल ‘अपेक्षा सुतार’ सारख्या खेळाडूंमागे सरकारचे पाठबळ राहील” म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तिचा घरी जाऊन केला सत्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रत्नागिरी येथील अपेक्षा सुतार सारखे खेळाडू क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील तर त्यांना आमचे सरकार नक्की पाठींबा देईल. क्रीडा विभागाच्या कोट्यातून सरकारी नोकरीत सामावुन घेऊ. तिच्यासारखे खेळाडू निर्माण होणे ही रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या दृष्टीने काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

उस्मानाबाद येथे झालेल्या ५५ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महिला गटातून महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करत देशातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा ‘राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ पटकावणार्‍या अपेक्षा सुतार या गुणवान खो-खो पटूचा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तिच्या कुवारबाव येथील घरी जाऊन सत्कार केला.

दि.२८ रोजी सोमवारी सायंकाळी कुवारबाव येथील सुतार यांच्या घरी हा कार्यक्रम झाला. पुरस्कार प्राप्त अपेक्षाला मंत्री सामंत यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. याप्रसंगी अपेक्षाचे वडील अनिल सुतार, तिची आई, भाऊ आणि सुतार कुटूंबीय, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष बाळू साळवी, संतोष कदम, फैय्याज खतिब, उल्का पुरोहित, कुवारबाव मधील प्रतिष्ठीत नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी सुतार कुटूंबियांतर्फे पुष्पगुच्छ देऊन मंत्री सामंत यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंत्री सामंत यांनी स्वतःहून अपेक्षाचा केलेला हा गौरव तिच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे सुतार कुटूंबियांतर्फे उल्का पुरोहीत यांनी सांगितले. मंत्री उदय सामंत यांच्या पाठींब्यामुळे आज रत्नागिरीत सर्व मैदानी खेळांमध्ये विविध खेळाडू यश मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मंत्री सामंत म्हणाले, अपेक्षा सुतार हीचे अभिनंदन करत असतानाच तिच्या प्रशिक्षकांचेही अभिनंदन करत आहे. महाराष्ट्राचे क्रिडाक्षेत्रातील प्रतिनिधीत्व करण्याची संधी अपेक्षाला मिळाली ही रत्नागिरीकरांचे भाग्य आहे. अशी मुले क्रिडा क्षेत्रात पुढे येत असतील, तर आमचे सरकार त्यांना नक्कीच पाठींबा देईल. भविष्यात क्रीडाविभागचा कोट्यामधून नोकरीत सामावून घेण्यासाठी आम्ही ठामपणे प्रयत्न करु. अपेक्षा सारखे खेळाडू निर्माण होत असतील तर रत्नागिरीसह महाराष्ट्राच्या क्रीडासंस्कृतीच्या वाढीसाठी काळाची गरज आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

 

यजमान महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम; महाराष्ट्राच्या महिलांचे २४ वे अजिंक्यपद तर रेल्वेचे ११ वे अजिंक्यपद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राचा भारतीय विमान प्राधिकरण संघावर डावाने विजय मिळवत उस्मानाबाद येथे यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघाने ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. महाराष्ट्राच्या महिलांचे हे २४ वे अजिंक्यपद ठरले आहे.

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघाचा ११-९ असा डावाने शानदार विजय मिळविला. महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीनेच संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. प्रियांका इंगळे (३.३० मिनिटे व २ गुण), अपेक्षा सुतार (२.२o व १.१०मिनिटे व १ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. पूजा फरगडे हीने ४ गडी बाद करीत आक्रमणाची बाजू सांभाळली. दुसऱ्या डावात रेश्मा राठोड २.२० व दिपाली राठोड हीने २.३० मिनिटे संरक्षण केले. भारतीय विमान प्राधिकरण संघाकडून वीणा (१.१० मिनिटे नाबाद), ऋतुजा खरेने (१.२० मिनिटे), जान्हवी पेठे हीने (१.०० मिनिटे व १ गुण) संरक्षण करीत एकाकी लढत दिली.

पुरुषांमध्ये रेल्वेची हॅट्ट्रिक साधत ११ वे अजिंक्यपद, महाराष्ट्राला उपविजेतेपद तर कोल्हापूरला तृतीय क्रमांक

भारतीय रेल्वेने यजमान महाराष्ट्रावर १४-१२ असा ४५ सेकंद राखून विजय मिळवित हॅटट्रिक केली. रेल्वेचे हे ११ वे विजेतेपद आहे. नाणेफेक जिंकून रेल्वेने संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राने पहिल्या आक्रमणात ६ गडी बाद केले. रेल्वेने ७ गडी बाद करीत मध्यंतरास एका गुणाची निसटती आघाडी घेतली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही ६ गडी टिपले. विजयासाठी रेल्वेला ६ गुण मिळवायाचे होते. त्यांनी ७ गुण मिळवित हॅटट्रिक केली.
रेल्वेकडून अक्षय गणपुले (२.०० व १.३० मिनिटे), महेश शिंदे (१.५० व १.४० मिनिटे व २ गुण), अमित पाटील (१.३० मिनिटे व १ गुण), विजय हजारे (१.१० मिनिटे), मिलिंद चौरेकर ३ गुण यांनी शानदार खेळी केली.
महाराष्ट्रकडून रामजी कश्यप (१.४० व १.३० मिनिटे व १गुण), प्रतिक वाईकर (१.५० मिनिटे), अक्षय भांगरे (१.१० मिनिटे व ४ गुण) यांनी लढत दिली.

अपेक्षा सुतार, अक्षय गणपुले सर्वोत्कृष्ट

अपेक्षा सुतार राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची मानकरी तर अक्षय गणपुले एकलव्य पुरस्कारचा मानकरी ठरला. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतर्फे पुरस्कारप्राप्त पुरुष व महिला खेळाडूना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पारितोषिके विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे नाईक निंबाळकर, आमदार श्रीकांत भारतीय, कल्याणराव काळे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय व्यवस्थापक दत्तात्रय कावेरी, अभिनेत्री किरण डहाने, भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी यांच्या उपस्थितीत देण्यात आली. त्यांचे स्वागत डॉ. चंद्रजीत जाधव, रहिमान काझी व अनिल खोचरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.ज्योती वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आली.

सोलापूरचा रामजी कश्यप सर्वोत्कृष्ट संरक्षक

या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू असे :
अष्टपैलू : अपेक्षा सुतार, अक्षय गणपुले
संरक्षक : रेश्मा राठोड, रामजी कश्यप
आक्रमक : नसरीन, विजय हजारे

 

 

स्वतंत्र मराठवाडाच नाही तर मुंबई ही केंद्रशासीत करू – गुणरत्न सदावर्ते


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबई ही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे खळबळजनक वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी पवारांनाही लक्ष्य केले आहे.

सदावर्ते यांनी यावेळी पवार चव्हाण आणि देशमुख अशी तीन कुटुंबं मराठवाड्याचे मारेकरी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले “शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शिप्टा नावाची एकमेव कंपनी या भागात आणली. त्या तुप्पा भागातील कष्टकरी त्यांना मतदान देण्यासाठी उत्सुक नव्हते. त्यावेळी वेगळ्या पक्षाची कामगार चळवळ होती म्हणून ती शिप्टा कंपनीही बंद पाडण्यात आली. सामान्य लोकांना आवाज नव्हता. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध नेते शरद पवार व कुटुंब , शंकरराव चव्हाण व कुटुंब आणि विलासराव देशमुख व कुटुंब हेच मराठवाड्याचे मारेकरी आहेत. म्हणून आम्ही खनिजाच्या सर्वंकष अभ्यासानंतर मराठवाडा स्वतंत्र राज्य झाले पाहिजे ही मागणी घेऊन पुढे आलो आहोत,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं. यावेळी मराठवाड्याला वेगळी वागणूक दिल्याचा आरोप करत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी आणे यांनीही मला पाठिंबा दिला आहे, असा दावा सदावर्ते यांनी केला आहे.

मुंबई वेगळी का हवी ? या प्रश्नावर गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “ज्याप्रमाणे पंजाबची राजधानी चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, त्याचप्रमाणे मुंबाईलाही केंद्रशासित प्रदेश केलं पाहिजे. मुंबई २४×७ सुरू ठेवायची असेल, तिचं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल, जगाची आर्थिक राजधानी ठेवायची असेल तर मुंबई केंद्रशासित प्रदेश झाली पाहिजे. अशी भुमिका मांडलीआहे. त्यामुळे आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता आहे.