Home Blog Page 77

फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान प्रकल्पामार्फत बाल सुरक्षा सप्ताह साजरा..

+
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान मार्फत पुणे आणि पिंपरी – चिंचवड येथे अनेक ठिकाणी बाल सुरक्षा साप्ताह १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला. फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान ही वीस वर्षापासून बाल लैंगिक अत्याचार (CSA) विरोधात काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक जनजागृती, समुपदेशन आणि पुनर्वसन, पोलीस सहकार्य आणि कायदेशीर सहाय्य, केवळ मुलांवरच नव्हे तर तरुण प्रौढ, पालक, शिक्षक, पोलीसांसोबत मिळून बदल घडवून आणण्यासाठी काम करते.”


बालदिनानिमित्त फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन (एफएफसीपी) – मुस्कानने कासारवाडी येथील छत्रपती शाहू महाराज व शुक्रवार पेठेतील डॉक्टर वसंतदादा पाटील माध्यमिक विद्या निकेतन येथे सलग दोन दिवस शाळेतील भिंतीवर “वाँल पेंटिंग” च्या माध्यमातून बाल लैंगिक अत्याचार थांबावा व मुलं सुरक्षित रहावे यासाठी संदेश देण्यात आला. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग दर्शविला. संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी बाल लैंगिक अत्याचार विरोधी या विषयी पथनाट्याचे सादरीकरण केले. यातून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श कसा ओळखावा व असुरक्षित स्पर्श झाल्यास त्याच वेळी नाही म्हणा, सुरक्षित ठिकाणी जा व विश्वासातील व्यक्तीला सांगून या घटनेबाबत कायदेशीर पद्धतीने दाद मागा हा पथनाट्यातून संदेश देण्यात आला व याचे सादरीकरण विविध ठिकाणी करण्यात आले.

बाल सुरक्षा सप्ताह निमित्त, एफएफसीपी – मुस्कान व पोलीस यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड परिसरात बाल लैंगिक अत्याचारापासून मुलांना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने व बाल लैंगिक अत्याचाराच्या वास्तविकतेबद्दल लोकांना जागृत करणे आणि त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहित करणे यासाठी रॅलीचे आयोजन केले. अशा प्रकरणांबद्दल न घाबरता किंवा लाज न बाळगता एफएफसीपी – मुस्कान संस्थेच्या हेल्प लाईन क्रमांक ९६८९०६२२०२ , ९११२२९९७८५ व ९११२२९९७८४ वरती संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

राज्यपाल हटवा’, शिंदे गटातून उमटला सूर; मराठी व्यक्तीला राज्यपाल पद देण्याची मागणी..


संपादक: मोईन सय्यद  / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून वेगवेगळ्या प्रकारे राज्यपालांवर टीकेची झोड उठत आहे. यापूर्वी विरोधक राज्यपालांना धारेवर धरत असल्याचे चित्र होते, मात्र आता सत्ताधारी आमदारांकडून राज्यपालांना हटविण्याची मागणी होत असल्याचे चित्र आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान नितीन गडकरी यांची तुलना शिवाजी महाराज यांच्यासोबत केल्याने यापूर्वी संभाजीराजे यांनी राज्यपाल हटविण्याची मागणी करणार असल्याचे वक्तव्य केले होते.

आतापर्यंत संभाजी ब्रिगेड, खासदार संजय राऊत, उदयराजे भोसले, विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे इत्यादी नेत्यांनी राज्यपालांना खडे बोल सुनावले होते. त्यामुळे राज्यपालांविरोधात चांगलीच वातावरण निर्मिती झाली आहे, आता थेट शिंदे गटातील आमदाराने राज्यपालांविरोधात संताप व्यक्त केला असून, राज्यपालांना राज्यातून हटविण्याची मागणी केली आहे.

शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे. यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले, “ज्या राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, ज्यांना राज्य काय आहे हे कळत नाही अशा व्यक्तीला आपल्या दिलदार राज्याच्या ‘राज्यपाल’पदी ठेवण्यात येऊ नये. हल्लीच्या राज्यपालांना कुठे पाठवायचे तिथे पाठवा परंतू महाराष्ट्राच्या मातीतील मराठी माणसालाच राज्यपालपदी बसवा”, अशी विनंती संजय गायकवाड यांनी भाजपकडे केली आहे.

यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी सूचक मत व्यक्त करताना प्रकरणाची सावरासावर करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खुद्द सहकारी पक्षातील आमदारांकडून राज्यपाल विरोधी सूर उमटत असल्याने, या प्रकरणाला निवळने सत्ताधाऱ्यांसाठी आव्हान ठरणार आहे.प्रसंगी केंद्र सरकारला देखील यामध्ये मध्यस्थता करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

पत्रकारांना शिवीगाळ किंवा धमकी दिल्यास होणार तीन वर्षांचा तुरुंगवास तर पोलीसांनी पत्रकारांशी गैरवर्तन केल्यास एफआयआर दाखल होईल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हायकोर्टाच्या टीकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे की, पत्रकारांना शिवीगाळ, धमकी तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असून रू.५० हजाराचा दंड आणि गैरवर्तन करणाऱ्याला ३ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सर्व राज्यांच्या गृह सचिव यांना सूचना पाठविल्या आहेत. पत्रकारांना धमकी देणाऱ्याला तुरुंगात पाठविण्यात येणार असून पत्रकारांना धमकावल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांना सहजा सहजी जामीन मिळणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्यांचेशी संपर्क करावा आणि मदत करा व पत्रकारांशी आदराने बोला नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. असे मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले.

गैरवर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर एफआयआर नोंदवला जाईल नाहीतर एमएसपी (MSP) वरती कारवाई केली जाईल. पत्रकार जमावाचा भाग नाहीत हिच बाब लक्षात घेऊन ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांनी प्रत्येक राज्य सरकारांना ताकीद दिली असून पत्रकारांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही ठिकाणी हस्तक्षेप किंवा हाणामारी करू शकत नाही. जसा एखादा वकील आपल्या अशिलाचा हत्येचा खटला न्यायालयात लढत असतो तसा तो खुनी होत नाही अगदी तसेच पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात. पण ते गर्दीचा भाग नसतात त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामा पासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे.

यासंदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव, गृहसचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि सर्व राज्यांच्या गृहसचिवांना सूचना पाठविल्या असून पत्रकारांसोबत पोलीस किंवा निमलष्करी दलाकडून होणारा हिंसाचार खपून घेतला जाणार नाही असे स्पष्ट पणे नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांवर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी. पत्रकारांसोबत पोलिसांनी केलेला हिंसाचार हा प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. जो घटनेच्या कलम १९ मध्ये देण्यात आला आहे. आणि घटनेच्या ह्या कलमानुसार गैरवर्तन करणाऱ्या पोलीस किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

५५ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत यजमान महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ अंतिम फेरीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उस्मानाबाद येथे सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष व महिला खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या पुरुषांची भारतीय रेल्वे विरुध्द तर महिलांची विमान प्राधिकरण विरुध्द लढत होईल.


भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात सुरू आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरी खचाखच भरली होती. रेल्वे-कर्नाटक वगळता प्रेक्षकांना चुरशीच्या सामने पाहण्यास मिळाले.

उपांत्य फेरीच्या पुरुष गटाच्या सामन्यात महाराष्ट्रने कोल्हापूरला १९-१५ असे नमविले. मध्यंतराची १०-८ ही २ गुणांची आघाडीच महाराष्ट्रास विजय मिळवून देऊन दिली. रामजी कश्यपने दोन्ही डावात १.४०, १.१० मि. संरक्षणची खेळी केली. अनिकेत पोटेने (१.२० मि. व ४ गुण) अष्टपैलू कामगिरी केली. निहार दुबळेने ४ तर सूयश गरगटे व प्रतिक वाईकर यांनी प्रत्येकी ३ गुण संघास मिळवून दिले. सूयश गरगटेने १.२० मि. संरक्षण व प्रतिक वाईकरने १ मि. संरक्षण केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महेश शिंदेच्या २.४० मिनिटे शानदार संरक्षणाच्या खेळीमुळे भारतीय रेल्वेने कर्नाटकचा ११-९ असा डावाने दणदणीत विजय मिळविला. कर्नाटकच्या धनराजची खेळी अपुरी पडली.

उपांत्य फेरीच्या महिला गटात महाराष्ट्राने दिल्लीस १९-१० असे पराभूत केले. प्रियांका इंगळे व काजल भोर यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी ५ गुण संघास मिळवून दिले. प्रियांका भोपी बरोबरच अपेक्षा सुतार, संपदा मोरे व दिपाली राठोड यांनी प्रत्येकी २.१० मिनिटे अशी संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. दिल्लीकडून सीमाची अष्टपैलू खेळी (१.१० मि. संरक्षण) अपुरी पडली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय विमान प्राधिकरण संघास ओरिसावर १२-१० असा विजय मिळविता कडवी झुंज द्यावी लागली. अर्चना व स्मरणिका यांच्या भक्कम संरक्षणाच्या खेळीमुळे ओरीसाने मध्यंतरास ६-६ असे बरोबरीत रोखले होते. त्यानंतर मात्र, विमान प्राधिकरण संघाच्या ऋतुजा (२.००, १.४० मि. व ४गुण) मोनिका (१.३०, १.५० मि. व २ गुण), एम वीणा (२.५०,२.१० मि.) व तेजस्विनी (२.५० मि.) यांनी बहारदार खेळी करीत संघाचा विजय खेचून आणला.

राष्ट्रीय स्पर्धेतील अष्टपैलू ठरणार्‍या पुरुष व महिला खेळाडूला अनुक्रमे एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार दिला जातो. या स्पर्धेत एकलव्य व राणी लक्ष्मीबाई पुरस्कार विजेत्या खेळाडूला उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतर्फे प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे.

 

एकत्र येण्याची उद्धव ठाकरे यांची प्रकाश आंबेडकरांना साद; एकाच कार्यक्रमात दोन्ही नेते उपस्थित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत महाविकास आघाडीची साथ धरली असली तरी नवीन पक्षांना आपल्यासोबत जोडत भाजप – शिंदे गटाविरुद्ध वेगळे राजकीय डावपेच आखण्याचे प्रयत्न सध्या दिसून येत आहे. मुंबईतील शिवाजी मंदिर येथे प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या पुर्नस्थापना करण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर एकत्र आल्याचे दृश्य बघायला मिळाले. वंचितकडून याआधीच उद्धव ठाकरे गटाला एकत्र येण्याकरिता प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नव्हते. मात्र नुकतेच हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र आल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून प्रकाश आंबेडकर यांना एकत्रित येण्याची साद घालण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देश सध्या गुलामगिरीकडे जात आहे. अशा वेळी आपण उघड्या डोळ्याने हे सर्व बघणार का ? निद्रेच्या आहारी गेलेल्या लोकांना जागविण्याचे गरज आहे, ते कार्य आपल्यालाच करावे लागेल. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी उडी घेत समाजाला जागविले होते, तेच कार्य आज करण्याची गरज असल्याने एकत्र येणे गरजेचे आहे. आतापर्यंत घटनेप्रमाणे किती कार्य झाले आणि घटनाबाह्य किती कार्य झाले हे बघणे तसेच त्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. सध्या हे बघण्याचे धाडस कुणामध्ये नाही, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका मांडली तसेच येत्या काळातील लोकसभा निवडणुकीत एकत्र येण्याचे संकेत दिले. यामुळे लवकरच वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती झाल्यास, नवल वाटण्यासारखे काही नाही असे म्हणावे लागेल. या कार्यक्रमाच्या मंचावरून या दोन्ही नेत्यांनी जणू आगामी काळात होणाऱ्या युतीची घोषणाच केली असे देखील म्हटल्यास गैर ठरणार नाही.