Home Blog Page 78

नाशिक महापालिकेच्या विविध विषयांबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेत महापालिका क्षेत्रातील मोकळ्या भूखंड वापरासाठी नाममात्र भाडे आकारणीसाठी नियमात केली सुधारणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापालिका कार्यक्षेत्रातील मोकळ्या भूखंडांचा वापर धर्मादाय संस्थांमार्फत ना नफा तत्वावरील समाजोपयोगी उपक्रमासाठी होत असतो. अशा संस्थांना भूखंडासाठी पूर्वीप्रमाणे नाममात्र शुल्क आकारणीसाठी नियमात आवश्यक बदल करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विषयांबाबत बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे बोलत होते. बैठकीला खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रताप सरनाईक, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, नाशिक महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, सिडकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुंडे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १०७५ भूखंडावर स्वंयसेवी आणि धर्मादाय संस्थांच्यामार्फत वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, अभ्यासिका, व्यायामशाळा यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात. भूखंडासाठी भाडे आकारणीचा नियम बदलल्याने या संस्थांना आर्थिक अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित भूखंड वापरासाठी पूर्वीप्रमाणे नाममात्र भाडे आकारण्यात यावे, यासाठी नियमात सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. या सुधारणेचा फायदा राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील समाजोपयोगी उपक्रमांना होणार आहे. तसेच नाशिक मधील सिडकोचा शहर विकासाचा उद्देश पूर्ण झाल्याने त्या क्षेत्रातील जमिनी ‘फ्री होल्ड’ करण्याच्या दृष्टीने शासन सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावित किकवी धरणाच्या कामासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीत नाशिक महापालिका क्षेत्रातील ऑनलाईन बांधकाम परवानगी प्रणाली, रिक्त पदांची भरती, प्रस्तावित रिंग रोड यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, विनोद जगदाळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करतात. कोविड काळात शासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकत्रितरित्या संकटाचा सामना केला. वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते. बातमी मिळविताना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच अधिस्वीकृती समिती लवकरच स्थापन करण्यात येईल. मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी २५ लाख रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

राज्याला पुढे नेण्यासाठी विकास व पत्रकारिता महत्वाची

मुख्यमंत्री म्हणाले, पत्रकार सकारात्मक दृष्टिकोनातून काम करीत असतात. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. ते सातत्याने समाजाचे प्रश्न मांडतात, स्वातंत्र्यपूर्व काळात दर्पणकारांपासून ही परंपरा सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार कठीण परीस्थितीत आपले कर्तव्य पार पाडतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याला पुढे नेताना विकास व पत्रकारितेचे महत्वाचे योगदान आहे आणि भविष्यातही राहील.

मराठी पत्रकार परिषदेने मराठी माणसाचा विचार पोहोचविण्याचे कार्य केले

मराठी पत्रकार परिषद देशातील पहिली संघटना आहे. ८३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेने गोवा, बेळगाव, बिजापूर, कारवार आणि महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील शाखांसह सयुंक्त महाराष्ट्र साकारला याचा सर्वांना आनंद आहे. आचार्य अत्रे, बाळासाहेब भारदे, नरेंद्र बल्लाळ, नारायण आठवले, अनंत भालेराव अशा मोठ्या व्यक्तिमत्वांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. परिषदेने मराठी माणसाचा विचार पोहोचविण्याचे कार्य केले.

गतिमान वृत्तांकनात बातमीतील सत्यता राखण्याचे मोठे आवाहन

आज समाज माध्यमामुळे वृत्तांकन गतिमान होत आहे. चहूबाजूने माहितीचा मारा होत असताना बातमीत सत्यता राखण्याचे आवाहन आपल्यासमोर आहे. वाचकाचा विश्वास कायम ठेवण्याचे आवाहनही आहे आणि म्हणून संघटनेची प्रबोधनाची भूमिका महत्त्वाची आहे. चौथा स्तंभ असलेली माध्यमे आणि शासनाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. शासनाचे जिथे लक्ष जात नाही अशा भागातील समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचे काम पत्रकार करतात, त्यामुळे एकप्रकारे शासन प्रशासनाला मार्गदर्शन होते आणि नागरिकांना न्याय मिळतो.

चार महिन्यात जनकल्याणाचे अनेक निर्णय..

गेल्या चार महिन्यात शासनाने घेतलेल्या पेट्रोल दरवाढ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना यासारख्या चांगल्या निर्णयांना माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. समृद्धी मार्गाचा १४ जिल्ह्यांना लाभ होणार आहे. पुणे रिंगरोड, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प पुणेकरांना उपयुक्त ठरणार आहेत. कात्रज आणि विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी टाळण्याबाबतही प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत.

सर्वच शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्यची मर्यादा २५ हजारावरून ३ लाखापर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविकात देशमुख यांनी अधिवेशनसंबंधी माहिती दिली. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न अधिवेशनाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘कै. स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे स्मृती आरोग्य पत्रकारिता’ पुरस्कार संदीप आचार्य यांना प्रदान करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेतर्फे यावर्षीपासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.

 

राज्यपालांच्या विधानावर त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याची प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी केले आपले मत व्यक्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकतेच काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरगांबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी राज्यपालांनी बोलताना जुन्या काळातील आदर्श हे शिवाजी महाराज होते तर आजच्या काळातील आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते नितीन गडकरी आहे असे म्हटले होते. प्रसंगी राज्यपालांनी शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी यांच्यासोबत केल्याने राजकीय वादंग निर्माण झाले आहे. अनेक नेत्यांनी राज्यपालांच्या विधानावर निषेध नोंदविला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी नुकतीच ‘अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धा २०२२’ च्या समारोपाला पुणे येथे हजेरी लावली होती त्यावेळी राज्यपालांच्या विधानावर सूचक मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा आदर्श नाही. ते सर्वांचेच आदर्श आणि प्रेरणा आहेत. महाराजांच्या शौर्याची आणि कार्याची माहिती सर्व देशाला आहे, राज्यपालांना देखील त्यांच्याविषयी चांगली माहिती आहे. राज्यपालांच्या मनात कुठलीही शंका नाही, मात्र राज्यपालांनी केलेल्या विधानाचा विनाकारण विपर्यास करत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे.” अशा प्रकारे राज्यपालांच्या विधानावर फडणवीसांनी स्पष्टीकरण देत आपले मत मांडले आहे. पोलीस बदल्यांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, जे अधिकारी बदलीस पात्र आहे त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत, बाकी बदल्या या अद्याप झाल्या नाही. सर्व बदल्या आजवर नियमांनुसार झाल्या आहेत.

एकंदरतीच राज्यभर राजकीय वर्तुळातून गेल्या दोन दिवसांपासून राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केल्याने जी खळबळ माजली होती, त्याला उपमुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण देताना प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न दिसून आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील फडणवीसांच्या सारखेच विधान केल्याने सत्ताधारी नेत्यांकडून या प्रकरणी राज्यपालांची पाठराखण करण्याचा प्रयत्न देखील होत असल्याचे जाणवत आहे.

 

केंद्रीय पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र दौरा सुरु; महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची होणार पुनर्रचना..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. या दौऱ्याची सुरुवात पुणे शहरापासून करण्यात आली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष तसेच महाराष्ट्र समन्वयक नितीन पुंडे यांची भेट घेतली. पुणे शहरातील विधानभवान येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियातील काही महत्वाच्या पत्रकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. या वेळी ‘लोकमत’चे उत्तम पाटील, ‘पुण्यनगरी’चे नितीन पाटील, ‘इंडिया २४ तास’चे नितीन पुंडे, ‘मेकिंग महाराष्ट्र’चे चेतन शिंदे, ‘बारामती टाइम्स’चे मन्सूर शेख, ‘शेतकरी योद्धा’चे योगेश नालांदे, ‘विशाल संविधान’चे श्रीपती खंडागळे, ‘पोलीस वॉरंट’चे संतोष साळवी आणि ‘खादी एक्स्प्रेस’चे अरविंद वाघमारे उपस्थित होते. सभेदरम्यान पत्रकारांना पत्रकारिता करताना येणाऱ्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच पत्रकारांच्या आर्थिक विकास हेतू एका नवीन प्रकल्पाची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली.

सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन हि एक राष्ट्रीय संघटना असून संपूर्ण भारतात या संघटनेबाबत जागरूकता करून पत्रकारांच्या समस्या जाणून घेण्याचा तसेच त्यांना संघटीत करण्याचा मानस असल्याचे संदिप कसालकर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे लवकरच महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची पुनर्रचना करण्यात येणार असून फक्त प्रिंट तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामधीलच पत्रकारांचा या संघटनेत सहभाग असेल असेही विधान राष्ट्रीय अध्यक्षांनी यावेळी केले आहे. सोबत केंद्रीय पत्रकार संघटनेच्या नावाने काही बनावट संघटना या महाराष्ट्रात कार्यरत असून, पत्रकारांनी अश्या संघटनांपासून सावधान रहावे तसेच अश्या संघटनांविषयी कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ संपर्क करावे, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे ‘केंद्रीय पत्रकार संघ’ (CPJA) च्या लीगल सेल विभागातर्फे तर्फे सांगण्यात आले आहे.

 

५५ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला खो-खो स्पर्धेत विजयी सलामी देताना डावाने विजय मिळवले.

भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सुरू झाली. आज झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही सामने मॅटवर झाले.

पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर २०-८ असा डावाने विजय मिळविला. यात सुयश गरगटे २:२० मिनिटे संरक्षण व ५ गुण मिळवत अष्टपैलू खेळी केली. रामजी कश्यपने ३:२० मिनिटे संरक्षण करताना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे सांभाळली. निहार दुबळेने आपल्या धारदार आक्रमणात ४ गुण मिळवले. मध्यप्रदेश कडून विवेक यादव व सागर यांनी प्रत्येकी २-२ गुण मिळवत एकाकी लढत दिली.

महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने तेलंगणाचा १९-६ असा डावाने धुवा उडवला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने तेलंगणा विरुद्ध ७ गुण मिळवताना विजयाची पायाभरणी केली. रेश्मा राठोडने (२:१० मि. संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू खेळ केला तर रूपाली बडे व दिपाली राठोड (प्रत्येकी २:५० मि. संरक्षण) व अपेक्षा सुतार (२:४० मि. संरक्षण) यांनी महाराष्ट्राला मोठा विजय मिळेल याची काळजी घेतली. तेलंगणाच्या कृष्णम्माने दिलेली अष्टपैलू लढत अपुरी पडली.

कोल्हापूर व गतविजेत्या रेल्वेचे शानदार विजय

अन्य एका मराठी खेळाडूंचा भरणा असलेल्या पुरुषांच्या सामन्यात गतविजेत्या रेल्वेने मणिपूरला १३-११ असे डावाने पराभूत केले.

कोल्हापूरच्या पुरुष संघाने सुद्धा उत्तर प्रदेशवर १५-१० असा डावाने विजय मिळविला. कोल्हापूरच्या आदर्श मोहितेने आपल्या धारदार आक्रमणात आठ गुण मिळवत १:३० मिनिटे सरक्षणाची खेळी केली, अविनाश देसाईने (२:१० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळी केली. रामेश्वर यादवने १ मि. संरक्षण करताना २ गुण मिळवले.

अन्य निकाल : महिला
तामिळनाडू वि.वि. पुदूचेरी १३-५, पश्चिम बंगाल वि.वि. झारखंड १८-८ डावाने, गुजरात वि.वि. मध्यभारत १०-५ डावाने, केरळ वि. वि. दादरा नगर हवेली २६-१ डावाने, मणिपूर वि.वि. इंडियन तीबेट बॉर्डर पोलीस १०-७ डावाने, भारतीय विमान प्राधिकरण वि.वि.मध्य प्रदेश १७-१४, कर्नाटक वि.वि. छत्तीसगड ११-५ डावाने, हरियाणा वि.वि. हिमाचल प्रदेश २४-४ डावाने.

अन्य निकाल : पुरुष
कर्नाटक वि.वि. झारखंड १२-७ डावाने, दादरा नगर हवेली वि.वि.अरुणाचल प्रदेश १७-१४, जम्मू काश्मीर वि.वि. इंडियन तीबेट बॉर्डर पोलीस २५-७ डावाने, तेलंगणा वि.वि. गोवा १७-८ डावाने, तामिळनाडू वि.वि. पंजाब १५-१३ डावाने, आंध्र प्रदेश वि.वि. राजस्थान १२-११ (७.२० मिनिटे राखून), ओरिसा वि.वि. सीमा सुरक्षा बल १३-१२ (६.३० मिनिटे राखून).