Home Blog Page 81

फेसबुक ‘मेटा’ च्या देशातील प्रमुखपदी भारतीय महिला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

समाज माध्यम क्षेत्रातील बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सध्या नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. फेसबुकची मुळ कंपनी असलेल्या ‘मेटा’ च्या भारतातील प्रमुखपदी आता संध्या देवनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्या ‘मेटा’ एशिया पॅसिफीकच्या गेमिंग बिझनेसची जबाबदारी सांभाळत आहेत. जानेवारीपासून त्या ‘मेटा’च्या भारतातील प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारतील.

अनेक हाय प्रोफाइल व्यक्ती ‘मेटा’ कंपनीतून बाहेर पडल्यानंतर संध्या देवनाथन यांची भारतातील प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. ‘मेटा’चे भारतातील प्रमुख अजित मोहन, सार्वजनिक धोरणासाठी कंट्री लीड राजीव अग्रवाल आणि ‘व्हॉट्सऍप’ चे भारत प्रमुख अभिजित बोस यांनी ‘मेटा’ मधुन राजीनामा दिला आहे. अजित मोहन यांनी प्रतिस्पर्धी कंपनी ‘स्नॅपचॅट’ मध्ये प्रमुख भूमिका घेण्यासाठी राजीनामा दिला, तर इतर दोन राजीनाम्यांची कारणे अद्याप अज्ञात आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘मेटा’ने ११ हजार कर्मचाऱ्यांना नोकरी वरून काढून टाकल्याचे वृत्त आहे.

मेटा कंपनी बाबत जाणून घ्या

फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सऍप ही लोकप्रिय सोशल मीडिया ऍप्स ‘मेटा’ कंपनीच्या मालकीची आहेत. मार्क झुकरबर्ग हा ‘मेटा’चा संस्थापक आहेत. ‘मेटा’ एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान समूह असून मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया येथे कंपनीचे मुख्यालय आहे.

 

राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही – उद्धव ठाकरे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांशी आपण सहमत नाही असे स्पष्ट करीत मात्र ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही त्यांनी याबाबत बोलू नये असा टोला उध्दव ठाकरे यांनी लगावला आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काल या सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस आणि रणजित सावरकर यांनी टीका केली होती.

आज उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी ठाकरे गटाचे नेते दिवाकर रावते, संजय राऊत, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

आपल्याला लढता, लढता दहा वर्षे पूर्ण झाली. आज दहावा स्मृतिदिन आहे. महापौर बंगल्यात लवकरच स्मारक होईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

बाळासाहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने फटकारे व्यंगचित्राचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, शिवसेना प्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्षे लागली, बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरू आहे, ते लवकरच पूर्ण होईल, भाजप सगळीकडचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण तो द्यायचा की नाही हा देशातील जनतेचा निर्णय आहे असे ते बोलताना म्हणाले.

 

स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल.

भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. या निवृत्तीवेतनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. यासाठी वार्षिक अंदाजे ७४.७५ कोटी रुपये इतका अधिक खर्च येईल. या निवृत्तीवेतन वाढीचा राज्यातील ६२२९ स्वातंत्र्य सैनिकांना लाभ होणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढा, हैद्राबाद मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम अशा देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी दरमहा निवृत्तीवेतन देण्याची योजना महाराष्ट्र शासनाने सन १९६५ पासून सुरु केली आहे. त्यानुसार २ ऑक्टोबर २०१४ पासून दरमहिन्याला १० हजार रुपये इतके निवृत्तिवेतन देण्यात येत होते.

 

कौटुंबिक वादातून बापाच्या डोक्यात लाकडी फळीचा फटका मारून त्यांना जागीच ठार मारणाऱ्या मुलाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बापाच्या डोक्यात लाकडी फळीचा फटका मारून ३१ वर्षीय मुलाने जन्मदात्या ६० वर्षीय बापालाच जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराची ही घटना अंबरनाथ पूर्वेतील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे.

प्रकाश देविदास सूर्यवंशी असे अटक आरोपी मुलाचे नाव आहे. तर देविदास किसन सूर्यवंशी असे हत्या झालेल्या बापाचे नाव आहे.

रक्तस्त्राव झाल्याने जागीच ठार

मृत देविदास हे पत्नी आणि आरोपी मुलगा प्रकाश यांच्यासह अंबरनाथ पूर्वेकडील दत्त कुटीर चाळीत राहत होते. गेल्या काही दिवसापासून बाप लेकात घरगुती कारणावरून कौटुंबिक वाद होत होते. बाप लेकाचा पुन्हा याच वादातून १३ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान घरातच वाद झाला. हा वाद यावेळी विकोपाला जात मुलाने घरात असलेल्या लाकडी जाड फळी उचून बापाच्या डोक्यात जोरदार फटका मारला. या जाड फळीच्या हल्ल्यात बाप जागीच जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी मुलगा पोलीस कोठडीत

दरम्यान, घटनेची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्यात समजताच पोलीसांचे एक पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत देविदास यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून हल्लेखोर मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर मृतकाच्या पत्नीने मुलाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीसांनी आरोपी मुलावर भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपी मुलाला दुपारच्या न्यायालयात हजर केले असता त्याला अधिक तपासाकरिता पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण कांबळे हे करीत आहेत.

केरळचे ‘बँड पथक’ ठरला ‘भारत जोडो’ यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लष्करी संचलनाप्रमाणे बिगुल, कवायतीची धून, ताशाचा कडकडाट आणि त्या तालावर अत्यंत शिस्तबद्ध रीतीने ‘लेफ्ट-राईट- लेफ्ट’ करत जाणारे “स्वर्गधारा बँड पथक” भारत जोडो यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

यात्रेत या १४ जणांच्या बँड पथकाला निश्चित असे स्थान आणि ओळख आहे. सर्वात पुढे या पथकाचे संचलन असते आणि मागे त्याच तालावर पाऊले टाकत यात्रा चालते. धून कानावर येताच राहुल गांधी यांची पदयात्रा जवळ आल्याचे गावागावात, चौकात उभ्या लोकांना कळते. हे बँड पथक केरळ मधील ‘स्वर्गधारा चॅरिटेबल ट्रस्ट’चे आहे.

अनेक सार्वजनिक व खाजगी समारंभ ते करतात. त्यातून मिळणारे उत्पन्न पथकातील कर्मचाऱ्यांचे पगार आणि शिल्लक रक्कमेतून गोरगरीब मुलांना शिक्षण, गरजवंत लोकांसाठी वैद्यकीय मदत दिली जाते.

नौदलाच्या बँड पथकाच्या धर्तीवर या पथकाला खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवृत्त नौदल अधिकारी सिनोय यांनी पाच महिने लष्करी शिस्त आणि संचलनाचे धडे दिले आहेत. नौदलाप्रमाणे सफेद गणवेश, काळे बूट आणि दंडक घेऊन संचलनाचे नेतृत्व करणारा कॅप्टनही आहे.

कॅप्टनसह प्रमुख दोन वादक असे तिघेजण संपूर्ण यात्रेसोबत असतील तर उर्वरित सदस्य दर महिन्याला बदलले जातात. आतापर्यंत दोन वेळा सदस्य बदलले आहेत. लांबचा पायी प्रवास आणि सतत वाद्य वाजवत शिस्तबद्ध संचलन केल्याने शरीरावर प्रचंड ताण येत असतो, त्यामुळे यात्रेसाठी एकूण ३० जणांचे नियोजन केले आहे, असे पथकाचे प्रमुख समीर के. यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

पहाटे साडेपाच वाजता पदयात्रा सुरू होण्याच्या स्थळी ते तयार असतात. काही क्षणातच राहुल गांधी दाखल होतात. मग “सारे जहाँ से अच्छा.. ” या धूनने सलामी दिली जाते आणि पदयात्रेला सुरूवात होते. तर “जन गण मन..” या राष्ट्रगीताच्या धूनने यात्रेला अल्पविराम मिळतो.

यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन यात्रेकरूंचे निधन झाले. त्या दिवशी श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि दुखवटा पाळण्यासाठी बँड पथकाचे संचलन बंद ठेवण्यात आले होते.

कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणाऱ्या १५० भारत यात्रींसोबत, राहुल गांधी यांचे अंगरक्षक, सीआरपीएफचे जवान, त्यांच्या भोवती राज्य पोलीसांचे ‘डी’ आकारातील सुरक्षा कड्यातील पोलीस पथक, यात्रेचे व्यवस्थान बघणारी दिल्लीची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची विशेष टीम आणि त्यांचे खास फोटोग्राफर, यांच्यासह हे बँड पथक सुद्धा न थकता आणि न थांबता मार्गक्रमण करत आहे.