Home Blog Page 82

चित्रपट अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या विलेपार्ले येथील राहत्या घरी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याचे निधन झाले. सुनील शेंडे हे घरामध्ये चक्कर येऊ पडले. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पार्थिवावर पारशीवाडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुनील शेंडे यांच्या पाश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुलं हृषिकेश, ओंकार आणि सुना असा परिवार आहे.

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांनी मराठीसोबतच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये दमदार भूमिका सारकारल्या होत्या. चित्रपट आणि मालिका या माध्यमांमध्ये काम केले होते. बॉलिवूडच्या ‘गांधी’, ‘सरफरोश’ आणि ‘वास्तव’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये सुनील शेंडे यांनी काम केले होते. या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका या अत्यंत लोकप्रिय ठरल्या. तसंच, त्यांनी ‘कथुंग’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘जसे बाप तसे पोर’, ‘ईश्वर’, ‘नरसिंहा’ या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे खूप कौतुक झाले. ‘गांधी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली छोटी भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. सुनील शेंडे यांनी डीडी दूरचित्रवाणीवरील ‘सर्कस’ मलिकेमध्ये बाबूजी (सर्कसचा मालक) ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

उच्च न्यायालयाने याचिका कर्त्यालाही फटकारत ठाकरे, राऊत, देशमुखांवरील सर्व याचिका फेटाळल्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निव्वळ प्रसिध्दीसाठी राजकीय हेतूने प्रेरीत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरील प्रसिद्धीसाठी दाखल केलेल्या याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

न्यायमूर्ती एस.व्ही.गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस.जी.डिगे यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी हेमंत पाटील यांनी अशाचप्रकारे दाखल केलेल्या तीन याचिकांही न्यायालयाने फेटाळून लावला आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटी वसुलीच्या आरोपांत उद्धव ठाकरे यांचीही तपासयंत्रणेनं चौकशी करावी, अशी मागणी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिकेतून केली होती. या याचिकेतही खंडणी उकळल्याचे आरोप करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत खंडणी उकळल्याचे आरोप केले होते. याशिवाय निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझेचाही उल्लेख होता.

तसेच, हेमंत पाटील यांनी संजय राऊत यांच्या विरोधात कोविड कालावधीत औषधोपचारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती. संजय राऊत यांच्यासह त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत, सुजीत पारकर यांच्यावरही या याचिकेत आरोप केले होते. पण ही याचिकाही निव्वळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा ठपका ठवला. तसेच, याचिकाकर्त्याने यात कोणतेही ठोस पुरावे, माहिती आणि कागदपत्रे दिलेली नसल्याचे निरीक्षणही नोंदवले.

याशिवाय हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नबाव मलिक यांच्याविरोधातही तिसरी याचिका दाखल केली होती. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमुळे सामाजिक सलोखा बिघडतो असा दावा याचिकेत पाटील यांनी केला होता. पण उद्धव ठाकरे यांच्यासह केलेल्या या सर्व याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी दाखल केल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

 

गुजरातमधील ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी च्या एकमेव आमदाराने राजीनामा देत शरद पवारांना दिला धक्का..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्याच्या घडीला देशात गुजरात मधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या तीन पक्षात मुख्य टक्कर होणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत वर्चस्व कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे. तर भाजपला रोखण्यासाठी विरोधक जोर लावत आहेत.

यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे गुजरातमधील एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी राजीनामा दिला आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पोरबंदरमधील कुटियाना येथून कंधाल जडेजा यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्यानंतर त्यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. कंधाल जडेजा हे २०१२ पासून कुटियाना मतदारसंघातून निवडून येत आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मतांनी जिंकून येत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता.

राज्यसभा निवडणुकीवेळी कंधाल यांनी बंडखोरी केली होती. उमेदवारी न मिळाल्याने कंधाल जडेजा यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे. राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी कंधाल जडेजा यांनी पक्षादेश झुगारुन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. कंधाल जडेजा यांनी ११ नोव्हेंबरलाच कुटियानामधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत उमरेठ, नरोडा आणि देवगड बारिया या तीन जागांसाठी आघाडी केल्याचे जाहीर केले होते. पक्षाविरोधात जाऊन उमेदवारी दाखल करणाऱ्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभेच्या १८२ मतदार संघांसाठी निवडणुका होत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर ला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल.मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

 

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीत नेमकी काय खलबतं शिजली ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहमंत्रालयाचा कारभार असल्याने विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मध्यंतरीच्या काळात महिलांबाबत राजकीय वर्तुळातून करण्यात आलेल्या विधानांनी गृहखात्याच्या स्वतःच्याच मंत्र्यांवर वचक नसल्याची ओरड झाली होती, ज्यामध्ये अब्दुल सत्तारांचे प्रकरण चांगलेच प्रकाशझोतात आले होते. पुन्हा एकदा हा मुद्दा नव्याने उचलून धरण्यात आला आहे, त्याच अनुषंगाने विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदारांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.

विरोधी पक्षातील महिलांनी राज्यातील सत्ताधारी नेते महिलांबाबत बेताल वक्तव्य करतात परंतू त्यांना गृह खात्याकडून तसेच सत्ताधारी नेत्यांकडून समज दिला जात नाही अशी तक्रार राज्यपालांकडे केली आहे. प्रसंगी गृहखात्याच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आले आहे. या महिला लोकप्रतिनिधींची राज्यपालांसोबत बैठक आटोपताच तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेण्यास पोहचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यापीठ कायदेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती पुढे आली असून राज्यपालांनी काही महत्वपूर्ण बाबतीत त्यांना सूचना देखील केल्याचे समजते. प्रसंगी राज्य सरकारमधील नेते मंडळींच्या बेताल वक्तव्याबाबतीत देखील राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. यापूर्वी अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या विधानाने राजकीय वातारवरण तापले होते आता विरोधी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड महिलेच्या विनयभंग प्रसंगी चर्चेत आहे. त्यामुळे या सर्व स्थितीमुळे कुठेतरी महिलांबाबतीत मुद्दे राजकीय वातावरण तापवताना दिसत आहे.

 

ट्विटर ‘ब्लू टिक’ साठी भारतात पैसे मोजावे लागणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ट्विटरची मालकी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते सातत्याने नवनवीन बदल करत आहेत. ट्विटरला विकत घेण्याचे एलॉन मस्क यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने ते आता नवीन बाबींना लागू करत ट्विटरला एक आगळेवेगळे स्वरूप देण्याकरिता प्रयत्नशील दिसून येत आहे. ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आल्यावर सर्वप्रथम त्यांनी अनेक जुन्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली होती. नव्याने ट्विटर करिता घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये ‘ट्विटर ब्लू’ पेड सब्स्क्रिप्शन चा समावेश आहे. त्यामुळे ट्विटरवर ब्लू टिक साठी शुल्क आकारणी केली जाणार असून सुरुवातीला विविध देशात ब्लू टिक साठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येईल असे कळविण्यात आले होते.

नव्याने ट्विटर ब्लू टिक साठी ट्विटरकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत माहिती पुढे आली असून भारतात ट्विटरवर ब्लू टिक करीत मासिक ७१९ रुपये इतकी शुल्क आकारणी केली जाणार असल्याचे समजते. हे एक पेड सबस्क्रिप्शन राहणार असून यामध्ये काही नवीन सेवावैशिष्ट्यांचा देखील लाभ वापरकर्त्यांना मिळणार आहे. भारतात सुरुवातीला असा अंदाज लावण्यात येत होता की ‘ब्लू टिक’ साठी मासिक ६६० रुपये मोजावे लागतील परंतू नव्याने पुढे आलेल्या माहितीमुळे या तर्कांना पूर्णविराम लागला आहे.

भारतात पुढील एक महिन्याच्या कालावधीत ‘ट्विटर ब्लू’ पेड सब्स्क्रिप्शन सुरु केले जाणार असल्याची माहिती ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी दिली होती परंतू सध्या काही जणांना ‘ब्लू टिक’ ऍक्सेस मिळत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यामुळे नवीन कुठल्या सेवा वैशिष्ट्यांचा अंतर्भाव ट्विटर मध्ये होणार याबाबतीत वापरकर्त्यांना उत्सुकता लागलेली आहे.

सध्या जरी ट्विटरने भारतात ७१९ रुपये इतक्या शुल्काची घोषणा केले असले तरी भविष्यात याबाबतीत काही बदल देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अनेक जणांनी भारतात ‘ब्लू टिक’ साठी आकारण्यात येणारी रक्कम अधिक असल्याचे मत व्यक्त केले आहे. प्रीमियम सेवा वैशिष्ट्यांमध्ये मोठ्या साईझचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा देण्यात येणार आहे, असे प्रथमदर्शी सांगण्यात आले होते.