Home Blog Page 85

देशाच्या राजधानीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला; नेपाळमध्ये भूकंपाचे केंद्रस्थान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश भागात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले ही घटना तब्बल दोनवेळा झाल्याने भीतीने अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. रात्रीला झालेल्या या भूकंपाचे केंद्रस्थान नेपाळमध्ये मणिपूर या ठिकाणी जमिनीच्या आत १० किलोमीटर खोल असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेपाळ मधील काही भाग देखील या भूकंपाने हादरला असून एकूण ६ जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आहे.

काल रात्री ९ वाजताच्या सुमारास उत्तर प्रदेशातील लखनऊ व आजपासच्या भागात प्रथम भूकंपाचे धक्के जाणवले होते ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी होती. त्यानंतर काही तासानंतर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास राजधानी दिल्ली व उत्तर भारतात जास्त तीव्रतेचे भूंकपाचे धक्के जाणवले. भारतात झालेल्या भूकंपामध्ये अद्याप कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्ता हानी झाल्याची नोंद नाही. मात्र नेपाळच्या बाबतीत ही जीवितहानी करणारी नैसर्गिक आपत्ती ठरली.

भारतात दोनदा भुकंपाचे धक्के जाणवले असले तरी नेपाळ अवघ्या २४ तासांत तीनवेळा भूकंपामुळे हादरला असून सध्या तिथे झालेल्या मालमत्ता हानीबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. यापूर्वी नेपाळने भूकंपांची सर्वात मोठी हानी सहन केली होती, ज्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला होता तसेच प्रचंड मालमत्ता हानी झाली होती.

 

माजी मंत्री अनिल परब यांचा ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अंतरिम जामीन मंजूर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांच्यावर दापोलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दापोलीतील मुरुड इथे बांधलेल्या रिसॉर्ट प्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असून प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण होण्याआधीच ग्रामपंचायतीशी संगनमत करून त्यांनी कर आकारणी करून शासन आणि ग्रामपंचायत यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दापोली पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी रूपा दिघे यांनी याबाबत पोलीसांत फिर्याद दिली असून अनिल परब यांच्यासह मुरुड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुरेश तुपे आणि ग्रामसेवक अनंत कोळी हेदेखील सह आरोपी आहेत.

दापोलीतील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि आमदार अनिल परब यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० आणि ३४ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अनिल परब यांना आज अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. खेड सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.

दापोलीतील ‘साई रिसॉर्ट’ प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परबांवर शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने अनिल परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे एक रिसॉर्ट बांधल्याचा आरोप होत आहे. २०१७ मध्ये अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी भूखंड विकत घेतला आणि कोरोनादरम्यान लॉकडाऊनच्या काळात या शेतीच्या भूखंडावर रिसॉर्ट बांधण्याचे काम केले.

मिळालेल्या माहितीनुसार, जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी २०१९ मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर २०२० मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी खासदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन १.१० कोटी रुपयांना विकण्यात आली. दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्या मते रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालय) २६ मे रोजी अनिल परब यांच्या सात ठिकाणी छापेमारी केली. तसेच त्यांच्या साथीदारांच्या घरांवरही छापे टाकून चौकशी केली. दरम्यान परब यांनी जमीन खरेदीपासून ते बांधकामात अनियमितता केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मात्र परब यांनी या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत सोमय्या यांच्यावर मानहानीचा दावाही दाखल केला आहे.

 

चंद्र, सूर्य आणि शुक्राविषयी सखोल संशोधनासाठी नव्या भरारीची तयारी करत ‘इसरो’चं नवीन मिशन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आता शुक्र आणि सूर्याच्या अभ्यासाच्या तयारीत भारताला चंद्राविषयीची सखोल माहितीही मिळेल. भारत शुक्र आणि सूर्याच्या अभ्यासासाठी स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करणार आहे. ‘इसरो’च्या नवीन मिशनबाबत गुजरातमधील अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे संचालक डॉ.अनिल भारद्वाज यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, भारत आकाशातील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. १९७५ मध्ये आर्य भट्ट या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर, भारताने अंतराळ विज्ञानात वेगाने प्रगती केली आणि स्वतःचे प्रक्षेपण केंद्र बांधले. आमची चंद्रयान आणि मंगळ मोहीम यशस्वी झाली आहे. भविष्यात आम्ही शुक्र आणि सूर्य ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आमचे तंत्रज्ञान विकसित करणार आहोत. जपानच्या ‘एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’ म्हणजेच जाक्साच्या सहकार्याने, आम्ही चंद्राच्या गडद ठिकाणी ‘मून लेन्सर’ आणि ‘रोव्हर’ ठेवण्याच्या मोहिमेवर वेगाने काम करत आहोत. या मिशनबाबत जपानच्या ‘एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी’सोबत बोलणी सुरू आहेत.

शुक्र आणि सूर्य ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी ‘इसरो’ ‘जाक्सा’सह करणार हातमिळवणी

उत्तरांचल विद्यापीठात आयोजित ‘आकाश तत्व’ या राष्ट्रीय चर्चासत्रात शेवटच्या दिवशी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात तज्ज्ञांनी आकाशाविषयी विविध पैलूंवर आपली मते मांडली. डॉ.अनिल भारद्वाज म्हणाले की, ‘इसरो’ जपानच्या सहकार्याने चंद्रावरील न उलगडलेले रहस्य शोधण्याचे काम करत आहे. ‘आदित्य एल-वन मिशन’वरही वेगाने काम केले जात आहे. अमेरिकेतील जॉर्ज मेसन विद्यापीठाचे प्रा. जे. शुक्ला यांनी हवामान बदल आणि हवामान अंदाजाची सद्यस्थिती सांगितली.

सूर्याच्या आत चालू असलेल्या क्रियाकलापांचे परिणाम डीआरडीओ शास्त्रज्ञ अंकुश कोहली यांनी भारतावर पर्यावरणीय बदल आणि विविध भू-आधारित तंत्रज्ञानाच्या दूरगामी परिणामांबद्दल जागरूक राहण्याचा सल्ला दिला.

आयआयटी मुंबई प्रा. गीता विचारे यांनी सूर्याच्या आत चालू असलेल्या क्रियांमुळे प्लाझ्माच्या रूपात मोठ्या प्रमाणात रेडिएशन आणि चार्ज केलेले कण आढळून आल्याने सौर वाऱ्याचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर काय परिणाम होतो, याचा भाष्य केले. त्या म्हणाल्या की, त्यात इतकी ऊर्जा आहे की ते आपली कम्युनिकेशन सिस्टीम, जीपीएस, ऑइल प्लांट, इलेक्ट्रिक ग्रीड यांसारख्या यंत्रणा नष्ट करू शकते.

‘नासा’चे शास्त्रज्ञ डॉ.एन.गोपाल स्वामी यांनी सूर्यावरील जगभरातील संशोधन आणि सूर्यावर घडणाऱ्या घटनांचे पृथ्वीवर होणारे परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली.

 

नासिकरोड पोलीसांनी मुंबईहून ट्रेन ने पळून जाणाऱ्या चोरट्यास केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईहून ट्रेन ने पळून जाणाऱ्या चोरट्यास नासिकरोड पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पायधूनी पोलीस स्टेशन मुंबई भादंवी कलम ४०८ अनुसार गुन्ह्यातील आरोपी संदीप अशोक कुमार शुक्ला (वय ३२) रा. गोंडा, उत्तर प्रदेश हा २८ लाख रुपये रोख घेऊन पळाला असुन तो ट्रेनने जात असल्याची माहिती पायधूनी पोलीस स्टेशन कडून नासिक रोडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना मिळाली. अनिल शिंदे यांनी त्वरित गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना सूचना दिल्या. अंमलदार शिंदे, अविनाश देवरे, विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे यांनी त्वरित पनवेल गोरखपूर एक्स्प्रेस मध्ये जीआरपी इगतपुरी चे पोलीस अंमलदार योगेश पाटील यांच्याशी संपर्क करुन आरोपीची माहिती दिली आणि नाशिकरोड रेल्वे स्थानकात गाडी पोहोचताच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली.

पोलीसांना बघून नागरिक घाबरून हैराण झाले, काय झाले ते लोकांनां समजेना, पोलीसांना बघून आरोपी पळत सुटला तेवढ्यात पोलीसांनी त्याला शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले. आरोपी संदीप शुक्ला याच्या कडे चोरी केलेले संपूर्ण २८ लाख रुपये पोलीसांना मिळाले आहेत. पायधूनी पोलीस ठाण्यात याबाबत नासिक रोड पोलीसांनी कळवले असुन पायधूनी पोलीस ठाण्यातील पथक आल्यावर आरोपीला त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. वरिष्ठ पोलीस निरक्षक यांनी केलेल्या त्वरित हालचालींमुळे आरोपीला पकडण्यास यश आले असे प्रसिद्धी माध्यमांना आले आहे.

 

काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ आज महाराष्ट्रात दाखल होणार; स्वागतासाठी मोठे नेते उपस्थिती लावणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या अनेक महिन्यांपासून देशांच्या विविध राज्यातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरु असलेली ‘भारत जोडो यात्रा’ आज ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. सध्या तेलंगणा मध्ये असलेली ही यात्रा तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेनजीक असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असून इथून पुढे राज्यातील इतर जिल्ह्यात ही पदयात्रा जाणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हुसेन दलवाई, सचिन सावंत, नसीम खान बाळासाहेब थोरात, मोहन जोशी इत्यादी नेते राहुल गांधींच्या स्वागतासाठी हजेरी लावणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रात भारत जोडो पदयात्रा १४ दिवस प्रवास करणार असून, सध्या नांदेडच्या देगलूर येथे या निमित्त जय्यत तयारी करणे सुरु आहे. पदयात्रेच्या सुनियोजनानूसार महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेड, अकोला, बुलढाणा, वाशीम इत्यादी जिल्ह्यातून ही यात्रा पुढे जाणार असून यानंतर पुढील प्रवासाकरिता मध्य प्रदेश राज्यात प्रवेश करणार आहे. आज राहुल गांधी यांचा मुक्काम नांदेडच्या देगलूर मध्ये राहणार असून अनेक मोठे नेतेमंडळी त्यांची भेट घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदित्य ठाकरे, राज्य प्रभारी एच. के. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव संतोष केणे हेदेखील या यात्रेत सहभागी होणार आहे परंतू या नेत्यांच्या नेमक्या तारखेबाबत अद्याप स्पष्टपणे माहिती पुढे आली नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील पदयात्रेत समावेश होणार असल्याची स्पष्टोक्ती अशोकराव चव्हाण यांनी दिली. एकंदरीतच राज्याचे राजकीय वातावरण राहूल गांधी यांच्या पदयात्रेने ढवळून निघणार असून महाविकास आघाडी नेते यानिमित्ताने एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्याची संधी साधताना दिसणार आहे.