Home Blog Page 84

वर्तक नगर पोलीसांनी केले जितेंद्र आव्हाड यांना अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज दुपारी पोलीसांनी अटक केली आहे. विवियाना मॉल मध्ये चित्रपट शो बंद पाडून प्रेक्षकाला मारहाण करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

‘हर हर महादेव’ या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत आव्हाड यांनी आपल्या समर्थकांसह चार दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियना मॉल मध्ये जाऊन चित्रपटाचा खेळ बंद पाडला होता, यावेळी एका प्रेक्षकाशी कार्यकर्त्यांची बाचाबाची होऊन त्यात त्या प्रेक्षकाला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी पोलीसांनी आव्हाड आणि त्यांच्या शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी नंतर मनसे ने विरोधी भूमिका घेत त्यादिवशी तो शो पुन्हा सुरू करण्यास भाग पाडले होते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच चित्रपटाचा खेळ प्रेक्षकांना मोफत दाखवला होता.

आज दुपारी या प्रकरणी पोलीसांनी आव्हाड यांना अटक केली असून सायंकाळी उशिरा पर्यंत त्यांना जामीन झाला नव्हता.

 

गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आधीच आमदार आणि खासदारांनी साथ सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका बसला आहे. शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. गजानन कीर्तिकर हे शिवसेनेतील वरिष्ठ आणि दिग्गज नेते मानले जातात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तिकरांची भेट घेतली होती. त्यामुळे कीर्तिकर शिंदे गटात जाणार अशा चर्चा तेव्हापासून रंगल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीवरील नाराजी गजानन कीर्तिकर यांनी अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे अनेकदा कीर्तिकरांनी शिंदेंचं तोंड भरून कौतुकही केलं होतं. त्यामुळे कीर्तिकर ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत जाणार का ? यावर तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

कोण आहेत गजानन कीर्तिकर

गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे दिग्गज नेते असून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. १९९० ते २००९ या काळात चार वेळा आमदार राहिले आहेत. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. गजानन कीर्तिकर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीत सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचं शिंदे गटात जाण उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

भातशेतीच्या जमिनीवर टाकले ‘कत्तलखाना’ चे आरक्षण! उत्तनवासीयांचा आरक्षणाला विरोध!

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला गलिच्छ करु नका! उत्तनच्या रहिवाशांची महापालिका प्रशासनाला विनंती

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: तब्बल पाच वर्षे उशिराने का होईना पण अखेर वादग्रस्त ठरलेला मिरा भाईंदर शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या विकास आराखड्यात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन, शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या भूखंडावर कत्तलखान्याचे आरक्षण टाकण्यात आले असून उत्तनच्या रहिवाशांचा या आरक्षणाला विरोध असल्याचे बोलले जात आहे.

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या उत्तनला आधी डम्पिंग ग्राऊंड सारखा घाणेरडा कचरा प्रकल्प दिला आणि आता त्याच परिसरात कत्तलखाना उभारण्यात येणार असून उत्तनच्या परिसरातील लोकांनाच मिरा भाईंदर महानगरपालिके कडुन असे घाणेरडे प्रकल्प का दिले जात आहेत? असा सवाल येथील नागरिकां कडून केला जात आहे.

उत्तनच्या धावगी येथील डम्पिंग ग्राऊंड मुळे आधीच येथील जनता त्रस्त झालेली आहे. या डम्पिंग ग्राऊंडमुळे संपूर्ण परिसरात घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे व त्यामुळे उत्तनच्या रहिवाशांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. त्यातच आणखीन दत्तमंदिर कोपरा ह्या ठिकाणी मेट्रो कारशेड होणार असल्याच्या बातम्या अनेक वर्तमानपत्रात येत आहेत, MMRDA विकास आराखड्यात येथे मलःनिसारण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. आणि आता उत्तन शिरेरोड येथे कत्तलखान्यासाठी (सर्वे नं 282/4) ही भातशेतीची जमीन संपादनासाठी लोकांना नोटिसा दिल्या असल्याचे सांगितले जात आहेत.

उत्तनमध्ये धावगी, डोगंर पायथा व शिरेरोड ह्या ठिकाणी वडीलोपार्जीत शेती व्यवसाय चालतो. उत्तन डम्पिंग ग्राऊंडच्या दूषित पाण्यामुळे तीकडची शेतजमीन नापीक झाली आहे. डंम्पीगमुळे येथील वातावरण, जमीन तसेच जल प्रदूषण देखील होत आहे. डंम्पीग ग्राऊंडचे दूषित पाणी समुद्रात जाऊन गेल्यामुळे येथील मासेमारीवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. असे असताना आता उत्तनमध्ये कत्तलखान्या सारखा घाणेरडा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या विकास आराखड्यात यापूर्वी देखील उत्तन परिसरात कत्तलखान्याचे आरक्षण टाकण्यात आले होते परंतु ह्या कत्तलखान्याला स्थानिकांचा आधिपासुनच विरोध आहे. कारण ह्या ठिकाणी बाहेरची गुरेढोरे आणुन ईथे कापली जातील ज्यामुळे घाण आणि दुर्गंधी पसरेल. घाणेरडे पाणी शेतात व समुद्रात जाऊन जल प्रदूषण होईल अशी भिती उत्तनच्या नागरिकांमध्ये पसरलेली आहे.

उत्तन परिसरातील रहिवाशांना चांगल्या सरकारी शाळा, कॉलेज, हॉस्पिटल असावे, चांगली उद्याने असावीत अशी सर्वाची ईच्छा आहे. कोळी लोकांना बोटीतुन मासळी उतरविण्यासाठी आधुनिक पद्धतीची जेटी असावी, मासळी साठविण्यासाठी आधुनिक पद्धतीचे शीतगृह असावे, मासळी विकण्यासाठी आधुनिक पद्धतीची बाजारपेठ/ मार्केट निर्माण करण्यात यावे, मासळी सुकविण्यासाठी Fish drying yards तयार करण्यात यावेत अशा मूलभूत सुविधांची गरज असताना महाराष्ट्र शासन आणि मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन मात्र उत्तन सारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात घाणेरडे प्रकल्प लादत असल्याने येथील नागरिकांमध्ये असंतोष पसरलेला आहे.

शिरेरोड येथील सर्वे क्रमांक 282/4 या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या कत्तलखान्याला अनेक नागरीकांनी हरकत घेतली असून हे आरक्षण रद्द न केल्यास उत्तनच्या रहिवाशां तर्फे मोठे जन आंदोलन केले जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.

भारत जोडो यात्रेला भाजपनेही पाठिंबा द्यावा; संजय राऊतांचे जाहीर आवाहन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शंभरहुन अधिक दिवसांची तुरुंगाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या बाळासाहेब उद्धव ठाकरे गटाच्य खासदार संजय राऊत यांच्या वागणुकीत आणि विचारसरणीत कमालीचा बदल जाणवत आहे. तुरुंगातून सुटल्यावर पहिली प्रतिक्रिया देताना काल राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली होती तसेच केंद्रातील बडे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे विधान केले होते. नव्याने संजय राऊत यांनी भाष्य केले असून यावेळी देखील त्यांचा कल भाजपकडे दिसून आला.

येत्या काळात लोक कल्याणाचा उद्देश ठेवत आपण विविध नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे राऊत म्हणाले, तसेच सध्या महाराष्ट्रात प्रवास करत असलेल्या भारत जोडो यात्रेचे यावेळी त्यांनी तोंडभरून कौतुक देखील केले. भारत जोडो यात्रा देशातील वैर व कटुता संपविण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ही यात्रा एकप्रकारे चळवळ आहे. त्यामुळे भाजपने देखील भारत जोडो यात्रेला पाठिंबा द्यावा, असे विधान संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केले.

एकंदरीतच राऊतांचे हे विधान अनेक जणांच्या भुवया उंचावणारे ठरणार आहे. लवकरच संजय राऊत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे, तत्पूर्वी त्यांनी केलेले हे मोठे विधान या भेटीवर काय परिणाम करणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते रस्त्याचे आणि भूमिगत नाल्याचे भूमिपूजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पावसाळ्यात वर्षानुवर्षे डोंबिवलीतील नांदीवली येथील स्वामी समर्थ मठ परिसरात पाणी तुंबून तेथील परिसरातील लोकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून हाल होत असतात व आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होत असते.

कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याच्या कामांसाठी एमएमआरडीए कडून मंजूर करून घेतलेल्या रुपये ४४५ कोटी पैकी ह्या विभागातील ‘गजानन चौक ते नांदीवली नाला’ हा रस्ता, ‘स्वामी समर्थ मठ ते मानपाडा रोड साईबाबा मंदिर’ रास्ता व ‘नांदीवली नाला ते लाईफ केअर हॉस्पिटल’ या परिसरात भूमिगत नाला बांधण्यात येत असून त्याचा भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते नियोजिलेले आहे. तरी परिसरातील समस्त नागरिकांनी या भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहण्यास कल्याण उप-तालुका प्रमुख उमेश बाबू पाटील व उप-शहर प्रमुख अमित बनसोडे यांच्या तर्फे सर्वांना निमंत्रण देण्यात येत आहे.