Home Blog Page 86

महाविकास आघाडी पक्षाचे १२ ते १३ आमदार संपर्कात असल्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला बॉम्ब..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसचे २२ आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवली. तर, महाविकास आघाडीचे आणखी १२ ते १३ जण शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला, असा बॉम्ब उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नेते उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मध्यावधी निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली. यावेळी त्यांनी हा धक्कादायक दावाही केला.

मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, याउलट महाविकास आघाडीचे आणखी १२ ते १३ जण शिंदे-फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. भाजप आणि शिंदे यांच्याकडे १७० चा आकडा असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. महाविकास आघाडीत काय समाविष्ट होणार, हे आज उघडकीस आले आहे. सध्या लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेल्यावर मी खोके घेतले होते का ? असा थेट प्रतिप्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केला आहे.

 

आमच्या सोबत केलेल्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी आम्ही तयारच होतो; फडणवीसांचा धक्कादायक खुलासा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही फक्त संधी शोधत होतो. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांच्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी आम्ही तयार होतो, असा धक्कादायक खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना सोडू इच्छित असल्याचे आम्हाला समजले. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. आमच्यासोबत झालेली बेईमानी, उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. तेव्हापासून आम्ही संधी शोधतच होतो. आम्ही संत नाही, नेते आहोत. जर ते आमच्याशी अप्रामाणिक असतीलल तर आम्ही त्याला उत्तर देऊच. माझ्यासोबत झालेल्या बेईमानीचा बदला मी घेतला, असा खुलासा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले की तुम्ही बाहेर पडणे चांगले आहे, आम्हालाही आमचा बदला हवा आहे. त्यानंतर अनेक घडामोडींनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेचे संपूर्ण श्रेय उद्धव आणि आदित्यजींना द्यावे लागेल, असे म्हणत शिंदे यांच्याशी केलेल्या वागणुकीमुळे त्यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला, असा टोमणाही त्यांनी मारला.

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर भाजपने सरकार स्थापन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यावर सवाल केला की, “मुख्यमंत्रीपदावर आल्यानंतर तुम्ही सरकारमध्ये दुसरे कोणतेही पद घेतल्यास तुम्ही सत्तेचे भुकेले आहात, अशी तुमची प्रतिमा बनते. पण आपण खुर्चीसाठी नाही तर परिवर्तनासाठी सत्ता बदलली आहे. गेल्या दोन ते अडीच वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या घटना पाहता हा बदल करण्यात आला आहे. म्हणूनच मी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला समजावून सांगितले की त्यांना महाराष्ट्रात सरकार चालवायचे आहे आणि त्यासाठी माझी गरज आहे, म्हणून मी हो म्हणालो.” अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’; उद्धव ठाकरेंनी केलं भाजपा-शिंदे गटाला लक्ष्य..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झालाय. यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘मशाल भडकली आणि भगवा फडकला’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं.

“कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे, असं म्हणत “लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

“नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे,” असा टोला लगावत उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या फडणवीसांच्या विधानावर ते म्हणाले की, लोकांसमोर सर्व घडलं आहे. आता कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा ‘महाराष्ट्र’ आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्र यात फरक आहे. सध्या शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सर्वजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते. विरोधकांनी माघार घेतल्यानंतर उत्साहावर थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे,” असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी दिलं. तसंच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आपण सहभागी होऊ का नाही हे नक्की नाही, पण आपले नेते सहभागी होतील असं त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं.

 

भाजप करणार नवीन गेम ! राजकीय वर्तुळात पुन्हा युतीची चाहूल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर राजकीय घडामोडींनी भलताच वेग घेतला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करून भाजपसोबत जाऊन राज्यात नवे सरकार स्थापन केले. त्याचप्रमाणे आता शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी करण्यासाठी मनसेचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज पुन्हा भेट होणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, आता प्रशांत दामले यांच्या साडेबारा हजाराव्या प्रयोगासाठी हे तिघे एकत्र येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. शिवाजी पार्क वरील दीपोत्सवानंतर तिन्ही नेते आज पुन्हा भेटणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी अधिकच वाढत आहेत. कधी एकमेकांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी, कधी शिवाजी पार्कमधील दीपोत्सवासाठी, तर कधी एखाद्या उद्योजकाच्या सामाजिक प्रकल्पासाठी एकत्र येत असल्याचे दिसत आहे.

इतकंच नाही तर महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या कार्यक्रमाच्या मुहूर्तावरही दोघे एकाच मंचावर दिसले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे अनेकवेळा एकत्र आलेत. त्यामुळे शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील सततच्या बैठका ही भविष्यातील युतीची नांदी तर नाही ना ? अशी चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे.

अंधेरी पोटनिवडणूक जिंकल्यानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ऋतुजा लटके या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. अंधेरी पोटनिवडणुकीतील हा विजय माझा नसून माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत जनसेवा आणि विकास कामेच केली आहेत. त्याची पोचपावती म्हणजेच अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील माझा विजय आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी विजयानंतर दिली.

उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांनी नोटाला मत देण्यासाठी प्रचार केला होता. त्याचे व्हिडीओही समोर आले होते. पण मतदारांनी या सर्व गोष्टी नाकारून शिवसेनेला मतदान केले. ज्या नोटांना मतदान झाले आहे ते भाजपचे आहेत. त्यामुळे त्यांनी माघार घेतली कारण त्यांना वाटले की, ” एवढी मते मिळाली असती, सहानुभूती असती तर त्यांनी आधी उमेदवार दिला नसता.” अशी टीका लटके यांनी केली.

रमेश लटके यांनी जे काही काम हाती घेतले ते पूर्ण करणार आहे. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय आहे. उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्या पाठिंब्यामुळे मी विजयी झाली आहे. आता मातोश्रीवर जाणार असल्याचेही लटके म्हणाले.

‘हा विजय पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे, त्यांचे मी आभार मानते. हा जल्लोष मी साजरा करणार नाही. माझ्या पतीचे निधन झाल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली. मी माझ्या पतीच्या जागेवर ही निवडणूक लढवली असून हा माझ्या पतीचा विजय आहे. अंधेरीचा विकास व्हावा, हा त्यांचा विचार होता. आम्हाला नवं पक्षचिन्ह मिळालं, त्या चिन्हाखाली हा विजय आहे. पण मला एक गोष्टीची खंत आहे. पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागली’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.