Home Blog Page 87

२०१४ च्या ‘कर्मचारी पेन्शन योजना’ कायदेशीर आणि वैध ठरवत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नोकरी करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. २०१४ च्या कर्मचारी पेन्शन योजनेबाबत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी मोठा निर्णय दिला आहे. २०१४ ची कर्मचारी पेन्शन योजना कायदेशीर आणि वैध असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. दिलासा देताना कोर्टाने महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी अद्याप कर्मचारी पेन्शन योजनेत सहभागी होण्याचा पर्याय वापरला नाही. त्यासाठी त्यांना आणखी सहा महिन्यांची मुदत द्यावी.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशभरात करोडो खातेदार आहेत. ईपीएफओ आपल्या खातेदारांच्या ठेवींवर व्याज देते. तसेच पेन्शन योजनेअंतर्गत किमान एक हजार रुपये पेन्शन दिली जाते. २०१४ च्या दुरुस्तीनुसार दरमहा १५ हजार रुपये मासिक वेतन आवश्यक होते. मात्र आता ही मर्यादा हटवण्यात आली आहे. ज्यांचे पगार १५ हजार रुपये आहे त्यांना दरमहा ६ हजार ५०० रुपये पेन्शन देण्यात येईल, असे त्यात म्हटले आहे. आता हा नियम कोर्टाने स्वीकारला आहे.

पेन्शन पॉलिसी अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १२% रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी कपात केली जाते. कंपनीच्या १५ हजार रुपयांच्या १२% शेअरपैकी ८.३३% पेन्शन योजनेत जातो. याशिवाय १.१६% रक्कमही सरकार पेन्शन फंडात भरते.

 

शीतपेयामधून नशेचे औषध पाजून तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ बनवत केले विद्यार्थ्याचे ब्लॅकमेलिंग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पार्टीच्या बहाण्याने कोल्हापूरला एका फार्महाऊसवर तीन मित्रांनी १९ वर्षीय एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला शीतपेयामधून नशेचे औषध पाजून एका तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ काढला. यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या विद्यार्थ्याला ब्लॅकमेल करत तीन मित्रांनी चाळीस लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम सोने लाटल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून याप्रकरणी डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात तीन मित्रांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत एकाला बेड्या ठोकल्या आहे. संजय राजपूत (वय २२) राहणार इचलकरंजी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम जाधव, रोहन संघराज (दोघेही रा. कावळानाका, कोल्हापूर) असे फरार आरोपींची नावे आहेत.

मित्रांनीच केला घात

डोंबिवली शहरातील गोग्रासवाडी भागात १९ वर्षीय पीडित तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. काही वर्षांपासून तो कोल्हापूरमधील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. तर आरोपीही याच महाविद्यालयात त्याच्यासोबत शिक्षण घेत असल्याने त्याचे मित्र आहेत. त्यातच २०२० मध्ये ऑगस्ट महिन्यात पीडित तरुणाला आरोपी मित्रांनी एका फार्महाऊसवर पार्टीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार तो पार्टी करण्यासाठी गेला होता. त्या पार्टीत आरोपी मित्रांनी त्याला शीतपेयामधून गुंगींचे औषध पाजून एका तरुणीसोबत त्याचे अश्लील व्हिडीओ काढले.

पीडित तरुणाचे ब्लॅकमेलिंग

त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी त्या विध्यार्थ्याला ब्लॅकमेल करत त्याच्या मागे लाखो रुपयांचा मुद्देमाल आणून देण्याचा तगादा लावला होता. आरोपींनी तरुणाकडून चाळीस लाख रुपये किंमतीचे आठशे ग्रॅम वजनाचे दागिने लाटले. दरम्यान हा ब्लॅकमेलच्या प्रकार वाढत असल्याने अखेर त्याने डोंबिवली गाठत तो राहत असलेल्या हद्दीतील टिळकनगर पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकाने संजय राजपूत या आरोपीला इचलकरंजीमधून अटक केली आहे.

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

टिळकनगर पोलीसांचे पथक अधिक तपासासाठी काल कोल्हापूरला रवाना झाले आहे. अटक आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात पीडित तरुण आणि आरोपींनी पोलीसांना दिलेल्या जाब जबाबात तफावत दिसून येत असल्याने टिळक नगर पोलीस त्या दिशेने या गुन्ह्याचा तपास करीत आहे.

राज्यातील सत्ता संघर्ष सुनावणी आता चार आठवडे लांबणीवर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुनावणी आता किमान चार आठवडे लांबणीवर पडली असून ती २९ नोव्हेंबर नंतर होईल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडे दोन्ही बाजूच्या वकिलांनी एकत्रित सुनावणीचे मुद्दे सादर करण्यासाठी तीन आठवड्याची मुदत मागितली होती.

त्याआधी कोर्टाने दोन्ही बाजूने एकत्रित बसून सुनावणीचे मुद्दे काढण्यास सांगितले होते. त्यानंतर दोन्ही बाजूने वेळ मागण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टाने २९ नोव्हेंबर पर्यंत हा अवधी दिला आहे. तोपर्यंत एकत्रित मुद्दे कोर्टासमोर सादर होतील आणि त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख न्यायालय निश्चित करेल, त्यामुळे ही सुनावणी आता पुढील महिन्यात नाताळ सुट्टी आधी होते की नंतर ते पाहावे लागेल.

हॉटेल मालकाला धमकावणाऱ्या गुंडाला कोळसेवाडी पोलीसांनी दिला चोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जेवणासाठी हॉटेल मालकाला चाकू दाखवणाऱ्या आरोपीला कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी भर चौकात चोप देत चांगलेच बदडले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

कल्याण सूचक नाका परिसरात आलिया दरबार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये २५ तारखेला सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान या परिसरातील बाबू नसीम शेख उर्फ बाबू जंगली नावाच्या गुन्हेगारानी मोफत जेवण घेण्यासाठी हॉटेल मालकाला चाकूचा धाक दाखवत हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात धिंगाणा घातला.

हॉटेल चालकांनी या गुन्हेगारांचा काटा काढण्यासाठी युक्तीचा उपयोग करत या गुन्हेगारांना मोफत जेवण दिले. आरोपी चाकू दाखवून धमकावत असल्याचे पोलीसांना सांगितले. व्यापाऱ्याची तक्रार येताच कोळसवाडी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन या आरोपाची चौकशी केली.

आरोपीकडून धारदार हत्यार पोलीसांनी ताब्यात घेतले. या आरोपीला धडा शिकवण्यासाठी आणि परिसरात या आरोपीची दहशत कमी करण्यासाठी कोळसेवाडी पोलीसांनी हॉटेल बाहेरच या आरोपीची चांगलीच धुलाई केली. वारंवार पोलीसात तक्रार देऊन फक्त दिखावाची कारवाई पोलीसांकडून होत आहे. प्रत्येक वेळी हा आरोपी दोन दिवसात सुटून येऊन पुन्हा परिसरात दहशत माजवत असल्याने परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात आहे. सध्या पोलीसांनी या आरोपीवर हत्यार बाळगण्याचा गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.

 

ग्राहकांना दोन लाखांपर्यंत होणार फायदा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

तुमचे कोणत्याही बँकेत खाते असल्यास, तुम्ही २ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळवू शकता. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे मात्र खरे आहे. अनेकांना याची खरी जाणीव नसते. हा फायदा कोणाला आणि कसा मिळेल, याबाबतची माहिती.

तुमचेही बँक खाते असल्यास, तुम्ही दोन लाख रुपयांचा लाभ मोफत घेऊ शकता. जनधन ग्राहकांना बँकेकडून ही सुविधा दिली जाते. बँक ग्राहकांना दोन लाखांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण देते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना दोन लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. याशिवाय ग्राहकांसाठी आर्थिक सेवा, बँकिंग बचत, क्रेडिट, विमा, पेन्शन अशा अनेक सुविधा आहेत.

जनधन खात्याचे फायदे

* सहा महिन्यांनंतर ओव्हरड्राफ्ट सुविधा
* दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा कव्हर
* ३० हजार रुपयांपर्यंत लाइफ इन्शुरन्स कव्हर, लाभार्थीच्या मृत्यूनंतर अटी आणि शर्थी पूर्ण करणाऱ्याला ते पैसे मिळतात.
* डिपॉझिटवर व्याज मिळतात
खात्यासह मोफत मोबाइल बँकिंगची सुविधाही दिली जाते.
* जनधन खाते उघडणाऱ्या व्यक्तीला रुपे डेबिट कार्ड दिले जाते, जेणेकरून त्याला खात्यातून पैसे काढता येतील किंवा खरेदी करता येईल.
* जनधन खात्याद्वारे विमा, पेन्शन उत्पादने खरेदी करणे सोपे आहे.
* जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रम योगी मानधनसारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते उघडले जाईल.
* देशभरात पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा
* सरकारी योजनांच्या लाभाचे पैसे थेट खात्यात येतात.

असं सुरू करता येईल खातं

तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन ते अगदी सहज उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिर्देशित व्यक्ती, व्यवसाय/रोजगार आणि वार्षिक उत्पन्न आणि आश्रितांची संख्या, एसएसए कोड किंवा प्रभाग क्रमांक, पिन कोड इत्यादींची माहिती द्यावी लागेल.

ट्रान्सफर करण्याचाही पर्याय

तुमच्याकडे मूलभूत बचत खाते जन धन योजनेत हस्तांतरित करण्याचा पर्यायदेखील आहे. जन धन योजनेत खाते असलेल्यांना रूपे कार्ड मिळते. २०१८ पर्यंत या खात्यावर विम्याची रक्कम एक लाख रुपये होती. आता ती वाढून दोन लाख रुपये झाली आहे. या खात्यावर ग्राहकाला अपघात विम्याचा लाभ मिळणार आहे.