Home Blog Page 88

मिरा-भाईंदर शहरात होणार महाराष्ट्रातील पहिले संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन!

ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असणारे वारकरी संप्रदायाचे भवन मिरा-भाईंदर शहरात तयार होणार असून या संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भावनांचा भूमिपूजन सोहळा 03 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृह सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमात संपन्न झाला.

सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मन ओपस सुविधा क्षेत्र भूखंडावर महाराष्ट्रातील पाहिले संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवनाचे निर्माण करण्यात येणार असून पुढील वर्षभरात या भवनाचे निर्माण कार्य पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमास शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, भाजपच्या आमदार गीता जैन, आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अनिकेत मनोरकर त्याच बरोबर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मिरा-भाईंदर शहरातील वारकरी संप्रदायाचे अनेक मान्यवर, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह याठिकाणी उपस्थिती दर्शवली. या ठिकाणी अंदाजे 2000 ते 2200 इतक्या वारकरी सांप्रदाय नागरिकांच्या उपस्थितीत ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचा हरीभक्ती कीर्तनाचा कार्यक्रम मोठया उत्साहाने संपन्न झाला.

कीर्तनात इंदुरीकर महाराज यांनी महाराष्ट्रात प्रथमच स्थापन होत असलेले वारकरी भवनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत मिरा भाईंदर शहरातील वारकरी सांप्रदायाला या वास्तूचा भविष्यात मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याचे महाराजांनी नमूद केले.

ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी वेळात वेळ काढून मिरा भाईंदर शहराच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सर्वप्रथम वारकरी भवन भूमिपूजन कार्यक्रमास आवर्जून उपस्थिती दर्शवली यासाठी आयुक्त दिलीप ढोले यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. त्याच प्रमाणे या कार्यक्रमाला सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, उपस्थित नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी वेळात वेळ काढून संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

उत्तनच्या समुद्रात सापडला दुर्मिळ वाघ्या जातीचा तब्बल 100 किलो वजनाचा पाकट मासा!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिमेकडील उत्तन भाटेबंदर येथे अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा वाघ्या जातीचा पाकट मासा मच्छिमारांच्या गळाला लागला असून त्यांचे वजन तब्बल 100 किलो एव्हढे असल्याचे बोलले जात आहे.

उत्तनच्या भाटे बंदर येथील एका इंजिन नसलेली लहान बोट जी फक्त वल्ले मारून खडकामद्ये मिळणारी #lobster (शिवंड) पकडण्यासाठी समुद किनाऱ्या पासून अर्ध्या ऐक तास अंतरावर सकाळी ६ वाजता जाते आणि 9 वाजता परत येते. या लहान बोटीतून समुद्रामध्ये ज्या ठिकाणी उथळ पाणी आणि चिखल असतो अशा ठिकाणी गळ टाकून मासेमारी केली जाते. त्या मच्छिमारांच्या गळाला हा भला मोठा वाघ्या जातीचा पाकट मासा लागला आहे.

ज्या बोटीतून हे मच्छिमार गेले त्या बोटीचे नाव एकवीरा आई आहे तर बोटीच्या मालकाचे नाव सुनील असून तो आणि त्याचा भाऊ हे दोघे दोन दिवसांपूर्वी सकाळी मच्छीमारीसाठी गेले असताना त्यांना हा दुर्मिळ पाकट मासा गळाला लागला.

वाघ्या पाकट हा क्वचित सापडणारा मासा आहे. त्याचा रंग गडद तांबडा असतो आणि त्याच्या अंगावर वाघाच्या कातडी सारखी आकृती असते म्हणून त्याला स्थानिक मच्छीमारांच्या भाषेत वाघ्या पाकट बोलले जाते. या माशाचे वजन जवळपास 100 किलो असल्याचे बोलले जात आहे तर बाजार भावानुसार त्याची किंमत अंदाजे पाच ते सात हजार भरेल असे बोलले जात आहे.

उत्तनच्या समुद्रात कमी खोलीच्या पाण्यात पहिल्यांदाच हा वाघ्या पाकट जातीचा आणि जवळपास 100 किलो वजनाचा हा दुर्मिळ मासा मच्छीमारांच्या गळाला लागल्यामुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांच्या निधीतून विकासकामांचा शुभारंभ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील मानपाडा रोडसाठी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यामार्फत २७ कोटीचा निधी मंजूर झाला होता. मात्र मधल्या काळात ही कामे मागे पडली होती. पण विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कामातील अडथळे दूर केले असून लवकरच मानपाडा रस्त्याचे काम सुरू होईल. रस्त्यांच्या कामाला सुरूवात होईपर्यंत रस्त्यावर पॅच लावण्याची विनंती केली असल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित पत्रकारांसमोर दिली आहे.

आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून मतदार संघातील विविध कामांचे भूमीपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी आमदार राजू पाटील बोलत होते. आमदारच्या निधीतून देसलेपाडा येथील रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत ‘सद्गुरू आर्केड’ ते ‘श्री गणेशनगर’ पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणासाठी रुपये २५ लाख, ‘अमा पॅलेस’ ते ‘शिवस्पर्श सोसायटी’ करिता रुपये २५ लाख तर ‘शिवस्पर्श सोसायटी’ ते ‘सलोनी प्लाझा’ बिल्डींग पर्यंत काँक्रीटीकरणासाठी रुपये २५ लाखाचा निधी देण्यात आला आहे.

शुभारंभ प्रसंगी, घारिवली गावचे सरपंच योगेश पाटील, हेदुटने गावचे सरपंच तकदीर काळण, काटई गाव उपसरपंच काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, काटई ज्येष्ठ नागरिक दगडु पाटील, घेसरचे साईनाथ भोईर, माजी नगरसेविका रविना माळी, भाजपाचे अमर माळी, बळीराम पाटील, महेश माळी, प्रल्हाद माळी, संजय देसले, दिलीप देसले, निर्मल भोईर, सुदेश चुडनाईक, ओम लोके, आदी पदाधिकारी तथा मनसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आमदार पाटील म्हणाले, कल्याण ग्रामीण परिसरातील लोकसंख्या जास्त आहे त्याप्रमाणो या परिसरातील समस्या देखील जास्त आहेत. कडोंमपा मालमत्ता कर घेतात पण सुविधा देत नाही. कडोंमपा रस्त्यातील खड्डे भरण्यास सांगत आहे पण त्याकडे ही महापालिका दुर्लक्ष करीत असते. नागरिकांना पाण्यासह, रस्ते अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. तरी ही ते लोकप्रतिनिधीचे स्वागत करीत आहात ही गोष्ट अभिमानास्पद आहे. तसेच निवडणूकीत मतदारांनी डोळे उघडे ठेवून मतदान करावे. पक्ष न पाहता उमदेवाराला पाहून मत द्या. जो लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी काम करेल अशाच व्यक्तींना मत द्या असा सल्ला ही आमदार राजू पाटील यांनी दिला.


एकता नगर येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने संजय देसले यांनी निवेदन देऊन  केली.

 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मिरा भाईंदर महापालिके तर्फे “राष्ट्रीय एकता दिवस” साजरा!

“राष्ट्रीय एकता” दिनानिमित्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले “मानवी एकता साखळीचे” आयोजन

31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह करण्यात येणार साजरा – आयुक्त दिलीप ढोले

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात 31 ऑक्टोबर रोजी थोर स्वातंत्र्य सैनिक व भारताचे पहिले गृहमंत्री स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी केली जाते. या निमित्ताने मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय प्रांगणात “राष्ट्रीय एकता दिनाचे” औचित्य साधून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली “मानवी एकता साखळी” चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, अतिरिक्त शहर अभियंता सुरेश वाकोडे, तहसीलदार नंदकिशोर देशमुख, महानगरपालिका विभागप्रमुख/खातेप्रमुख व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.

सदर प्रसंगी “राष्ट्रीय एकता दिनाचे” औचित्य साधून राष्ट्रीय एकात्मकतेची शपथ घेण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचाराविरुद्ध दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात देखील करण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर शपथ/प्रतिज्ञा समाप्तीनंतर मिरा-भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय पासून अंदाजे एक ते दीड किलोमीटर इतकी लांब “मानवी एकता साखळी” तयार करून शहरातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मकते बाबत जनजागृती करण्यात आली. या मानवी एकता साखळीमध्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, महानगरपालिका सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख, कर्मचारी व सफाई कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

31 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार विरुद्ध दक्षता व जनजागृती मोहीम चालविण्यात येणार असून या काळात भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालविण्याचे आवाहन आयुक्त दिलीप ढोले यांनी जरी केले असले तरी मात्र महापालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यावर खरे उतरतात का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

‘भारत जोडो’ यात्रेच्या समर्थनार्थ मिरा भाईंदर शहरात काँग्रेसची बाईक रॅली संपन्न!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला देशभरातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून ही ‘भारत जोडो’ यात्रा तेलंगाणा मधून ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येत असून देगलूर, नांदेड येथे प्रवेश करणार आहे.

या निमित्ताने मिरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली मीरा भाईंदर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने उत्तन ते डेल्टा गार्डन, मिरारोड अशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, जिल्हा, सेल, ब्लॉकचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काँग्रेसचे जेष्ठ नेते मुझफ्फर हुसैन यांच्या आदेशानुसार मिरा भाईंदर शहरातील पक्षाचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असून त्यांची पहिली तुकडी रेल्वेने नांदेडला रवाना होणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी पत्रकारांना दिली आहे.