Home Blog Page 96

‘इनडोअर क्रिकेट विश्वचषक’ स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर १२ धावांनी विजय; पुरुष गटात भारताने पाच पैकी चार लढती जिंकल्या. ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सिडनी येथे सुरू असलेल्या जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाने (डब्लूआयसीएफ) ऑस्ट्रेलियात आयोजित केलेल्या इनडोर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताने श्रीलंकेवर १२ धावांनी पराभव करून निसटता विजय मिळवला. आज झालेल्या सामन्यात भारताने फलंदाजी करताना १६ षटकात १०५ धावा केल्या तर श्रीलंकेने ९३ धावा करताना जोरदार लढत दिली.

१६ षटकांच्या सामन्यात भारताच्या सलामवीरांनी आजही चांगली सुरुवात करून दिली. भारताच्या चारही जोड्यांनी अनुक्रमे २१, २४, २३ व ३८ धावा करत एकूण १०५ धावा करत मजबूत स्थिति मिळवली. भारताच्या शेवटच्या जोडीनेही जोरदार फटकेबाजी करत भारताला शंभरी पार करून दिली. तर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या चारही जोड्यांना अनुक्रमे २१, २५, ३१ व १६ धावांवर रोखलं. आजच्या सामन्यात श्रीलंकेने भारताला जोरदार लढत दिली मात्र भारताने १२ धावांनी विजय साजरा केला. भारताच्या गोलंदाजांनी १६ षटकात श्रीलंकेचे एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने श्रीलंकेच्या धावाफलकतून २५ धावा कमी करता आल्या तर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही १६ षटकात भारताचे एकूण ५ फलंदाजांना बाद केल्याने भारताच्या धावाफलकतून सुध्दा २५ धावा कमी झाल्या. एकूणच भारताची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अतिशय चांगले व उत्तम झाले त्यामुळेच कडव्या प्रतिकारनंतर सुध्दा भारताला विजय प्राप्त करता आला. विशेष म्हणजे शेवटच्या जोडीने केलेल्या फटकेबाजीनेच भारताचा विजय सुकर झाला.

भारता तर्फे पहिल्या जोडीने धनुश भास्कर (८) व दैविक राय (१३) यांनी करून दिलेल्या चांगल्या सुरवतीनंतर दुसऱ्या जोडीतील विजय हनुमंतरायाप्पा (१२) व अफ्रोज पाशा (१२), तिसऱ्या जोडीतील सुरज रेड्डी (१६) व अरिज अजीज (६) व चौथ्या व शेवटच्या जोडीतील नामशीद व्हि. (१३) व मोहसिन नादाम्मल (२५) यांनी भारतासाठी जोरदार कामगिरीची नोंद केली.

श्रीलंकेच्या पहिल्या जोडीमधील निलंथा वीजेकून (१९) व ऍण्डी सोलोमोंस (२), दुसऱ्या जोडीमधील रुमेश पेरेरा (१०) व चंडिमा अबेकूण (१५), तिसऱ्या जोडीतील कोलिथा हापूयाराच्ची (१०), व मालशान रोड्रिगो (२१) तर शेवटच्या जोडीतील निलोचना पेरेरा (९) व दासून रंदिका (७) यांनी कडवी लढत दिली.

भारताच्या नामशीद व्हि. २, धनुश भास्कर, अफ्रोज पाशा व सूरज रेड्डीने यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केला तर श्रीलंकेच्या निलंथा वीजेकूनने ३ व मालशान रोड्रिगो, दासून रंदिका यांनी प्रत्येकी एक एक फलंदाज बाद केला.

या सामन्यात ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार श्रीलंकेच्या निलंथा वीजेकून देऊन गौरवण्यात आले. भारताच्या २२ वर्षाखालील मुलांच्या संघाने सुध्दा द. आफ्रिकेला पराभूत करून विजय मिळवला.

 

व्हॉट्सऍपवर येणार नवीन अपडेट्स, ग्रुप चॅटवर १०२४ युजर्स येणार एकत्र..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

व्हॉट्सअ‍ॅप वर नेहमी सतत नवीन नवीन अपडेट येत असतात. मेटा-मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सऍप आता काही बीटा परीक्षकांसाठी १०२४ वापरकर्ते गटांमध्ये जोडण्याची क्षमता आणत असल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सऍप बीटा इन्फो नुसार, हे वैशिष्ट्य अँड्रॉइड आणि आयओएस साठी व्हॉट्सऍप बीटा वर उपलब्ध आहे, परंतु ते बीटा परीक्षकांच्या विशिष्ट अपरिभाषित संख्येपुरते मर्यादित आहे.

व्हॉट्सऍपवर नवीन अपडेट येणार समोर

कंपनीच्या अहवालामध्ये नमूद केले आहे की जर एखाद्या वापरकर्त्याला हे वैशिष्ट्य त्यांच्या व्हॉट्सऍप खात्यावर उपलब्ध आहे की नाही हे तपासायचे असेल तर ते एक गट तयार करण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा अस्तित्वामध्ये असलेल्या खात्यामध्ये नवीन सहभागी जोडू शकतात. अहवालामध्ये असेही म्हटले आहे की, व्हॉट्सऍप भविष्यामध्ये प्रशासकांना या मोठ्या गटांवर अधिक नियंत्रण देण्यासाठी नवीन साधने देखील विकसित केली जात आहेत.

‘व्हॉट्सऍप प्रीमियम – बीटा टेस्टर’

कंपनीने २५६ लोकांच्या गटामध्ये ५१२ लोकांना जोडण्याच्या क्षमतेसह मे महिन्यामध्ये नवीन वैशिष्ट्ये आणली आहेत. तसेच अलीकडेच प्लॅटफॉर्मने काही देशांमधील व्यवसाय खात्यांसाठी ‘व्हॉट्सऍप प्रीमियम – बीटा टेस्टर’ हे आणखी एक वैशिष्ट्य सादर केले आहे. आता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे की, व्हॉट्सऍप मध्ये काय बदल होतो.

 

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ‘संमत’ साहित्य संमेलनाचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘नॅशनल एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘सरस्वती विद्या भवन’ संकुलाच्या हिरक महोत्सव आणि भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘ संमत ‘अर्थात संस्कृत,मराठी व तमिळ साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन मुलुंड येथील ‘एनईएस इंटरनॅशनल स्कूल’ (स्वप्ननगरी) याठिकाणी १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात प्राचीन काळातील संत साहित्य, संत कवयित्री, त्यापुढील काळातील संयुक्त महाराष्ट्रातील शाहिरी परंपरा, गांधी भगतसिंग यांची विचारसूक्ते, दलित साहित्य, स्त्रीवाद आणि या संदर्भात महाभारत, तमाशा मधील स्त्रियांचे मूल्यमापन, भारतीय संविधान आणि आदिवासींचे विश्वव्यापी अधिकार या विषयांबरोबरच मराठीतील जैन साहित्य, विस्थापितांचे साहित्य, बालसाहित्य, ग्रामीण साहित्य, वैज्ञानिक दृष्टिकोन युक्त साहित्य, वंचितांची रंगभूमी या साहित्य प्रवाहांवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे.

या बरोबरच तमिळ साहित्यात प्रचलित असणारे साहित्यिक ‘करन कारकी‘, ‘पुथिया माधवी‘ यांचा प्रत्यक्ष परिचय करून घेण्याची संधी तमिळ भाविकांना या संमेलनामुळे प्राप्त होणार आहे अशी माहिती समुहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.वरदराजन यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

सुरूवातच राष्ट्रगीताने होणार टपाल विभागाच्या कामकाजाची..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कुठल्याही कार्यक्रमाची सुरूवात ही राष्ट्रगीताने होते पण शासकीय कार्यालयात कर्मचारी आल्यावरच कामकाजाची सुरुवात होते पण नागपूरात असे एक सरकारी कार्यालय आहे जेथे कामकाजाची सुरुवात प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने होते.

नागपुरातील (जीपीओ) जनरल पोस्ट ऑफिस, टपाल विभाग आहे जिथे येथील कामकाजाची सुरुवात ही प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने होते. या कार्यालयाच्या कामकाजाची सुरुवात सकाळी १० वाजताची आहे. मात्र कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी निर्धारित वेळेच्या १५ मिनिटा अगोदरच कार्यालयात पोहोचतात आणि त्यानंतर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोस्टमन एकत्रित येऊन प्रतिज्ञा आणि राष्ट्रगान गाऊनच आपल्या कामकाजाला सुरुवात करतात. त्यांचा हा नित्यक्रम असून गेल्या १२ वर्षांपासून अविरतपणे हे सुरू आहे.

 

कम्युनिस्ट पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एकेकाळीचे कट्टर दुश्मन असणारे कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना आज चक्क एकत्र आले, अंधेरी पोट निवडणुकीत पाठिंबा देण्याच्या निमित्ताने कम्युनिस्टांनी थेट आज मातोश्री गाठली.

एकेकाळी मुंबई वर वर्चस्व असलेल्या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेने आपले सर्वस्व पणाला लावले होते, त्यातूनच पुढे कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून ही झाला होता, त्या आरोपात शिवसैनिक तुरुंगातही गेले होते.

मात्र काळाच्या ओघात चित्र पूर्णपणे पालटले असून कट्टर दुश्मन आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी अशी ख्याती असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या उभ्या आयुष्यात कधीही न घडलेली गोष्ट आज घडली.

आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही असे आठवडा भरापूर्वीच स्पष्ट करणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला अंधेरी पोट निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्व कट्टर विरोधक कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळाने मातोश्री गाठली आणि त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.