Home Blog Page 97

सिनेतारक आमिर खानच्या जाहिरातीवरून वादंग..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या काही काळापासून विविध कारणांमुळे लोकांच्या टिकेचा धनी ठरत असलेला आमिर खान आता एका जाहिरातीवरून अडचणीत आला आहे. ‘लालसिंग चढ्ढा’ या चित्रपटावरून त्याच्यावर उठलेला टिकेचा धुरळा खाली बसत नाही तोवरच आता कियारा अडवाणी सोबत त्यांने नुकत्याच केलेल्या एका जाहिरातील हिंदू लग्न प्रथांमध्ये विरोधाभास दर्शवणारा प्रसंग चित्रित केल्याबद्दल त्याला ट्रोल गेले जात आहे.

फक्त ५० सेकंदांच्या एका व्यावसायिक बॅंकेच्या या जाहिरातीत आमिर खान आणि कियारा अडवाणीचे लग्न होते आणि तो घर जावई म्हणून तिच्या सोबत सासरी येतो असे दृश्य दाखवण्यात आले आहे. यावेळी धान्याने भरलेले माप ओलांडून तो सासरच्या घरी गृहप्रवेश करतो असे दाखवण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत या विधी स्त्रीया करतात त्यामुळे काही राजकीय नेत्यांनी आणि धर्मरक्षकांनी या प्रसंगावर आक्षेप घेत आमिर खानवर टिकेची झोड उठवली आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या जाहिरातीचा जोरदार निषेध केला असून आमिर खानने हिंदुंच्या रीतिरिवाजांशी खेळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. ‘द काश्मिर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील या जाहिरातीबाबत ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे.

 

उध्दवची मशाल सापडली वादाच्या भोवऱ्यात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उद्धव ठाकरेंना मशाल निवडणूक चिन्हं देण्यात आल्यामुळे समता पार्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. “मशाल चिन्हं पुन्हा समता पार्टीला द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

जर उद्धव ठाकरेंना दिलेले मशाल हे चिन्हं त्वरीत काढले गेले नाही तर समता पार्टी सुप्रीम कोर्टात जाईल असा इशारा समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

रिक्षेची चोरी करणाऱ्या दोन जणांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्व मध्ये रिक्षेतून संशयास्पदरित्या प्रवास करणाऱ्या दोन जणांना राम नगर येथील डोंबिवली पोलीसांनी अटक केली असून त्यांची चौकशी केली असता एक चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे समोर आले.

अजदे गावात राहणाऱ्या तेजस नायर (वय: २२ वर्षे), मयूर केणे (वय: २३ वर्षे)अशी या दोन आरोपींची नावे आहेत. राम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी वाघ, निवळे, रावखंडे, सांगळे हे रामनगर पोलीस हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना डोंबिवली पूर्व येथील मानव कल्याण हॉस्पिटल च्या मागे टाटा लेन येथे तेजस आणि मयूर हे दोन आरोपी संशयितरित्या एका ऑटो क्र. एमएच ०५ डीएल १८१५ रिक्षेतून फिरत असल्याचे दिसून आले.

त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे रिक्षेची कागदपत्र मागितली असता त्यांनी देण्यास नकार दिला. अधिक कसून तपास केला असता एमएच ०५ डीएल १८१५ या क्रमांकाची रिक्षा चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले. पार्क केलेली रिक्षा चोरल्याचा गुन्हा या दोघांच्या नावावर असून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप आणि रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.

डोंबिवलीच्या श्री गणेश मंदिरात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ यांच्या ‘ढाल तलवार’ निशाणीची विधीवत पूजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष दोन गटात विभागला आहे. त्यातच हा वाद न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं गोठवलं. त्यामुळे दोन्ही गटांना आता स्वतंत्र नाव आणि चिन्हं मिळाले असून त्यात आता शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्हं मिळाले आहे. त्यासोबत शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय पुन्हा देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने तीन पर्याय दिले होते त्यात ‘ढाल-तलवार’ हे निवडणूक चिन्हं अधिकृतरित्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला प्राप्त झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘ढाल-तलवार’ हि निशाणी दिली आहे. मंगळवारी सायंकाळी डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान येथे ‘ढाल-तलवार’ निशाणी ची विधीवत पूजा करण्यात आली.

 

यावेळी कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, जनार्दन म्हात्रे, संजय पावशे, पंढरीनाथ पाटील, धर्म राज शिंदे, बंडु पाटील, नितीन पाटील, संतोष चव्हाण, सागर जेधे, उपशहरप्रमुख अमित बनसोडे संजय विचारे, अमोल पाटील, गजानन व्यापारी, इतर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अखेर बहुप्रतिक्षित गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!

उद्घाटनाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फिरकलेच नाही तर माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाले सह मेहता समर्थक नगरसेवकांनी प्रवेशद्वारावर घातला गोंधळ!

मीरा भाईंदर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहराच्या विकास कार्यात मोलाची भर टाकणारे परंतु गेली अनेक वर्षे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाचे उद्घाटन आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिमाखदार कार्यक्रमात पार पडले.

मिरा भाईंदर महानगरपालिका शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि स्केटिंग रिंग व नाट्यगृह लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चिमाजी अप्पा स्मारक आणि महाराणा प्रताप स्मारकाचे रिमोट कंट्रोल द्वारे ई-अनावरण देखील करण्यात आले.

सर्वप्रथम मिरारोड पूर्व, महाजन वाडी येथील लोढा अमेनिटी स्केटिंग रिंगाचे लोकार्पण, तद्नंतर मिरारोड पूर्व, आरक्षण क्रमांक 302 येथील नियोजित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन व मिरारोड पूर्व घोडबंदर येथे नवीन महानगरपालिका प्रशासकीय भवन यांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.

त्यानंतर मिरारोड पूर्व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह फलकाचे अनावरण करण्यात आले. तदनंतर मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदर महानगरपालिकेने मागील वर्षभरात केलेल्या विकासकामांची चित्रफित दाखवण्यात आली. तद्नंतर मुख्यमंत्री यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यात आले.

त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्या हस्ते भाईंदर पश्चिम येथील चिमाजी अप्पा स्मारक व भाईंदर पूर्व येथील महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे ई-अनावरण करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास राज्यस्तरीय आदीवासी विकास आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडीत (राज्यमंत्री दर्जा), लोकसभा सदस्य राजेंद्र गावित, ओवळा-माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर मतदार संघाच्या आमदार गीता जैन, आमदार पराग शाह, मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव बालाजी खतगांवकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर निर्मला सावळे, भाजप जिल्हाध्यक्ष रवी व्यास, नगरसेविका परिशा, नाट्यगृहाच्या वास्तुविशारद मुग्धा पतकी, रुग्णालयाचे विकासक अतुल शहा, महापालिका प्रशासकीय भवनाचे विकासक विजय जैन, वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर आणि महानगरपालिकेचे सर्व वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त व प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली असली तरी पूर्वनियोजित कार्यक्रम असून देखील आणि निमंत्रण पत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित असलेले उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गैरहजेरी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत होती.

त्याच प्रमाणे माजी आमदार नरेंद्र मेहता देखील प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित असून सुद्धा ते नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उशिराने पोहोचले आणि आपल्या सर्व समर्थकांना नाट्यगृहात प्रवेश देण्याचा हट्ट करू लागले तेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना अडवले असता नरेंद्र मेहता आणि त्यांच्या समर्थकांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडून गोंधळ घातला.

महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला शासनाची पूर्ण परवानगी नसताना अशासकीय पद्धतीने घाई गडबडीत उद्घाटन करून महाराणा प्रताप स्मरकावर माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नावाची पाटी लावलेली होती. आता सर्व शासकीय परवानग्या मिळल्या नंतर ती पाटी काढून पुन्हा शासकीय पद्धतीने उद्घाटन केल्याचा राग मनात ठेवून माजी आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांचे समर्थक मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून नाट्यगृहात गोंधळ घालणार असल्याची कुणकुण पोलिसांना आधीच लागली होती आणि म्हणूनच त्यांना प्रवेशद्वारा जवळ पोलिसांनी त्यांना अडवले असल्याची चर्चा आता शहरात केली जात आहे.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, माजी आमदार, माजी खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, उपस्थित नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी वेळात वेळ काढून सर्व लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल मिरा-भाईंदर महानगरपालिके आयुक्त व प्रशासक दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.