Home Blog Page 98

महाराष्ट्र कमजोर होतोय ! संजय राऊतांचे भाकीत पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचा चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर राऊतांचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोपामध्ये गुंतले आहेत. दुसरीकडे शिवसेनेची तोफ संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे असे भाकित केले होते. राऊतांच्या या भविष्यवाणीची सध्या सोशल मिडीयातही मोठी चर्चा रंगली आहे.

संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या मदतीने सुरत व्हाया गोवाहाटी मध्ये जाऊन बंड केला. शिवसेनेत या बंडखोरीने दोन गट पडले. फुटीर शिंदे गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला. संजय राऊतांनी यानंतर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांवर घणाघात चढवला होता. संजय राऊतांच्या आक्रमकतेने राज्यातील शिवसैनिक चवताळून उठला होता. अखेर कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ‘ईडी’ने संजय राऊत यांना अटक करताच शिंदे गटाच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. संजय राऊत यांनी ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे, असे विधान केले होते.

संजय राऊत यांचा प्रादेशिक पक्षाला संपवल्याचा शिंदे गटावर ठपका

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेला ओळख म्हणून वाघ चिन्ह तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे चिन्ह गोठवले गेले. राज्यात यामुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. एका प्रादेशिक पक्षाला संपवल्याचा शिंदे गटावर ठपका सोशल मीडियातून ठेवण्यात आला आहे. तसेच जोरदार टीकास्त्र सुरु आहेत. अशातच संजय राऊत यांच्या महाराष्ट्र कमजोर होतोय, हे भाकित करणारे विधान जोरदार व्हायरल झालं आहे. अनेकांनी संजय राऊतांनी वर्तवलेल्या भाकितांवरून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधताना दिसत आहेत. ज्येष्ठ नेत्यांना डावलणारा भाजप पक्ष आगामी काळात शिंदेंना किती सहकार्य करेल, असा प्रश्न ही सोशल मीडियातून विचारला जातो आहे.

 

एमसीए निवडणुकीत मोठी उलथापालथ, शरद पवार-आशिष शेलार गटांची युती, एकत्र निवडणूक लढवणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) होऊ घातलेल्या निवडणुकीला मोठी कलाटणी मिळाली आहे. आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता असलेले शरद पवार गट आणि आशिष शेलार गट यांनी युती करत एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यात चर्चा झाल्यानंतर एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

शरद पवार आणि आशिष शेलार यांचे गट एकत्र आल्याने आता निवडणुकीमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार असा संयुक्त गट असेल. तसेच ऐनवेळी हे दोन्ही गट एकत्र आल्याने आता शरद पवार गटातील अध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील यांच्यासह इतर उमेदवारांचं भवितव्य काय असेल, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, निवडणूक लढवत असलेल्या शरद पवार यांच्या गटामध्ये मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे हेही मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक लढवत आहेत.

दरम्यान, या निवडणुकीसाठी शरद पवार यांनी आपला वेगळा गट जाहीर केला होता. तसेच उमेदवारांनी उमेदवारी अर्जही भरले होते. मात्र आज संपूर्ण निवडणुकीलाच अचानक कलाटणी मिळाली. शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यातील चर्चेनंतर दोन्ही गटांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. तसेच या संयुक्त गटाचं निवेदनही जाहीर झालं आहे, त्यामुळे आता उर्वरित उमेदवारांचं काय होणार, तसेच निवडणुकीचा काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी घेतला ९ कोटी ९९ लाख रोख रकमेचा धसका; एसटी परिवहन महामंडळाची तातडीची बैठक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दसरा मेळाव्यासाठी आरक्षित केलेल्या सतराशे बससाठी सुमारे दहा कोटी रक्कम रोकडीने एकाच वेळी भरल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची दुपारी बारा वाजता तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली. या प्रकरणावर पडदा टाकण्याच्या हालचाली सुरू केल्याचे बोलले जाते.

एसटी महामंडळाची तातडीची बैठक

बीकेसी मैदानात एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. गर्दी जमवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आणण्यात आली. त्यासाठी १७९५ एसटी महामंडळाच्या विशेष बसेस राज्यातून बुक केल्या. या बस आरक्षित केल्यानंतर ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आगार व्यवस्थापक मुंबई आगार यांच्याकडे भरण्यात आली. हा सगळा व्यवहार रोखीत झाला. शिवसेना आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यामुळे शिंदे गटाची धावपळ उडाली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी बारा वाजता बैठक सुरू होईल. परिवहन विभावाचे अधिकारी शेखर चन्ने यांच्यासह विविध डेपोचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र, एसटी महामंडळाच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात ही बैठक बोलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अंबादास दानवेंचा आरोप

शिंदे गटाने आयोजित केलेला दसरा मेळाव्यासाठी १७९५ एसटी महामंडळाच्या विशेष बस राज्यातून बुक करण्यात आल्या. या बस आरक्षित केल्यानंतर ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आगार व्यवस्थापक मुंबई आगार यांच्याकडे ३ ऑक्टोबरला भरले. या मेळाव्यासाठी १७९५ बसपैकी प्रत्यक्षात १६२५ बसचा वापर झाला. उर्वरित १७० बसच्या भरलेल्या पैशांचा परतावा एसटी कोणाला करणार ? सामान्य व्यक्तीला बँकेत ५० हजारापेक्षा जास्त रक्कम भरायची असल्यास त्याला अधिकृत ओळखपत्र सादर करावे लागते. मग इतकी मोठी रक्कम भरताना एसटी महामंडळाने त्याची विचारपूस केली का ? असा सवाल दानवे यांनी एसटी महामंडळाला विचारला होता.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून हिंदी भाषेतून शिक्षण बंधनकारक करण्याची शिफारस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ज्या ठिकाणी हिंदीचा वापर करता येणं शक्य आहे, त्या ठिकाणी तो करावा, इंग्रजीचा वापर कमी करावा अशा शिफारशी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संसदेतील कार्यालयीन भाषा समितीने केली आहे. केंद्रीय विद्यालयाच्या सर्व टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल संस्थांमध्ये हिंदीतून शिक्षण देणं बंधनकारक करण्याची शिफारस केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. सर्व टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल क्षेत्रातल्या शिक्षणासाठी हिंदीचा वापर बंधनकारक करावा, आणि इंग्रजीचा वापर पर्यायी भाषा म्हणून करावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीमध्ये एकूण ३० सदस्य आहेत. त्यामध्ये लोकसभेतील २० तर राज्यसभेतील १० सदस्यांचा समावेश आहे. भविष्यात हिंदी भाषेचा शिक्षण क्षेत्रात वापर वाढवण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात अशी शिफारस या समितीने केली आहे. उच्च शिक्षणामध्ये हिंदी भाषेचा वापर वाढावा यासाठी या समितीने एकूण ११२ शिफारशी केल्या आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने असं सांगितलं आहे की, जोपर्यंत सर्व विद्यापीठांमध्ये तसेच सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये हिंदी भाषा बंधनकारक करण्यात येणार नाही तोपर्यंत ही शिक्षणाची भाषा होऊ शकत नाही.

देशात आयआयटी सारख्या अनेक उच्च संस्थांमध्ये सध्या इंग्रजी या एकाच भाषेतून शिक्षण दिलं जातं. त्यामुळे चांगली नोकरी मिळवायची असेल तर इंग्रजी भाषेतून शिक्षण घ्यायला हवं असा समज निर्माण झाला आहे. त्यामुळे हा समज मिटवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना हिंदी भाषेतून ज्ञान मिळावे यासाठी हिंदीचा वापर वाढवावा अशी शिफारस या समितीने केली आहे.

 

‘गुगल’ ची ट्रान्सलेशन सर्विस होणार बंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जगातील सर्वांत मोठे सर्च इंजिन गुगलने ट्रान्सलेशन सर्विस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटलेले दिसत आहेत. गुगल सर्च इंजिन हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणून ओळखले जाते. गुगलने चीनमध्ये ट्रान्सलेशन सर्विस बंद केली आहे.

गुगलच्या या निर्णयामुळे शेजारील देशाच्या कंपनीची सेवा मर्यादित झाली आहे. चीनमध्ये ‘ट्रान्सलेट वेबसाईट’ ओपन केल्यानंतर आता एक ‘जेनेरिक गुगल सर्च बार’ दिसत आहे. यावर क्लिक केल्यानंतर यूजर्स हाँगकाँगची गुगल ट्रान्सलेशन वेबसाइटवर पोहोचतात. परंतु, चीनी यूजर्स हाँगकाँगची ट्रान्सलेशन वेबसाइटचा वापर करू शकत नाही. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, चीनमध्ये अमेरिकी टेक कंपनीने ट्रान्सलेशन सर्विसला कमी वापर होत असल्याने बंद केले आहे.

गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कंपनीने चीनमध्ये कमी वापर होत असल्याने गुगल ट्रान्सलेट ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट मध्ये सर्वात मोठी ट्रान्सलेशन सर्विसला चीनमध्ये ५.३५ कोटी हिट मिळाले होते. गुगलने २०१७ मध्ये चीनमध्ये ‘ट्रान्सलेशन ऍप’ लाँच केले होते. चीनी यूजर्सला आकर्षित करण्यासाठी कंपनीने प्रसिद्ध चीनी अमेरिकी रॅपर एमसी जिनकडून जाहिरात सुद्धा केली होती. चीनमध्ये गुगल ट्रान्सलेशन सर्विस अचानक बंद करण्यात आल्याने काही चीनी ॲप्लिकेशनवर परिणाम झाला आहे.