Home Blog Page 102

संपकाळात बडतर्फ केलेले ११८ कर्मचारी पुन्हा कामावर रुजू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यामध्ये एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे, त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले.

परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि परिवहन आयुक्तायालयाची आढावा बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांचेसह राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार या बैठकीस उपस्थित होते.

११८ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याच्या सूचना

संपकाळात सुमारे दहा हजारपेक्षा अधिक कर्मचारी बडतर्फ झाले होते, त्यानंतर न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत पाळू न शकलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्याची कार्यवाही प्रलंबित होती, या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू करून घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत.

इलेक्ट्रिक, सीएनजीवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार

लोकसंख्येचा भार वाढला त्या तुलनेत बसगाड्यांची संख्या कमी असून ही संख्या वाढविण्यासाठी महामंडळाने पुनरुज्जीवन आराखडा तयार केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दीडशे इलेक्ट्रिक वाहने भाडेतत्वावर घेतली जाणार असून ५०० नवीन डिझेल बसेसची खरेदी प्रक्रिया सुरु आहे. सुमारे एक हजार बसगाड्यांचे सीएनजीमध्ये रुपांतरण करण्यात येत असून जून २०२३ पर्यंत सुमारे दोन हजार इलेक्ट्रिकवरील बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील त्यातून प्रवाशांना आरामदायी, पर्यावरणपूरक प्रवासाचा आनंद घेता येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ५४ लाख ज्येष्ठांचा मोफत प्रवास

सामाजिक बांधिलकी म्हणून विविध घटकांना एसटीच्या २१ सवलती दिल्या जातात. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सवलत देणारा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे, सरकारच्या या निर्णयामुळे आतापर्यंत ५४ लाख ज्येष्ठ प्रवाशांनी लाभ घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळाचे कौतुक केले.

मालवाहतूक सेवेतून १०७.८० कोटींचे उत्पन्न

एसटीचे महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सुरु केलेल्या मालवाहतूक सेवेतून आजपर्यंत सुमारे १०७.८० कोटींचे उत्पन्न मिळाले असून या सेवेद्वारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अन्न धान्याची वाहतूक करण्या संदर्भातील प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

‘डीबीओएलटी’ तत्वावर बसपोर्टचा होणार विकास

एस.टी. महामंडळाच्या सुमारे ८१२ ठिकाणी १४२३.९० हेक्टरच्या जागा असून त्यातील ५ शहरातील १८ मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा डीबीओएलटी (डिझाईन-बिल्ड- ऑपरेट-लीज-ट्रान्सफर) तत्वावर विकसित करण्यात येणार आहेत. त्यातून सुमारे ३ हजार ८०० कोटीपेक्षा अधिक महसूल मिळणार आहे. हे करताना त्या जागा केवळ व्यावसायिक वापरासाठी विकसित न करता निवासी-वाणिज्य या संमिश्र वापरासाठी करा आणि तसा आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी उपाययोजना करा

महाराष्ट्रात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी असून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. वाहनचालकांचे प्रशिक्षण, वाहनांची स्थिती, वाहतूक नियमांचे पालन आदी गोष्टींवर भर देऊन व्यापक उपाययोजना करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी बैठकीत दिले.

धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? उद्यापर्यंत म्हणणे सादर करा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्य बाण हे आपल्यालाच मिळावे यासाठी शिंदे गटाने आज निवडणूक आयोगाकडे रीतसर दावा केला आहे, त्यावर उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत ठाकरे गटाने आपले म्हणणे यावर सादर करावे अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

आज सायंकाळ पर्यंत निवडणूक आयोगाने दोन्ही गटांनी आपापले दावे आणि कागदपत्रे सादर करावीत अशी मुदत याआधीच निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना दिली होती, त्यानुसार शिंदे गटाने आपले म्हणणे सादर केले, त्याच्या समर्थनार्थ कागदपत्रांचे गठ्ठेही सादर करण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या ठाकरे गटाने मात्र आपले प्राथमिक म्हणणे सादर केले आहे, दरम्यान चिन्हावर शिंदे गटाने दावा केल्यावर आयोगाने यावर आपले म्हणणे मांडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला नोटीस बजावून उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.

दोन्ही बाजूने पक्षावर आणि निवडणूक चिन्हावर दावा करण्यात आल्याने आयोग त्यावर निर्णय घेण्यासाठी किती वेळ घेतो आणि तोवर चिन्ह गोठवेल का हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे.

अवेळी पडत असलेल्या परतीच्या पावसाने राज्यातील पिकांचे नुकसान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सिंधुदूर्ग जिल्ह्यात सकाळपासून कणकवली व कुडाळ परिसरासह अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळीराजा चिंतेत आलाय.

मागील चार ते पाच महिने मेहनत घेऊन पिकवलेलं भात शेतीचे पीक आता कापणीसाठी परिपक्व झालं असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चितींत झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे निघून जातो की काय अशी भीती आता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ही अधून मधून जोरदार वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी पडून शेतीतील भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रायगड, ठाणे, नागपूर आदी जिल्ह्यात ही अधून मधून पाऊस पडत आहे.

डोंबिवलीत शिवसेना नेते संजय राऊत यांचे पोस्टर्स फाडले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील मंजुनाथ शाळे समोरील पेंडसे नगर तीन रस्ता प्लाझ्मा रक्तपेढी जवळील यादव डेअरी येथे शिवसेना दसरा मेळाव्याचे पोस्टर्स लावण्यात आले होते. काही अज्ञात इसमाने खोडसाळपणाने शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोटो असलेला भाग धारदार वस्तूने फाडला आहे. गुरुवारी ६ आक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान सदर घटना घडल्याची तक्रार रामनगर येथील डोंबिवली पोलीस ठाण्यात शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रकाश श्यामराव तेलगोटे यांनी केली आहे.

रामनगर येथील डोंबिवली पोलीस स्टेशन यांनी भारतीय दंड संहिता १८६० च्या अनुषंगाने अज्ञात इसमा विरुद्ध धारा ४२७ प्रमाणे एनसीआर दाखल करून घेतला आहे. सदर घटनेबाबत शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांना कळविण्यात आले असल्याचे प्रकाश तेलगोटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

 

मुंबईचे प्रसिध्द उद्योगपती अंबानी कुटुंबाला धमक्या देणारा अटकेत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईतील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबाला धमक्या आल्याच्या घटनेवर तत्परतेने कारवाई करत मुंबई पोलीसांच्या पथकाने बिहार पोलीसांच्या मदतीने मध्यरात्री बिहारमधील दरभंगा येथील एका व्यक्तीला अटक केली आहे. राकेश कुमार मिश्रा असे या व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या ‘सर एच एन हॉस्पिटल’ च्या लँडलाईनवर एक अज्ञात नंबरवरुन कॉल आला होता व हे प्रशस्त हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी या कॉलच्या माध्यमातून देण्यात आली. तसेच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती .

मुंबई पोलीसांनी या घटनेची तातडीने गंभीर दखल घेत तपासला सुरुवात केली. तपासात बिहारमधील दरबंगा शहरातून राकेश कुमार मिश्राला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध भादंवि कायदा कलम ५०६ (२),५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी त्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेऊन मुंबईत आणले आहे. राकेश कुमार मिश्राने धमकी का दिली ? याची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.