Home Blog Page 114

कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कल्याण ग्रामीणच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन..

_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कल्याण ग्रामीण आणि इतर संस्थांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन एमआयडीसी येथील गणपती मंदिर शेजारील पक्ष कार्यालयात करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केले.

यावेळी भाजप डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष आणि विधानसभा संपर्क प्रमुख नंदू परब, गौतम पाठक, राकेश जैन, रवींद्र रंगा, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, महिला ग्रामीण अध्यक्षा मनीषा राणे, माधुरी जोशी, रसिका पाटील, पंढरीनाथ म्हात्रे, भाजप प्रणित रिक्षाचालक संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देसले, दत्ता मळेकर, रवी सिंग इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऍंजियोग्राफी, ऍंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, टुडी एकॉकारडीयोग्राफी, मधुमेह, रक्तदाब, ईएनटी, दंतचिकित्सा, नेत्रतपासणी, मोतीबिंदू, इत्यादीची मोफत तपासणी तर आयुर्वेद उपचार, मोफत कानाचे मशीन, भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन बाबत नंदू परब म्हणाले कि, ना.रवींद्र चव्हाण यांचा तळागाळातील जनतेसोबत सातत्याने संपर्क असतो. या जनतेचे आरोग्यासाठी सुविधा मिळणे गरजेचे आहे. कोवीड काळानंतर बेरोजगारी आणि ताणतणावात वाढ झाली असून अश्या परिस्थितीत प्रथम गरिबांना प्राथमिक आरोग्य सुविधा मिळायला हव्यात.

ना. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराच्या माध्यमातून या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एका छत्राखाली अश्या शिबिरामुळे गरजुंना विविध शारीरिक तपासण्यासाठी आर्थिक रित्या लाभ होतो असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले. दुपारी ना. रवींद्र चव्हाण यांनी शिबिराची पाहणी करुन शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले. कच्छ युवा संघटनेच्या वतीने सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजनासाठी त्यांचे कौतुक केले.

युवक प्रतिष्ठान, कच्छ युवक संघटना, सत्य साई प्लॅटीनम हाॅस्पीटल, सिध्दीविनायक हाॅस्पीटल, सिध्दीविनायक नेत्रालय, युवा आशापुरा मित्र मंडळ, डाॅ.अविनाश देशपांडे, डॉ.राजीव आढाव यांनी शिबिरास सहकार्य केले.

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थेने राबविली भव्य स्वच्छता मोहीम

भाईंदर प्रतिनिधी: शनिवार १७ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक स्वच्छता दिवस साजरा केला जातो, या निमित्ताने ‘फ़ॉर फ़्यूचर इंडिया’ संस्थे तर्फे मुंबई येथील गोराई समुद्रकिनारी तर मिरा-भाईंदर शहरातील उत्तन व वेलंकनी समुद्रकिनारी तसेच जंजिरे धारावी व गोडबंदर किल्यांवर स्वच्छता मोहित राबविण्यात आली.

या भव्य स्वच्छता अभियानात मुंबई महानगरपालिका, मिरा-भाईंदर महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, मॅन्ग्रोव्हस फौंडेशन, जंजिरे धारावी जतन समिती, राष्ट्रीय सेवा योजना, जागतिक स्वच्छता दिन फौंडेशन, माझी वसुंदर व स्वच्छ सर्वेक्षण यांचे विशेष सहकार्य होते.

मुंबई येथील गोराई समुद्रकिनारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात ८५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत १५ टन हुन अधिक इतका कचरा काढला. यावेळी स्थानिक आमदार सुनील राणे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मा. उपायुक्त (परिमंडळ-7) भाग्यश्री कापसे मॅडम, सहायक आयुक्त निवृत्ती गोंधळी, कार्यकारी अभियंता ललित तेलेकर, सहायक अभियंता संदीप म्हाळुणकर यांची उपस्थिती होती.

तर मिरा-भाईंदर येथे उत्तन व वेलंकनी समुद्रकिनारी १९५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत ४० टन पेक्षा अधिक कचरा काढला. तसेच यंदा जंजिरे धारावी जतन समितीच्या मदतीने शहरातील जंजिरे धारावी व गोडबंदर किल्यांवर सुद्धा स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियानात सुद्धा ५५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत ६५० किलोहून अधिक कचरा काढला.

यावेळी अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव, स्थानिक आमदार श्रीमती गीता जैन, मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (पर्यावरण) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, वरिष्ठ पत्रकार व पर्यावरणप्रेमी धीरज परब यांची उपस्थिती होती.

फ़ॉर फ़्यूचर इंडियाचे संस्थापक व अध्यक्ष आणि मिरा भाईंदर “इंडियन स्वच्छता लीग” स्टार कॅम्पेनर हर्षद ढगे, जंजिरे धारावी जतन समितीचे श्रेयस सावंत, गोडबंदर येथील स्थानिक अनिकेत किनी तर संस्थेचे स्वयंसेवक ध्रुव कडारा, धैर्या होनराव, कुंदन सोळंकी, प्रज्ञा चिकणे, करण पवार, ललित सोळंकी, विशाल पांड्ये, जितेश खाटीक, अब्राहम मुरुगन, शॉन नूनस, अदिती शेजवाल, सौरभ कौशवाह, मानसी जाधव यांनी वेगवेगळ्या ५ ठिकाणी स्वच्छता अभियानाचे व्यवस्थापन करत २५ हुन अधिक शाळा, महाविद्यालय व स्वयंसेवी संस्थांच्या एकूण ३३५० हुन अधिक स्वयंसेवकांचा सहभाग घेत ५५ टन हुन अधिक कचरा काढला आणि या भव्य अभियानास यशस्वी केले.

अधिक माहितीसाठी संपर्क: फ़ॉर फ़्यूचर इंडिया / For Future India
www.forfuture.india
9820952079

शहराच्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आयुक्तांचे आदेश!

खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आयुक्त दिलीप ढोले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश!

मिरा भाईंदर प्रतिनिधी: सोमवार 19 सप्टेंबर रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त दिलीप ढोले यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस शहर अभियंता दिपक खांबित, उप अभियंता, शाखा अभियंता व सर्व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून पाऊस नियमितपणे पडत असल्या कारणाने मिरा भाईंदर शहरातील खड्ड्यांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे आयुक्त दिलीप ढोले यांनी उपस्थित सर्व अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले.

काशीमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते गोल्डन नेस्ट, मॅक्सस मॉल ते सुभाषचंद्र बोस मैदान, ठाकूर मॉल ते वेस्टर्न हॉटेल, हटकेश चौक ते सगणाई माता मंदिर या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने शहरातील नागरिकांना वाहतूकी दरम्यान त्रास होत असल्याने त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारी पर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून तातडीने संथ गतीने सुरू असलेल्या पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

खड्डे बुझविताना डांबराची गुणवत्ता ही उत्कृष्ट दर्जाची ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. खड्डे दुरुस्ती काम सुरू असलेल्या ठिकाणी सबंधित प्रभागाच्या अभियंत्याने त्याठिकाणी उभे राहून कामाची पाहणी करून ते काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरात ठिकठिकाणी खड्डे दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे की नाही याचा स्वतः पाहणी दौरा करणार असल्याचे आयुक्त यांनी सांगितले. शहरातील खड्डे बुझविण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा दिसून आल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी आयुक्त दिलीप ढोले यांनी सदर बैठकीत दिला आहे.

आयुक्त दिलीप ढोले यांनी पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अभियंत्यांची बैठक घेऊन मिरा भाईंदर शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश दिल्यामुळे येणाऱ्या काळात शहरातील नागरिकांना खड्ड्यांपासून दिलासा मिळेल असे दिसत असले तरी आयुक्तांच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले जाईल का? शहरातील शंभर टक्के खड्डे बुजविले जातील का? किंवा खड्डे बुजविताना कामाची गुणवत्ता राखली जाईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले!

संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी; साखर निर्यातीत भारत जगात अव्वल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जगभरात भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. हरित क्रांतीने भारत देशात मोठी क्रांती घडवून आणली, परंतु येथील शेतकरी आद्यपही आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्यात कुठेतरी मागे पडला असतानादेखील साखर उत्पादनात व निर्यातीत देशाने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन’ची वार्षिक परिषद नुकतीच पार पडली यावेळी काही महत्वपूर्ण तथ्य मांडण्यात आले. प्राप्त अहवालानुसार भारताने जगाच्या तुलनेत साखर उत्पादन व निर्यातीत विक्रम कायम केला असून, साखरेच्या निर्यातीत भारताचा जगात अव्वल क्रम लागला आहे. सध्या देशातून महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेणारे राज्य म्हणून बाजी मारली आहे.

या परिषदेत बोलताना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली की, आता खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोन्याचे दिवस आले असून जगासोबत राज्यानेही साखरेच्या निर्मिती व निर्यातीत मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे या व्यवसायातून सुमारे १ लाख कोटी इतकी मोठी उलाढाल होत आहे. भारताने यंदा ११२ लाख टन साखरेची विदेशात निर्यात केली असून, यामध्ये ७५ लाख टन इतका महाराष्ट्राचा वाटा आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगली आर्थिक आवक होत असून, १७ सप्टेंबर पर्यंत ४२ हजार ६०० कोटी रुपयांचे वाटप ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

ऊस पिकाला साखरेव्यतिरिक्त अन्य जोडधंदा म्हणजे इथेनॉल व पोटॅशियमची निर्मिती हा पर्याय प्राप्त असून, इथेनॉल निर्मितीत दिवसागणिक वाढ होत असताना जणू काही साखर कारखाने इथेनॉल कारखाने म्हणून नवी ओळख कायम करत आहे. सध्या गरज आहे ती आयएसओ चे कारखाने वेगाने महाराष्ट्रात येण्याची, यामुळे ऊस पिकाला आणखी सुगीचे दिन प्राप्त होईल. महाराष्ट्रात साखर निर्मितीला चांगला वाव असून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या प्रमुख राज्यांमध्ये देखील महाराष्ट्राचा क्रम लागतो. याकरिता २० हजार कोटींची गुंतवणूक लवकरच केली जाणार आहे.

साखरेची निर्यात ही केवळ देशालाच मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळून देत नसून देशांतर्गत शेतकऱ्यांच्या कष्टाला देखील योग्य मोबदला मिळवून देण्यात सक्षम ठरत आहे. महाराष्ट्र राज्याची घोडदौड ऊस उत्पादन व साखर निर्मितीच्या बाबतीत येत्या काळात अशीच सुरु राहली तर एक दिवस भारत जगातील साखरेचे सर्वात मोठे हब म्हणून देखील नावलौकिक प्राप्त करेल. इथेनॉल निर्मिती ही जीवाश्म इंधनाला तोडीचा पर्याय असल्याने यामुळे देशाचे विदेशावर असलेले इंधन तेलाचे अवलंबित्व देखील कमी करण्यास मदत होईल.

बँकचा परवाना रद्द होत असल्याने आरबीआय कडून महाराष्ट्रातील जनतेला त्या बँकेतून पैसे काढण्यासाठी अलर्ट जारी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

तुमचे ‘रुपी सहकारी बँक लिमिटेड बँकेत’ खाते असेल किंवा तुम्ही या बँकेत कोणत्याही प्रकारे पैसे जमा केले असतील तर ते बुडीत जाण्याआधी लवकर काढून घ्या. या बँकेचा परवाना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला आहे, असे स्पष्ट करत, देशाची मध्यवर्ती बँक एका ठराविक तारखेनंतर तुम्ही या बँकेशी व्यवहार करू शकणार नाही. २२ सप्टेंबर २०२२ नंतर ‘रुपी कोऑपरेटिव्ह बँके’च्या ग्राहकांना त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे काढता येणार नाहीत. जर एखाद्या ग्राहकानेही या बँकेत मुदत ठेव (एफडी) केली असेल तर त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पैसे कधी काढता येतील

रुपी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने २२ सप्टेंबर २०२२ पर्यंतची मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत ‘रुपी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’च्या ग्राहकांकडे पैसे काढण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत.

काय म्हटले रिझर्व्ह बँकेने

पुणे येथील ‘रुपी सहकारी बँक लिमिटेड’चा परवाना १० ऑगस्टपासून सहा आठवड्यांनंतर रद्द करण्यात येणार असल्याचे पत्रक रिझर्व्ह बँकेने १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केले होते. ही वेळ २२ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण होणार आहे. म्हणजेच ४ दिवसांनी बँकेचा परवाना रद्द होणार आहे.

जर तुम्ही ३ दिवसांच्या आत बँकेतून पैसे काढू शकत नसाल तर

एखादी बँक बंद पडली तर तिच्या ग्राहकांना बँकेत जमा होणाऱ्या पैशांवर पाच लाख रुपयांचे ठेव विमा संरक्षण मिळते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (आरबीआय) उपकंपनी डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) तुम्हाला यावर विमा संरक्षण देते. बँकेत पाच लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही, ती बुडणार नाही.

बँकेचा परवाना का रद्द करण्यात आला

बँकिंग नियमांचे उल्लंघन झाल्याने ‘रुपी सहकारी बँक लिमिटेड’चा परवाना रद्द करण्याची मोठी कारवाई केली आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या बँकांवर रिझर्व्ह बँक (आरबीआय) अशी कारवाई करते. या आधीही रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने अनेक बँकांचे परवाने रद्द केले आहेत.

बँकेने नियमांकडे दुर्लक्ष केले

रुपी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील रिझर्व्ह बँकेची ही कारवाई बँकेची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते रुपी बँकेकडे ना भांडवल शिल्लक आहे ना बँकेकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन आहे. याच कारणामुळे रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला आहे.