Home Blog Page 115

‘तात्काळ लोन’ ऍप्सच्या नावाखाली मोठा गोंधळ व फसवणुकीचे प्रकार !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आजच्या झटपट ‘इन्स्टंट’च्या जमान्यात कर्जही हल्ली ‘इन्स्टंट’ मिळू लागली आहेत. त्यासाठीचे हजारो ऍप्सही मोबाईलवर सहजरीत्या उपलब्ध होऊ लागले आहेत. परंतु, तत्काळ कर्जपुरवठा करणारे हे ऍप्स हे फसवणुकीचे नवीन अड्डे असल्याचेच गेल्या काही काळात घडलेल्या घटनांवरुन सिद्ध झाले आहे. अशा ऍप्सबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत. त्यानिमित्ताने हे ‘इन्स्टंट लोन’ ऍप्सचे सायबर फसवणुकीचे प्रकार आणि त्यापासून नेटकर्‍यांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करणारी ही माहिती.

असे म्हणतात की, माणसाला कुठलेही सोंग आणता येते, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. कारण, माणसाला कधीही कुठल्याही कारणास्तव आर्थिक गरज भासू शकते. त्यावेळी जर तत्काळ अर्थसाहाय्य हवे असेल, तर मग काय पर्याय उपलब्ध असतात. जवळचे मित्र, नातेवाईक किंवा कार्यालयातील सहकारी. पण, तरीसुद्धा आर्थिक गरज भागवता येत नसेल, तर मनुष्य साहजिकच इतर पर्याय शोधू लागतो. अशावेळी बँकेकडे जाऊन कर्ज मागणे हा पर्याय अनेकांना अव्यवहार्य वाटतो. कारण, ती प्रक्रिया साहजिकच वेळखाऊ, क्लिष्ट आणि अनेक कागदी घोडे नाचवल्यानंतर कदाचित तुम्हाला कर्ज मिळू शकते. मग अनेकांना आणीबाणीची परिस्थिती समोर असल्याचे दिसत असते.

अशावेळी ‘इन्स्टंट लोन’ म्हणजे तत्काळ कर्जाच्या अनेक जाहिराती हल्ली समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात झळकताना दिसतात आणि याचाच गैरफायदा अनेक लुटारू घेतात.यासाठीचे सावज शोधणे हा अनेकांचा पूर्णवेळ उद्योग असतो आणि आता बहुतांश व्यवहार हे ‘डिजिटल’ झाल्याने अशी ऑनलाईन फसवणूक करणे सोपे झाले आहे.

त्यातच कोरोना काळात ‘लॉकडाऊन’मुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आणि शेकडो लोक बेरोजगार झाले. हातावर पोट असणार्‍यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. त्याच काळात ‘इन्स्टंट लोन ऍप्स’चे जाळे देशभरात पसरले होते. घरबसल्या कर्ज मिळत असल्यामुळे, अनेकांनी हे ‘लोन’ ऍप्स डाऊनलोड करून गरजेपुरते कर्ज घेण्यास सुरुवात केली. पाच ते दहा हजार इतक्या रकमेचे कर्ज देत असल्याने, अशा ‘लोन’ ऍपद्वारे कर्ज मिळवण्याचे प्रमाणही अल्पावधीत वाढले.

इंटरनेट वापरून अर्थ व्यवहार करणे हे आता अगदी सर्वमान्य झाले आहे. सुटसुटीतपणा, भौगोलिक मर्यादा नसल्याने त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ‘आग तेथे धूर’ तसे ‘अर्थ तिथे गुन्हेगार’ हे गृहीतकही तितकेच सत्य. फसवणूक करणारे लोक गरजू लोकांच्या अशा गरजांचे भांडवल करतात आणि अशा परिस्थितीत कथित विश्वासार्ह कर्ज देण्याच्या बहाण्याने त्यांचे पैसे लुटतात. यालाच ‘लोन घोटाळा’ असे म्हणतात. हे सत्र वर्षानुवर्षे चालू आहे. आता फक्त त्यांचे मार्ग आधुनिक झाले आहेत. पूर्वी पाकीटमार होते, आता ‘हॅकर्स’ आहेत. लोन घोटाळ्यात फसवणूक करणारे गरजू, हवालदिल झालेल्या व्यक्तीस कर्ज लवकर आणि सहजपणे मिळवून देण्याची खोटी आशा दाखवतात. ते व्यक्तीच्या गरजेनुसार एक फसवा, पण आकर्षक प्लॅन बनवतात.

उदाहरणार्थ, जर एका स्थापित बँकेत कर्ज मिळवण्यासाठी, अर्ज करणार्‍या व्यक्तीचा ‘क्रेडिट स्कोअर’ तेवढा चांगला नसेल किंवा खूप कमी वेळेत व्यक्तीला मोठ्या रकमेची गरज असल्यास, फसवणूक करणारे ते कसे काही मिनिटांमध्ये व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार कर्ज मिळवून देऊ शकतात, हे खूप हुशारीने पटवून देतात. लोन घोटाळ्यास भरीस पडल्यास त्याचे दोन मुख्य परिणाम होतात. एकतर फसवणूक करणारा ‘सिक्युरिटी’ (गॅरंटर) म्हणून काही आगाऊ रक्कम मागू शकतो, जी कधीही परत केली जात नाही किंवा प्रोसेसिंग फी, लेट फी, व्याज आणि अशा इतर बर्‍याच खर्चाच्या बहाण्याने तुमच्याकडून एकूण रक्कम काढू शकतो.

अशाप्रकारे शेवटी कर्ज घेणार्‍या व्यक्तीचे मोठे आर्थिक नुकसान होते. गुन्हेगार तुमच्याशी अनेकदा मेसेज, ई-मेल किंवा फोनद्वारे संपर्क साधतात आणि तुम्हाला त्यांचे लोन ऍप ‘डाऊनलोड’ करण्यास सांगून तुमचे तपशील भरून झटपट कर्ज मंजुरी मिळवण्यास सांगतात. लोन ऍप ‘डाऊनलोड’ केल्यावर, ते तुमच्या फोनवरील प्रत्येक गोष्टीत प्रवेश मिळवण्याची विनंती करतात. तुमची संपूर्ण संपर्क सूची (अड्रेस बुक), फोटो आणि व्हिडिओ इत्यादी. तुम्ही तुमचा आधार, पॅन, पत्ता आणि तुम्हाला आवश्यक असलेली रक्कम यासारखे मूलभूत तपशील भरल्यानंतर लवकरच तुम्हाला तुमच्या खात्यात रोखरक्कम जमा झालेली दिसेल. पण, यावर खूश व्हायचे क्षण अगदी थोडे असतात.

कारण, खरी गंमत आता पुढे सुरू होते. कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी अशा ‘लोन’ घोटाळ्यात बळी पडलेल्या आणि देऊ केलेले पैसे स्वीकारणार्‍यांना वसुली एजंटांकडून हरप्रकारे त्रास दिला जातो आणि गैरवर्तन केले जाते. अश्लील संदेश, अश्लील चित्रे आणि अपमानास्पद मजकूर व्यक्ती तसेच त्याच्या/तिच्या संपर्क यादीतील इतरांना पाठवले जातात. काही बाबतीत ‘सायबर’ गुन्हेही घडतात व आपली सर्व माहिती वापरून खोटी खाती, प्रोफाईल्स निर्माण केले जातात. पुढे काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत, जे तुम्हाला लागलीच सांगतील की, तुमच्याशी संपर्क साधणारा व्यक्ती एक लोन घोटाळेबाज आहे.

१) कर्जदात्याची संस्था ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ सोबत अधिकृत नोंदणीकृत केलेली नाही आणि कोणत्याही ज्ञात बँक किंवा वित्तीय संस्थेशी निगडित नाही.

२) ‘प्ले-स्टोअर’ वर लोन उघड नाही. कर्जाच्या नियम व अटींचे तपशील उघड करत नाही, कर्ज मंजूर करण्याआधी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासत नाही.

३) कर्जदाता नोंदणीकृत नाही, त्यांच्या कार्यालयाचा पत्ता, संकेतस्थळाचा पत्ता नाही.

४) कर्जाचे वितरण करण्याआधी आगाऊ स्वरूपात कर्जाच्या शुल्काची मागणी केली जात आहे

५) कोणतेही क्रेडिट सत्यमापन केले गेले नाही आणि असे सांगितले जाते की, कर्ज क्रेडिट मुक्त आहे.

६) कर्जदाता खूप कमी व्याज दरावर कर्ज देऊ करेल आणि ते फक्त मर्यादित कालावधीसाठी वैध आहे.

लोन घोटाळ्यापासून आपला बचाव कसा करावा ?

१) कधीच कोणाला तुमचे वैयक्तिक तपशील आधार, पॅन, बँक खाते क्रमांक इत्यादी फोन, ई-मेल किंवा इतर माध्यमातून शेअर करू नका.

२) कर्जदात्याची विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी नेहमी त्यांचा वास्तविक पत्ता आणि संकेतस्थळाचे मूल्यांकन करा.

३) तुमचा वनटाईम पासवर्ड (ओटीपी) किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाहीसोबत शेअर करू नका.

४) कर्जाची ऑफर समजून घ्या. कारण, घोटाळे करणारे नेहमीच काहीतरी संशयास्पद लाभ देण्याची लालूच देत असतात.

भामट्यांचे फोन क्रमांक हे नोएडा, पश्चिम बंगाल, झारखंड भागात रजिस्टर केलेले आहेत. ‘सायबर’ पोलीसांच्या मते, असे पाच-दहा नव्हे, तर तब्बल ३०० हून अधिक ऍपद्वारे फसवणूक होते. ‘सायबर सेल’ अशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र, हे गुन्हेगार आंतरराष्ट्रीय पातळीवरून नेटवर्कचा वापर करत असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे ‘सायबर’ पोलीसांचे म्हणणे आहे.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ने या फसवणुकीची दखल घेतली आहे आणि गेल्या दोन वर्षांत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, कर्ज सेवा प्रदात्याला देय असलेले सर्व शुल्क हे कर्ज देयकाने भरले पाहिजे, कर्जदाराने नाही. नियामक मार्गदर्शक तत्त्वांमधील त्रुटी दूर करून ग्राहकांच्या माहितीच्या गोपनीयतेसाठी आणि सुरक्षिततेसाठी बँका आणि संलग्न वित्तसंस्था बँका जबाबदार असतील. क्रेडिट मर्यादा आपोआप वाढवण्यासाठी कोणताही अतिरिक्त भार नसावा, असेही त्यात नमूद केले आहे. तसेच, ‘आरबीआय’ने म्हटले आहे की, ‘डिजिटल’ कर्जाची किंमत कर्जदाराला अगोदरच जाहीर केली पाहिजे व ती एकतर्फी बदलणे वैध नाही. एप्रिलमध्ये, ‘आरबीआय’च्या कार्यकारी गटाला ६०० बेकायदेशीर कर्ज देणारी ऍप्स सापडली. ‘डिजिटल’ फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे, केंद्रीय बँक आता ‘तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या’ (केव्हायसी) निकषांवर पुनर्विचार करत आहे, ज्यामुळे अपुरेपणा ओळखता येईल आणि ती जागा भरून काढता येईल.

चिनी सायबर गुन्हेगार अनेकदा बेरोजगार तरुणांना आणि आर्थिकदृष्ट्या तणावाखाली असलेल्या समाजातील निम्न स्तरातील लोकांना प्रथम हेरतात, जे गुन्हेगारी सिंडिकेट आणि टोळ्यांचे सहज सावज बनतात. ते अनेक देशांमध्ये बेकायदेशीरपणे घोटाळ्याचे कामकाज चालवत आहेत, अशी अनेक प्रकरणे आढळून आली आहेत आणि कंबोडिया, व्हिएतनाम इत्यादी चीनच्या शेजारील देशांमध्ये अशा बेकायदेशीर कारवाया वाढल्या आहेत. नुकतेच काठमांडूमधील बेकायदेशीर कॉल-सेंटरवर नेपाळ पोलीसांनी छापा टाकला आणि १९० लोकांना अटक केली. ज्यात पाच चिनी नागरिक आणि दोन भारतीयांचा समावेश आहे.

नेपाळच्या गुप्तचर संस्थांनी भारतीयांना लक्ष्य करून ‘सायबर’ गुन्ह्यांसाठी चिनी नागरिकांकडून नेपाळी लोकांचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. काठमांडू आणि इतर भागात चिनी लोकांनी बेकायदेशीर ‘कॉल सेंटर्स’ स्थापन केली होती. स्थानिकांना भरघोस पगार आणि कमिशनचे आमिष दाखवून, अपमानास्पद कॉल आणि अश्लील फोटोंद्वारे भारतीयांकडून पैसे उकळण्याचे घाणेरडे काम केले होते. नेपाळने बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या १ हजार, ५०० हून अधिक चिनी नागरिकांना मायदेशात पाठवले आहे. या गुन्ह्याचा हा आहे आंतरराष्ट्रीय पैलू आहे. तेव्हा, एकूणच अशा लोन अ‍ॅपच्या जाळ्यात न अडकता सर्वसामान्यांनी आपली अर्थसुरक्षा करणे नितांत गरजेचे आहे.

 

रेल्वे प्रवाश्यांना आयआरसीटीसीकडून सहजपणे रेल्वे तिकीट बुकिंग्स साठी नवी सुविधा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी आयआरसीटीसीकडून मोठी बातमी आहे. तुम्ही सुद्धा रेल्वेत रिझर्व्हेशन केलंत तर आता आणखी सोप्या पद्धतीने तुम्ही स्वत:साठी सीट बुक करू शकता. आता तुम्हाला आयआरसीटीसी ऍपवर जाऊन तिकीट बुक करण्याची गरज नाही, तुम्ही ऍपवर लॉग इन न करता तुमचं तिकीट बुक करू शकता. कसे ते समजून घेऊया.

आयआरसीटीसी ऍपशिवाय बुक करता येणार तिकीट

आयआरसीटीसीकडून प्रवाशांना अनेक विशेष सुविधा पुरवल्या जातात. आज तुम्हाला अशा एका सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही आयआरसीटीसी चॅटबॉटमधूनच रिझर्व्हेशन करू शकता. रेल्वेतर्फे ग्राहकांसाठी विशेष सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा नुकतीच सुरू करण्यात आली असून या सुविधेअंतर्गत तुम्ही सहजपणे तिकीट बुक करू शकता.

दररोज १० लाख लोक तिकीट बुक करतात

आयआरसीटीसीच्या वेबसाइटनुसार, सध्या वेबसाइटवरून दररोज १० लाखांहून अधिक लोक आरक्षण करतात. याशिवाय ऍप आणि स्टेशनच्या माध्यमातूनही प्रवासी तिकीट बुक करतात आणि अनेक वेळा वेबसाईट व्यवस्थित हँग होऊन चालत नसेल तर लोकांना वेळेत तिकीट मिळत नाही, हे लक्षात घेऊन रेल्वेने चॅटबॉटची सुविधा सुरू केली आहे.

वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही

या सुविधेत तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही, जितके पैसे तुम्हाला वेबसाईटवर तिकीट बुकिंगसाठी मोजावे लागतील, तेवढेच शुल्क चॅटबॉटवर सुद्धा द्यावे लागेल.

किती शुल्क आकारले जाते

तिकीट बुक करताना स्लीपर क्लाससाठी १० रुपये आणि एसी क्लाससाठी १५ रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर यूपीआयने पैसे भरल्यास स्लीपर क्लाससाठी २० रुपये आणि एसी क्लाससाठी ३० रुपये मोजावे लागतात.

दुर्लक्षित मतिमंद मुलांच्या शाळेला ‘टीम आम्ही गिरगांवकर’च्या मदतीचा हाथ..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शैक्षणिक सायकल स्वारी ह्या मथळ्याची बातमी ८ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये छापून आली होती, त्याला समाजातील दानशूर व्यक्तींचा उत्तम पाठिंबा मिळाला. पेण येथील ‘सूहित जीवन ट्रस्ट’ शाळेतील मतिमंद मुलांच्या शाळेत वरीलपैकी ५ सायकल २४ सप्टेंबर रोजी सुपूर्द करण्यात येणार आहेत. ह्यावेळी शाळेच्या साफसफाई करीता लागणारे वर्षभराचे साहित्य देखील शाळेच्या स्वाधीन करण्यात येईल. सदर मतिमंद मुलांच्या एका वर्षाकरिता शालेय पोषण आहारासाठी आवश्यक असलेले ८०० किलो तांदूळ, २५० किलो गहू ह्यासह सर्व प्रकारच्या डाळी, साखर, कडधान्य, तेल, तिखट- मीठ मिळून अंदाजे २१०० किलो अन्न धान्याची आवश्यकता आहे.

सदर धान्यांची पूर्तता ‘टीम आम्ही गिरगांवकर’ तर्फे करण्याचा प्रयत्न करणार आहे, तसेच ह्या सत्पात्री शैक्षणिक कार्यात अन्नधान्याची किंवा इतर स्वरूपात मदत करण्याची ईच्छा असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘टीम आम्ही गिरगांवकर’ तर्फे संस्थेच्या मार्फत करण्यात आले आहे.

संपर्क:-
मिलिंद वेदपाठक:- ९८२०७९५५८०
शिल्पा नायक:- ९८३३४३०१९४
दिपक राजपुरकर:- ८३६९८३०३८४

तरुणांनी ‘पोलीस भरती झालीच पाहिजे !’ म्हणत उपमुख्यमंत्र्यांसमोरच केली जोरदार घोषणाबाजी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तरुणांनी पोलीस भरती झालीच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. रखडलेली भरती पूर्ण करावी, अशी मागणी करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांची भेट घेऊन काहीही न बोलता निघून गेले. विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घातल्याने पोलिसांनी येथे घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी फडणवीस यांना घेराव घातल्याचे दिसून आले.

दरम्यान, नांदेडमधील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना या दिवशी आरोप करून दिवसाला महत्त्व देऊ नका, असे सांगितले. हा आजच्या दिवसाचा आपमान ठरेल. औरंगाबादमध्ये नेहमीच्या वेळेपूर्वी ध्वजारोहण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती दिनाचा अवमान केल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

“हैद्राबाद येथे मुक्ती संग्राम दिनाचाच कार्यक्रम आहे. तीन राज्याचे मुख्यमंत्री तिथे आहेत. मुख्यमंत्र्यांना लवकर ध्वजारोहन करण्याची काही हौस नाही. आजच्या दिवशी राजकारण करू नये.” असे देवेंद्र फडणवीस येथे बोलताना म्हणाले.

टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती; अवघ्या २२५ रुपयात लाईफटाईम वैधतामुळे जिओनेही ‘या’ प्लॅनपुढे टेकले हात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता दर महिन्याला रिचार्ज करण्याचा कंटाळा आला असून तीन महिने किंवा सहा महिन्याच्या वैधतेचा रिचार्ज प्लॅन करण्यापेक्षा अनेकांना असे वाटते की, लाईफटाईम वैधतेचा रिचार्ज प्लॅन असायला हवा. परंतु, टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लॅन उपलब्ध नाही. आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांकडे असा प्लॅन नसला तरी असा प्लॅन सध्या फक्त एकाचं कंपनी देत आहे. या कंपनीचे नाव आहे ‘एमटीएनएल’. या कंपनीच्या २२५ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्संना लाईफटाईम वैधता मिळते.

एमटीएनएल कंपनी देतेय असा प्लॅन

हो, तुम्ही जे ऐकलं आहे ते खरंच आहे. या प्लॅनमध्ये एमटीएनएल अनेक फायदे देत आहे. एमटीएनएलचा २२५ रुपयांचा प्लॅन यूजर्ससाठी खुपचं मस्त आणि किफायतशीर आहे. जाणून घ्या या प्लॅनसंबंधी सविस्तर माहिती.

‘एमटीएनएल’ कडून २२५ रुपयात अनेक फायदे

या प्लॅनची किंमत २२५ रुपये आहे. यात यूजर्संना एकदा रिचार्ज केल्यानंतर लाईफटाईम दिलासा मिळणार आहे. यात सिम आणि अकाउंटची वैधता लाईफटाईम आहे. यासोबतच १०० मिनिट कॉलिंग मोफत दिली जाते. व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति सेकंद ०.०२ पैस या दराने चार्ज केले जाते तसेच एसटीडी कॉलसाठीही हाच चार्ज केला जातो.

‘व्हीआय’ (वोडाफोन आयडिया) कंपनीचा प्लॅन

वोडाफोन-आयडिया कंपनीचा प्लॅन २३९ रुपयाचा आहे. यात यूजर्संना फक्त २४ दिवसाची वैधता मिळते. कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १ जीबी डेटा आणि रोज मोफत १०० एसएमएस दिले जातात. यात यूजर्संना मोफत ‘हॅलोट्युन’ आणि ‘विंक म्यूझिक’ मोफत दिले जाते.

‘ऐअरटेल’ कंपनीचा प्लॅन

ऐअरटेल कंपनीचा हा प्लॅन २३९ रुपयाचा आहे. यात यूजर्संना २४ दिवसाची वैधता दिली जाते. सोबत नंबर कॉलवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. रोज १ जीबी डेटा आणि रोज मोफत १०० एसएमएस दिले जातात. यात यूजर्संना ‘मोफत हॅलोट्यून’ आणि ‘विंक म्यूझिक’ मोफत दिले जाते.

‘जिओ’ कंपनीचा प्लॅन

जिओ कंपनी २२२ रुपयांचा प्लॅन देत आहे. परंतु हा प्लॅन केवळ जिओ फोन यूजर्ससाठी आहे. यात यूजर्संना २८ दिवसाची वैधता मिळते त्यासोबत रोज २ जीबी डेटा मोफत दिला जातो. अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. मोफत १०० एसएमएस रोज दिले जाते. व त्यांसीबत ‘जिओ ऍप्स’ चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाते.