Home Blog Page 118

सीमाशुल्क विभागाने सहा जणांना मुंबई विमानतळावर अटक करत केली १२ किलोची सोन्याची बिस्किटे जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने १० सप्टेंबर २०२२ रोजी एका सुनियोजित कारवाई अंतर्गत सुदानी प्रवाशांकडून ५ कोटी ३८ लाख रुपये किमतीचे सोन्याची १२ किलो वजनाची बिस्किटे जप्त केली. सुदानी प्रवाशांचा हा गट दुबईहून एमिरेट्स फ्लाईट एके-५०० ने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेला होता.

सुमारे २३ सुदानी लोकांच्या एका गटाने एकत्र येऊन कस्टम अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी गोंधळ निर्माण करून ग्रीन चॅनल मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. सुदानी प्रवाशांनी सीमाशुल्क आगमन क्षेत्रात मुद्दाम गोंधळ घातला तसेच अधिकाऱ्यांसमोर आरडाओरड करून आक्रमक पवित्रा घेतला आणि काही जण मारामारी देखील करू लागले. मात्र सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी हा प्रकार अतिशय व्यावसायिकतेने हाताळला. पुरेशी कुमक घेऊन त्यांनी या आक्रमक प्रवाशांना आवरलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सीमाशुल्क आगमन क्षेत्रात मुद्दाम गोंधळ निर्माण करून धूर्तपणे सोने घेऊन पलायन करायचा त्यांचा डाव होता.

गोंधळ करून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या एका प्रवाशाने परिधान केलेल्या खास डिझाइन केलेल्या पट्ट्यात लपवून ठेवलेल्या प्रत्येकी एक किलो वजनाची १२ सोन्याची बिस्किटे सीमाशुल्क अधिकार्‍यांच्या प्रभावी आणि जलद कारवाईमुळे हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी सीमाशुल्क अधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून वेगळे वर्तन करणाऱ्या अन्य पाच प्रवाशांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

 

७५.७१ कोटींच्या बनावट देयकाप्रकरणी एकास अटक, महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मेसर्स बालाजी स्टील आस्थापनासाठी बोगस पाच कंपन्याची स्थापना करुन ७५.७१ कोटींची बनावट बीले घेतल्याप्रकरणी ‘महाराष्ट्र वस्तू व सेवाकर’ विभागाने कारवाई करुन एकास अटक केली. भंवरलाल गेहलोत (४५ वर्षे) असे अटक केलेल्याचे नाव असून महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बनावट देयक देणाऱ्या करदात्यांवरील विशेष मोहिमेअंतर्गत मेसर्स. बालाजी स्टील या आस्थापनास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने भेट दिली. त्यादरम्यान मेसर्स. बालाजी स्टीलचे पाच मोठे पुरवठादार मे. द्वारकेश ट्रेडर्स, मेसर्स. एस.के. एंटरप्रायझेस, मेसर्स. परमार एंटरप्रायझेस, मेसर्स. अलंकार ट्रेडिंग आणि मेसर्स. शुभ ट्रेडर्स हे बोगस असून गेहलोत यांनी बनावट कागदपत्रांद्वारे त्यांची नोंदणी केली असल्याचे आढळले. वरील पाच बनावट कंपन्यांकडून ११.५५ कोटींची बनावट ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’ मिळवत बालाजी स्टीलने प्रत्यक्षात मालाची खरेदी न करता ७५.७१ कोटी रुपयांची केवळ देयके घेतली आहेत. असे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

श्रीमती वन्मथी सी, राज्य कर सहआयुक्त, अन्वेषण – ब, मुंबई राज्यकर उपायुक्त मनाली पोहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर विभागाचे सहायक आयुक्त महेंद्र पवार, प्रसाद आडके, सायली धोंगडे, दिनेश भास्कर तसेच राज्य कर निरिक्षक व कर सहायक यांच्या मदतीने ही कारवाई पार पडल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

 

‘टाटा’ समुह कंपनी कडून ‘मेड इन इंडिया’ आयफोनचे उत्पादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशातील सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक कंपन्यांपैकी एक म्हणजे टाटा कंपनी. जमशेदजी टाटा यांनी १८६८ मध्ये स्थापन केलेला, टाटा समूह हा एक जागतिक उपक्रम आहे, ज्याचे मुख्यालय भारतात आहे, ज्यामध्ये दहा वर्टिकलमध्ये ३० कंपन्या आहेत. टाटा कंपनीबाबत सध्या एक चर्चा सुरू आहे. स्मार्टफोन युजर्समध्ये आयफोनची क्रेझ किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. यामुळेच टाटा सन्स लवकरच भारतात आयफोन तयार करू शकते. टाटा समूह यासाठी ‘ऍपल इंक’चे तैवानी सप्लायर विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा करत असल्याचे म्हटले जात आहे.

टाटा समूह आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार !

टाटा समूहाला भारताला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात स्वावलंबी बनवायचे आहे. अशा परिस्थितीत ‘टाटा ग्रुप’ आणि ‘ऍपल इंक’ यांच्यातील हा करार झाल्यास आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनीचा चीनला आव्हान देण्याचा मोठा प्रयत्न असेल. यामुळे टाटा समूह आयफोन बनवणारी पहिली भारतीय कंपनी ठरणार आहे.
त्याचबरोबर यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला तसेच भारतीय कंपनीला चालना मिळेल.
भारताची लोकसंख्या पाहता येथे भविष्यात आयफोनच्या मार्केटला मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन टाटा समूहाने आता भारतातच आयफोन निर्मिती करण्याचा विचार सुरू केला आहे.

ऍपल इंक ही कंपनी भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या एकत्रित उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी ही कंपनी टाटा समूहाच्या संपर्कात असून लवकरच टाटा आणि ऍपल कंपनीमध्ये एक महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे.

भारताला याचा फायदा होऊन चीनला दणका बसणार ?

भारतात आयफोन बनवल्यास देशाला अनेक फायदे होतील. भारत आयफोन बनवणाऱ्या चिनी कंपन्यांना स्पर्धा देऊ शकेल आणि यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील चीनचे वर्चस्व कमी होण्यास मदत होईल. यासोबतच ‘ऍपल इंक’नंतर इतर परदेशी कंपन्या देखील भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग स्थापन करण्यासाठी आपली पावले उचलतील, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन शक्ती मिळेल.

यासोबतच आयफोन भारतात बनवल्याने देशात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच, जेव्हा आयफोन भारतातच बनवले जातात, तेव्हा बाहेरून आयात करण्यावर कोणताही कर लागणार नाही आणि त्यामुळे भारतीय बाजारपेठेतही आयफोन स्वस्त मिळू शकतात. टाटा समूहाने भारतात आयफोन निर्मिती सुरू केल्यास चिनी कंपन्यांना मोठा दणका बसू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला चीनवर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.

 

कर्जवाटप करताना नवीन उद्योजकांचे खच्चीकरण केल्यास बँकांवर होणार कायदेशीर कारवाई – उद्योगमंत्री उदय सामंत


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सांस्कृतिक उपराजधानी असे नावलौकिक असलेल्या डोंबिवलीत ‘सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ च्या माद्यमातून आणि एमआयडीसी च्या सहकार्याने ‘इंजिनिअर्स डे’ च्या निमित्ताने सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित होते.

सर्व कागदपत्राची पुर्तता केलेल्या नवीन युवा उद्योजकाला जर बँक कर्ज देण्यासाठी वारंवार हेलपाटे मारण्यास भाग पाडत असेल व त्याचे खच्चीकरण करत असेल तर अशा युवा उद्योजकांच्या पाठीशी एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार ठाम उभे असून अशा बँकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी कार्यक्रमात दिला.

तर गेल्या अडीच वर्षात किती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले याची मी उद्या यादीच जाहीर करतो असे देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याच कार्यक्रमात पुढे बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला आहे की उद्योजकांच्या प्रगतीसाठी व त्यांना बळ देण्यासाठी तुम्ही जो शब्द द्याल तो मी दिला आहे असे समजेन व आपण तो पूर्ण करू असे सांगितले. एक संकल्प करत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील उद्योजकाला कुठलाही त्रास होणार नाही हे उद्योग खात्यातील अधिकाऱ्यांनी आपली जबाबदरी समजून काम केले पाहिजे त्यावर आमचे नियंत्रण देखील असेलच . उद्योजकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उद्योजकांची एक समिती स्थापन केली जाईल व लवकरच त्यावर सरकार च्या माध्यमातून निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

‘कामा’ संघटनेतील उद्योजकांना भेटणारे उदय सामंत हे पहिले उद्योगमंत्री

कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (कामा) ही संघटना १९५८ पासून अस्तित्वात असून डोंबिवली एमआयडीसी येथे कार्यरत आहे. कामगार किंवा उद्योजकांच्या असोसिएशनचे प्रश्न मंत्रालयाच्या केबिनमध्ये बसून सोडवण्यापेक्षा प्रत्यक्षात असोसिएशनच्या कार्यालयात बसून सोडवणे महत्त्वाचे आहे. मंत्री त्यांच्या घरातला आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. या उद्देशाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज कामा संघटनेला भेट दिली. मात्र कामा संघटनेला त्यांच्या कार्यालयात येऊन भेट देणारे उदय सामंत हे पहिले उद्योग मंत्री ठरले आहेत. “कालपासून जे सारखे टीका करत आहेत त्यांनी सांगावं की ते कितीवेळा या ठिकाणी आले ? त्यामुळे नुसती टीका करण्यापेक्षा आपली जबाबदारी स्वीकारली तर काम सोपे होते. तीच जबाबदारी घेत मी त्यांच्या कार्यालयात त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आलो आहे.” असे ते बोलताना म्हणाले.

कामगारांना भविष्यात न्याय देण्यासाठी योग्य भूमिका एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी कामा संघटनेच्या भेटीदरम्यान दिले. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, कमल कपूर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अमबलगन उपस्थित होते व त्यांनी उदय सामंत यांना विघनहर्ता श्री गणेशाची मूर्ती देत कोरोना कालावधी नंतरचे उद्योजकांचे सगळे विघ्नांचे निराकारण करावे याकरिता साकडे घातले.

तत्कालिन मंत्र्यांनी येथील कंपन्या स्थलांतरित करण्याचा जो निर्णय घेतला होता तो नेमका काय आहे ते तपासावे लागेल . यासंदर्भात येथील उद्योजकांशी बोलावे लागेल. जर खरोखर यात तथ्य असेल तर पाऊल उचलावे लागेल. वेदांताची हाय कमिटीची मीटिंग सहा महिन्यांपूर्वी लावणे गरजेचे होते पण ती मीटिंग लावली गेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ती मीटिंग दोन महिन्यांपूर्वी लावली. मात्र आधीच सहा महिने त्यांना उशीर केल्याने त्यांनी प्रतिसाद दिला नाही. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ येथील बंद झालेले कारखाने गुजरातला जाऊ देणार नाही. जर काही कारखाने आजारी झाले असतील तर त्यांना पुन्हा नव्याने ऊर्जा देण्याचे काम प्रशासन व सरकारतर्फे करण्यात येईल. ‘गर्व से कहो हंम हिंदू है’ हा नारा मुख्यमंत्र्यांनी आता अचानक दिलेला नाही तर हा नारा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आधीच दिला होता, मात्र गेल्या अडीच वर्षात हा नारा काही जण विसरले आहेत असे ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांदरम्यान म्हणाले.

जाहिरात होर्डिंग्ज पालिकेने ताब्यात घेऊन थकबाकीदार ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मीरा भाईंदर शहरात विविध ठिकाणी महापालिकेने जाहिरात होर्डिंग्ज उभारली आहेत, ती चालविण्यासाठी मात्र खाजगी ठेकेदारांना देत आपली जबाबदारी झटकून टाकल्याने लाखों रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केला आहे.

ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे महापालिकेचे लाखों रुपयांचे नुकसान होत असताना थकबाकी वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न न करता पालिका प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे नागणे म्हणाले.

एकीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या कडेला, झाडांवर, विजेच्या खांबांवर जाहिरात करणे कायदेशीर गुन्हा आहे, महासभेत तसा ठराव संमत झाला आहे.

असे असताना देखील विनापरवानगी जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई पालिका प्रशासनाकडून केली जात नाही वा राजकीय दबावाखाली कार्यक्रम पार पडल्यानंतर बॅनर उतरवले जातात.

सदर होर्डिंग्ज वर ठेका पद्धतीच्या नावाखाली ठेकेदार मालकीहक्क दाखवत मनमानी कारभार करीत असल्याचे प्रकाश नागणे यांनी सांगितले.

एका विशिष्ट राजकीय पक्षाला झुकते माप देत हेच ठेकेदार पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडवत असल्याने त्या सर्वांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडील लाखोंची थकबाकी कायदेशीर मार्गाने वसूल करण्यात यावी तसेच शहरातील सर्व होर्डिंग्ज महापालिकेने ताब्यात घेऊन ठेकेदारी पद्धत बंद करावी.

शहरातील जाहिरातदारांना दिलासा देत नियमानुसार दरपत्रक ठरवून न्यायालयाच्या निर्देशानुसार अधिकृतपणे परवानगी देण्यात यावी.

सदर कामकाज पालिका प्रशासना मार्फत करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे.