Home Blog Page 119

आमिर खान च्या घरावर ‘ईडी’ ने छापा मारत केले १७ कोटी रुपये जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोलकात्यात ‘ईडी’ने मोठी कारवाई केली आहे. कोलकाता मधला व्यापारी आमिर खानच्या घरात ‘ईडी’ला मोठं घबाड सापडलं असून त्याच्या घरातून तब्बल पाच ट्रंकमध्ये १७ कोटी रुपये इतकी कोट्यावधीची रोकड जप्त करण्यात आली आहे. व्यापारी आमिर खान याच्या ‘गार्डन रीच’ निवासस्थानी ‘ईडी’ने काल सकाळी छापा टाकला. पाच ट्रंकमध्ये ही रोकड ठेवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पैशांची मोजणी सुरु केली आणि रात्री उशीरापर्यंत मोजणी सुरुच होती. ‘ईडी’ अधिकाऱ्यांबरोबर केंद्रीय सुरक्षा यंत्रणाही तैनात करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. याशिवाय काही २००० आणि २०० रुपयांच्या नोटा सुद्धा होत्या. प्रिवेंशन ऑफ मनी लॉण्ड्रींग अॅक्ट अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. फेडरल बँकेच्या अधिकाऱ्यांनी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे कोलकाता इथल्या पार्क स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये १५ फेब्रुवारीला एफआयआर च्या आधारे आमिर खान आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘ईडी’ने दिलेल्या माहितीनुसार आमिर खान ‘गेमिंग ऍप’च्या माध्यमातून लोकांची फसवणूक करत होता. त्याने ई-नगेट्स नावाचं एक मोबाईल गेमिंग ऍप लॉन्च केलं होतं. सुरुवातील या गेमिंग ऍपच्या माध्यमातून त्याच्या युजर्सना चांगली बक्षिसं देण्यात आली. युजर्सच्या वॉलेटमध्ये पैसे पाठवण्यात आल्याने युजर्सचा विश्वास वाढला आणि त्यांनी ऍपमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

या ऍपची प्रसिद्धी वाढत गेल्याने मोठ्या प्रमाणावर युजर्सने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मोठी रक्कम गोळा झाली. त्यानंतर अचानक ऍपद्वारे पैसे काढण्यावर बंदी घालण्यात आली. इतकंच नाही तर सर्व डेटा ऍप सर्व्हरवरुन हटवण्यात आला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं युजर्सच्या लक्षात आलं. युजर्सची कोट्यवधींची फसवणूक करण्यात आली आहे याची तक्रार दाखल करण्यात आली त्यामुळे ‘ईडी’ ने सदर कारवाई केली.

गृहमंत्रालयातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी लवकरच जाहीर होणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

चातकासारखी बदल्यांची वाट पहाणाऱ्या आणि वारंवार हुलकावणी मिळत असल्याने नैराश्याच्या मोडमध्ये आलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांकडून कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भाने राज्यभरातून गेलेले सर्व अहवाल लक्षात घेता १२ सप्टेंबर किंवा त्यानंतर कोणत्याही दिवशी बदल्यांची यादी जाहिर केली जाऊ शकते. शिर्षस्थ पातळीवरून या माहितीला दुजोरा मिळाला आहे.

२०२० नंतर राज्यात कधी नव्हे एवढा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा बदलीचा हा वादग्रस्त विषय ठरला आहे. बदलीच्या निमित्ताने कोट्यवधींची डील झाल्याचा जोरदार आरोप झाल्याने आणि या आरोपाची केंद्रीय संस्थांकडून कसून चाैकशी झाल्याने गेल्या दोन वर्षांत अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषय टांगणीवर ठेवला असल्यानेच राज्यात प्राधान्य मिळाले. परिणामी एकाच ठिकाणी नियुक्त मुदतीपेक्षा जास्त कार्यकाळ काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांचा तीव्र हिरमोड झाला आहे.

सेवाकाळ पूर्ण झाल्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आपल्या बदलीच्या ऑर्डची वाट बघत आहेत. मात्र, विशिष्ट राजकीय भूमीकेमुळे बदलीची यादी निघायला तयार नाही. या यादीच्या प्रतिक्षेत अनेक अधिकारी ‘ओव्हर सर्व्हीस ड्यू’ (नमूद कालावधीपेक्षा अधिक सेवा) झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणच्या अधिकाऱ्यांची ही स्थिती आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपात पहिले गृहमंत्री, अनिल देशमुख यांच्या रुपात दुसरे तर आता परत देवेंद्र फडणवीसांच्या रुपातच तिसरे गृहमंत्री दिले आहे. त्यामुळे पोलीस दलात नागपूरचे नाव गृहमंत्र्यांचे शहर म्हणूनही घेतले जाते. अशा या शहरात काही अधिकाऱ्यांचा सेवाकाळ २०२१ मध्येच पूर्ण झाला. त्यामुळे ते वर्षभरापासून बदलीच्या आदेशाची वाट बघत आहे. नुकतीच गणेशोत्सवाची सांगता झाली. दोन आठवड्यानंतर नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचा बंदोबस्त सुरू होईल. त्यानंतर हिवाळी अधिवेशन, दिवाळीचाही बंदोबस्त लागेल. परिणामी आता नाही तर एकदम दसरा-दिवाळी नंतरच बदल्यांची यादी काढावी लागेल. ते ध्यानात घेऊन सोमवारी १२ सप्टेंबरपासून पुढच्या कोणत्याही दिवशी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची जंबो यादी जाहिर केली जाणार असल्याचे समजते. खास सूत्रांच्या माहितीनुसार, गृहमंत्रालयातून बदली प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही क्षणी प्रतिक्षेतील अधिकाऱ्यांना आनंदाची बातमी देऊ शकतात, असेही सूत्रांचे सांगणे आहे.

१३ पैकी ९ अधिकाऱ्यांना प्रतिक्षा

उपराजधानीत १० डीसीपी (उपायुक्त) आणि अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त तसेच पोलीस आयुक्त असे एकूण १३ वरिष्ठ अधिकारी आहेत. यापैकी सहआयुक्त अस्वती दोरजे, उपायुक्त चिन्मय पंडित, संदीप पखाले आणि चेतना तिडके हे वरिष्ठ अधिकारी सोडता सर्वांचाच सेवाकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे सर्वांना बदलीच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. काही अधिकारी प्रतिनियुक्तीवरही जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

आयुक्तांना एक्स्टेंशन ?

राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक व्हीआयपींच्या आगमनांची वर्दळ असलेले शहर म्हणूनही नागपूरचे नाव घेतले जाते. त्यामुळे येथे सलग बंदोबस्ताचा ताण असतो. त्यात नागपूरचा वाढता क्राईम रेट पाहता येथे सेवा देण्यास फारसे कुणी उत्सूक नसतात. येथील गुन्हेगारी वाढल्याची ओरड होत असली तरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे प्रयत्न चांगले आहेत. ते लक्षात घेता त्यांना आणखी काही महिने एक्स्टेंशन मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

शिंदे-ठाकरे समर्थक गणपती विसर्जन मिरवणुकीत आपापसात भिडल्याने तणावपूर्ण झालेले वातावरण पोलीसांच्या मध्यस्तीने निवळले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे यांचे समर्थक इतर वेळी एकमेकांवर टीका करत असतात परंतु अनंतचतुर्दशी दिनी थेट गणेश विसर्जन मिरवणुकीत देखील परस्पर विरोधाचे बोलके चित्र बघायला मिळाले. मुंबईतील प्रभादेवी परिसरात गणरायाचे विसर्जन करत असताना दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांच्या मिरवणुकी आमनेसामने आल्याने घोषणाबाजी, कल्लोळ यासह काही काळ तणावपूर्ण वातावरणाची निर्मिती झाली होती. यावेळी समाधान सरवणकर व संजय भगत हे प्रमुख कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने जोरदार घोषणाबाजी होऊन राडा सदृश्य स्थिती निर्माण झाली होती.

यावेळी पोलीसांनी प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केल्याने दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले व कुठलाही अनुचित प्रकार रोखण्यास पोलीसांना यश प्राप्त झाले. प्रभादेवी भागात यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले होते तसेच शिंदे गटाच्या प्रियाताई सरवणकर यांनी मध्यस्थी केल्याने विसर्जनाला गालबोट लागण्याचा प्रकार टाळला गेला. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली व पोलीसांना योग्य ते उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

पोलीसांच्या हस्तक्षेपाने लवकरच वातावरण निवळले व विसर्जन शांततेत पार पडले. एकंदरतीच राजकीय विरोध हा सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात देखील दिसून येत असल्याने लाडक्या बाप्पाच्या विसर्जनावेळी तरी शांतता राखणे गरजेचे होते. येत्या काळात नवरात्र उत्सव आहे त्यामुळे सामंजस्याने वागत विरोध बाजूला ठेवत सण उत्सव साजरे व्हावे अशा प्रतिक्रिया सामान्य लोकांतून येत आहे.

कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागल्याने नागरिकांमध्ये समाधान


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागल्याने नागरिकांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात ९५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासात राज्यात ९७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी राज्यात १०७६ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली होती. तर सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत ९७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ७९,५४,०५२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०८ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ९५५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज चार करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे आणि सध्या कोरोना संक्रमित सक्रिय रुग्ण ७,०६७ आहे.

मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची सर्वाधिक संख्या २०८५ असून राज्यात सध्या ७,०६७ सक्रिय रुग्ण आहेत. ठाण्यात १,५३२ सक्रिय रुग्ण आहेत. पुणे- १,७२१, पालघर १५८ , रायगड २८१ , नाशिक १८६ , नागपूर १३८ आणि चंद्रपूरमध्ये १६१ सक्रिय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या १०० पेक्षा कमी आहे. राज्यात सर्वात कमी सक्रिय रुग्ण यवतमाळमध्ये आहेत. यवतमाळमध्ये सध्या फक्त चार सक्रिय रुग्ण आहेत. हिंगोलीमध्ये पाच तर परभणीमध्ये सहा सक्रिय रुग्ण आहेत. बीड आणि गोंदिया जिल्ह्यात सात सक्रिय रुग्ण आहेत अशी माहिती मिळाली आहे.

५० खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के : रामदास आठवले


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

५० खोके, एकदम ओके, खेळत बसा तुम्ही एक्के, आम्ही आहोत पक्के, अशा कवितेच्या चारओळी ऐकवत आठवले यांनी उपस्थितांना खळखळून हसवलं. बालगंधर्व रंगमंदिरात रिपाइंच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. विरोधक रोजच आमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काहीही झालं तरी आमचं सरकार पडणार नाही. सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजप आणि आरपीआय बरोबर एकत्र होती.

शिवसेनेनं आमची साथ सोडून महाविकास आघाडीचा रस्ता स्वीकारला आणि आमच्यापासून फारकत घेऊन दूर गेली. आता एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आल्यामुळे विरोधक आमचं सरकार पाडण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत, असं रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.

यंदाच्या डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या निवडणूका होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. प्रभाग रचना आणि काही अन्य कारणामुळे निवडणूका रखडल्या असल्या तरी राज्यातील प्रत्येक शहरात या निवडणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. पुण्यात देखील सर्व पक्षाने निवडणूकीसाठीची तयारी सुरु केली आहे. विविध आंदोलनं, विकास कामं करण्यासाठी सरसावले आहेत.

मात्र ठाकरे सरकारने प्रभागरचनेचा निर्णय बदलल्यामुळे निवडणुकीचा गोंधळ झाला. आता निवडणुक आयोगानेही सध्या निवडणूका घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार सगळ्या गोष्टी नीट करत आहेत. विरोधकांनी उगाच विरोध करु नये, असंही ते म्हणाले.

ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आठवलेंची भेट घेत त्यांच्या आरक्षणाबद्दल चर्चा झाली. मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं तर ब्राह्मण समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी पुर्वीच केली असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळायला हवं. अमृत योजनेसाठी पाठपुरावा करण्यात यावा, अशा मागण्या यावेळी ब्राह्मण महासंघाने केल्या.