Home Blog Page 133

गुन्हे शाखा युनिट- ३, कल्याण पोलीसांची यशस्वी कामगिरी; मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून केली एकास अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दोन महागड्या मोटर सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणून गुन्हे शाखा युनिट ३, कल्याण पोलीसांनी एकास अटक केली आहे. काशिम युनूस अली (वय:२२ वर्षे)असे याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सापळा रचून प्रीमिअर कॉलनी, मानपाडा – शीळ रोड येथून काशिम युनूस अली रा. फिरस्ता मूळ रा. कुलमंपुर, ग्यानपूर जिल्हा: रविदासनगर भदोही उत्तरप्रदेश यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने चार -पाच महिन्यापूर्वी तो व त्याच्या मित्र अंकित कुमार शर्मा सध्या रा. उत्तरप्रदेश या दोघांनी मिळून कल्याण मधील मटण शॉप मध्ये काम करत असताना नांदिवली मधून आर १५ यामाहा कंपनी ची मोटासायकल व मुंबई धारावी येथून होंडा शाईन मोटासायकल चोरी केली होती व दोन्ही मोटर सायकलचे त्याच कंपनी मोटर सायकलचे खोटे नंबरप्लेट टाकून गाड्या चालवीत असल्याचे त्याने कबूल केले.

पोलीसांनी त्याच्याकडून दोन्ही मोटार सायकल जप्त करून त्याच्याकडून मोबाईलसह एकूण २,१५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच १) कोळसेवाडी पो ठाणे गुन्हा रजि क्र. ३३६/२२ आयपीसी ३७९, २) शाहूनगर पोलीस स्टेशन मुंबई गुन्हा रजि क्र. १७४/२२ आयपीसी ३७९ असे दोन महागड्या मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले.

सदर गुन्ह्यातील आरोपी काशिम युनूस अली आणि दोन मोटार सायकल पुढील कारवाई करीता कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहेत.

सदरची कारवाई गुन्हे युनिट -३, कल्याण चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, हेड कॉन्स्टेबल जरग, साबळे, बेलदार, साळवी, कडू, बोरकर व सचिन वानखेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

डोंबिवली पोलीसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून २,९०,०००/- रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

२२ मोबाईल व १० सायकल चोरी करणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून डोंबिवली पोलीसांनी २,९०,००० /- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सविस्तर वृत्त असे आहे की गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हे आपल्या पोलीस ठाणे हददीत गस्त करत असताना दोन संशयीत लहान मुले हे पराग बंगल्यासमोरुन, नांदीवली रोड, डोंबिवली पूर्व येथून सायकल वरून जात असताना त्यांना मिळून आल्याने सदर दोघांना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच सदरची सायकल ही त्यांनी ९० फुट रोड, ठाकुर्ली पूर्व येथील वि-मार्ट समोरुन चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडील रेडमी कंपनीच्या मोबाईल बाबत चौकशी केली असता सदरचा मोबाईल देखील चोरीचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदर मोबाईल बाबत डोंबिवली पोलीस ठाणे गुरजिक्र :- १७७/२०२२ कलम :- ३८० भादंवि प्रमाणे व सायकल चोरी बाबत डोंबिवली पोलीस ठाणे गुरजिक्र २७९ / २०२२ कलम :- ३७९ भादवि प्रमाणे दाखल आहे.

दरम्यान, पोलीसांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून सदरचा मुददेमाल जप्त केला. तसेच त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आणखी २१ मोबाईल व ९ सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्याकडून मेमोरंडम पंचनाम्या प्रमाने आयरेगांव परीसरातील एका घरातून एकूण २१ मोबाईल (ओपो, विवो, रेडमी, पोको) अशा कंपनीचे मोबाईल तसेच ९ सायकल (हिरो स्प्रींट, हरक्युलस, बिटविन, वोकी) अशा कंपनीच्या सायकल पोलिसांनी जप्त केल्या.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, कल्याण, सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि तडवी, पोनि सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ, पोहवा शंकर निवळे, पोहवा प्रशांत सरनाईक, पो.अ. वैजनाथ रावखंडे, नितीन सांगळे, पो.ना. कोती यांनी केली आहे.

 

मुंबई विमानतळावर कस्टम्सने इथोपियाची महिलेकडून ५ कोटींचे कोकेन केले जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई विमानतळावर कोकेनची तस्करी करणाऱ्या एका इथोपियन महिलेकडून तब्बल ५ कोटी रुपयांनचे कोकेन जप्त करण्यात कस्टम्सला यश आले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिएरा लिओनियन नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कस्टम्सने केली असून या महिलेकडून तब्बल ५०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. ती इथोपियाच्या आदिस अबाबा येथून प्रवास करत होती. ही महिला इथोपियन एअरलाईन क्रमांक ईटी ६१० या विमानातून मुंबईत दाखल झाली होती.

दरम्यान मुंबई विमानतळावर संबंधित महिलेच्या पर्सची तपासणी मुंबई विमानतळावरील
कस्टम्स अधिकाऱ्यांकडून करण्यात आली त्यावेळी तिच्या पर्समध्ये सुमारे ५०० ग्रॅम कोकेन आढळून आले. यानंतर कस्टम्सने या महिलेला ताब्यात घेऊन तिला जेरबंद करण्यात आले आहे.

 

डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकात ‘संवाद’ संस्थेच्या कर्णबधिर मुलांनी उत्साहात फोडली प्रतिकात्मक दहीहंडी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथील पंडित दीनदयाळ रोड वरील ‘सम्राट चौकात’ यंदा दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर सगळे निर्बंध उठल्यावर झालेल्या दहीकाला उत्सवात यंदा माजी नगरसेवक व युवा नेता ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’ यांच्यातर्फे “स्वराज्य दहीहंडी महोत्सव २०२२” मध्ये यंदाचे खास वैशिष्ट्य म्हणून दहीहंडी फोडण्याचा प्रथम मान कर्णबधिर मुलांना मिळाला. डोंबिवलीतील ठाकूरवाडी येथील संवाद कर्णबधीर शाळेतील विद्यार्थ्यांनी जल्लोषात ही हंडी फोडून उत्सवाची सुरुवात केली. एकीकडे रिमझिम पावसाची बरसात तर दुसरीकडे दहीहंडी फोडण्याचा या कर्णबधिर मुलांच्या चेहऱ्यावरील निस्सीम आनंद असा दुग्धशर्करा योग यावेळी जुळून आला होता.

डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकात ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’च्या दहिहंडी उत्सवात संवाद कर्णबधिर मुलांनी प्रतिकात्मक दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात फोडली. अपर्णा आगाशे संचालित ‘संवाद’ या संस्थेच्या मुलांनी ‘आम्ही पण कुठेही कमी नाही, आम्ही पण हंडी फोडू शकतो’ असा संदेश समाजाला या माध्यमातून दिला. कर्णबधिर मुलांनी मोठ्या उत्साहात या दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. कर्णबधिर मुलांना दही हंडीचा आनंद लुटता यावा, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सगळे नियम कटाक्षाने पाळत ‘दीपेश म्हात्रे फाउंडेशन’च्या वतीने आयोजित ‘स्वराज्य दहीकाला उत्सवात’ पहिली हंडी फोडण्याचा मान या मुलांना देण्यात आला होता.या दहीहंडी उत्सवात सोनी टीव्ही मराठी वर नामांकित असलेली कॉमेडी मालिका ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामधील प्रसिध्द कलाकार गौरव मोरे आणि शिवाली परब यांनी सुद्धा हजेरी लावली.

रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची उपस्थिती लाभली व सर्व गोविंदा पथकांना शुभेच्छा देत राज्यसरकार या उत्सवाला खेळाचा दर्जा देणार असून नोकरीत ही प्राधान्य देणार व दहीहंडी पथकाला १० लाख रुपयांचा विमा सुद्धा मिळणार ज्याचा हप्ता राज्य सरकार भरणार असल्याचे सांगितले.

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय २८ सप्टेंबरला सुरु होणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आपल्या मधुर स्वराने लाखो गीतांना अजरामर करणाऱ्या स्वर्गीय गायिका लता मंगेशकर यांच्या नावने लवकरच संगीत महाविद्यालय सुरु होणार असून, पुढील महिन्यात २८ सप्टेंबरला हे महाविद्यालय सुरु होणार असल्याचे समजते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांचा स्वर हा केवळ भारतीयांच्या परिचयाचा नसून त्या विदेशात सुद्धा प्रसिद्द आहेत.

संगीत महाविद्यालयात आता विद्यार्थी-विद्यार्थिनी पदवी सोबतच, प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतील. मुंबई येथील कलिना परिसरात या महाविद्यालयासाठी जागा हस्तांतरित केली गेली असून, तेथे सुसज्ज असे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटद्वारे सांगितले.