Home Blog Page 166

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी नवीन उपक्रम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना शेती व्यवसायात प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकार तसेच राज्यसरकार नेहमीच प्रयत्नशील असते. सध्या देशासह महाराष्ट्रात महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात डिझेलच्या दरात तब्बल १० रुपयांची वाढ केली गेली. सातत्याने इंधनाच्या होणाऱ्या वाढीचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे त्यात शेतकरीही हवालदिल झाला आहे.

विशेष म्हणजे सध्या राज्यात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून राज्यात सरासरी डिझेलचे दर १०५ रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. डिझेलच्या या मोठ्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. शेतीच्या मशागतीच्या कामांचे दर देखील अव्वाच्या सव्वा झाले आहेत. यावर उपाय म्हणून राज्य सरकारतर्फे ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ अशा नावाची एक नवी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असून मोठा फायदा होणार आहे.

विधवा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला शेतकऱ्यांना पेरणी ते कापणी दरम्यान आर्थिक सहाय्य व्हावे, व त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी ‘ट्रॅक्टर आमचा, डिजेल तुमचे’, हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे या महिला शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे. ही योजना देशात प्रथमच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत असून ही योजना राज्याला व देशाला मार्गदर्शक ठरणार आहे. याबाबत कामगार राज्यमंत्री नेते बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे.

शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह वेळ महिलांवर येते. पण नांगरणी, वखरणी, पंजी आणि पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून ? असे अनेक प्रश्न त्यांच्या सामोर उभे ठाकतात. त्यात त्यांना सहाय्य व्हावे यासाठी, हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला असल्याची माहिती कामगार राज्यमंत्री नेते बच्चू कडू यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.


केंद्र सरकारचा खाद्य तेलांच्या किंमती कमी करण्यासाठी मोठा निर्णय ! साठेबाजांवर कठोर कारवाई सुरू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्रातील सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून खाद्यतेल आणि तेल बियांवर कडक कारवाई सुरू आहे. केंद्रीय पथकांनी शुक्रवारी मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये खाद्यतेलाशी संबंधित साठेबाजी तपासण्यासाठी छापे टाकले.

देशात अनेक ठिकाणी खाद्यतेल आणि तेल बियांची साठेबाजी होत असल्याची माहिती केंद्रीय यंत्रणांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा थेट परिणाम महागाईवर होत आहे. तत्पूर्वी, महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

कस्टम ड्युटी रद्द करण्याची घोषणा

सरकारने मार्च २०२४ पर्यंत वार्षिक २ दशलक्ष टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवर कस्टम ड्युटी आणि कृषी पायाभूत सुविधा उपकर रद्द करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयानंतरही स्वयंपाकाचे तेल स्वस्त होईल, अशी अपेक्षा आहे.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये वार्षिक २० लाख टन क्रूड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावर कस्टम ड्युटी लावली जाणार नाही. आयात शुल्कातील ही सूट देशांतर्गत किमती खाली आणेल आणि महागाई नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल, असा सरकारचा विश्वास आहे.

 

रोटरी मिडटाऊनची ‘स्वरभूषण’ स्पर्धा उत्साहात संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ ने दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा “स्वरभूषण” ही गाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे नियोजन १२ ते १८ वर्षे, १९ ते ५० वर्षे आणि ५० वर्षावरील अशा तीन वयोगटात करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास १०० स्पर्धकांनी स्वेच्छेने भाग घेतला होता.

या स्पर्धेचे आयोजन रो.डॉ. लीना लोकरस आणि रो.डॉ. मकरंद गणपुले यांनी अतिशय उत्कृष्टरित्या केले होते. त्यांनी सांगितले की या स्पर्धेचा उद्देश हा स्थानिक गायकांना उत्तेजन देणे आणि त्यांना प्रकाशात आणणे हा आमचा हेतू आणि लक्ष्य आहे आणि यापूर्वी झालेल्या स्पर्धेतून जिंकलेले अनेक गायक हे आज गायन क्षेत्रात प्रगती करीत आहेत.

रविवारी दि.२२ मे रोजी या स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी, कामा हॉल, एमआयडीसी, डोंबिवली येथे पार पडली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नामवंत गायक श्री. उदय चितळे आणि सौ. कल्पिता खरे यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी रोटरी क्लब संगीताच्या क्षेत्रात करीत असलेल्या या कार्याची खूप प्रशंसा केली.

प्रेसिडेंट रो. जितेंद्र नेमाडे यांनी यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन करीत असलेल्या विविध समाजोपयोगी कामाची माहिती दिली. रो. अजय कुलकर्णी यांनी या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळली. रो. महादेव तामसे यांनी सर्व विजेत्यांना स्वखर्चाने रोख पारितोषिके दिली.

खालील गायक गायिकांनी या स्पर्धेत पारितोषिके पटकावली. त्यांना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ तर्फे रोख पारितोषिक व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी स्पर्धकांचे पालक, डोंबिवलीकर व रोटरी क्लबचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वयोगट १२ ते १८
१ – तेजस्विनी जोशी, २ – प्रेम विशे, ३ – जिविका हळबे, ४ – सुरभी देवस्थळे, ५ – पावनी कुलकर्णी, ६ – आश्लेषा सावळे

वयो,गट १९ ते ५०..
१ – शर्वरी बापट, २ – अमृता नायर, ३ – मंदार जोशी, ४ – डॉ. स्नेहल चटप, ५ – संतोष अय्यर

वयोगट ५० वरील..
१ – महेश देशपांडे, २ – प्रद्युम्न कुलकर्णी, ३ – उत्तम सोनवणे, ४ – परिमला देशपांडे, ५ – स्वाती देशपांडे, ६ – प्रफुल्ल साने

अशी यंदा या ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’ ने आयोजलेल्या ‘स्वरभूषण’  या संगीत स्पर्धेत वरील गायकांनी रोख पारितोषिक व ट्रॉफी जिंकलेल्यांची नावे आहेत.

 

‘या’ ४ कारणांमुळे तुमचं रेशन कार्ड रद्द होऊन कारवाईचीही शक्यता..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  अपात्र शिधापत्रिका धारकांनी कार्ड सरेंडर करावे किंवा रद्द करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. जे कार्ड सरेंडर करणार नाहीत, ते सरकारी पडताळणीत पकडले गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यासोबतच त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले रेशनही वसूल केले जाऊ शकते.

तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी जरूर वाचा. कोरोना महामारीच्या काळात सरकारने गरिबांसाठी मोफत रेशनची व्यवस्था सुरू केली होती. मात्र, सरकारकडून मिळणाऱ्या मोफत रेशनचाही लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचे गेल्या काही दिवसांत सरकारच्या निदर्शनास आले. अशा लोकांनी स्वतःच त्यांचे रेशनकार्ड रद्द करून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. शिधापत्रिका रद्द न झाल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक ते रद्द करेल. अशा लोकांवरही कारवाई होऊ शकते.

जाणून घ्या काय आहेत कारणं ?
जर एखाद्या कार्डधारकाकडे स्वतःच्या उत्पन्नातून मिळालेला १०० चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल, चारचाकी वाहन/ट्रॅक्टर, शस्त्र परवाना, गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात वर्षाला तीन लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असेल अशा लोकांनी आपले रेशनकार्ड ‘तहसील’ आणि ‘डीएसओ* कार्यालयात सरेंडर करावे लागेल.

घेतलेले रेशन वसूल केले जाईल
शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिकाधारकाने कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांचे कार्ड छाननीनंतर रद्द केले जाणार आहेत. यासोबतच त्या कुटुंबावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नाही तर अशा लोकांकडून तो रेशन घेत असल्याने रेशनही वसूल केले जाणार आहे.

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची पेट्रोल आणि डिझेल बाबत मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रातील मोदी सरकार ने आज सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रातील सरकारने पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्कात आज मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. पेट्रोलचे उत्पादन शुल्क तब्बल ८ रुपये तर डिझेलचे उत्पादन शुल्क तब्बल ६ रुपयांनी कमी करण्यात आल्याची घोषणा केंद्रातील अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केली आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५० रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी होणार आहेत. याशिवाय केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला’ योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (१२ सिलिंडरपर्यंत) २०० रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या की, यामुळे आपल्या माता-भगिनींना एकप्रकारे आर्थिक मदतच होईल.

देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणी मध्ये १२३.४६ रुपये प्रति लिटर, तर आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल १०७.६१ रुपये प्रतिलिटर आहे. त्याच वेळी, पोर्ट ब्लेअर मध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल ९१.४५ रुपये आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रति लिटर होते. त्याच वेळी, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर आज ९६.६७ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल१०४.७७ रुपये दराने विकले जात आहे. मात्र आता उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता कमी होणार आहेत.