Home Blog Page 170

आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ८ व्या महिला एशियन बीच च्या हँडबॉल स्पर्धेत भारतीय संघाला द्वितीय उपविजेतेपद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बँकॉक थायलंड येथे २५ ते ३० एप्रिल या दरम्यान झालेल्या ८ व्या महिला एशियन बीच हँडबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय महिला संघाने द्वितीय उपविजेतेपद पटकावले आहे. यात कल्याण ठाणे जिल्हा येथे राहणारी खेळाडू आणि भारतीय महिला संघाची कर्णधार रेखा अर्जुन कांबळे हिने द्वितीय उपविजेतेपदाची ट्रॉफी उंचावत कल्याणकरांचे नाव उंचावले आहे.

कोरोना काळात देशात प्रतिबंध आणि निर्बंध लादल्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. यात आता प्रतिबंध आणि निर्बंध शिथिल केल्याने भारतीय संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करत भारतीय महिला संघाने द्वितीय उपविजेतेपदाला गवसणी घातली.

टीम चे हेड कोच म्हणून राजस्थान राज्य क्रीडा परिषद चे हँडबॉल कोच श्री. प्रियदीप सिंह यांची निवड झाली होती. हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव डॉ. तेजराज सिंह यांनी टीम चे अभिनंदन केले तसेच कल्याण मध्ये येताच रेखा चे स्वागत करण्यात आले. इंडिया केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री. अप्पा शिंदे, जिजाऊ क्रीडा मंडळ कल्याण येथील राजेश मानवडे तसेच रेखा यांचे पती मनोज जाधव आणि संपूर्ण कुटुंब यांनी तीचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.


भारतीय टीम:
रेखा अर्जून कांबळे (कॅपटन) महाराष्ट्र,
वैष्णवी जाधव, मानसी परब, नताशा भगवान साहनी,(महाराष्ट्र), सिध्दी कौशिक, तान्या सिंह (राजस्थान), बितिका रभा, शेफाली दास (पश्चिम बंगाल), सिमाबेन अश्विनभाई चौधरी (गुजरात), हेड कोच – प्रीयदिप सिंह (राजस्थान), कोच – इंथोनी गोमस (महाराष्ट्र), विष्णूवधन बोड्डू (तेलंगणा) यांनी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान कामगिरी करून भारताच्या शिरपेचात एक तुरा खोवला म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

औरंगाबाद येथील सभेला पोलीसांनी घातलेल्या अटी आणि शर्थींचे उल्लंघन करून चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अखेर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलीसांकडून अटी आणि शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. त्यामुळेच या सभेवर पोलीसांची बारकाईने नजर होती. या सभेत राज ठाकरेंकडून नियम आणि अटींचं उल्लंघन केलं गेलं आहे का? या संदर्भात औरंगाबाद पोलीसांनी एक अहवाल तयार करून तो पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरेंवरील कारवाई बाबत चर्चा झाल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांना मिळत आहे.

प्रसिद्धी माध्यमांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यात दुपारी एक बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेचा औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. त्यानुसार आता औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात निश्चित कारवाई होण्याची शक्यता सूत्रांकडून मिळत आहे.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी याच संदर्भात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या झालेल्या या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांना राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेच्या संदर्भात विचारले असता त्यांनी म्हटलं, औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास केला आहे. कारवाई करण्यास औरंगाबादचे पोलीस आयुक्त सक्षम आहेत. आवश्यक असल्यास औरंगाबाद पोलीस योग्य ती कारवाई करतील अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिली आहे. जर आवश्यक असेल तर जी काही कारवाई आवश्यक असेल ती आज संध्याकाळपर्यंत होईल असंही पोलीस महासंचालकांनी स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंवर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्यावर या कलमांतर्गत गुन्हा दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एफआयआरमध्ये राज ठाकरेंना आरोपी नंबर १ करत त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये औरंगाबाद येथील सभेमधील चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार चिथावणीखोर आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक कलमं लावण्यात आली आहेत.

अटींचं उल्लंघन

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधल्या सभेसाठी पोलीसांनी १६ अटी ठेवल्या होत्या. त्यातल्या काही अटींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी जमवली असा ठपकाही ठेवण्यात आला आहे.

लावण्यात आलेले कलम –

राज ठाकरे यांच्यावर कलम ११६, ११७, १५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ या कलमांतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कोणत्या कलमात कोणते गुन्हे ?

११६ – गुन्हा करण्यासाठी मदत करणे
११७ – गुन्ह्याला मदत करणे आणि चिथावणीखोर भाषण करणे
१३५ – अटि शर्थींचा भंग करणे
१५३ – दोन समूहात भांडण लावणे

सरकारचा पोलिसांवर दबाव ?

सरकारचा पोलीसांवर दबाव असल्याने राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. सभेसाठी मुद्दामच पाळता न येण्यासारख्या अटी लादल्या होत्या. उद्धव ठाकरे, पवारांच्या सभांना उपस्थितीची मर्यादा कधी लावली होती का ? असा सवालही देशपांडे यांनी केला आहे. गुन्हा दाखल होणार, हे आम्हाला माहिती होतंच, असंही पुढे ते म्हणाले.

मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाई

मनसे पदाधिकाऱ्यांवर पोलीसांनी कारवाई करायला सुरूवात केली आहे. मुंबईत सर्वात आधी भोंग्यावर हनुमान चालिसा वाजवणारे चांदीवलीचे मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलीसांनी प्रतिबंधक खबरदारी म्हणून ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांच्या ऑफिसमधून पोलीसांनी भोंगेही जप्त केले आहेत.

 

मुंबई उच्च न्यायालयाने राज ठाकरे यांच्या सभे विरोधातील जनहित याचिका फेटाळली..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे १ मे रोजी होणाऱ्या सभे विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली.

या सभेवर बंदी घालावी किंवा सभेचे थेट प्रक्षेपण न करता त्यांनी केलेले भाषण न्यायालय व पोलीसांनी तपासावे व नंतर त्याचे प्रक्षेपण करावे अशा मागणीची जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी दाखल केली होती.

काल दुपारी याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना १ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. पुढील ३ दिवसात दंडाची रक्कम भरण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

 

रेल्वे प्रवाश्यांना एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्के घट – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रेल्वे प्रवाश्यांना यंदाच्या उकाड्यात गारेगार प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एसी लोकल रेल्वे मुंबई सीएसटीएम ते कसारा, कर्जत आणि चर्चगेट ते डहाणू व पनवेल या मार्गावर सुरु करण्यात आली. त्यातच या एसी गाड्यांच्या फेऱ्या कमी प्रमाणात असल्याने या गाड्याने प्रवास करण्याचे रेल्वे प्रवाश्यांकडून टाळले जात होते. तसेच या लोकलचे तिकिट दरही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होते. त्यामुळे एसी लोकलच्या गाड्या अनेकदा विना प्रवाशीच धावत असल्याचे चित्र पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर एसी लोकल गाड्यांच्या प्रवासी तिकिट दरात थेट ५० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जाहीर केला.

पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व रेल्वे मार्गावर मिळून जवळपास ९० लाखापर्यंत लोक हे दररोज लोकलने प्रवास करतात. सीएसएमटी ते पनवेल-कसारा-कर्जत असा मध्य रेल्वेचा पसारा असून चर्चगेट ते डहाणू असा पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेचा पसारा आहे. या दोन्ही मार्गावर एकुण २९०० लोकलच्या फेऱ्या दररोज होत असतात.

असं असतांना या मार्गांवर विविध ठिकाणी एसी लोकल (वातानुकूलित लोकल) च्या अत्यंत मर्यादीत फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र या एसी लोकलचे तिकीटाचे आणि दैनंदिन पासचे दर हे अव्वाच्या सव्वा असून सर्वसामान्यांच्या बजेटच्या पलीकडे असल्याने या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यातच काही एसी लोकलच्या फेऱ्या या ऐन गर्दीच्या वेळी सुरु केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कारण एक लोकल कमी करत ही एसी लोकल आल्याने, यामधून फार कमी प्रवासी प्रवास करत असल्याने या लोकलच्या मागे-पुढे असलेल्या लोकलमधील गर्दी वाढलेली बघायला मिळाली. त्यामुळे या एसी लोकल बंद करण्याची मागणी प्रवाशांकडून व्हायला लागली होती.

आज भायखळा इथे झालेल्या रेल्वेच्या एका कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी करत असल्याचे जाहीर केले. यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील प्रवासाला एका तिकीटासाठी १३० रुपये मोजावे लागाचे ते आता ९० रुपये आकारले जाणार आहे. तर चर्चेगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे ते आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत.

असे असतील सुधारीत दर

किमी         सध्याचे दर      सुधारीत दर
 ०५                  ६५                  ३०
 २५                १३५                  ६५
 ५०                २०५                 १००
१००                २९०                 १४५
१३०                ३७०                १८५

असं असंल तरी रेल्वे राज्यमंत्री यांनी तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी केले आहेत, याची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार हे मात्र स्पष्ट केलेले नाही. मात्र कार्यक्रमानंतर प्रसिद्धी व प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, आज मी घोषणा केली आहे. लवकरच दिल्लीला जाणार असून त्यानंतर यासंदर्भातील नोटीफिकेशन काढण्यात येईल. नोटीफिकेशन काढलेल्या दिवसापासून मग ५० टक्के म्हणजेच अर्ध्या तिकिट दरात एसी लोकलने प्रवास करता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

अनेक वर्षांपासून रखडलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्यामुळे “कहीं खुशी, कहीं गम” सारखी अवस्था!

मिरा भाईंदर: तब्बल अठरा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिरा भाईंदर महापालिकेच्या दहा कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्याच बरोबर अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना देखील अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे मात्र आणखीन चार अभियंत्यांना पदोन्नती पासुन वंचित राहावे लागले आहे. इतर सहा अभियंत्यांचे न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असून त्यांची विभागीय चौकशी देखील सुरू असल्यामुळेच त्यांना पदोन्नती देण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महानगर पालिकेने सेवा ज्येष्ठता यादीच अद्ययावत केली नसल्यामुळे अनेक अधिकारी कर्मचऱ्यांची पदोन्नती रखडलेली होती. मिरा भाईंदर महानगर पालिकेचे एकूण १६ कनिष्ठ अभियंते २००४ सालापासून राज्य शासनाकडून कायम स्वरूपी विविध विभागात कार्यरत असताना सेवा प्रवेश नियमानुसार ३ वर्षानंतर त्यांना शाखा अभियंता पदावर वाढीव वेतनश्रेणी देऊन पदोन्नती देणे आवश्यक होते. परंतु २०१४ साली मिरा भाईंदर महानगर पालिकेचे सेवा प्रवेश राज्य शासनाने मंजूर केल्यामुळे त्या सेवा प्रवेश नियमानुसार त्यांना सेवेत रुजू झाल्यानंतर सर्व कनिष्ठ अभियंत्यांना ८ वर्षांनंतर उपअभियंता पदावर पदोन्नती देण्याची तरतूद करण्यात आलेली होती.

पात्र ठरत असलेल्या अभियंत्यांची संख्या जास्त आणि मंजूर पदांची संख्या कमी असल्यामुळे नेमकी पदोन्नती कुणाला द्यायची? हा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यामुळे सर्वच १६ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिका पदोन्नती देण्याचे टाळत होती. या प्रश्नावर आयुक्त दिलीप ढोले वेगळाच तोडगा काढला असून १० पात्र अभियंत्यांना उप अभियंता पदावर पदोन्नती न देता शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या नियमानुसार महापालिका आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंत्यांना दर तीन वर्षांनी उपअभियंता पदावर पदोन्नती देण्याची तरतूद आहे. याच धर्तीवर शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग व ग्राम विकास विभागाच्या सर्व जिल्हा परिषदामध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांना तात्काळ पदोन्नती देण्यात आलेली होती. मात्र याला मिरा भाईंदर महानगरपालिका मात्र अपवाद ठरलेली आहे. महापालिका आस्थापनेवरील काही अभियंत्यांचे ४५ वर्ष वय पूर्ण झालेले असून त्यांना उप अभियंता पदावर पदोन्नती न देता महापालिकेच्या शाखा अभियंता पदावर पदोन्नती देण्यात आलेली असल्यामुळे एका अर्थाने त्यांच्यावर अन्यायच झाला असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवार २६ एप्रिल रोजी महापौर दालनात मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले व महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या हस्ते १० कनिष्ठ अभियंता व तीन अग्निशमन अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले.

ज्या १० कनिष्ठ अभियंत्यांना शाखा अभियंता पदावर पदोन्नती दिली आहे. त्यामध्ये शिरिषकुमार पवार, प्रांजल कदम, सतीश तांडेल, राजेंद्र पांगळ, अरविंद पाटील, भुपेश काकडे, उत्तम रणदिवे, उमेश अवचर, सचिन पाटील आणि यतीन जाधव यांची नावे आहेत. त्याच प्रमाणे अग्निशमन विभागाचे सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी प्रकाश बोऱ्हाडे, दिलीप रणवरे, धनंजय कनोजे यांना अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली.

यावेळी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, पालिका आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त मारुती गायकवाड यांच्यासह शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी दिपक खांबीत इत्यादी अधिकारी उपस्थित होते.