Home Blog Page 201

गणेशोत्सव काळात दर्शन ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यभर कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने २९ जून २०२१ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

  • सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
  • कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
  • यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
  • श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपतीकरिता 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
  • यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/ पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे.
  • उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / शिबीरे (उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
  • लागू करण्यात आलेले Level of Restrictions for Breaking the Chain बाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त कोणतीही शिथिलता देता येणार नाही.
  • आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
  • श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • दिनांक ८ सप्टेंबर २०२१ च्या शुद्धीपत्रकानुसार, गणेशमूर्तींचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे.
  • श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नयेत.
  • महापालिका विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.
  • कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आले आहे.

मीरारोडच्या नयानगर परिसरात एकाच घरात आढळले तीन मृतदेह! परिसरात उडाली खळबळ

मिरारोड: मिरारोडच्या नयानगर परिसरातील नरेंद्र पार्कच्या एका इमारतीत एकाच घरातील तीन जणांचे मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नयानगरच्या नरेंद्र पार्कमधील जुही को-आप हा.सोसायटी या इमारतीच्या बिल्डिंग नंबर 2 सी विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका क्र.३२ मध्ये ही घटना घडली आहे. मृतदेहामध्ये आई, मुलगी व मुलगा यांचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मिरारोडमधील नयानगर परिसरातील नरेंद्र पार्क जुहू सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिका ३२ मध्ये तीन मृतदेह आढळून आले आहे. यामध्ये आईसह दोन मुलांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळी घरातील एका वयोवृद्ध व्यक्तीच्या उठल्यावर लक्षात आले की, आपल्या मुलीसह नातवंडे बेशुद्ध पडले आहेत याची माहिती त्यांनी शेजारी व्यक्तींना दिली. स्थानिकांनी नयानगर पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले होते. संशयास्पद मृत्यू असल्याने पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवली आहेत.

आत्महत्या केलेली महिला आपल्या वडिलांच्या घरी राहत होती. एक वर्षापूर्वी महिलेचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून महिलेची अर्थिक परिस्थिती बिकट झाली असल्यामुळे ती महिला मानसिक तणावाखाली होती, अशी माहिती शेजारच्या लोकांनी दिली आहे. मृत महिलेला तिची दोन्ही मृत मुले गतिमंद असल्याने इमारतीच्या आवारात देखील मुलांना खेळण्यास पाठवत नव्हती.

महिलेच्या घरात झोपेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत, त्यामुळे सदर महिलेने झोपेच्या गोळ्या स्वतः खाऊन मुलांना देखील देऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पोलिसांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या तिघांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला? हे स्पष्ट होणार आहे.

डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार; शिवसैनिकांचा मनसे पक्षात प्रवेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजू लागताच डोंबिवलीत शिवसेनेला खिंडार पडू लागल्याचे दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन डोंबवलीतून गेल्या निवडणुकीत सेनेच्या कणखर उमेदवाराला चितपट करून मनसे चे एकमेव निवडून आलेले उमेदवार माननीय आमदार राजू दादा पाटील यांच्या मर्गदर्शनाखाली नांदिवली पंचानंद मधील समर्थ नगर येथील शिवसेनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांचे म.न.वि.से उपशहर अध्यक्ष दिप्तेश नाईक, विभाग अध्यक्ष सुहास काळे, महाराष्ट सैनिक कमलेश सावंत, यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, उप-जिल्हा संघटक सुदेश चुडणाईक, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, डोंबिवली संघटक योगेश पाटील विभाग अध्यक्ष राजेश म्हात्रे, गट अध्यक्ष निषाद आंबूर्ले, महाराष्ट्र सैनिक चिन्मय वारंगे व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान माथाडी ट्रान्स्पोर्ट कामगार सेनेच्या वतीने नळपाणी योजना पूर्ववत सुरु; पितळवाडी आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडरची मदत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पाणी ही माणसाची मूलभूत गरज असल्याने संकटग्रस्त लोकांसाठी तातडीने धावून जाणे गरजेचे असल्याने आम्ही सामाजिक उत्तरदायित्वाची भूमिका जपली अशी भावना हिंदुस्थान माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष विकास मयेकर यांनी व्यक्त केली. २२ जुलैच्या अतिवृष्टीमूळे पोलादपूर तालुक्यातील कामथी नदीला आलेल्या बेफाम पुरात साखर खडकवाडी व आडावळे खडकवाडी या दोन गावांसाठी असलेल्या नळपाणी योजनांचे दोन्ही पंपघर, मोटर व इलेक्ट्रिक मोटर मशीन केबलसह संपूर्णतः वाहून गेले होते. ग्रामस्थ मंडळींनी अल्पावधीत श्रमदानातून पुन्हा उभारलेल्या नवीन पंपघराचे उद्घघाटन मयेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष बाजीराव मालुसरे, संयुक्त सरचिटणीस शंकर झोरे, रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश डफळे, वाहतूक सेना उपाध्यक्ष गिरीश विचारे, शिवसेना युवानेते अनिल मालुसरे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेले महिनाभर पावसाने उघडीप घेतल्याने ना नळाचे पाणी ना पावसाने पडणाऱ्या वळचणीचे पाणी अशा अडचणीत ग्रामस्थ पाण्याविना सापडले होते. याची दखल घेत पोलादपूर नाईक मराठा समाज मुंबईचे कार्याध्यक्ष व फोर्टचे माजी शाखाप्रमुख बाजीराव मालुसरे आणि दातृत्वासाठी नेहमी तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते दीपेश मालुसरे यांनी सिंहाचा वाटा उचलत तातडीने दोन्ही गावातील चाकरमानी तरुणांच्या मदतीने शासनाच्या मदतीची वाट न पाहता काम पूर्ण केले. यातल्या फार मोठ्या आर्थिक खर्चाचा भार हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेने उचलून सामाजिक भूमिका पार पाडली.

पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूसख्खलन होत दरडी कोसळून घरांसह मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. तिन्ही नद्यांना आलेल्या बेफाम पुरांमुळे तर दोन्ही बाजूच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत तो उध्वस्त झाला आहे याची प्रत्यक्ष पाहणीही यावेळी मुंबईतील कार्यकर्त्यांनी केली. कोरोनाच्या आजारामूळे तिन्ही खोऱ्यातील बाधित रुग्ण ग्रामीण भागातून महाड कोविड रुग्णालयापर्यंत सुखरूप पोहोचावा यासाठी संघटनेच्या वतीने पितळवाडी आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलेंडर वैद्यकीय मदत म्हणून भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लऊ मालुसरे, गणेश मालुसरे, गोपाळ जाधव, तानाजी मालुसरे, रामभाऊ मालुसरे यांनी विशेष मेहनत घेतली.

राज्यसरकार तर्फे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दीड वर्षांच्या दिर्घकाळानंतर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्यसरकार तर्फे सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत (टोल माफी) देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना विशिष्ट स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

आगामी गणेशोत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कोकणात जाणारे सर्व रस्ते, महामार्ग सुस्थितीत असणे गरजेचे आहेत. भाविकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी पनवेल, पेण, महाड रस्ता, सातारा, भुईंज, शेंद्रे तसेच कराड-पाटण चिपळूणमार्गे कोकणात जाणारा महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, वाकण-पाली-खोपोली मार्ग, सिंधुदुर्गातील वागदे-कुडाळ मार्ग, आंबेनळी घाट, ताम्हिणी घाट, रत्नागिरी-सावर्डे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उर्वरित कामे दोन दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरात सवलत (टोल माफी) देण्याची घोषणा करतानाच या वाहनांसाठी विशिष्ट स्टीकर्स तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही यावेळी शिंदे यांनी दिले. मुंबई-पुणे, पुणे-सातारा, मुंबई-गोवा या महामार्गावरील पथकर नाक्यांवर अधिकचे मनुष्यबळ नेमणूक करुन गणेश भक्तांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने पथकर नाक्यांवर भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पथकर नाक्यांवर गणेश भक्तांशी वाद घालू नका, पथकर सवलतीचे स्टीकर्स उपलब्ध करुन देण्याबरोबर पथकर नाक्यांवर रुग्णवाहिका, जलद प्रतिसाद वाहने, जेसीबीबरोबरच पुरेसे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करा. कोविडचे संकट पाहता भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. कोकणात जाणाऱ्या मार्गावर स्थानिक पोलीसांबरोबरच महामार्ग वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले असून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये, वाहतूक खोळंबू नये यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

या बैठकीस ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, परिवहन, एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आदींचे वरिष्ठ अधिकारी तसेच पथकर कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची आणि सुविधांची माहिती यावेळी दिली. या बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अपर पोलीस महासंचालक (महामार्ग वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. देबडवार आदी वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीला उपस्थित होते.