Home Blog Page 202

‘ई.डी’ कडून अनिल देशमुखांच्या विरोधात शोध सुरू; लुकआउट नोटीस जारी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) ने बजावलेले ‘समन्स’ रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण देशमुख यांची याचिका ऐकू शकत नसल्याचे न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी स्पष्ट केल्याने दुसऱ्या एकलपीठासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे. दरम्यान आता अंमलबजावणी संचालनालय (ई.डी) ने अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे. १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या संदर्भात ‘ई.डी’ ने ही ‘लुकआऊट नोटीस’ जारी केली आहे.

‘ई.डी’ कडून ‘लुकआउट नोटीस’ जारी झाल्यानंतर अनिल देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही. हे परिपत्रक एक वर्षापर्यंत किंवा तपास यंत्रणा रद्द किंवा नूतनीकरण करेपर्यंत वैध राहते. वसुलीच्या आरोपांनंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देश सोडून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी ‘लुकआउट नोटीस’ जारी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.

‘ई.डी’ ने देशमुख यांना आतापर्यंत पाच वेळा समन्स बजावले असून ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. कायद्यानुसार उपलब्ध पर्यायांचा विचार करत असल्याचा दावा करत देशमुखांनी हजर राहण्यास नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना गेल्या महिन्यात या प्रकरणातील ‘ईडी’च्या कारवाईपासून अंतरिम विश्रांती देण्यास नकार दिला होता. ‘ई.डी’ अधिकारी अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करत आहे.

एजन्सीने केलेल्या फिर्यादी तक्रारीनुसार आरोपपत्र  दाखल..

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘गृहमंत्री’ म्हणून काम करताना विविध ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून अंदाजे ४.७० कोटी रुपयांची रोख रक्कम अवैधरित्या मिळवली होती असे ‘ई.डी’ ने  त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

 

डोंबिवलीतील सामाजिक संस्थेकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोफत प्रसाद वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

यंदाच्या गणेशोत्सवात ‘सेफ्टी वेलफेअर असोसिएशन डोंबिवली, आणि कुराश असोसिएशन महाराष्ट्र सलग्न, पोलीस मित्र समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने डोंबिवली मधील सर्व ‘सार्वजनिक गणेशोत्सव’ मंडळांना मोफत प्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील असणाऱ्या सर्व गणेशोत्सव मंडळांना एकूण २५० किलो प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे असे ‘सेफ्टी वेलफेअर असोसिएशन’चे संस्थापक व अध्यक्ष विशाल वि.शेटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले आहे. दिनांक ८/०९/२०२१ पर्यंत डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील सर्व गणेशोत्सव मंडळांनी आपला पत्ता आणि नाव संस्थेच्या ९९२०२६२१०१ या क्रमांकावर नोंदवण्याचे आव्हान संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बृहन्मुंबईतील ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि ‘बी.वाय.एल.नायर रुग्णालय’ ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि बी.वाय.एल.नायर रुग्णालयाचा शतकपूर्तीवर्ष सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, आमदार यामिनी जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जनतेला दीर्घायुष्य देणारी संस्था आज शतायुषी होते आहे, हे समाधान काही वेगळे असून या संस्थेचा हा प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिकूल काळात जिद्द आणि चिकाटीने काय करता येऊ शकते हे या संस्थेने दाखवून दिले आहे. संस्था निर्माण केल्यावर जीव ओतून इतरांना जीवदान देण्याचे काम या रुग्णालयातील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहोरात्र केले आहे. आज मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद आहेत, देव केवळ मंदिरे आणि प्रार्थनास्थळांमध्ये नाही तर डॉक्टरांच्या रुपात रुग्णांचा जीव वाचवत आहे. कोविड-१९ काळात कोरोनाचे संकट हे अनपेक्षित तितकेच अनाकलनीय होते, सुरुवातीला या संकटाची दहशत होती, मात्र आज आपण या संकटाचा मुकाबला करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्यामुळे राज्य सरकार, प्रशासन यांचे सर्वत्र कौतुक झाले. मात्र, या कौतुकाचे खरे मानकरी सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

.

कोविडच्या अगोदर शंभर वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यूची साथ पसरली होती, आता त्याची काही माहिती उपलब्ध असेल असे वाटत नाही, मात्र यापुढे कोणताही विषाणू येईल त्यावेळी कोरोनाकाळात आपण काय केले ? काय करायला हवे ? याची अधिकृत नोंद करण्याची आवश्यकता असून ही माहिती ५०-१०० वर्षानंतरदेखील उपलब्ध होईल या दृष्टिने प्रयत्न करण्याची गरज बोलून दाखवतानाच या संस्थेला जेव्हा दोनशे वर्षे पूर्ण होतील त्यावेळी इतिहासात या रुग्णालयाच्या कार्याची निश्चितच नोंद होईल असेही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शंभर वर्षांपूर्वी अनेक दानशूरांनी दान दिले, मदत केली म्हणून आज आपल्याला या संस्थेच्या माध्यमातून जीवनदान मिळाले आहे. ‘टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय’ आणि बी.वाय.एल. नायर रुग्णालय या संस्थेला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करतानाच शंभर वर्षांनंतरही लोकांसाठी हितकारक ठरेल असे काम करून दाखवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री यांनी यावेळी केले.

२००५ च्या मुंबईतील पूरानंतर लॅप्टोस्पयरोसिस, डेंग्यूचा धोका वाढला होता त्यावेळी चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात पहिली लॅब सुरु झाली, नंतर कोरोनाच्या काळात चाचण्यांसाठी सुरुवातीला ‘कस्तुरबा’ आणि पुण्याची ‘एनआयव्ही’ अशा दोनच प्रयोगशाळा होत्या आज या प्रयोगशाळांची संख्या सहाशेच्या वर गेल्या असून पूर्वी सात-आठ हजार खाटांची क्षमता असलेल्या या राज्यात आता साडेचार लाख खाटा वाढल्या आहेत. कोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरियंट’च्या तपासणीसाठी नायर रुग्णालयातच एकमेव ‘जिनोम सिक्वेन्सिंग लॅब’ उभारण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

शतकपूर्तीवर्षे असलेल्या या संस्थेचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान असून ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. वैद्यकीय सेवेसाठी पुढाकार घेऊन संस्थेने केलेल्या कार्याचा पालकमंत्री असलम शेख यांनी यावेळी खासकरून गौरव केला. फ्रंटलाईन वर्कर्ससाठी महाराष्ट्र सरकारने केलेल्या भरीव उपाययोजनांची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

नायरसारखी मुंबईतील सर्व रुग्णालये ही मुंबईकरांची हृदयस्थानं असून कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळात नायर रुग्णालयाने केलेल्या सेवेचा महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी गौरव केला. भविष्यातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीदेखील महापौरांनी यावेळी दिली.

याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इम्युनॉलॉजी, शल्यक्रिया कौशल्य आणि संगणकधारित शिक्षण या तीन प्रयोग शाळांचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागनिर्मित पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची माहिती देणाऱ्या ‘गणेशोत्सव २०२१’ या माहितीपुस्तिकेचे तसेच नायर रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचाऱी तसेच विद्यार्थ्यांना कोविड काळात आलेल्या अनुभवांचे संकलन असलेल्या पुस्तिकेचेही मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. भारतीय टपाल विभागाने नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त जारी केलेल्या विशेष ‘टपाल कव्हर’चे प्रकाशन आणि संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या भित्तीचित्राचेदेखील यावेळी अनावरण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरातील विविध रुग्णालयांमध्ये कोविड काळात केलेल्या व्यवस्थापनाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचेही यावेळी मान्यवरांनी प्रकाशन केले. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे नायर रुग्णालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी १२ तासांत चालत्या ट्रेन मधून आरोपीच्या मुसक्या आवळल्यामुळे कोलाबा पोलिसांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक २८/०८/ २०२१ रोजी मुंबईतील एका फुटपाथवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याबाबत खबर मिळाली त्या अनुषंगाने कुलाबा पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. ३६९/ २०२१ कलम ३७६ भादवि सह कलम ४, ८ (पोक्सो कायदा) अन्वये त्यानी दिलेल्या तक्रारीं वरून गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपीचे नांव व कोणताही ठावठीकाणा माहीत नसताना त्यास केवळ जुना फोटो व आसाम चा रहिवाशी असल्याच्या माहितीवरून सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी सुधाकर शितप व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश खरात व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन मिळालेल्या माहितीनुसार व तांत्रिक पुराव्याच्या आधारे सदर आरोपींचा कसोशीने शोध घेऊन आरोपी रफिक-उल-इस्लाम अबुल कलाम आज़ाद उर्फ रोहित यास १२ तासांच्या आत मुंबई सोडून फरार होत असताना सापळा रचून चालत्या ट्रेन मधून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला व आरोपीस अटक केली.

सदर कामगिरीबद्दल कुलाबा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या प्रशंसनीय व उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिनांक ०३/०९/२०२१ रोजी सकाळी ११:०० वा मा. श्री.विश्वास नांगरे पाटील, पोलीस सह आयुक्त (का.व.सु.) बृहनमुंबई यांनी त्यांच्या कार्यालयात विशेष पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला आहे.

 

‘ईडी’ चे एकनाथ खडसे, त्यांची पत्नी आणि जावयाच्या विरोधात आरोपपत्र दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ‘ईडी’कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या एक हजार पानी आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून आरोपपत्रात समावेश आहे. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून लावला.

गिरीश चौधरी यांनी या प्रकरणी आपल्याला बळीचा बकरा बनवलं गेलंय असा आरोप केला होता. मात्र विशेष पीएमएलए कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या एकनाथ खडसेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. साल २०१६ मध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना हा सारा व्यवहार झाला होता. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. मात्र एसीबीनं खडसे यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली होती.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. ५२/२ (अ) ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या आणि त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत.

या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच ‘शेल’ कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे. या सर्व व्यवहारात राज्य सरकारचं सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचं नुकसान झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती. एकनाथ खडसे यांचीही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. मात्र एकनाथ खडसे यांना याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास अटकेपासून दिलासा दिलेला आहे.