Home Blog Page 213

शेकडो पोलिस पश्चिम मुंबईतील ‘रेड लाइट’ एरियात तैनात; जमावबंदीचे आदेश जारी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील उपराजधानीतील पश्चिम मुंबई येथील ‘रेड लाईट’ एरियात देहव्यापारासाठी (कु)प्रसिद्ध असणाऱ्या गंगा-जमुनात रात्री पोलिसांनी संचारबंदी (सील) लागू केली असून प्रचंड पोलिस बंदोबस्तात पोलिसांनी या परिसराची झाडाझडती सुरू केली आहे. गंगा-जमुनात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. या भागात गुन्हेगारांचा वावर असून काही दलाल अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याशिवाय परिसरातील नगरसेवक व प्रतिष्ठीत नागरिकांनीही गंगा जमुनामुळे होणाऱ्या त्रासाबाबत पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी बुधवारी रात्री गंगा जमुना सिल करून या भागात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली. यासह लकडगंज पोलिसांच्या पाच अधिकारी व १०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रचंड ताफा या भागात तैनात करण्यात आला आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी गंगा जमुना परिसराची झाडाझडती सुरू केली.

दारू दुकानांचे परवाने रद्द करणार

गंगा-जमुना परिसरात देशी दारू, बीअर शॉपी, वाईन शॉपसह एक बीअर शॉपही आहे. या सर्वांचे परवाने रद्द करण्याचे पत्र आयुक्तांनी उत्पादन शुल्क विभागाला पाठविले आहेत. आता उत्पादन शुल्क विभाग आयुक्तांच्या पत्रावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. तसेच परिसरातील घरांमध्ये देहव्यापारासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम तोडण्याची विनंती अमितेश कुमार यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना केली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विवेक पाटलांच्याविरोधात बँक फसवणूक प्रकरणात ‘ईडी’ कडून आरोपपत्र दाखल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पनवेल, मुंबई येथील ‘कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड’ चे माजी अध्यक्ष विवेक शंकर पाटील यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. आरोपपत्रात विवेकानंद शंकर पाटील यांच्यावर ६७ बनावट खात्यांच्या माध्यमातून ५६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. विवेक पाटील हे चार वेळा आमदार राहिले आहेत. या प्रकरणात त्यांना ‘ईडी’ने १५ जून रोजी अटक केली होती.

‘ईडी’च्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, ‘ईडी’ने या प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. वर्ष २०१९-२० मध्ये, रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार ‘कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड’ पनवेल मुंबई विरुद्ध ऑडिट करण्यात आले. या ऑडिट दरम्यान असे आढळून आले की बँकेचे तत्कालीन चेअरमन विवेक पाटील हे बनावट खात्याद्वारे त्या बँकेतून पैसे काढत होते आणि ‘कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘कर्नाळा क्रीडा अकादमी’ मध्ये पैसे टाकत होते. या दोन्ही संस्था पाटील यांनीच निर्माण केल्या आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता.

ऑडिटच्या तपासादरम्यान असे आढळून आले की ही फसवणूक २००८ पासून सुरू होती. ‘ईडी’ च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात ‘पीएमएलए’ अंतर्गत करण्यात आलेल्या तपासादरम्यान असे आढळून आले की ही फसवणूक ६७ बनावट खात्यांद्वारे करण्यात आली होती आणि ही फसवणूक व्याजासह सुमारे ५६० कोटी रुपयांची होती. फसवणुकीवर पांघरूण घालण्यासाठी, पैसे वेगवेगळ्या खात्यांद्वारे पाटील यांनी स्थापन केलेल्या नियंत्रित संस्थांच्या अनेक बँक खात्यांमध्ये वळवण्यात आले. ‘कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’, ‘कर्नाळा क्रीडा अकादमी’ आणि इतर वैयक्तिक फायद्यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून क्रीडा संकुल, महाविद्यालय आणि शाळा यासारख्या मालमत्ता बांधण्यासाठी या पैशाचा वापर करण्यात आला.

पनवेल येथील ‘कर्नाळा नागरी सहकारी बँके’च्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे अनेक संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेविदारांच्या ५२९ कोटीच्या ठेवी बँकेत होत्या. बँकेच्या सुरूवातीपासून तत्कालीन शेकाप नेत्यांनी स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठी बँकेतून गैरमार्गाने कोट्यवधी रूपयांच्या ठेवी उचलून बँकेत गैरव्यवहार केला होता. मात्र, ऑडिट रिपोर्टमध्ये सर्व गैरव्यवहार दडपण्यात आले होते.

दोन दिवसांपासून ‘कोविशिल्ड’ लसीचा साठाच उपलब्ध नाही; लस सक्तीमुळे खाजगी व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांची धावाधाव..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात महापालिकेच्या मोहिमे अंतर्गत लसीकरण केंद्रावर जेव्हा लस उपलब्ध होती त्यावेळी अनेकांनी ती घेतली नाही. मात्र आता अनेक खाजगी, शासकीय व निमशासकीय कार्यालयात लसीकरणाची सक्ती केली जात असल्याने लसीसाठी कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पर्याप्त ‘कोविशिल्ड’ लस उपलब्ध नसल्याने या सर्व कर्मचाऱ्यांची कोंडी झाली आहे. टाळेबंदीमध्ये शिथिलता देत शासकीय व निमशासकीय कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीसाठी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना लससक्ती केली जात आहे.

शहरात आतापर्यंत एकूण १४ लाख ४७ हजार ९५३ लोकांनी लस घेतली असून त्यात पहिली मात्रा १० लाख २७ हजार २३८ नागरिकांनी तर दुसरी मात्रा ४ लाख २० हजार ७१५ नागरिकांनी घेतली आहे. अठरा वर्षांवरील ४ लाख २५ हजार ९०३ युवकांनी पहिली तर ३६ हजार ६७५ युवकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. याशिवाय ४५ वर्षांवरील २ लाख ९६ हजार ३२४ नागरिकांनी पहिली मात्रा तर १ लाख ८७ हजार ९२८ दुसरी मात्रा घेतली आहे.

परंतु, अजूनही १० लाखांवर नागरिकांनी लस घेतलेली नाही.
शहरात १४२ केंद्र आहेत.
येथे दररोज ३० ते ३५ हजार लसींची आवश्यकता असताना त्या प्रमाणात शहराला पुरवठा होत नाही. त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे.
अनेक खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लस घेतल्यावरच कार्यालयात या असे बजावले जात आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी अनेकांची सैरवैर धावाधाव सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘कोविशिल्ड’ लसीकरण बंद आहे.
महापालिका व शासकीय रुग्णालयासह केवळ ९ केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ लस दिली जात आहे. मात्र त्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे अनेकांना लस मिळत नाही. ज्यांनी ‘कोविशिल्ड’ची पहिली मात्रा घेतली आहे आणि दुसरी मात्रा हवी आहे, त्यांची लसतुटवडय़ा मुळे मोठीच अडचण झाली आहे.

कल्याणच्या महात्माफुले चौक पोलिसांनी उबेर चालकाचा खून करून प्रेत कसारा घाटात फेकून देणाऱ्या आरोपींना शिताफीने केली अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकतीच भिवंडीतील माणकोली पुलाखाली ‘ओला टॅक्सी’ चालकाची हत्येची बातमी ताजी असताना ‘उबेर टॅक्सी’ चालकाचा खून करून प्रेत कसारा घाटात फेकून देणाऱ्या आरोपींना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

अमृत सिद्धराम गवारे राहणार ऐरोली, नवी मुंबई, हे दिनांक १ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११:३० वाजता च्या सुमारास कल्याण शिवाजी चौक ते धुळे असे प्रवासी भाडे घेऊन गेलेला असून अद्याप परत आलेला नाही. अशी तक्रार प्रमोदकुमार रामलाल गुप्ता राहणार ऐरोली, यांनी नवी मुंबई पोलीस ठाण्यात जाऊन दिली. त्यांच्या या तक्रारी वरून महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे मानव मिसिंग प्रमाणे ३ ऑगस्ट २०२१ प्रमाणे तक्रार दाखल झाली.

या तपासा मध्ये सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल च्या आधारे आरोपींनी ‘एर्टिगा’ कार चोरी करून उत्तरप्रदेश मधील भदोई येथे कार घेऊन गेल्याचा सिद्ध झाले ह्या घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ -३ कल्याण चे मा.पोलीस उपआयुक्त श्री. विवेक पानसरे यांची परवानगी व मार्गदर्शन घेऊन गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले व त्यांचे पथक उत्तर प्रदेश भदोई येथे पाठवले. मोबाईल मधून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे ३ आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करून चोरी करून नेलेली ‘एर्टिगा’ कार ताब्यात घेतली. तसेच कसून चौकशी केले असता, त्यांनी ड्राइवर चे हात पाय बांधून त्याच्या छातीवर व गळ्यावर वार करून त्याला ठार मारून कसारा घाटात फेकून दिल्याचे सांगितले .त्या नंतर सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन पत्रे व पथक ने आरोपींनी सांगितल्या प्रमाणे ड्राइवर च्या प्रेताचा कसारा घाटात शोध घेतला असता १० ऑगस्ट २०२१ रोजी ड्राईव्हर चे प्रेत मिळाले. मयताच्या प्रेतावर जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथे पोस्टमोर्टम करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले व त्यांचे पथक यांनी उत्तर प्रदेश मधील भदोई जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आरोपींचा शोध घेऊन ३ आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांनी चोरलेली ‘एर्टिगा’ कार ताब्यात घेतले त्या नंतर आरोपी १) राहुलकुमार बाबूराम गौतम २) धर्मेंद्रकुमार उर्फ वकील संपतराम गौतम ३) हरीशचंद्र उर्फ अमन रमाकांत गौतम याना ११ ऑगस्ट २०२१ रोजी ह्या ३०२ च्या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, मयत इसमाचा मोबाईल फोन,आधारकार्ड, पॅनकार्ड, मास्टरकार्ड, आर.सी.बुक, रेल्वेची पावती जप्त करण्यात आली आहे.

भ्रमणध्वनि वर थेट महसूल खटल्यांची माहिती; राज्यातील पहिला प्रयोग..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आरक्षित व अनधिकृत जागेच्या महसुली खटल्यांच्या सुनावण्यांची माहिती नागरिकांना आता थेट आपल्या भ्रमणध्वनिवर मिळणार आहे. प्रत्येक दिवशी कोणत्या खटल्यांची सुनावणी होणार आहे, या माहितीसह प्रत्यक्ष सुनावणी सुरू असलेला खटला आणि त्यानंतर सुनावणी होणाऱ्या खटल्यांची माहितीही संबंधित पक्षकार आणि वकिलांना आपल्या भ्रमणध्वनिवर मिळणार आहे.

मोबाइल उपयोजन (ऍप) द्वारे
ही सुविधा देण्यात आली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर राज्यात प्रथमच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळणे आणि नागरिकांना खटल्याच्या सुनावणीसाठी ताटकळत थांबावे लागू नये, यासाठी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे पक्षकारांना सुनावणींच्या स्थितीची अद्ययावत माहिती मिळणार आहे.

प्रत्येक खटल्याच्या सुनावणीसाठी तीन मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार दर दिवशी ६० खटल्यांची सुनावणी घेतली जाणार आहे. सुनावणींसाठी केवळ तीन तारखा दिल्या जाणार असून त्यानंतर संबंधित खटल्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली.
प्रलंबित खटल्यांचे निकाल वेगाने लागण्यासाठी प्रचलित पद्धतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत पक्षकारांना नोटीस देणे आणि सुनावणीच्या तारखा देणे ही कामे एकाच ठिकाणी करण्यात येत होती. मात्र आता नोटीस देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे खटल्यांच्या सुनावण्या वेळेत होणार आहेत. मोबाइल उपयोजन (ऍप) वर दिवसभरात कोणत्या खटल्यांची सुनावणी होणार आहे, याची माहिती असेल. तसेच सुनावणी सुरू असलेला खटला आणि त्यानंतर सुनावणी होणाऱ्या पुढील पाच खटल्यांची माहिती पक्षकारांना मिळणार आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.