Home Blog Page 22

बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली – सध्या मुंबई ठाणे कल्याणात एकच जयघोष ऐकायला व पाहायला मिळत आहे “जय श्रीराम जय श्रीराम”. आपल्याला लवकरच आयोध्येत जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे राम मंदिर उभारत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते स्वप्न होते. ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिपादन करत येत्या काळात लवकरच राम मंदिराचे काम पूर्ण होऊन ते भाविकांसाठी खुले होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत सुरू असलेल्या डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन रासरंग दांडिया फेस्टिव्हल मध्ये उपस्थित दांडिया प्रेमी भक्तांना दिले.

कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कल्याण येथे येत दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण शहर प्रमुख रवी पाटील हे यावेळी उपस्थित होते.

यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी डोंबिवली येथे आपले पुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या ‘रासरंग’ दांडिया फेस्टिव्हल या डोंबिवलीच्या सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवाला हजेरी लावली. यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला. राज्यात आमचे सरकार येताच सगळे निर्बंध आम्ही उठवले आहेत. मंदिरं खुली केली, सण उत्सवांवरील बंदी उठवली व नवरात्र उत्सव शेवटच्या तीन दिवशी सरकारने १२ वाजेपर्यंत परवानगी दिल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी आवर्जून केला. आपलं सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी सगळ्या सण उत्सवांची बंधनं उठवली, मंदिरं खुली केली असे ही ते म्हणाले. पूर्वी लोकांना मुंबई आणि ठाणे इथे गरबा खेळण्यासाठी जायला लागायचे आता डोंबिवलीत लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजन केले आहे असा उल्लेख खासकरून त्यांनी केला.

अयोध्येत लवकरच जायचे आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा

त्यानंतर त्यांनी मुंबई, ठाणे, कल्याणसह राज्यात सगळीकडे “जय श्रीराम जय श्रीराम” गीत म्हणतात असे म्हणत त्यांनी तुमच्या इथे श्रीरामाचे गीत लागलं का नाही ? असा प्रश्न आयोजकांना करताच ते गीत आयोजकांनी त्वरित लावले. यावर ‘एक ही नारा एक ही नाम जय श्रीराम जय श्रीराम’ असे शिंदे म्हणताच जय श्रीराम च्या घोषणांनी भाविकांनी परिसर दणाणून सोडला. अयोध्येत राम मंदिर बनत आहे. लाखो करोडो भक्तांचे स्वप्न साकार होत आहे. आणि मोदीजी ते काम करत आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्या लोकांचे हे सरकार आहे तुम्हाला जे हवं आहे तेच हे सरकार करेल असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेला दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेत केली आरती

कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून गेल्या ५४ वर्षापासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा देखील नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन हजारो लाखो भाविक घेत असतात. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुर्गाडी देवीची आरती करण्यात आली. वर्षानुवर्ष ही परंपरा सुरू आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी साडे ७ कोटी मंजूर केलेले आहेत. त्यात अडीच कोटींचं काम सुरू आहे आणखी ५ कोटी रुपयांचे काम सुरू होईल आणखी जे काही कामाला पैसे लागतील ते देखील शासनाच्या वतीने देण्यात येतील. या किल्ल्याची या देवस्थानाची अनेक वर्षाची पुरातन परंपरा आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. महाराष्ट्र मध्ये यंदा नवरात्र उत्सवात गेल्या वर्षी पेक्षा भाविक आणि भक्तगणांमध्ये जास्त उत्साह यावर्षी पाहायला मिळतं आहे असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशन च्या नूतनीकरणाचे ठाणे शहर पोलीस सह आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण झालेल्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा खरं तर ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या हस्ते करण्याचे योजले गेले होते, पण अचानक त्यांची मुख्यमंत्री यांच्या सोबत महत्वाची बैठक ठरल्याने ठाणे शहराचे सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते या नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. मानपाडा पोलीस स्टेशन कडून यानंतर चांगल्या रितीचे काम होईल व चांगल्या रितीची नागरिकांशी वागणूक आणि डिटेक्शन आणि कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने चांगलं पोलीस कर्तव्य पार पाडले जाईल अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व नागरिकांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा ठाणे शहराचे सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी यावेळी बोलताना दिल्या.

कल्याण परिमंडळ -३ पोलीस ठाण्याच्या कक्षेत पोलिसांची कुमक कमी आणि कामाचा ताण जास्त हे समीकरण अध्याप सुटलेलंच नाही. पोलिसांनी नागरिकांसोबत मैत्रीची भावना बाळगून कार्य करावे ही अपेक्षा आहेच, मात्र पोलीस बळ किती आहे आणि पोलिसांनी तुटपुंज्या बळात कसे काम करावे याची रेमेडी कोणी सांगत नाही. दिनांक १९ ऑक्टोबर २०२३ ला मानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरण झाले. मात्र लोकसंख्येच्या तुलनेने अजूनही कल्याण झोन-३ अपुराच पडतोय. लोकसंख्येच्या ताणाचा हिशोबाने मानपाडा सोबत कल्याण पूर्व अजूनही मागास आहेच. जिथे दोन पोलीस ठाण्याची वास्तू हवी तिथे एकाच पोलीस ठाण्यावर भार देऊन पोलीसांची व नागरिकांची कसोटी का घेतली जाते हा स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी डोळ्यात अंजन टाकणारा भाग असताना गुन्हेगारी वाढली म्हणून फक्त पोलिसांच्या माथी चिखलफेक करून हे संपणार नाही असे मत कल्याण परिमंडळ-३ विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी या उद्घाटनाच्या वेळी बोलून दाखविले. गुन्ह्यातील पुनर्प्राप्त केलेला सव्वा दोन कोटीचा मुद्देमाल २७ ऑक्टोबर ला संबंधितांना देण्यात येणार असल्याचे परिमंडळ-३ चे उप आयुक्त सचिन गुंजाळ यांनी या उदघाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

उद्घाटन सोहळ्यानिमित्त कल्याण विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, संजय जाधव (प्रशासन), कल्याण परिमंडळ-३ उपआयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे (डोंबिवली विभाग), मानपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर (कोळशेवाडी वाहतूक शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे सह पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

हिंदी-मराठी पत्रकार संघाची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर; अध्यक्ष पदी मुज्जम्मील शेख तर उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता आणि सचिव पदी राहुल हरपळे यांची निवड!

पुणे (प्रतिनिधी) : हिंदी-मराठी पत्रकार संघाची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पुण्यातील धडाडीचे पत्रकार म्हणून ओळखले जाणारे युवा पत्रकार मुज्जम्मील शेख यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी तसेच उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता आणि सचिव पदी राहुल हरपळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र हिंदी मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष धनश्री काटीकर यांनी दिले आहे.

मुज्जम्मील शेख ह्यांनी अनेक वृत्त संस्थेत त्यांनी काम केले आहेत. तसेच सध्या ते सध्या टाईम्स ऑफ महाराष्ट्र या वेबपोर्टलचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत. तसेच दैनिक हॅलो प्रभात या वृत्तपत्रात ते पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या समवेत उपाध्यक्ष पदी दक्ष पोलीस टाईम्स वृत्तपत्राचे पुणे विभागीय संपादक सुरेश गुप्ता आणि सचिव पदी न्युज प्रहारचे उप संपादक राहुल हरपळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्यानंतर सर्व स्तरावरून त्यांचे गौरव करण्यात येत आहे.

निवड झाल्यानंतर शेख यांनी सांगितले की, लवकरच हिंदी-मराठी पत्रकार संघाची पुणे शहरात कार्यकारणी तयार करणार आहेत. यामध्ये नवीन देखील पत्रकारांना संधी देणार आहे व वरिष्ठ पत्रकारांना यामध्ये जबाबदारीचे स्थान ते उपलब्ध करून देणार आहेत. तसेच पत्रकारांच्या हितासाठी पुण्यात ते काम करणार आहेत. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी ते काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ तर्फे डोंबिवलीत रंगणार सर्वात मोठा ‘रासरंग २०२३’ दांडिया फेस्टिव्हल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली शहरात पहिल्यांदाच गुजरात, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात नावलौकिक आणि प्रसिद्ध असलेला ‘दांडिया किंग’ नैतिक नागदा आणि त्याचे बँड पथक यांचा कार्यक्रम डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या ८०,००० स्क्वेयर फूट च्या भव्य पटांगणात ‘श्री नवदुर्गा युवा मंडळ’ व ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या ‘रासरंग २०२३’ दांडिया फेस्टिव्हल यांच्या माध्यमातून दिनांक १५ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येत असून ‘रासरंग २०२३’ या महोत्सवाचे यंदा ६ वे वर्ष असून नागरिकांना गरब्याच्या आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागेत ‘दांडिया कींग’ म्हणून सर्वत्र प्रचिलित असलेले ‘दांडिया किंग’ नैतिक नागदा यांचे थिरकायला लावणारे संगीत, मनसोक्त नृत्याचा आनंद घेणारे आबालवृद्ध, सिनेअभिनेत्यांची, कलाकारांची मांदियाळी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान अशा सोहळ्यात ‘रासरंग २०२३’ हा भव्यदिव्य दांडिया फेस्टिव्हल पार पडणार आहे.

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवली शहरासह संपुर्ण कल्याण मतदार संघात विविध सण-उत्सवाच्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विविध सणवार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. ‘दांडिया किंग’ नैतिक नागदा यांचा कार्यक्रम डोंबिवली मध्ये होत असल्याचे कळताच गुजरात, मुंबई, ठाण्यातुन मोफत प्रवेश पासेस करिता जोरदार मागणी होत असल्याचे व आतापर्यंत ३५,००० मोफत प्रवेश पासेस वाटले गेले असल्याचे डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना सांगितले. पहिल्या दिवशी रविवारी उद्घाटन सोहळ्यानिमित्त मराठी पारंपारिक प्रथा म्हणून सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान २०० ढोल, झांज, लेझीम पथक तसेच शिवसेनेचा भगवामय कार्यक्रम म्हणून ५००० भगवे फुगे आकाशात सोडणार असल्याची माहिती मिळत असून या अविस्मरणीय क्षणाचा अविभाज्य घटक होण्यासाठी म्हणून खास पत्रकारांना निमंत्रित करण्यात आले असून या नऊ दिवसात मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज सिनेतारक, सिनेतारका यांची उपस्थिती लाभणार आहे.

नवरात्र उत्सव म्हणजे नारीशक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारा उत्सव या पार्श्वभूमीवर महिला व भगिनींसाठी उत्सवाच्या पाचव्या दिवशी (गुरुवार दि. १९/१०/२३) रोजी महिलांसाठी ‘भोंडला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सातव्या दिवशी (शनिवार दि. २१/१०/२३) रोजी कुमारिकांसाठी ‘कुंकुमार्चन’ व ‘कुमारिका पूजन’ आयोजलेले आहे. रविवार दि. २२/१०/२३ रोजी रक्तदान शिबिर व दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अवयव साहित्य वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात या ‘रासरंग दांडिया २०२३’ ला दरवर्षी प्रमाणे महोत्सवा दरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. महिलांना ‘नवदुर्गा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले असून त्या महिलांची निवडही झाली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले गेले. त्याचबरोबर महिलांसाठी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलांना बक्षिस देखील देण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमात समाजातील उच्च शिक्षित व विद्याविभूषित नागरिक यांचा सत्कार देखील करण्यात येणार असल्याचे आयोजले असून समाजातील विवध वर्गातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे त्यांचे सुद्धा सत्कार करण्याचे आयोजले असून हया भव्य दांडिया ‘रासरंग २०२३’ कार्यक्रम दरम्यान सावधानतेचा व सुरक्षिततेचा उपाय म्हणून दोन रुग्णवाहिका, अग्निशमन दल, वैद्यकीय मदत कक्षासह ९ दिवस सज्ज असणार आहेत.

नवमी च्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मंत्री महोदय व प्रशासकीय उच्चपदास्थीय अधिकारी यांची उपस्थिती लाभणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, रवी मट्या पाटील, तालुकाप्रमुख महेश पाटील, शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक नितीन मट्या पाटील, जितेन पाटील, सागर जेधे, सुनील भोसले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते हे या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या संघटित विरोधामुळे भुमीअभिलेख कक्षाकडून परस्पर होणारी जमीन मोजणी स्थगित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील मौजे दावडी येथील सर्व्हे क्र. ५,६,७,८,९,१०,११,१२,१३, ११३, ११५, ११६, ११८, ११९, १२४,१२५ चा सर्व्हे बिल्डर अजय प्रताप अशर याने भूमिलेख खात्याकडून सोबत पोलीस बळ घेत परस्पर सर्व्हे करण्याचे योजिले असल्याची माहिती तेथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना माहिती पडताच तेथे सगळे भूमिपुत्र शेतकरी संघटित होऊन त्या सर्व्हेस विरोध केला व तेथे तणावाचे वातावरण झाले. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संरक्षित कुळ १९३२ च्या पूर्वीपासून दप्तरी दाखल असून वडिलोपार्जित ५-६ पिढ्या त्यावर गेलेल्या असून जवळपास ३०० वर्षांपासून कब्जा वहिवाटीनुसार सदर जमीन आमच्या ताब्यात असून आणि भूमिअभिलेख यांना वेळोवेळी अर्ज तसेच निवेदनं देऊन हरकती घेत असून आमच्या कुठल्याही हरकतीवर योग्य सुनावणी न घेता परस्पर बिल्डरशी हातमिळवणी करून मोजणी चा दबाव २०१६ पासून आणला जात आहे असे तेथील स्थानिक भूमिपुत्र शेतकरी जितेंद्र ठाकूर, महेंद्र म्हात्रे, नवनीत म्हात्रे, हरी जोशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

सुपारी घेऊन कारस्थान रचल्याचा आरोप

वारंवार “मे.आशर रियलटर्स” चे भागिदार अजय प्रताप आशर व जतिन देसारिया यांच्या कडून आमच्या वर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संत सावळाराम महाराज अभयारण्य दावडी, उंब्राली यांच्या पायथ्याशी कसत असलेली जमिन सोनारपाडा येथील मुळनिवासी भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या कुळ-कब्जा वहिवाटीत कसत असलेल्या जमीनी मौजे.दावडी, ता.कल्याण, जि.ठाणे ज्याचे सुरक्षित कुळांच्या जमीनीचे एकूण क्षेत्रफळ ८०,७१ एकर जमीन परस्पर मोजणी करून आम्हांला भूमिहीन करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून आमचा या मोजणीला विरोध असून या दाबावतंत्राला बळ देण्याचे काम ‘हॅपी होम’ चे विकासक प्रफुल शाह आणि काँग्रेसचे संतोष केणे जे ‘शेतकरी संघर्ष समिती’चे सल्लागार आहेत त्यांनी सुपारी घेऊन कारस्थान रचल्याचा आरोप जितेंद्र ठाकूर यांनी केला. त्यावर संतोष केणे यांची या आरोपावर प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता त्यांचे जिल्ह्यात दौरे असल्याने ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.

‘मेसर्स आशर रियलटर्स’ वर नक्की वरदहस्त कोणाचा ?

या प्रकरणात आम्ही ८० वर्ष कष्ट केलेले जवळपास ३०० ते ४०० शेतकरी आहोत. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या गरजेपोटी आपली शेतजमीन विकलीही असेल त्यावर कोणालाही त्यांनी त्यांची जमीन विकण्यास आमचा विरोध नाही पण सरकारी सर्व्हे ला आमचा कट्टर विरोध आहे कारण आमची जमीन ही एकत्रित असून एका सर्व्हे क्रमांकात ६-७ शेतकरी आहेत व शेतीची हिस्से मोल अद्याप झाली नसून त्यामुळे तो शेतकरी त्याचा हिस्सा विकला तर तो कुठला विकतो हे आमच्या निदर्शनात येणार नाही तसेच त्याच्या कब्जा वाहिवाटीतील ज्यांना कोणाला त्यांची जमीन ज्या कोणाला विकायची असेल तर तो शेतकरी स्वतंत्र आहे व आमची काहीच हरकत नाही. आमची जमीन आम्ही जोवर न्यायालयात न्यायासाठी भांडत आहोत व महसूल खात्याशी निगडित शेतकऱ्यांचे ५९ दावे अजून उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रलंबीत असूताना मोजणी केली जाऊ नये तसेच बिल्डर अजय प्रताप आशर ने न्यायालयात मोजणी साठी अर्ज करून तो दिवानी आणि जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला असून उच्च न्यायालयात प्रलंबित असून आमच्या दाव्यांचा न्यायनिवाडा न होता हा सर्व्हे लावला जातोच कसा ? असा प्रश्न स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांनी उपस्थित केला. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या कडे शेतकऱ्यांतर्फे दावा क्र.१३/२०१६ दाखल करण्यात आला असून त्यामध्ये जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दि.२१/११/२०१६ रोजी प्रांत उपविभागीय अधिकारी मा.उकिरडे यांनी फेरफार मध्ये कुठलेही फेरबदल करू नये असे आदेश पारित केलेला असतानाही अमित सानप तत्कालीन तहसीलदार कल्याण, तत्कालीन मंडळ अधिकारी, तत्कालीन तलाठी दावडी, यांनी आर्थिक लालसेपोटी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर पणे आदेश देऊन व फेरफार मंजूर करून त्यावर अंमल करून आदेशालाही केराची टोपली दाखवली आहे व आमच्यावर अन्याय केला गेला आहे हे लक्षात आल्यामुळे आम्ही शेतकरी भूमिहीन व उपाशी मरण्यापेक्षा अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करून मेलेले बरे, यासाठीच होत असलेल्या जमीन मोजणीस आम्ही स्थानिक भूमिपुत्र शेतकरी विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने संघटीत जमून हरकत घेत आहोत व विरोध करीत आहोत. आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री इकडचेच ठाणे जिल्ह्यातील असून आमच्यावर लढायची वेळ येतेच कशी व याचा सूत्रधार कोण तसेच सदर ‘मेसर्स आशर रियलटर्स’ वर नक्की वरदहस्त कोणाचा ? असा खडा सवाल स्थानिक भूमिपुत्र शेतकरी जितेंद्र ठाकूर, महेंद्र म्हात्रे, नवनीत म्हात्रे, हरी जोशी, गणेश केणे, रवींद्र म्हात्रे, दिलीप ठाकूर, संतोष म्हात्रे व पिंटू म्हात्रे यांनी उपस्थित पत्रकारांसमोर केला.