Home Blog Page 23

मानपाडा पोलीसांनी सेक्स रॅकेट उध्वस्त करून ७ बांगलादेशी महीलांची सुटका करत ५ बांगलादेशी आरोपीसह १ भारतीयाला केले गजाआड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक ०५/१०/२०२३ रोजी बांगला देशातील एन.जी.ओ च्या अधिकारी मुक्ता दास यांनी ‘फ्रीडम फर्म‘ या पुण्यातील सामाजिक संस्थेस ईमेल द्वारे कळविले की, राणा नांवाच्या इसमाने एका १९ वर्षीय बांगलादेशी महीलेस नोकरीला लावण्याच्या बहाण्याने बांगला देशामधुन भारत देशामध्ये आणुन हेदुटणे नावाच्या गांवामध्ये तिला खोलीत डांबून ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. असे ईमेल द्वारे कळविल्यानंतर दिनांक ०६/१०/२०२३ रोजी तिची सुटका करण्यासाठी ‘फ्रिडम फर्म’ संस्थेतील समाजसेविका शिल्पा वानखेडे यांनी डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनला संपर्क साधुन त्या महिलेच्या सुटकेसाठी मदतीची मागणी केली. मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी ताबडतोब बांगलादेशी महीलेची सुटका करण्यासाठी आपल्या पोलीस पथकाला मार्गदर्शन करून हेदुटणे गावामध्ये रवाना केले.

मानपाडा पोलीस पथकाने हेदुटणे गावातील विठ्ठल रुक्मीणी मंदीराजवळ असलेल्या घर कमांक ३२ मध्ये रात्री १२ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता सदर घराच्या तळमजल्यावर पिडीत महीला व तिच्यासोबत इतर ६ बांगलादेशी महीला मिळुन आल्या. पोलीसांनी पिडीत महीलेकडे विचारपुस केली असता युनुस शेख उर्फ राणा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने या सर्व महीलांना नोकरीचे व उपचाराचे अमिष दाखवून बांगलादेशातून भारत देशामध्ये आणुन हेदुटणे गावामध्ये डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. तसेच या महीलांना इतर पुरुषासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यास लावून त्याबदल्यात राणा व त्याचे साथीदार लोकांकडुन पैसे घेत असल्याचे सर्व महीलांनी पोलीसांना सांगितले. राणा व त्याचे साथीदार ‘पलावा सिटी’ मध्ये असल्याचे पोलीसांना पिडीत महीलांनी सांगितल्यानंतर पोलीसांनी पलावा सिटी मध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले. आरोपींना पोलीसांचा सुगावा लागल्याने ते अंधाराचा फायदा घेवुन अंतर्ली गावाबाहेर असलेल्या झाडीझुडपामध्ये पळून गेले. झाडीमध्ये अंधार असल्यामुळे तसेच आरोपिंची संख्या जास्त असल्यामुळे मानपाडा पोलीसांनी आणखी मनुष्यबळ व टॉर्च मागवुन रात्री २ ते पहाटे ६ वाजेपर्यंत आरोपींचा अंतर्ली गांवाबाहेरील झाडीझुडपामध्ये शोध घेवुन ५ आरोपींना पकडले. त्यांची नांवे
१) युनूस अखमल शेख उर्फ राणा (वय: ४० वर्षे)
२) साहिल मिजापुर शेख (वय: २६ वर्षे)
३) फिरदोस नुर हुसेन सरदार, (वय: २४ वर्षे)
४) आयुबअली अजगरअली शेख (वय: ३५ वर्षे)
५) बिपलॉप हापीजूर खान (वय: २४ वर्षे)
अशी असून यातील मुख्य आरोपी युनुस शेख उर्फ राणा यांच्या सांगण्यावरून कोणत्याही वैध कागदपत्र व करारनाम्याशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बांगलादेशी आरोपींना घर उपलब्ध करून देणारा घरमालक इसम नामे योगेश बळीराम काळण (वय: ३१ वर्षे) यालाही पोलीस पथकाने ताब्यात घेतले असून त्यानंतर शिल्पा वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गु.रजि क्रमांक ७९७/२०२३ भादवि कलम ३७६ (२) (एन), ३७०, ३७० (अ), ३६५, ३६६, ३६६ (ब), ३६३, ३४४, ३२३, ३४, सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ४, ५ परदेशी नागरीक कायदा १९४६ चे कलम ३, १४ (अ), १४ (क) सह पारपत्र नियम (भारत प्रवेश) कलम ४, प्रमाणे गुन्हा दाखल करून एकुण ६ आरोपींना अटक केली आहे.

 

तपासादरम्यान पोलीसांना आरोपींच्या खोलीमध्ये १० मोबाईल, २५ संशयित आधार कार्ड, १० पॅनकार्ड, ४ जन्मतारखेचे दाखले तसेच बांगलादेश व भारताच्या चलनी नोटा सापडल्या आहेत.

सदरची कारवाई दत्तात्रय शिंदे मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, सचिन गुंजाळ, मा पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण, सुनिल कुराडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोनि सुरेश मदने, राम चोपडे, दत्तात्रय गुंड, सपोनि अविनाश वनवे, सुनिल तारमळे, प्रशांत आंधळे, सफौ संतोष चौधरी, पोहेकॉ राजेंद्र खिलारे, संजु मासाळ, सुनिल पवार, विकास माळी, शिरीष पाटील, दिपक गडगे, पोना यल्लप्पा पाटील, देवा पवार, मंदार यादव, मपोहेकॉ इरपाचे, पोकॉ महेंद्र मंझा, बहीरम, राठोड, जाधव, नरुळे, विजय आव्हाड, अशोक अहेर, व सफौ धनजय मोहीते, दिपक भोसले (ए. एच.टी. यु ठाणे) या पोलीस पथकाने केली आहे.

मानपाडा पोलीसांकडुन घरमालकांना अवाहन

 

भाडेतत्वावर घर देणाऱ्या घरमालकांनी ठेवत असलेल्या भाडेकरूची नीट पडताळणी केल्याशिवाय घर भाड्याने देवु नये. तसेच भाडेकरू ज्या ठिकाणी नोकरी किंवा मजुरी करतो त्याठिकाणी प्रत्यक्ष जावुन त्याची खात्री करावी व पोलीस पडताळणी करून घ्यावी. भाडेकरूच्या हालचालीबाबत संशय आल्यास ताबडतोब स्थानिक पोलीसांना कळवावे.

ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते स्व. लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचे मिरा-भाईंदरमध्ये झाले भूमिपूजन

संगीताच्या प्रचार – प्रसाराचे मोलाचे कार्य गुरुकुल मधून होईल – उषा मंगेशकर

आमदार प्रताप सरनाईक यांचे कलेच्या प्रचारासाठीचे कार्य कौतुकास्पद ; आम्ही कायम त्यांच्यासोबत – उषा मंगेशकर

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरात ‘भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय’ (गुरुकुल) उभे राहणार आहे त्याचे आज भूमिपूजन झाले याचा खूप आनंद आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे संगीत गुरुकुल उभे राहत असून त्यांच्या चेहऱ्यावरील निश्चय पाहून आमची पूर्ण खात्री झाली आहे की हे संगीत गुरुकुल अतिशय चांगल्या पद्धतीने उभारले जाणार आहे. संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वाना सर्व भाषेतील संगीत शिकता यावे, सर्व प्रकारचे संगीत, वाद्य, गाण्याचे ज्ञान, संगीताचे विविध जे विभाग आहेत त्याचा प्रसार व्हावा अशी लता दीदींची इच्छा होती. आणि दीदींच्या इच्छेप्रमाणेच हे संगीत गुरुकुल येथे उभारले जात आहे याचा आनंद आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी हातात घेतलेले हे काम मीरा भाईंदर प्रमाणेच ठाण्यातही पूर्ण होईल व कलेच्या प्रचारासाठी ते करत असलेल्या कामात मंगेशकर कुटुंब त्यांच्या सोबत आहे, असे ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी मीरारोड येथे बोलताना आज सांगितले.

मिरा-भाईंदर शहरात मोठ्या संख्येने कलाकार, कलाप्रेमी, संगीत प्रेमी, संगीत शिकू इच्छिणारे राहतात. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी त्यांच्या नावे मिरा-भाईंदर शहरात संगीत गुरुकुल उभारण्याची संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला मान्यता देत मीरा भाईंदर मध्ये संगीत गुरुकुल उभारण्यासाठी २५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. मिरारोड येथील आरक्षण क्रमांक २४६ येथे हे संगीत गुरुकुल उभारले जाणार असून आज त्याचे उषा मंगेशकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन झाले. मिरा-भाईंदरचे हे संगीत गुरुकुल बांधून पूर्ण होईल तेव्हा त्यावर मंगेशकर कुटुंबीयांनी लक्ष ठेवावे व मिरा-भाईंदरच्या संगीत विद्यालयात शिकायला येणाऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा भाषणात आमदार सरनाईक यांनी व्यक्त केली. त्यावर उषा मंगेशकर म्हणाल्या की, आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमदार सरनाईक हे गाण्याकरिता किंवा कलेच्या प्रचारासाठी ताठ उभे आहेत आणि ते चांगले काम सतत करतील याच्यावर माझा विश्वास आहे. मंगेशकर कुटुंबाला त्यांनी विनंती केली आहे की मिरा-भाईंदरचे हे संगीत विद्यालय गुरुकुल मंगेशकर कुटुंबाने चालवावे. त्यांच्या या आज्ञेचा मी स्वीकार करते. आमदार सरनाईक यांना वचन देते कि आम्ही नक्की हे कार्य (मीरा भाईंदर संगीत गुरुकुल चालविण्याचे) फार चांगल्या रीतीने पार पाडू. मिरा-भाईंदर मध्ये संगीत गुरुकुल उभे राहत आहे याचा खूप आनंद होत असून आमदार प्रताप सरनाईक यांची मी खूप आभारी आहे असेही उषा मंगेशकर म्हणाल्या. आमदार सरनाईक मिरा-भाईंदरप्रमाणेच ठाण्यातही असे संगीत गुरुकुल उभारणार आहेत. ते जिथे जिथे हे कार्य हातात घेतील ते नक्कीच पूर्ण करतील याची खात्री आहे आणि आम्ही सरनाईक यांच्या सोबत आहोत. केव्हाही त्यांनी बोलवावे आम्ही मंगेशकर कुटुंबीय येऊ. जिथे जिथे ते बोलवतात तिथे तिथे आम्ही त्यांच्यासह येऊ. सर्व मंगेशकर कुटुंब प्रताप सरनाईक यांच्या बरोबर आहे असेही उषा मंगेशकर म्हणाल्या व त्यांनी आमदार सरनाईक यांचे कौतुक केले.

संगीत गुरुकुल मध्ये काय काय?

मिरा रोडच्या आरक्षण क्रमांक २४६ येथे हे संगीत विद्यालय उभे राहणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात २१ कोटींचा खर्च होणार आहे. तळ अधिक एक मजल्याची इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ २३९३. चौ. मी. एवढे आहे. या इमारतीच्या कामात म्यूजिकल लायब्ररी , म्युझिकल क्लास रूम , म्युझिकल प्रॅक्टिस व डबिंग रूम असेल. तसेच लॅण्ड स्केपिंग, संगीत विद्यालयाचे आकर्षक प्रवेशद्वार, पार्किंग सुविधा, म्युरल, लिफ्ट व इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. मिरा-भाईंदरचे हे संगीत विद्यालय राज्य सरकारच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करण्यात येईल, असे आमदार सरनाईक म्हणाले. मिरा-भाईंदर शहरात संगीतावर प्रेम करणारे खूप प्रेमी, रसिक असंख्य आहेत. अनेकांना संगीत शिकून या क्षेत्रात करियर करायचे आहे. त्यांना या संगीत विद्यालयामुळे संधी मिळेल. मिरा-भाईंदरच्या या संगीत विद्यालयातून अनेक मोठे संगीतकार, कलाकार घडावेत अशी माझी इच्छा आहे, असे आमदार सरनाईक म्हणाले. मिरा-भाईंदरचे संगीत गुरुकुल राज्य सरकारच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न झाले कि मिरा-भाईंदरच्या विद्यालयात संगीत अभ्यासक्रम शिकणाऱ्यांना येथेच पदवी सुद्धा मिळू शकेल असेही आमदार सरनाईक म्हणाले.

या भूमिपूजन सोहळ्याला ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्यासह महापालिका आयुक्त संजय काटकर, आमदार गीता जैन, संगीतकार मयुरेश पै, पालिकेचे इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

‘लतायुग’ संगीत सोहळ्याला रसिकांची दाद

या भूमिपूजनाचे औचित्य साधून जीवनगाणी निर्मित ‘लतायुग’ या कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या गाजलेल्या हिंदी – मराठी गीतांची मैफिल सकाळी १० वाजल्यापासून रंगली. संपूर्ण नाट्यगृह खचाखच भरले होते. कला रसिकांनी या कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद दिला.

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमानी भक्तांसाठी शिवसेनेच्या वतीने मोफत ५०० एसटी बस सेवा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सरकार च्या वतीने कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कल्याण व डोंबिवलीत मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. डोंबिवली पश्चिमेकडील बावन चाळ रेल्वे मैदान आणि ग्रामीणसाठी पूर्वेकडील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडांगण येथे ही सोय करण्यात आली होती. यावेळी लोकप्रिय खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी बसला झेंडा दाखवून कोकणवासीयांना सुखाचा प्रवास करण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गोपाळ लांडगे, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, माजी महापौर विनिता राणे, तालुका प्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, भाऊ चौधरी, संजय पावशे, हरिश्चंद्र पाटील, संदेश पाटील, माजी नगरसेवक रणजित जोशी, जनार्दन म्हात्रे, राहुल म्हात्रे, सुजित नलावडे, स्वाती मोहिते, संतोष चव्हाण यांसह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

डोंबिवली-कल्याण येथून सुमारे ३०० एसटी बस सोडण्यात आल्या होत्या. डोंबिवलीतून शिवसैनिक संदेश पाटील व हरिश्चंद्र पाटील यांनी त्यांच्या प्रभागातील कोकणवासी भक्तांसाठी या एसटी बसपैकी ६२ एसटी बसची सेवा पुरविण्यास सहकार्य केले होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिक संदेश पाटील यांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले.

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला

राज्याचे माजी मुख्यमंत्री अडीच वर्षात फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेले होते. त्यांनी तळागाळात जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी जे काम तळागाळातील लोकांसाठी केले त्याचा आढावा घ्यावा. आमदार आदित्य ठाकरे यांनी “शिंदे सरकार काही काम करत नाही फक्त पोस्टर बाजी करतात” अशी टीका नाशिक येथे केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लागवला आहे. डोंबिवली येथे कोकण व राज्यातील इतर भागात गणपती उत्सवासाठी जाण्याकरिता डोंबिवली-कल्याण येथील नागरिकांना मोफत एसटीची सोय करण्यात आली होती. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्या वर टिका केली.

विद्यमान सरकारच्या कामाबद्दल बोलताना खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे म्हणाले कि, मराठवाड्यासाठी स्पेशल पॅकेज दिलेले असून, विशेष कॅबिनेट बैठक संभाजी नगर येथे आयोजित करण्यात आली होती. मराठवाड्यासाठी साठ हजार कोटीचे विविध सरकारी योजना पूर्ण करण्यासाठी पॅकेज देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी खात्यात साडेबारा हजार कोटीं रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर एसटीची ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत देण्यात आली असून, खास करून महिलांना देखील ५० टक्के सवलत एसटीच्या दरात देण्यात आलेली आहे. मुंबई – गोवा महामार्गावर एकेरी वाहतूकीसाठी रस्ता तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर केंद्र आणि राज्य शासनाकडून सुरू आहे. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. गणपतीच्या अगोदर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या पद्धतीने युद्धपातळीवर त्या महामार्गाचे काम सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गणपतीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात मोफत एसटीची सोय करण्यात आली असून गेल्या वर्षी १९० बसेस आपण सोडल्या होत्या. यावेळी ५०० बसेस आपण सोडत आहोत. कोकणवासी चाकरमानी भक्त यांचा एसटीचा संबंध हा जिव्हाळ्याचा आहे. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये कोकणातील चाकरमानी भक्तगण जात असतात. फक्त कोकणच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर भागात सुद्धा यावेळी एसटीची सोय करण्यात आलेली आहे. एसटी सोबत जे खाजगी किंवा आपल्या वाहनातून जात असतात त्यांच्यासाठी ‘टोल फ्री’ ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर गणपती साठी विशेष रेल्वेची सोय देखील केलेली आहे. या सरकारने हिंदु सणांवरील सर्व निर्बंध मागे घेतले त्यामुळे राज्यात आता उत्साहात सगळे मराठी सण साजरे करता येतात.

 

 

 

ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील सरकता जिन्याचा लोकार्पण सोहळा यशस्वीपणे संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाकुर्ली पूर्व विभागातील रेल्वे स्टेशन लगतचा सरकत्या जिन्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात उपरोक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह स्थानिक विभाग प्रमुख श्री.समीर कवडे देखील उपस्थित होते. उपशहर प्रमुख माननीय श्री.दीपक उर्फ बंड्या भोसले, शहर संघटक श्री.ज्ञानेश पवार, श्री.प्रकाश सागरे, उप कार्यालय प्रमुख श्री.शैलेंद्र भोजने, डोंबिवली पूर्व विभाग महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.स्वातीताई हिरवे, महिला उपशहर संघटक सौ.कल्याणी ताई वर्तक, खासदार रेल्वे समन्वय समितीच्या अध्यक्षा सौ.स्वातीताई मोहिते, शिवसेना झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माननीय श्री.हरिश्चंद्र कांबळे, शिवसैनिक श्री.मनोहर शिंदे, शाखाप्रमुख श्री.अर्जुन भाटी, कार्यालय प्रमुख श्री.प्रकाश शांताराम माने, स्टेशन मास्तर श्री.पिंटो साहेब, आरपीएफ विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच रेल्वे विभागाचे अनेक कर्मचारी आणि अनेक शिवसैनिक व ठाकूर्ली विभागातील नागरिक आनंदाने सहभागी झाले होते.

ठाकूर्ली येथील नागरिकांची बऱ्याच वर्षाची मागणी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कानावर घातल्यानंतर खासदार यांनी त्वरित रेल्वे प्रशासनाशी पाठपुरावा करून ठाकुर्ली पूर्व विभागातील नागरिकांसाठी सरकत्या जिन्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला.

या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि रेल्वे प्रवाशांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला तर “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आगे बढो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो” अशा घोषणा देऊन ठाकुर्ली स्टेशनचा परिसर उपस्थितांनी दणाणून सोडला.

 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुखरूप पोहोचणारा भारत जगातील पहिला देश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यूल बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेल्या लँडर मॉड्यूलने संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग केले.

चंद्रावर लँडिंग; अभिनंदन, भारत !

इसरोने चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगची माहिती सोशल मीडियावर खास पद्धतीने शेअर केली. इसरोने लिहिले, भारत, मी माझ्या गंतव्यस्थानावर सुखरूप पोहोचलो आहे आणि तुम्हीही ! चांद्रयान-३ चंद्राच्या पुष्टभागावर सुखरूप पोहीचण्यास यशस्वी झाले. चंद्रावर अलगद लँडिंग झाले. अभिनंदन, भारत !

मोदींनी केले अभिनंदन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इसरो’ च्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले, आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकार झाला. पंतप्रधान म्हणाले, “माझ्या प्रिय कुटुंबीयांनो ! असा इतिहास डोळ्यांसमोर घडताना पाहिल्यावर आम्हाला अभिमान वाटतो. अशा ऐतिहासिक घटना देशाच्या जीवनाची जाणीव करून देतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अभूतपूर्व आहे. हा क्षण भारताच्या जयघोषाचा क्षण आहे. हाच क्षण संकटांचा महासागर पार करण्याचा. हा क्षण आहे विजयाच्या चंद्रमार्गावर चालण्याचा. हाच क्षण आहे बळाचा. १४० कोटी हृदयांच्या धडकण्याचा हा क्षण आहे. हा भारताच्या विजयाचा क्षण आहे. नवीन ऊर्जा, नवीन चेतना तसेच भारताच्या उगवत्या नियतीला हाक देण्याचा हा क्षण आहे. अमृतकालच्या पहिल्या पहाटे यशाचे अमृत बरसले आहे. आम्ही पृथ्वीवर प्रतिज्ञा घेतली आणि साकार झाली ती चंद्रावर.