Home Blog Page 223

मिरा भाईंदर महानगरपालिकेत अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत रंगले शह काटशहचे राजकारण!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: सोमवार 26 जुलै रोजी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या असून उपायुक्त मुख्यालय अजित मुठे यांचेकडून अतिक्रमण विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांचे ऐवजी आता अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभार प्रतिनियुक्तीवर असलेले उपायुक्त मुख्यालय मारुती गायकवाड यांचेकडे सोपविण्यात आला आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या प्रभाग चारच्या सहायक आयुक्त कांचना गायकवाड यांच्याकडे वृक्ष अधिकारी सोबतच सहायक आयुक्त उद्यान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वाहन विभागाचे सहायक आयुक्त सचिन बच्छाव यांचेकडे मूळ कार्यभार सांभाळून वैद्यकीय आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

त्याच बरोबर सर्वात मोठी आणि चर्चित बदली सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांची ठरली आहे कारण दीपक खांबीत यांची बदली करण्यासाठी खुद्द मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांचेवर राजकीय दबाव आणला होता अशी चर्चा त्यावेळी केली जात होती. दीपक खांबीत यांना आता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार देण्यात आला असून त्यांचे ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांना पूर्ववत पाणी पुरवठा विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.

तीन महिन्यापूर्वीच आयएएस (IAS) असलेले आयुक्त डॉ. विजय राठोड या तडफदार अधिकाऱ्याने मिरा भाईंदर महानगरपालिकेचे काही वादग्रस्त अधिकारी जे वर्षानुवर्षे एकाच विभागात एकाच पदावर चिटकून बसलेले होते त्यांच्या बदल्या करण्याचे धाडस केले होते. मात्र केवळ तीन महिन्याच्या कालावधीतच आत्ताचे आयुक्त दिलीप ढोले यांनी या अधिकाऱ्यांना पुन्हा त्यांच्या पूर्व पदावर बसवले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्या त्यानंतर आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी देखील तडकाफडकी बदली करण्यात आली असून यामध्ये पक्षांचे राजकारण तर आहेच शिवाय मोठे अर्थकारण देखील गुंतले असल्याने ह्या बदल्या करण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व अधिकाऱ्यांच्या गेल्या काही महिन्यातच झालेल्या या बदल्या पुन्हा पूर्ववत करण्यात आल्याने मिरा भाईंदर शहरात सत्ताधारी भाजप आणि राज्यात सत्तेत असलेले मात्र शहरात विरोधीपक्षात असलेल्या शिवसेनेत पुन्हा एकदा शह कट शहचे राजकारण रंगले असल्याची चर्चा केली जात आहे. महत्वाचे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांची मूळ विभागात बदली झाल्यामुळे आमदार गीता जैन यांना मात्र मोठा धक्का बसला असल्याची चर्चा केली जात आहे. कारण दीपक खांबीत माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या बोलण्यानुसार कामकाज करीत होते आणि आमदार असून देखील त्यांनी गीता जैन यांच्याशी संबधित असलेल्या काही ठेकेदारांची काही कामं अडवून धरली होती आणि त्यामुळेच आमदार गीता जैन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांची बदली करण्यासाठी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली होती असे बोलले जात होते.

मिरा भाईंदर शहरातील मूलभूत सुविधा देण्यास असमर्थ ठरलेली व कर्जबाजारी झालेली महानगरपालिका, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि शहरात असुविधांचा बाजार मांडला असताना या सर्व शह काट शहच्या राजकारणात मिरा भाईंदर शहरातील करदात्या जनतेला मात्र कुणी वाली राहिला नसल्याचे दिसत आहे.

काशिमीरा पोलिसांनी केली भाईंदर येथील एका खुनाच्या प्रकरणात ३ आरोपींना अटक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाईंदर येथील एका खुनाच्या प्रकरणात काशिमीरा पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे.
२१ जुलै ला दुपारी ३ ते रात्री १०.१५ च्या दरम्यान भाईंदर ला राहणाऱ्या श्री.लाला सुग्रीव वर्मा ह्यांच्या पत्नी सौ. सुमन ह्या घरात एकट्या असतानां अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून,गळाआवळून त्यानां जीवे ठार मारले.
त्यांच्या अंगावरील ३५,८०० रु. किंमतीचे सोन्याचे दागिने, बॅगेत असलेले आधार कार्ड, एटीएम कार्ड, इस्त्री आणि साऊंड बॉक्स असे सामान लुटून नेले,याबाबत काशिमीरा पोलीसात गुन्हा दाखल झाला होता.

ह्यात कोणताही पुरावा आणि धागेदोरे नसताना पोलिसांनी घटनास्थळाचा प्राथमिक माहिती वरून, तांत्रिक तपास आणि विचारपूस याच्या आधारे, ३ आरोपीना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे, त्यांनी गुन्हा कबूल केला असून पुढील तपास चालू आहे असे काश्मीरा पोलिसांतर्फे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

गर्भवतींचा कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाला कमी प्रतिसाद; आतापर्यंत केवळ १४५ महिलांना लसमात्रा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापालिकांतर्फे गर्भवतींचे कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण सुरू होऊन दहा दिवस उलटून गेले तरी अजून तसा लसीकरणाला विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. मुंबईत आत्तापर्यंत केवळ १४५ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे.

गर्भवती महिलांना कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत विशेष धोका नसल्याचे जाणवले असले तरी दुसऱ्या लाटेत मात्र त्यांना तीव्र लक्षणे आढळली आहेत. पहिल्या लाटेत ‘नायर रुग्णालयात’ ११०० गर्भवती महिला कोरोनाच्या उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. यातील केवळ ८ महिलांचा मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या लाटेमध्ये ४८५ बाधितांपैकी २६ महिलांचा मृत्यू झाल्याचे आढळले आहे. सुमारे १० ते १५ टक्के महिलांना तीव्र लक्षणे होती. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी खास लसीकरण उपलब्ध करण्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. त्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाने गर्भवती महिलांच्या लसीकरणाला परवानगी दिली असली तरी कोरोनाचा संसर्ग झाल्यास संभाव्य धोके आणि प्रसुतीच्या काळात लसीकरणाचे माहीत नसलेले दुष्परिणाम याची माहिती दिल्यावर लस घेण्याचा निर्णय गर्भवतीचा असेल असे स्पष्ट केले आहे. लस घेण्याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण असून लसीकरणाबाबत अनेक शंकाकुशंका या महिलांमध्ये दरवळत आहेत. त्यामुळे लसीकरणाला अजून फारसा हवा तसा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

केंद्राच्या सूचनेनुसार मुंबईत पालिकेने १५ जुलैपासून ३५ रुग्णालयांत गर्भवती महिलांसाठी लसीकरण सुरू केले आहे. याला आता दहा दिवस उलटले तरी पालिकेत आत्तापर्यंत केवळ ६१ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे. सरकारी रुग्णालयात तर केवळ १४ महिलांनी अद्याप लस घेतली आहे. शहरात सुमारे दीड लाख महिला या गर्भवती असून त्या लसीकरणासाठी पात्र आहेत.

भाजप-मनसेचा ‘दुवा’ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जुळणार?

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये भेट झाली. त्यानंतर मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली. मनसेच्या परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून संभ्रम असल्याचं पाटील यांनी ठाकरेंना सांगितलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी पाटील यांना त्यांच्या भाषणाची लिंक पाटील यांना पाठवली आहे. यामध्ये राज यांची परप्रांतीयांबद्दलची भूमिका आहे. दरम्यान, मनसेसोबतच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, मनसे शत्रूपक्ष नाही. पण, भाषेच्या संदर्भातील त्यांची भूमिका भाजपला मान्य नाही, असे सांगताना हिंदुत्ववादी भूमिका महत्त्वाची आहे. अलीकडील काळात मनसेने तशी भूमिका घेतली आहे. मात्र, भाषेसंदर्भातील भूमिका मनसेने बदलली, तर विचार करता येऊ शकतो. पण, आताच्या घडीला मनसेसोबत युतीची कोणतीही चर्चा नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांच्या मनसेची परप्रांतीयांची भूमिका अतिशय आक्रमक आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा परप्रांतीयांना चोप दिला आहे. त्यामुळेच भाजपनं मनसे सोबतच्या युतीवरून सावध पवित्रा घेतला आहे. नाशिक भेटीत राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत मनसेच्या परप्रांतीयांच्या भूमिकेवर चर्चा झाली. तुमच्या मनातील संभ्रम लवकरच दूर करतो. परप्रांतीयांची भूमिका स्पष्ट करणाऱ्या मुलाखतीची लिंक लवकरच तुम्हाला पाठवतो, असं राज यांनी पाटील यांना सांगितलं होतं.

चंद्रकांत पाटील यांच्या मनातील गैरसमज आणि संभ्रम दूर करण्यासाठी राज यांनी त्यांना एका मुलाखतीची लिंक पाठवल्याचं समजतं. सध्या पाटील पूरग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी साताऱ्यात आहेत. त्यांनी अद्याप राज यांनी पाठवलेली लिंक पाहिलेली नाही. मनसेसोबत युती करायची की नाही याचा निर्णय भाजप नेतृत्त्वाकडून घेण्यात येणार आहे.

मात्र मनसेसोबतच्या युतीविषयी तूर्तास कोणतीही चर्चा नाही. याबद्दल सध्याच्या घडीला चर्चा सुरू नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मनसे आमच्यासाठी शत्रूपक्ष नाही. मात्र भाषेच्या मुद्द्यावरून भेदभाव करायचा नाही हे आमचं धोरण आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत. त्यांचीही भूमिका हिंदुत्ववादी आहे, असं फडणवीस पुढे म्हणाले.

१ ऑगस्टपासून एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये बदल – आरबीआय..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

रिझर्व्ह बँकेच्या नव्या आदेशानुसार बँकांनी स्वयंचलित टेलर मशिन्सवर अर्थात ‘एटीएम’ वर शुल्क आकारू शकणार्‍या ‘इंटरचेंज फी’ मध्ये वाढ केली आहे. १ ऑगस्टपासून २ रुपयांची वाढ दिसून येईल. ‘आरबीआय’ने जूनमध्ये इंटरचेंज फी १५ ते १७ रुपयांनी वाढविली तर बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी फी ५ रुपयांवरून ६ पर्यंत वाढविण्यात वाढ केली. आरबीआयच्या मते, ही फी बँकांकडून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे देयकांसाठी (पेमेंटसाठी) केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी ग्राहकांकडून घेतली जाते. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राहक त्यांच्या खाते असलेल्या बँकेच्या एटीएम मधून दरमहा पाच मोफत व्यवहार करण्यास पात्र असतील.

काय आहेत बदल ?

१ऑगस्ट २०२१ पासून, व्यावसायिक बँकांना सर्व व्यवहारांमध्ये १५ ते १७ रुपये व सर्व केंद्रांमधील बिगर-आर्थिक व्यवहारांसाठी ५ रुपयांवरून ६ रुपयांपर्यंत वाढीस परवानगी दिली जाईल. आरबीआयने बँकांना पुढील वर्षापासून मोफत मासिक परवानगी मर्यादेपलीकडे रोख आणि विना-रोकड ‘ए.टी.एम’ व्यवहारासाठी शुल्क वाढविण्यास परवानगी दिली आहे. “जास्त इंटरचेंज फी ची भरपाई करण्यासाठी आणि खर्चात सर्वसाधारण वाढ झाल्यास त्यांना ग्राहकांच्या शुल्कामध्ये प्रत्येक व्यवहारांसाठी २१ रुपये करण्याची परवानगी आहे. ही वाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल”, असे ‘आरबीआय’ने सांगितले. रिझर्व्ह बँकेने असेही म्हटले आहे की, बँक ग्राहकांनी मोफत व्यवहाराची मासिक मर्यादा ओलांडल्यास त्यांना १ जानेवारी २०२२ रोजी २० रुपयांऐवजी २१ रुपये प्रत्येक ट्राजेंक्शनसाठी द्यावे लागतील. तथापि, बँक ग्राहक त्यांच्या स्वत:च्या बँक एटीएम मधून दरमहा पाच विनामूल्य ट्राजेंक्शनसाठी पात्र आहेत.