Home Blog Page 24

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुखरूप पोहोचणारा भारत जगातील पहिला देश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यूल बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेल्या लँडर मॉड्यूलने संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग केले.

चंद्रावर लँडिंग; अभिनंदन, भारत !

इसरोने चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगची माहिती सोशल मीडियावर खास पद्धतीने शेअर केली. इसरोने लिहिले, भारत, मी माझ्या गंतव्यस्थानावर सुखरूप पोहोचलो आहे आणि तुम्हीही ! चांद्रयान-३ चंद्राच्या पुष्टभागावर सुखरूप पोहीचण्यास यशस्वी झाले. चंद्रावर अलगद लँडिंग झाले. अभिनंदन, भारत !

मोदींनी केले अभिनंदन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इसरो’ च्या वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले, आम्ही पृथ्वीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकार झाला. पंतप्रधान म्हणाले, “माझ्या प्रिय कुटुंबीयांनो ! असा इतिहास डोळ्यांसमोर घडताना पाहिल्यावर आम्हाला अभिमान वाटतो. अशा ऐतिहासिक घटना देशाच्या जीवनाची जाणीव करून देतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण अभूतपूर्व आहे. हा क्षण भारताच्या जयघोषाचा क्षण आहे. हाच क्षण संकटांचा महासागर पार करण्याचा. हा क्षण आहे विजयाच्या चंद्रमार्गावर चालण्याचा. हाच क्षण आहे बळाचा. १४० कोटी हृदयांच्या धडकण्याचा हा क्षण आहे. हा भारताच्या विजयाचा क्षण आहे. नवीन ऊर्जा, नवीन चेतना तसेच भारताच्या उगवत्या नियतीला हाक देण्याचा हा क्षण आहे. अमृतकालच्या पहिल्या पहाटे यशाचे अमृत बरसले आहे. आम्ही पृथ्वीवर प्रतिज्ञा घेतली आणि साकार झाली ती चंद्रावर.

 

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयाचे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ कडून जाहीररीत्या खंडन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधूत सावंत

गेल्या काही दिवसात वैद्यकीय विश्वा विषयी दोन महत्त्वाचे निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांनी घेतले आहेत. त्याप्रमाणे एक डॉक्टरांना मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू व परदेशी दौऱ्याबाबत आहे तर दुसरा जेनेरिक औषधांबबाबत असून यापुढे डॉक्टरांना औषध निर्मिती कंपन्यांकडून दिमाखदार महागड्या भेटवस्तू स्वीकारता येणार नाही आणि अशा कंपन्यांच्या पुरस्काराखाली आयोजित पंच तारांकित परिषदा, परदेशी दौरे यात सहभागी होता येणार नाही. आपली उत्पादने म्हणजे औषधे जास्तीत जास्त विकली जावी यासाठी या कंपन्यांकडून सातत्याने विविधरित्या प्रयत्न केले जातात. असा आरोप होत असताना याबद्दल ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ चे सदस्य आणि पदाधिकारी डॉ. मंगेश पाटे यांनी डॉक्टरांवर होणाऱ्या आरोपांचे जाहीररीत्या खंडन केले आहे.

याबाबत डॉ. पाटे म्हणतात की, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांनी जे डॉक्टरांसाठी काही निर्बंध लागू केलेले हे काही नवीन नाही. ज्यावेळी आम्ही वैद्यकीय शिक्षण घेतो त्यावेळी सर्व रुग्णांना समान सेवा देण्याची शपथ घेत असतो. त्याप्रमाणे कुठलाही डॉक्टर अशा भेटी वगैरे स्वीकारत नाही. पंचतारांकित व परदेशी टूर्स अशा गोष्टी कुठल्याही डॉक्टरांच्या कक्षेत येत नाहीत. दुसरा असा एक विषय आहे जेनेरिक औषधांचा. जेनेरिक औषधांचा उपयोग व रुग्णांना कितपत त्याचा लाभ होतो असा आहे. सिक्युरिटी म्हणजे या औषधांची सुरक्षितता किती आहे त्याचा. त्या औषधांचा दर्जा किती आहे त्याचा. त्याचे होणारे साईड इफेक्ट याचे मानांकन होणे अत्यंत गरजेचे आहे. फक्त जेनेरिक औषध स्वस्त आहेत हा अट्टाहास योग्य नाही. जेनेरिक औषधांच्या मागचा उद्देश असा आहे की औषधांवरील खर्च कमी व्हावा व रुग्णांना औषधे सवलतीच्या दरात उपलब्ध व्हावी ही अत्यंत योग्य गोष्ट आहे. आज रुग्णांना औषधांवर भरपूर खर्च करावा लागतो तो कमी व सवलतीच्या दरात व्हावा. परंतु त्याचे उत्तर फक्त जेनेरिक औषध हे नाही. गेले एक दशक आम्ही सरकारकडे एकच मागणी करत आहोत की “एक राष्ट्र, एक औषध, एकच किंमत”.

औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा व होणाऱ्या औषधाचा खर्च, वाहतुकीचा खर्च याचा वाजवी दर ‘सरकार’ आणि ‘एफडीए’ने ठरवावा आणि देशात कुठेही लोकांना औषध मिळावं. देशात कुठेही रुग्णांनी औषध घेतले तर त्याला एकाच किंमतीत ते औषध मिळावे. आज दोन गोष्टींमधून फायदा काढला जातो, औषध कंपन्या आणि आरोग्य विमा. या दोन्हींना आज फायदा होत चाललेला आहे. औषध कंपन्या आणि आरोग्य विमा कंपन्या या दोन्ही वर सरकारचे नियंत्रण नसल्याने रुग्णांचा आरोग्य सेवेवर प्रचंड ताण व खर्च होत आहे. आणि याचे खापर उगाचच डाॅक्टरांच्या माथी फोडले जाते. या दोन्ही गोष्टींशी डाॅक्टरांचा संबंध नाही. ह्या फक्त सरकारच्या अखत्यारीतील गोष्टी आहेत. नुसतं ‘जेनेरिक औषध’ हे त्याच्यावरचं अजिबात पर्याय तसेच उत्तर नाही. जेनेरिक औषधांच्या नावाने नुसता गवगवा केला जात आहे आणि अशी समजूत केली जात आहे की जेनेरिक औषध कमी पैशात मिळाल्यामुळे लोकांचे पैसे वाचतील. परंतु त्याची ‘क्वालिटी’ किंवा त्याची ‘सुरक्षितता’ याबाबत अजिबात भाष्य केले जात नाही. फक्त दावे करून सुयोग्य दर्जा आणि सुरक्षितता मिळत नाही. ज्यावेळी आम्ही औषध लिहून देतो त्यावेळी या औषधांमुळे रुग्णांना त्रास होणार नाही ना याचा विचार करूनच औषध लिहून देत असतो. औषधं लिहून देत असताना ब्रँडेड औषध महाग का मिळतात याचा विचार सरकार का करत नाही. ‘सरकार’ने आणि ‘एफडीए’ने सर्व औषध कंपन्यांवर एकाच वाजवी दराने औषधाच्या किंमती ठरवण्याबाबतचा निर्णय घ्यावा आणि सर्व देशात ती एकच किंमत लागू करावी अशी आमची मागणी आहे व त्यामुळेच ही समस्या मिटणार आहे.

डॉक्टर म्हणून काम करत असताना तुमचे वैद्यकीय ज्ञान अपडेट व्हावं लागतं त्याच्यासाठी कुठलीही शासकीय यंत्रणा – प्रशासन वगैरे पुढाकार घेत नाही. वैद्यकीय ज्ञानामध्ये नवीन काय येते आणि संशोधन होते , त्यासाठी तुम्हाला माहिती घ्यावी लागते. आणि कोणी नवीन ज्ञानाचा प्रसार करत असेल तर चुकीचं काय आहे ? डॉक्टरांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून कंटिन्यू मेडिकल एज्युकेशन (सीएमई) नावाची पद्धत अनेक ठिकाणी सुरू आहे. त्याच पद्धतीने मेडिकल असोसिएशनच्या वतीने आम्ही या प्रकारचे सत्र वारंवार आयोजित करीत असतो. यामध्ये येणार नव तंत्रज्ञान, नवीन मशिनरी, नवीन औषधं तसेच त्यांचा रुग्णांना होणारा लाभ याबाबत तज्ञांना बोलवून माहिती घेत असतो व त्यावर चर्चा करतो. त्यामुळे डॉक्टरांच्या ज्ञानात भर पडते. प्रॅक्टिस मध्ये आधुनिकता येते. याचा फायदा सामान्य जनतेलाच होतो. एखादं औषध असेल किंवा उपकरण असेल त्याबद्दल डॉक्टरांना ते अवगत करण्यासाठी औषध कंपन्यांची लोक येऊन माहिती देत असतील तर त्यात गैर काय ? असा सवाल देखील डॉक्टर मंगेश पाटे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर केला आहे. ज्ञानार्जन करणे यात कोणती चूक आहे ? असं देखील ते विचारतात. याचा विचार सरकार व वैद्यकीय आयोगाने करायला हवा.

इडली चटणी सांबार विक्रीच्या व्यवसायातून तरुणांना रोजगाराची संधी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

इडली चटणी सांबार सारखे पौष्टिक अन्नपदार्थ स्वस्त दरात विकून आर्थिक उत्पत्ती होऊ शकते आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतो हे डोंबिवलीतील एका तरुणाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सकस – दर्जेदार अन्न स्वस्त दरात मिळावे आणि तरुणांना रोजगार मिळावा याकरीता ‘नादब्रह्म इडली विक्री सेवा’ व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. नादब्रह्म हे नाव आता डोंबिवली येथे दर्जेदार आरोग्यदायी इडली चटणी सांबार साठी ओळखले जाणार आहे. डोंबिवली येथे पहिल्यांदा अवघ्या दहा रुपयांत हि सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पुणे, नवी मुंबई, ठाणे आणि महाराष्ट्रातील खवय्यांची मनं आणि ह्रदय जिंकल्यावर डोंबिवली पूर्व, रामनगर मधील स्वामी समर्थ मठासमोर नादब्रह्म इडली आउटलेट योगेश कोठावदे यांनी सुरु केले आहे. या आऊटलेटचे उद्घाटन कल्याण डोंबिवली महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती आणि महाराष्ट्र युवा सेनेचे प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे यांनी केले आहे. या वेळी रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, रिक्षा चालक-मालक संघटनेचे उपाध्यक्ष अर्जुन माने, सुप्रसिद्ध गायक शेखर गायकवाड, आरती कोठावदे आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.

 

डोंबिवली मानपाडा पोलीसांनी ठाणे, नवी मुंबई व मुंबई येथील १८ गुन्ह्यांची एकूण रुपये २०,१५००/- उकल करत घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी तसेच चोरीचे गुन्हे घडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी मा. श्री.दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री.सचिन गुंजाळ, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण व मा. श्री.सुनिल कुराडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी आपल्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्षन करुन सुचना दिलेल्या होत्या.

​ त्याप्रमाणे मानपाडा पोलीस ठाण्याचे श्री.सुरेश मदने, पोनि. (प्रशासन) अतिरिक्त कार्यभार व पोनि यांनी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विषेश पथक स्थापन करून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे मार्गदर्शन करून पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी आरोपी येण्या-जाण्याचे मार्गावरील सीसीटिव्ही फुटेज व इतर तांत्रिक तपास करून तसेच गोपनिय बातमीदाराच्या आधारे अहोरात्र मेहनत घेवून सराईत गुन्हेगार नामे युसुफ रशीद शेख (वय: ३८ वर्ष), व नौशाद मुश्ताक आलम उर्फ सागर (वय:२८ वर्ष), यांना ताब्यात घेवून त्यांना मानपाडा पो.स्टे.गु.र.नं. ४३४/२०२३, भादंवि कलम ४५४,३८०,३४ या गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडुन ठाणे शहर, नवीमुंबई व मुबई आयुक्तालयतील १८ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदर अटक आरोपींकडुन २०० ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने, २,२०,५००/- रूपये रोख रक्कम, ०२ मोटार सायकल, ०२ लॅपटॉप, ०८ मोबाईल, ०५ मनगटी घडयाळ, ०१ कॅमेरा, ०१ स्पिकर, ०१ एटीएम कार्ड, ०१ नंबर प्लेट, ०१ हेल्मेट, घडफोडी करण्याकरीता वापरलेले दोन लोखंडी कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पकड, व चाकू असा एकुण २०,१५,०००/- रुपयांचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

अटक केलेले दोघे आरोपी हे अट्टल तसेच सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी मुंबई, नवी मुंबई व ठाणे आयुक्तलयात आरोपी युसूफ शेख याला एकुण २३ गुन्ह्यात व आरोपी नौशाद आलम याला एकुण ११ गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरची कामगिरी श्री.दत्तात्रय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेषिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व मा. श्री.सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्षनाखाली श्री. सुरेश मदने,पोनि(प्रशासन)अतिरिक्त.कार्भार व पोनि, सपोनि.सुनिल तारमाळे, सपोनि. अविनाश वणवे, सपोनि. प्रशांत आंधळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा. सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, राजेंद्र खिलारे, दिपक गडगे, सोमनाथ टीकेकर, पोना. गणेश भोईर, शांताराम कसबे, प्रविण किनरे, देवा पवार, येलप्पा पाटील, अनिल घुगे, पोशि. विजय आव्हाड, अशोक आहेर, महेंद्र मंजा, संदीप चौधर यांच्या पथकाने यशस्वीरित्या केलेली आहे.

 

 

मिरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना ईडीची नोटीस?

मुंबई, प्रतिनिधी: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना ठाण्यातील बांधकाम व्यवसायिकांशी संबंधित असलेले कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.

ज्या आरोपी विकासकांना ULC कायद्यांतर्गत आपली जास्तीची जमीन सरकारकडे सोपवायची होती किंवा कायद्याच्या कलम 20 अंतर्गत राज्य प्राधिकरणांकडून सूट मिळवायची होती, त्यांनी लोकांची आणि अधिकाऱ्यांची दिशाभूल करून आणि खोटी कागदपत्रे सादर करून कोट्यावधीचा घोटाळा केला आहे.

या प्रकरणात ठाणे पोलिसांनी नोव्हेंबर 2016 मध्ये घोटाळा शोधून काढल्यानंतर तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली होती ज्यामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांनी कमाल नागरी जमीन नियमन कायदा (ULCR) कायद्याचे उल्लंघन करून, लाच देऊन आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून अतिरिक्त जमीन सरकारला हस्तांतरित न करता त्या जमिनी परस्पर विकल्या होत्या. मिरा-भाईंदरचे प्रशासक तथा आयुक्त दिलीप ढोले यांना अर्बन लँड सीलिंग रेग्युलेशन (यूएलसीआर) कायदा प्रकरणातील 11.14 कोटी रुपयांची मनी लौंड्रींग प्रकरणाशी संबंधित माहिती आणि स्पष्टीकरण देण्यासाठी अमलबजावणी संचालयाकडून नोटीस काढून बोलावण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप ढोले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय असून ते वस्तू व सेवा कर विभागात उपायुक्त म्हणून कार्यरत असताना, शिंदे राज्यात नगरविकास मंत्री होते त्यावेळी त्यांची नगरविकास मंत्रालयात स्वीय्य सहाय्यक पदावर बदली करण्यात आली. नगरविकास विभागाचे मंत्री असतानाच एकनाथ शिंदे यांनी 2020 मध्ये ढोले यांची मिरा-भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि त्यानंतर 2021 मध्ये त्यांना महापालिका आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे:
मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत कार्यरत असलेल्या अनेक विकासकांनी महापालिका अधिकार्‍यांशी संगनमत करून अर्बन लँड सिलिंग रेग्युलेशन ऍक्ट (ULC) कायद्यानुसार अतिरिक्त असलेली जमीन सरकारला हस्तांतरित न करता त्या जमिनी परस्पर विकल्या आणि हे 2016 च्या नंतर देखील झाले आहे असे तपासात उघड झाले आहे.

दिलीप ढोले यांनी मार्च 2021 मध्ये पालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्याच्या एक वर्षाच्या पूर्वी ते अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. नोव्हेंबर 2016 मध्ये ठाणे पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी कमाल जमीन मर्यादा विभागाचा घोटाळा उघडकीस आणून मिरा-भाईंदर शहरातील काही विकासकांना अटक केली होती. या घोटाळ्यातील सहभागाची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी वास्तुविशारद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ULC विभागातील काही तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांवर आणि ULC महामंडळाच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला होता.

काय आहे नागरी कमाल जमीन धारणा कायदा?:
नागरी कमाल जमीन धारणा कायदा ULC अंतर्गत कोणत्याही भूखंडावर बांधकाम करताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 5% जमीन सरकारला हस्तांतरित करणे बंधनकारक असते. या कायद्यातील तरतुदी पासून सूट मिळविण्यासाठी मिरा भाईंदर शहरातील काही आरोपी विकासकांनी बोगस प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या चौकशीत सुमारे २३,३४० चौरस मीटर इतकी जमीनीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे.

जून 2021 मध्ये, ULC प्रकरणाच्या तपासादरम्यान ठाणे पोलिसांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) मीरा-भाईंदरचे माजी नगर नियोजक आणि आर्किटेक्टसह तीन जणांना अटक केली होती.

या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्याशी संपर्क केला असता कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.