Home Blog Page 279

ठाण्यात साडेचार लाखाचे गोमांस टेम्पोसह जप्त; दोघांना अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी तालुक्यातील मुबंई-नाशिक महामार्गावरील राजणोली नाका येथील पुलावरून उतरणाऱ्या मार्गावर कोनगाव पोलिसांनी रात्रीच्या सुमारास नाकाबंदी केली होती. यावेळी एका टेम्पोत (एम. एच. १२-एल. टी. ४४५२) यामध्ये गोमांस वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदीमध्ये प्रत्येक वाहन तपासणी करीत असतानाच टेम्पोच्या आतमध्ये पोलिसांनी पाहणी केली असता, जनावराचे मांस असल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे पोलिसांनी पशु वैद्यकीय अधिकारी यांना घटनस्थळी बोलवून मांसाच्या तुकड्याची तपासणी केली असता गोवंश जनावराची कत्तल केलेले मांस असल्याचे निष्पन्न झाले.

सोलापूरवरून केली जात होती मांसाची वाहतूक

पिकअप टेम्पोतुनच सोलापूरवरून इतर शहरात विक्रीसाठी जाणारे साडे चार लाख रुपयांचे गोमांस कोनगाव पोलिसांनी जप्त करून चालकासह दोघांना अटक केली आहे. मंजूर गफूर मुल्ला (वय ३३, रा. शनिवार पेठ, सोलापूर) सैफन गफूर शेख (वय २२, रा. मल्लिकाजुर्ननगर, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी बेकायदा जनावरांचे मांस वाहतूक केल्याप्रकरणी चालकासह त्याच्या साथीदारावर कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी दिली आहे.१६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्तगोवंश मांसाची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो ज्याची किंमत १२ लाख आणि टेम्पोतील ४ लाख ५० हजार रुपये किंमतीचे गोमांस असा एकूण १६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे मार्च २०१५ पासून गोमांस विक्रीसाठी बंदी असूनही आजही भिवंडी, कल्याण, मुंब्रा, ठाणे व मुंबई या भागात हे गोमांस विक्रीसाठी ट्रक, टेम्पोमधून इतर जिल्ह्यासह परराज्यात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.

राज्य शासनाने गाय तसेच गोवंश हत्येला बंदी घातली असतांनाही चारचाकी वाहनातून चोरट्या मार्गाने गोवंश मांसाची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची बाब भिवंडीत वारंवार समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना कठोर शिक्षेची तरदूत करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून केली जात आहे.

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोरपणे नियोजन करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जिल्ह्यांनी ऑक्सिजन प्लांट्सची तात्काळ उभारणी करावी, आवश्यक औषधांचा साठा करावा दुर्बलांसाठी जाहीर पॅकेजचे लाभ विनाविलंब द्यावेत..

कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा पुरेल याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या आहेत. आज ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी,पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.

राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्ण संख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो.

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे पण त्यासाठी पुरेश्या प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे मात्र पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे.

ऑक्सिजन प्लांट उभारणीत अजिबात दिरंगाई नको..

आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत, नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे व यासाठी कोणतेही कारण चालणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्ह्णून आवश्यक त्या औषधांचा पुरेसा साठा आत्तापासून करून ठेवा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठी उपचार पद्धतीबाबत टास्क फोर्सचे डॉक्टर्स कायम उपलब्ध आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टर्सना मनमोकळेपणाने विचारणे गरजेचे आहे. येणाऱ्या पावसाळ्यातल्या आपत्ती लक्षात घेता आवश्यक औषधी व संसाधनांचा साठा जिल्ह्यातील अगदी कानाकोपऱ्यात होईल याचेही चांगले नियोजन करावे.

इतर राज्यांतून येणाऱ्या मजुरांची नोंद ठेवा..

गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत परतले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणेकरून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत ठरवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योगधंदे थांबू नयेत..

कोणत्याही परिस्थितीत आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहावेत, अर्थचक्राला झालं बसू नये मात्र त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या केली आहे का ते पाहण्याचे व त्याचे नियोजन आत्तापासून करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर, टास्क फोर्सचे डॉक्टर संजय ओक, शशांक जोशी, राहुल पंडित, डॉ.तात्याराव लहाने यांनी देखील आपले विचार मांडले. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे तसेच विशेषतः रुग्णालयांतील अग्नी सुरक्षा, बांधकाम आणि विद्युत उपकरणांचे ऑडिट तात्काळ पूर्ण करून अहवाल देण्याचे निर्देश दिले. प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास आणि प्रधान सचिव विजय सौरव यांनी देखील बैठकीत सद्यस्थितीची माहिती दिली

मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यांची देखील या बैठकीस उपस्थिती होती.

खासगी डॉक्टरांची पालिकेच्या सेवेकडे पाठ; कारवाईच्या नोटिसांनंतरही महाभरतीला अल्प प्रतिसाद

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाचे वाढते रुग्ण, त्यात अपुरी आरोग्य यंत्रणा यामुळे पालिकेने खासगी सेवेतील डॉक्टरांना पालिकेच्या सेवेत पंधरा-पंधरा दिवसांसाठी रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र डॉक्टरांनी याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पालिकेने आता या डॉक्टरांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.

दुसरीकडे पालिकेनेदेखील आरोग्य विभागात डॉक्टर्स आणि परिचारिकांची भरती सुरू केली असून त्यालादेखील म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. वसई-विरार शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत आहे. दिवसाला ९०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने कोरोना उपचार केंद्रे वाढविण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ महापालिकेकडे नाही. त्यामुळे पालिकेने खासगी डॉक्टरांना १५ दिवसांसाठी सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. मागील वर्षीदेखील पालिकेने हा प्रयोग राबवला होता. मात्र यंदा पालिकेच्या या आदेशाकडे खासगी डॉक्टरांनी पाठ फिरवली आहे.

जे खासगी सेवेतील डॉक्टर पालिकेला सेवा देणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. अशा नोटिसा डॉक्टरांना पाठविण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. आरोग्य विभाग अधिक बळकट करण्यासाठी पालिकेने एम.बी.बी.एस., बी.एच.एम.एस., बी.एम.एस. डॉक्टर्स तसेच परिचारिका, आरोग्य सेविका यांच्या पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
थेट मुलाखत घेऊन तात्काळ सेवेत रुजू केले जाणार आहे. यासाठी मुलाखती सुरू आहेत. मात्र त्यालादेखील फारसा प्रतिसाद मिळत नाही. पालिकेकडून दिले जाणारे मानधन कमी आहे तसेच कोरोना काळात धोका नको म्हणून डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी येण्यास उत्सुक नसल्याचे सांगण्यात येते.

सेवानिवृत्त वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार..

सेवानिवृत्त वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा वरिष्ठांच्या हस्ते सत्कार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली वाहतूक उपविभागात नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक/ASI श्री. सदाशिव जाना हरपाले हे आज रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी आतापर्यंत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे, हिल लाईन पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, नारपोली पोलीस ठाणे व डोंबिवली वाहतूक शाखा येथे उत्कृष्ठ सेवा बजावली आहे.

त्या निमित्ताने मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण वाहतूक विभाग श्री. उमेश माने पाटील साहेब यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. पोलीस निरीक्षक श्री उमेश गित्ते, डोंबिवली वाहतूक उपविभाग यांनी त्यांच्या ३६ वर्षे पोलीस खात्याच्या उत्कृष्ठ सेवेबद्दल डोंबिवली वाहतूक विभागाच्या वतीने आभार मानले व त्यांना पुढील निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

सराईत गुन्हेगाराकडून ४ लाख किमतीचा २७ किलो गांजा हस्तगत; महात्मा फुले पोलिसांची दमदार कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील बऱ्याच गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी रहमत युसुफ पठाण यास सापळा लावुन अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून २७.४०५ किलो ग्रॅम वजनाचा ४ लाख ५ हजार किंमतीचा गांजा हस्तगत केला आहे.

आरोपी पठाण याला राहत्या घरातून २४ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. अनेक दिवसापासून पोलीस पठान याच्या मागावर होते, पठाण हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती एका गुप्तचराकडून महात्मा फुले पोलीसांना मिळाली. पठाण याच्या राहत्या घराजवळ सापळा रचत मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात आली. यावेळी त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर घरातुन एकुण २७.४०५ किलो वजानाचा ₹ ४ लाख किमतीचा गांजा (अंमलीपदार्थ) हस्तगत करण्यात आला आहे.

पठाण याच्या विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने शुक्रवार ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र त्याची २९ एप्रिल रोजी कोव्हीड-१९ अॅन्टीजेन चाचणी पॉझीटीव्ह आल्याने गुरुवारी २९ एप्रिल रोजी त्यास पुढील उपचाराकरीता सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर आरोपी औषधोपचार करून आल्यानंतर महात्मा फुले पोलीस ठाण्याकडुन ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, वपोनि नारायण बानकर, पो.नि.(गुन्हे) संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपक सरोदे, सपोनि प्रकाश पाटील, पोहवा भालेराव, निकाळे, पोना भोईर, भालेराव, चौधरी, ठिकेकर, जाधव, पोशि हासे, मधाळे, मपोना गरूड यांनी केली आहे.