Home Blog Page 282

रेमडेसिवीर इंजेक्शन काळया बाजाराने विक्री करणाऱ्या महिलेस अटक

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी मुंबई येथे रेमडेसिवीर इंजेक्शन काळया बाजाराने विक्री करणाऱ्या एका महिलेस एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे की, पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून पामबीच रोड, वंडरवुड फर्निचर मॉल समोर फुटपाथवर, एपीएमसी सेक्टर २६, वाशी, नवी मुंबई येथे सापळा रचला असता सदर महिला रेमडेसिवीर इंजेक्शनचे २ नग हे बेकायदेशीररीत्या अवैध मार्गाने मिळवून कोणताही परवाना नसताना छापील किंमती पेक्षा जास्त दराने तसेच डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन व कोविड तपासणी अहवालाशिवाय अधिक किंमतीने बेकायदेशीररीत्या विक्री करत असताना मिळून आल्याने सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली.

सदर महिलेकडून ४ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

महत्वाची बातमी! आता रेम्डीशिवर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करण्याची गरज नाही!

महत्वाची बातमी! आता रेम्डीशिवर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना धावपळ करण्याची गरज नाही!

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: अवधूत सावंत

राज्य सरकारच्या नियमानुसार राज्यातील प्रत्येक कोव्हिडं रुग्णालय (सरकारी आणि खाजगी ) जिथे आपले रुग्ण ऍडमिट आहेत त्यांच्या नातेवाईकांनी रेम्डीशिवर इंजेक्शन मिळवण्यासाठी आता गोंधळून घाबरून जाण्याची गरज नाही.

इंजेक्शन मिळवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

१. आपल्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

२. जिल्हाधिकारी कक्षातून सगळ्या सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलला Annexure A & B असे फॉर्म मिळालेले आहेत.

३. त्यानुसार आपले हॉस्पिटल किंवा आपले Treating Doctor आपल्या पेशंटच्या चालू कंडिशन वरून नक्की किती रेम्डीशिवर लागतील हे ठरवून आपल्याकडून केवळ Annexure B हा फॉर्म भरून घेतील (Annexure A हॉस्पिटल स्वतः भरेल).

४. असे करून Annexure A आणि B हे दोन्ही भरलेले फॉर्म हॉस्पिटल स्टाफ स्वतः ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्याला इंजेक्शन मिळावे ह्या हेतूने आपल्या इतर कागदपत्रांसाहित (कॉविड रिपोर्ट, HRCT Report, हॉस्पिटलचे प्रिस्क्रिपशन, आधार कार्ड इ.) जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्याची व्यवस्था करेल इतकंच नाही तर याचा follow up सुद्धा हॉस्पिटल स्टाफ यांच्याकडेच असेल.

५. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकदा आपली इंजेक्शनची request आल्यावर ते 60% प्रमाणे आपला कोटा FDA अधिकारी आणि रेम्डीशिवरचे अधिकृत विक्रेता यांचे मार्फत आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था करतात.

६. आणि म्हणूनच आपण कोणीही त्रास घेऊ नका जो काही त्रास घ्यायचा आहे तो हॉस्पिटलचा स्टाफ घेईल.

७. ईथुन पुढे जर हॉस्पिटलमधून तुम्हाला रेम्डीशिवर आणण्यासाठी त्रास देत असतील तर खाली दिलेल्या फोन नंबर वरून त्यांची लेखी आणि तोंडी तक्रार जिल्हाधिकारी यांना करावी.

८. शेवटचं,
आता या सगळ्यात आपल्याला जर काही करायचे असेल तर आपले पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी ह्यांच्या नाकात दम आनेपर्यंत त्यांचा Followup घ्या, त्याना सळो की पळो करून सोडा, लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांना जितक पळवाल जितका फोन करून, मेल करून, msg करून त्रास द्याल तितके ते तुमच्यासाठी सजग राहून सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि जितके तुम्ही गाफील रहाल तितके ते गाफील राहतील बाकी निर्णय तुमचा आहे.

माहितीसाठी / तक्रारीसाठी हेल्पलाईन खालीलप्रमाणे :

१. मुंबई जिल्हा – 022-22664232

२. मुंबई उपनगर : – 022-26556799 , 26556806

३. ठाणे जिल्हा : – 022-25301740 022-22027990

४. रायगड जिल्हा : – 02141-222118 02141-222097

रेमडेसिवीरचा इंजेक्शन चा पुरवठा राज्यात वाढला; मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार!

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हाईल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हाईल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. यात म्हटले आहे की, २१ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिवीर इंजेक्शनच्या व्हाईल्स केंद्र पुरविणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित ‘देशीदारु’ ची तस्करी करणार्‍या दोघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना काळात गेल्या वर्षभरापासून जगाला विळखा घालणार्‍या कोविड नावाच्या महामारीने कोट्यावधी लोकांना जायबंदी करीत लाखोंचे जीवही घेतले आहेत. आजही या महामारीच्या झपाट्यात येवून अनेकांना रुग्णालयात जागा नसूनही प्रतीक्षेत राहून दाखल व्हावे लागत आहे. वर्षभरापासून सुरु असलेल्या या भयानक प्रकाराने जगातील माणूसकीचेही दर्शन घडले आणि अमानुषतेचेही. या संपूर्ण काळात आरोग्य यंत्रणांनी केलेल्या कामाला तोडच नाही. मात्र अलिकडच्या काळातील काही घटनांनी या क्षेत्रातही अमानवी प्रवृत्तींचा शिरकाव झाल्याचे दाखले मिळत असतांनाच चक्क आता रुग्णवाहिकेतून सायरन वाजवित दारु तस्करीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी एका रुग्णवाहिकेसह दोघांना ताब्यात घेतले असून जवळपास पाच खोके देशी बनावटीच्या दारुसह २ लाख २३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सध्या जिल्ह्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी जागोजागी तपासणी नाके उभारले आहेत. त्याद्वारे मास्क नसलेल्या, कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासह संशयास्पदरित्या हालचाली असलेल्या वाहनांची कसून तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार बसस्थानकाजवळील तपासणी नाक्यावर आज सकाळपासूनच पोलिसांकडून नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी सुरु होती. यावेळी तेथे पोलिसांनी अडवलेल्या वाहनांची गर्दीही झाल्याचे चित्र होते. अशातच नाशिककडील रस्त्याच्या बाजूने भरधाव वेगाने सायरन वाजवत एक रुग्णवाहिका आली. या रस्त्याला रुग्णवाहिका तशी नवीन नाही. मात्र दूरवरुन सायरनचा आवाज आला नाही, मात्र सदरचे वाहन दृष्टीपथात येताच सायरन का वाजला ? असा प्रश्‍न यावेळी तपासणी नाक्यावर उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना पडला.

त्यामुळे सदरची रुग्णवाहिका तपासणी नाक्यावर पोहोचण्या आधीपासूनच त्याकडे त्यांचे लक्ष खिळले. सदरचे वाहन सायरन वाजवित भरधाव वेगाने तपासणी नाक्याजवळ येताच पो.नि.देशमुख यांनी रुग्णवाहिकेच्या मागील भागावर लक्ष्य केंद्रीत केले असता मागील बाजूस कोणीही रुग्ण नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरुन त्यांनी सदर वाहनाला थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे आपण पकडले जातो की काय या भितीने चालकाने नाक्यापासून काही अंतरावर पुढे जात नवीन नगर रस्त्यावर आपली रुग्णवाहिका उभी केली व तो पोलिसांकडे चालत गेला. यावेळी पोलिसांनी रुग्ण नसतांना सायरन का वाजवतोय? असा सवाल केल्यानंतर तो काहीसा गोंधळला आणि येथेच पो.नि.देशमुख यांनी त्याला हेरला.

त्याच्या रुग्णवाहिकेची तपासणी करण्याचा आदेश मिळताच नाक्यावरील चौघांनी त्या वाहनाकडे धाव घेत त्याचा दरवाजा उघडताच पोलिसांनीही तोंडात बोट घातले. मारुती ओमनी कंपनीच्या या वाहनात ज्या ठिकाणी रुग्ण ठेवला जातो त्या संपूर्ण भागात पद्धतशीरपणे थोडी नसून तब्बल पाच खोके देशी दारु पोलिसांना आढळली. याबाबत त्याच्यासह वाहनात बसलेल्या त्या जोडीदाराकडे चौकशी केली असता ते उडवाउडवी करु लागल्याने त्या दोघांनाही ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

यावेळी सदरच्या रुग्णवाहिकेतून तब्बल २३ हजार रुपये किंमतीची देशी बनावटीची दारु जप्त करीत पोलिसांनी चालक विजय खंडू फड (वय ४२, रा.साईदर्शन कॉलनी, मालदाड रोड) व त्याचा साथीदार कैलास छबुराव नागरे (वय ४९, रा.शेडगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. सदरची देशीदारु शेडगाव येथे घेवून जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. या कारवाईत पो.नि.देशमुख यांच्यासह पो.कॉ.सचिन उगले, प्रमोद गाडेकर व सलिम शेख यांचा सहभाग होता.

गेल्या वर्षभराच्या काळात तालुक्यातील असंख्य रुग्णवाहिका चालकांनी मानवतेची सर्वोच्च सेवा बजावली आहे, आजही ही मंडळी दिवसरात्र रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी आपले जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावित आहेत. मात्र या क्षेत्रातही वेगळ्या प्रवृत्तीच्या माणसांचा शिरकाव झाल्याचे आजच्या घटनेतून समोर आले असून रुग्ण असल्याचा बनाव करुन चक्क रुग्णवाहिकेतून दारु वाहण्याचे बेकायदा उद्योग सुरु आहेत. या प्रकाराने पोलिसांचीही जबाबदारी वाढली असून अशा मोजक्या प्रवृत्तींमुळे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍या अन्य रुग्णवाहिकांच्या चालकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

अतिदक्षता विभाग निष्पाप १३ जणांचा जीव घेत ठरला अत्यंत धोकादायक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विरार मध्ये १३ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू

कोरोनाच्या महाभयंकर संकटापासून वाचण्यासाठी जग आटोकाट प्रयत्न करत असताना आशेचा एकमेव किरण असणाऱ्या रुग्णालयांतच असे प्रकार घडू लागतात तेव्हा अतिदक्षता विभागच अतिधोकादायक सिद्ध होतोय.
घटना काल मध्यरात्रीनंतरची आहे. रात्री ०३:१३ वाजताच्या सुमारास तिरुपती नगर, बंजारा हॉटेलच्या मागे, विरार(प) येथे ‘विजय वल्लभ हॉस्पिटल’ मध्ये (तळ+४) दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात आग लागली होती. घटनास्थळी विरार अग्निशमन दलाचे ३-फायर ब्रिगेड वाहन उपस्थित झाले. हि आग दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून पहाटे ०५:२० वा. सुमारास विझवली आहे.

दुर्दैव म्हणजे सदर घटनेत १३ रुग्णांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय तर ५ ते ६ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.

ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

सदर घटनेत मृत झालेल्या व्यक्तीची माहिती पुढीलप्रमाणे:-
१) श्रीमती. उमा सुरेश कंगुटकर, (स्त्री/वय वर्ष ६३)
२) श्री. निलेश भोईर, (पु/वय वर्ष ३५)
३) श्री. पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव, (पु/वय वर्ष ६८)
४) श्रीमती. रजनी कडू, (स्त्री/वय वर्ष ६०)
५) श्री. नरेंद्र शंकर शिंदे (पु/वय वर्ष ५८)
६) श्री. जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (पु/वय वर्ष ६३)
७) श्री. कुमार किशोर दोशी (पु/वय वर्ष ४५)
८) श्री. रमेश उपयान (पु/वय वर्ष ५५)
९) श्री. प्रवीण शिवलाल गौडा (पु/वय वर्ष ६५)
१०) कु. अमेय राजेश राऊत (पु/वय वर्ष २३)
११) श्रीमती. शमा अरुण म्हात्रे (स्त्री/वय वर्ष ४८)
१२) श्रीमती. सुवर्णा पितळे (स्त्री/वय वर्ष ६४)
१३) श्रीमती. सुप्रिया देशमुख (स्त्री/वय वर्ष ४३)