Home Blog Page 294

१० वी १२ वी बोर्डाच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार! – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

ठळक वैशिष्ट्ये:-

परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा..

कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही…
लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ…

प्रतिनिधी, अवधुत सावंत(मुंबई) : विद्यार्थ्यांची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत गायकवाड बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, इयत्ता १० वी ची लेखी परीक्षा यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीमध्ये तर इ. १२ वी ची परीक्षा दि.२३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. कोविड परिस्थितीमुळे लेखी परीक्षेचे त्याच शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येणार असून पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाणे सोयीचे होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतच्या शाळेतील परीक्षा उपकेंद्रामध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

विशेष परीक्षा

एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी आदी कारणांमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील.

लेखी परीक्षेसाठी मिळणार वाढीव वेळ

दरवर्षी ८० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी ३ तास वेळ दिला जात असे. परंतू यावर्षी विद्यार्थ्याचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. तर ४० व ५० गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी २० मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.

प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी गृहपाठ

इ. १० वी च्या प्रात्यक्षिक परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात परंतु या वर्षी कोविड-१९ परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पद्धतीने घेण्यात येतील. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पद्धत २१ मे ते १० जून २०२१ या कालावधीत सादर करावे लागणार आहे. इ. १२ वी च्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि. २२ मे २०२१ ते १० जून २०२१ या कालावधीत होतील. कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे १२ वी च्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून ५ ते ६ प्रात्यक्षिकांवरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भातील माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.

विशिष्ट परिस्थितीत गृहपाठ सादर करण्यासाठी मुदतवाढ

कला/वाणिज्य/व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेनंतर १५ दिवसात गृहपाठ सादर करावेत. इ.१० वी व १२ वी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा गृहपाठ सादर करण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल. परीक्षा मंडळामार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

कोविड-१९ बाबत सुरक्षात्मक उपाययोजना

परीक्षेसंदर्भात शाळा/कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबींसाठी स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येतील. कोविड-१९ बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. कोणताही परीक्षार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची राज्य शासनाने दक्षता घेतली आहे. परीक्षांबाबत अनेक वेळा विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होताना आढळून येत आहे. त्यामुळे घाबरुन न जाता विद्यार्थी आणि पालकांनी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजावी, असे आवाहनही गायकवाड यांनी यावेळी केले.

मनसेच्या महिलाध्यक्षा अनु पाटीलसह अनेक कार्यकत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मिरा भाईंदर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ठाणे-पालघर प्रभारी तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मनसेच्या महिलाध्यक्षां अनु पाटीलसह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.

मीरा-भाईंदर शहारामध्ये माजी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांच्या ठिकाणी अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी आता मोठ्या प्रमाणात संघटन बांधणीस सुरुवात केली असून या भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि नवनवीन कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून घेण्याचे अभियान त्यांनी सुरु केले आहे.

मनसेच्या मीरा-भाईंदर महिलाध्यक्षा अनु पाटील, शिवसेनेचे राजू शहा, कल्पेश शहा; काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गणेश लांबे, काँग्रेसच्या आदिवासी सेलचे प्रमोद कोल्हे; काँग्रेसचे शहर सचिव संजय सिंह, काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष आनंद गुप्ता आणि सिनेक्षेत्रातील स्थळ दिग्दर्शक रोहित गुप्ता यांनी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी मीरा भाईंदरचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार विभागाचे सरचिटणीस डॉ. ओमकार माळी , प्रदेश प्रतिनिधि एडवोकेट विक्रम तारे पाटिल, सुरेश पंढरे, गुलाम नबी फारुकी आदि उपस्थित होते.

एकीकडे इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जरी सामील होत असले तरी पक्षातंर्गत गटबाजी मात्र जोरात सुरु आहे. माजी जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांच्या समर्थकांचा एक गट अंकुश मालुसरे यांना जिल्हाध्यक्ष मानायलाच तयार नाहीत आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरेच्या विरोधात जोरदार मोर्चा उघडला असून अगदी शरद पवार ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्याच बरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि स्थानिक वर्तमान पत्रातून देखील त्यांच्या विरोधात दररोज काहींना काही लिहिले जात आहे.

अशा परिस्थितीत नवीन जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे इतर पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्या नविन कार्यकर्त्यांना कशा प्रकारे सामावून घेतील? आणि त्यांना पदं देताना कसा न्याय देऊ शकतील? यावरूनच त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाची खरी कसोटी ठरणार आहे.

२४ तासात गुन्हा उलगडून कल्याण क्राईम च्या युनिट-३ च्या गुन्हे शाखेला मोठे यश

प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) – बारबालेची गळा दाबून हत्या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या बातमीला २४ तास उलटत नाही तोवर कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ च्या पोलिसांना आरोपीची गचांडी गुंडाळण्यात घावघवीत यश मिळाले आहे.

सविस्तर बातमी अशी की विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गु.रजि. नंबर ५६/२०२१ भादंविक ३०२, ४५२ प्रमाणे गुन्ह्यातील महिला नामे श्रीमती आरती अरुण सकपाळ (वय ४६ वर्षे ) राहणार बी/२, कुमार अपार्टमेंट, कोपर रोड, डोंबिवली (प) हिस तिच्या राहते घरी अज्ञात आरोपी याने अज्ञात कारणासाठी जीवे ठार मारले म्हणून आज दि.२०.०३.२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रस्तुत गुन्ह्याचा गुन्हे शाखा, युनिट-३ कल्याण यांचेकडून समांतर तपास करीत असताना गुन्ह्यातील अज्ञात आरोपी याचा शोध घेणे कामी घटनास्थळाला भेट देऊन व आजूबाजूच्या परिसरात तपास करत असताना साक्षीदार, तसेच मयत महिला पूर्वी काम करत असलेल्या ‘रुचिरा बार’ येथील साक्षीदार यांच्याकडे सखोल विचारपूस व चौकशी केली असता ‘रुचिरा बार’ येथे काम करणारा श्रीनिवास मडीवाल हा मयत आरती सकपाळ हिच्या परिचयाचा असून तो बारच्या स्टाफरूम मध्ये राहण्यास असल्याचे समजले. त्याप्रमाणे लागलीच रुचिरा बार येथील स्टाफरुम मध्ये जाऊन खात्री करून बरमालक व इतर स्टाफ यांच्याकडे विचारपूस करून संशयित इसम श्रीनिवास मडीवाल हा घटनेच्या रात्री तो कोठेतरी बाहेर असल्याची गुप्तरीत्या माहिती मिळाल्याने त्याआधारे त्याच्यावरच दाट संशय बळावला. त्यावरून त्याचा फोटो प्राप्त करून मयत आरती सकपाळ व श्रीनिवास मडीवाल यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित श्रीनिवास मडीवाल याचा गुन्हे शाखा युनिट -३ च्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कल्याण स्टेशन परिसरात कसोशीने शोध घेतला असता फोटोशी जुळता व्यक्ती दिसला असता त्याला हटकले असता त्यास त्याचे नाव, पत्ता विचारले असता त्याने आपले नाव श्रीनिवास बसवा मडीवाल (वय ३४ वर्षे), राहणार रुचिरा बारच्या स्टाफरुम मध्ये, कल्याण स्टेशन रोड, कल्याण (प) मूळचा राहणार १/३६७, थोमबाटू, ओलागुड्डे शहर, जिल्हा: उडपी, राज्य: कर्नाटक असे सांगताच पोलिसांनी त्याला आपला खाक्या दाखवून हिसका देताच सदरचा गुन्हा त्याने केला असल्याचा कबुलीजबाब पोलीसांना दिल्याने त्यानेच आरती सकपाळ चा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

श्रीनिवास मडीवाल (वय ३४ वर्ष) यांस गुन्ह्याच्या पुढील तपास कामी व पुढील कायदेशीर कारवाई करिता विष्णूनगर पोलीस ठाणे येथे हजार करण्यात आले आहे.

सदर गुन्हा २४ तासांत उघडकीस आणण्याची यशस्वी कामगिरी मा. पोलीस उपायुक्त श्री. विवेक फाणसळकर, मा. सह पोलीस आयुक्त श्री. सुरेश मेकला, मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संजय येनपुरे, मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. लक्ष्मीकांत पाटील, मा. सह पोलीस आयुक्त (गुन्हे शोध -१) श्री. किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ चे वापोनि श्री.संजू जॉन, सपोनि भूषण एम. दायमा, उपनिरीक्षक नितीन मुदगुन, उपनिरीक्षक शरद पंजे, उपनिरीक्षक मारुती दिघे, उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहा. उपनिरीक्षक साळुंखे, पोहवा राजेंद्र घोलप, दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, विलास मालशेटे, निवृत्ती थेरे सचिन साळवी, पोना राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, केशव निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा, पोशि अजितसिंग रजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी व महिला पोलीस शिपाई स्वाती काळे यांनी केलेली आहे..

१७ वर्षांपासून गुन्ह्यातील फरार असलेला आरोपीच्या काशिमीरा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी: अवधुत सावंत (ठाणे) : गेल्या १७ वर्षांपासून एका गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा कक्षाच्या काशिमीरा पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे की, मिरारोड पूर्व येथे एका अनोळखी इसमानी दोन वॉचमनना चाकू व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून शटरचे कुलूप तोडून दुकानातील लोखंडी तिजोरी तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ₹. २९,६३,४७८ किंमतीचा माल चोरून नेला असल्याबाबत मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान, सदर गुन्हयातील पाहिजे असलेला फरार आरोपी भिवंडी येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट काशिमीरा पोलीस यांना मिळाली, सदर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तपास करून सदर आरोपीस सापळा रचून अटक केली आहे व पुढील तपास सुरू आहे असे काशिमीरा पोलीस यांच्या कडून सांगण्यात आले आहे.

हा आरोपी तब्बल १७ वर्षांपासून फरार होता आणि पोलीस सतत अटक करण्याचा प्रयत्न करीत होते अखेर हा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे.

आताची मोठी बातमी: कार्यालयांमध्ये केवळ ५० टक्केच उपस्थिती, शासनाचे आदेश

ठळक मुद्दे :-

तोंडावर मास्क असल्याशिवाय कुठल्याही आस्थापनामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही

कार्यालयाच्या प्रवेशद्वारात तापमान तपासण्यात येईल, तसेच प्रत्येक कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आलं आहे

अवधुत सावंत, प्रतिनिधी : राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगिन्स अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश नव्यानेच निर्गमित केले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभागात व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा खबरदारीसाठी कडक उपाययोजना आखण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

राज्य शासनाने परिपत्र काढून नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाहीत असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दि.१७ मार्च रोजी यासंदर्भात परीपत्रक काढलं आहे. त्यामध्ये, कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तोंडावर मास्क असल्याशिवाय कुठल्याही आस्थापनामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही.

कार्यालयाच्या प्रवेशद्वारा तापमान तपासण्यात येईल, तसेच प्रत्येक कार्यालयात सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आलं आहे. शासनाने काढलेला हा आदेश ३१ मार्च २०२१ पर्यंत अंमलात येणार असून त्यानंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही या आदेशात म्हटले आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या सहीने हा आदेश पारित करण्यात आला आहे.

राज्यात दिवसभरात 25 हजार रुग्णांची वाढ

मुंबईत गुरुवारी २ हजार ८७७ नवे रुग्ण आढळून आले असून, ८ जणांचा मृत्यू झाला. तर राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. राज्यात गुरुवारी २५,८३३ नवीन रुग्ण सापडले. मुंबईतही दिवसभरात अडीच हजारांहून अधिक रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक २४,८९६ रुग्ण एक दिवसात सापडले होते. त्यामुळे राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे असेही नमूद करण्यात आले आहे.