Home Blog Page 30

पाण्यासाठी बिल्डर आणि प्रशासनाला इशारा देत डोंबिवली येथील ‘रिजन्सी अनंतम्’ च्या रहिवाशांचे आंदोलन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील २७ गावांमध्ये पाणी भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे याच २७ गावांत असलेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील ‘रिजन्सी अनंतम्’ मधील रहिवाशांनी रविवारी तेथील बिल्डरच्या कार्यालयातच ठिय्या मांडला. पाण्याचा प्रश्न सोडविला नाही तर आंदोलन आणखी चिघळणार असल्याचे आंदोलनाला बसलेल्या रहिवाशांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

‘रिजेन्सी अनंतम्’ मधील मागील आठ-दहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद असल्याने पाण्यासाठी तेथील रहिवासी त्रस्त आणि हैराण झाले आहेत. बिल्डर आणि प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे आवश्यक तितका पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे रविवारी सर्व रहिवाशांनी बिल्डरच्या ऑफीसमध्ये मोर्चा नेला. या रहिवाशांनी पाण्यासाठी टाहो फोडत बिल्डरला धारेवर धरले. रहिवाशांची बिल्डरने भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रहिवाशांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले. मात्र अशी परिस्थिती यापुढे निर्माण झाल्यास त्यानंतर होणाऱ्या परिणामांना बिल्डरसह महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा इशारा या रहिवाशांनी दिला.

 

अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोघांच्या बाजारपेठ पोलीसांनी आवळल्या मुसक्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सविस्तर वृत्त असे की दिवसेंदिवस अंमली पदार्थाची बेकायदेशीर रित्या खरेदी विक्री नशेच्या बाजारासाठी लपून छपून होत असल्याच्या बातम्या दर दिवशी ऐकायला मिळत होत्या. अशातच नशा करून नवीन पिढी नशेत वाहून खराब होत असताना, नशेच्या वस्तू विकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळणे, त्यांच्यावर अंकुश ठेवणे अतीशय गरजेचे आणि चॅलेंजिंग काम झाले होते. म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, यांनी सदर जबाबदारी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन स्टाफ यांच्यावर सोपवली होती.

दिनांक ०९.०५.२०२३ रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिराग हॉटेलच्या जवळ, रेतीबंदर कडे जाणाऱ्या पूला खाली दोघेजण ‘गांजा’ या अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची बातमी डिटेक्शन स्टाफ मधील पोलीस हवालदार सचिन साळवी यांना मिळाली. सदरची माहिती ताबडतोब वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चिराग हॉटेल’च्या बाजूच्या गल्लीत, कल्याण येथे डिटेक्शन इन्चार्ज सपोनि अरुण घोलप यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार सचिन साळवी, पावशे, प्रेम बागुल, बाविस्कर, पोलीस नाईक रामदास फड यांनी सापळा रचला.

बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार दोन इसम त्यांच्याकडील ऍविएटर मोटरसायकलने येत असताना दिसताच, त्यांना पळून जाण्यास वाव न देता डिटेक्शन पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्या गाडीची व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील गाडीच्या डिक्कीत सहा किलो गांजा असा अंमली पदार्थ मिळून आला असून त्यांची नावे करीम उर्फ बाबू शब्बीर शेख (वय ३९ वर्षे) राहणार अहिल्याबाई चौक, पटेल वाडी, कल्याण (पश्चिम), सीमाब कईम शेख उर्फ गुड्डू चपाती (वय ३४ वर्षे) राहणार – मौलवी कंपाउंड जाहीर मोलवीची चाळ, रेतीबंदर कल्याण (पश्चिम).
अशी असून त्यांच्याकडून एकूण सहा किलो गांजा हा अमली पदार्थ एक ऍविएटर मोटार गाडी, दोन मोबाईल फोन असा एकूण १,८०,०००/- रुपये कींमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर गांजा हा अमली पदार्थ कोठून आणला व कोणाला देणार होते याचा पोलीस पुढील तपास करीत आहे.

सदरची कामगिरी वपोनि नरेंद्र पाटील, सपोनि अरुण घोलप, रूपवते, पोहवा सचिन साळवी, पावशे, प्रेम बागुल, बाविस्कर, पोना फड, दमयंती शेळके असे असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अरुण घोलप करीत आहेत.

खंबाळपाड्यातील भोईरवाडी तलावातील मृत मास्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण; साथीचे रोग पसरण्याची भिंती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत मास्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून सध्या राहावे लागत आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिंती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

खंबाळपाडा येथील तलावात गणपती आणि इतर देवतांचे विसर्जन नित्यनेमाने होत असते. आता उन्हाळ्यामुळे तलावातील पाणी आटले आहे. सदर तलावातील पाणी हिरवे झाले असून ते दूषित झाले असावे असा स्थानिक नागरिकांचा कयास आहे. असे असताना, अचानक आठ दिवसापासून येथे मासे मेल्यानंतर जी भयंकर दुर्गंधी येते तशी तलावाच्या आसपासची दुर्गंधी परिसरात पसरली असून त्याचा स्थानिक नागरिकांनी याबाबत शोध घेतला असता, या तलावातील मासे मृत अवस्थेत आढळल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे मृत मासे खाण्यासाठी परिसरातील भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या तलावातील पाणी उपसून साफसफाई करावी याकरिता कॉम्रेड काळू कोमास्कर आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र यावर कारवाई करण्याबाबत महापालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत “फ” प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील यांना विचारले असता, सदर खंबाळपाडा तलावातील मासे मृत झाल्याची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. तेथे दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी औषध फवारणी केली असल्याचेही सांगितले.

 

सरकार स्थिरतेच्या सुप्रीम निकालासाठी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात संकल्पपूर्ती व महाआरतीचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विद्यमान सरकार व शिवसेने संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सकारात्मक निर्णयानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव पंढरीनाथ पाटील यांनी केलेल्या संकल्पानुसार आज शुक्रवारी प्राचीन तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे संकल्पपूर्ती अभिषेक तसेच एका भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.+

यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, शिवसेना जिल्हा संघटक, माजी नगरसेवक तथा कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, कल्याण ग्रामीण सचिव बंडू पाटील, श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहन पाटील, उपसचिव अरुण पाटील, उपाध्यक्ष रतन म्हात्रे, सदस्य सुरेश पाटील, कल्याण तालुका संघटक अर्जुन पाटील, शिवसेना डोंबिवली उपशहर प्रमुख सुनील भोसले, उपशहर संघटक संतोष तळाशीकर, विभाग प्रमुख अमोल पाटील, उप-कार्यालय प्रमुख धर्मराज शिंदे, माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, प्रकाश माने, युवा सेनेचे जिल्हा पदाधिकारी योगेश म्हात्रे, रवी मट्या पाटील, रवी अंबो म्हात्रे, दिपाली स्वप्निल पाटील, उमेश पाटील, विभाग प्रमुख अनिल म्हात्रे, सचिन म्हात्रे, ऍड. स्वप्निल पंढरी पाटील, डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण क्षेत्रातील अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक बंधू भगिनी श्रद्धापूर्वक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे जागृत देवस्थान आहे. याचा सहा वेळा मला अनुभव आला होता. यंदा देखील मी केलेल्या संकल्पनुसार माझी इच्छा पूर्ण केली. म्हणून मी अभिषेकाचे आणि शिवसेनेच्या वतीने महाआरतीचे आयोजन केले होते असे पंढरीनाथ पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसैनिकांचा जल्लोष..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाचा गुरूवारी एकदाचा सोक्षमोक्ष लागलाच. सुप्रीम कोर्टाने निकाल जाहिर केल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करुन, पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

बुधवारपासून सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार धोक्याच्या उंबरठ्यावर उभे असल्याची, तसेच सरकार गडगडण्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिंदे समर्थक शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. गुरूवारी दुपारी सुप्रीम कोर्टाने निकाल जाहिर केल्यानंतर अस्वस्थ शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. राज्यातील सरकार स्थिर असल्याचे जाहीर होताच डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेत जमलेल्या शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. शहरप्रमुख राजेश मोरे, संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, सुनील मालणकर, आदी पदाधिकाऱ्यांसह शिंदे समर्थक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयासह “जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है”, आदी समर्थनाच्या घोषणा देऊन शिवसैनिकांकडून परिसर दणाणून सोडण्यात आला.