Home Blog Page 45

शब्दांचा सुकाळ असलेला हा राज्याचा अर्थसंकल्प – अजित पवार


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर झाला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेती क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. विरोधीपक्षाने राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राज्यात सध्या आर्थिक बेशिस्तीचे वातावरण आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी स्थगितीमुळे खर्च झालेला नाही. शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कर्ज काढून शेती केली जात आहे. शेतीचा उत्पादन खर्च निघत नाही अशी परिस्थिती आहे. अवकाळी पाऊस, महापूर अशा आपत्ती आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. सततच्या पावसाचे पैसै अजून मिळाले नाहीत. अशा काळात वर्षाला एका कुटुंबाला सहा हजार रुपये दिले आहेत. एका शेतकऱ्याला दिवसाला १७ रुपये मिळणार आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा असून त्यापेक्षा सोयाबीन, द्राक्षे, कांदे आणि अन्य शेतपिकाला दर द्या. दूरदृष्टीचा आभाव आणि स्वप्नांचे इमले, शब्दांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, या आधीचे दोन अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने मांडले होते. त्या वेळी कोरोनाचे संकट होते आणि केंद्र सरकार आमच्या बाजूचे नव्हते. २५ हजार कोटींहून अधिक जीएसटी थकबाकी होती. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. आमच्या काळातील योजना नामांतर करून जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे काजूचा हलवा आहे असे त्यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.

 

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजय झिंजे काँग्रेसच्या वाटेवर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजय झिंजे सध्या पक्षात नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. झिंजे गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत असून माजी आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांच्या अगदी जवळचे मानले जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंशी त्यांची जवळीक वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यातच काळे यांच्या पुढाकारातून माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरातांनी झिंजेंच्या निवासस्थानी भेट दिल्यामुळे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चेला शहरात उधाण आले आहे.

झिंजे हे माजी नगरसेवक आहेत. अहमदनगर शहर हॉकर्स संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष असून सुमारे अडीच हजारहून अधिक हॉकर्स या संघटनेचे सभासद आहे. राष्ट्रवादीचे ते ज्येष्ठ नेते आहेत. माजी मंत्री आमदार थोरात नुकतेच शहर दौऱ्यावर आले असता अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयातील शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर झिंजे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. यावेळी गप्पांचा फड रंगला होता. शहरातील अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

विशेष म्हणजे यावेळी झिंजे यांच्यावर मध्यंतरी झालेल्या भ्याड हल्ल्याची विचारपूस थोरात यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र भावना घडलेल्या प्रकाराबद्दल थोरातांच्या समोर व्यक्त करत घडलेला प्रकार हा निंदनीय असल्याची खंत व्यक्त केली होती. त्या प्रकरणापासून झिंजे हे राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये शहरात एकदाही दिसले नाहीत.

काळे यांच्या पुढाकारातून आमदार थोरात व झिंजे यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. संजय झिंजे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादीने तसेच आमदारांच्या वतीने अनेकांनी अनेक वेळा त्यांच्याशी संपर्क साधल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांनी त्याला अजिबात प्रतिसाद दिला नसून ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी सर्वत्र शक्यता वर्तवली जात आहे.

 

युवकांकडून विचार होणार का ? राज ठाकरेंचा परखड सवाल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणं साजरी हाेत आहे. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. मिरवणुकींची जाेरदार तयारी सुरू आहे. असे असताना काल ठाण्यामध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन झाला. राज ठाकरे यांनी यानिमित्ताने पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले हाेते. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांना आणि राज्यातील युवकांनी जयंती कशी साजरी करावी याबाबत खडेबोल सुनावले.

राज ठाकरे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांचे केवळ पुतळे उभारून काहीही हाेणार नाही. त्यांचे आचार-विचार आत्मसात केले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे आत्मचिंतन करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे. या महापुरूषांचे विचारांचे आचरण केले नाही, तर महाराष्ट्रासाठी येणारा काळ हा अत्यंत अवघड हाेईल”.

राज ठाकरे यांनी पुतळ्यांवरून राजकारण करणाऱ्यांना यावेळी फटकारले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाची यावेळी त्यांनी आठवण करून दिली. इंदू मिलमध्ये माेठी वास्तू उभी राहिली पाहिजे. इतकं माेठं ग्रंथालय तिथं उभे राहिले पाहिजे की, अख्ख्या जगाने त्या ठिकाणी ज्ञान मिळविण्यासाठी आले पाहिजे. नुसते पुतळे उभारून काहीएक हाेणार नाही. नाक्यानाक्यावर, चाैकात शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळे उभारून काय साध्य हाेणार आहे? महापुरूषांचे पुतळे उभारून आपल्या हाती काहीही लागणार नाही. या महापुरूषांचे आचार-विचार आता कृतीत उतरवून आणण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी येणाऱ्या या पिढीला हे करावेच लागेल, असं झाले नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल अवघड हाेईल, असेही ठाकरे म्हणाले.

 

राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव – अजित पवार


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जागतिक महिला दिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गंभीर विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधत सरकारने अशा नराधमांवर जरब बसवावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

प्रत्येक क्षेत्रात आपल्या माता-भगिनी, पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. समाजाच्या विकासात योगदान देत आहेत. या महिलांना अज्ञान, अंधश्रद्धा, पुरुषी गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वास जगविण्याचे काम राजमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महिलांना एक दिवसाचं झुकतं माप नको, तर रोज समान संधी मिळाली पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे. आपण जर असं करु शकलो, तर जागतिक महिला दिन सार्थकी लागला, असं म्हणता येईल, अशी भावना अजित पवारांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र हे प्रगतिशील विचारांचं, पुरोगामी राज्य आहे. देशाला, जगाला आदर्श ठरतील अशा कितीतरी सामाजिक सुधारणांची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे. महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, अधिकार याबाबत महाराष्ट्र कायम जागरुक राहिला आहे. देशातलं पहिलं स्वतंत्र महिला धोरण तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना, १९९४ मध्ये आपल्या राज्यात आणलं. त्याआधी १९९३ मध्ये राज्यात महिला व बालविकास हे स्वतंत्र खातं त्यांनी सुरु केलं. केंद्रात राष्ट्रीय महिला आयोग स्थापन झाल्यानंतर, देशातला पहिला राज्य महिला आयोग आपल्या राज्यानं स्थापन केला. आदरणीय शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. ते आरक्षण आता ५० टक्के केलं आहे. अशा प्रकारे महिलांना आरक्षण देणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. महिलांच्या सक्षमीकरणाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी महिला धोरणात सर्व स्तरातील महिलांच्या प्रश्नांचा समावेश असावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

 

आशियातल्या सर्वात मोठ्या ‘पिकल बॉल’ स्टेडियम चे मराठी अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते उद्घाटन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जागतिक दर्जाच्या कमी अवधित जगप्रसिद्ध झालेला खेळ कल्याण-डोंबिवलीकरांना देखील खेळता यावा आणि येत्या ऑलिंपिक मध्ये इथला खेळाडू असावा या उद्देशाने ‘डावखर फाउंडेशन’ आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ यांनी बेलग्रेव स्टेडियम सुरू केले आहे. ज्यामध्ये आठ कोर्ट चार पॅव्हीलिअन्स असणार आहेत. या स्टेडियमचे उदघाटन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

आशियातले सर्वात मोठे पिकल बॉल स्टेडियम हे डोंबवलीत असल्याचा मी एक डोंबिवलीकर म्हणून मला अभिमान आहे असे उद्गार अभिनेते भाऊ कदम यांनी यावेळी बोलताना काढले व डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांच्या सोबत ‘पिकल बॉल’ खेळ खेळून सामन्यांची सुरुवात केली. यावेळी ‘रिजेन्सी ग्रुप’चे महेश अग्रवाल, संजय गोयल, अनिल भतीजा, विकी रुपचंदनी, दिनेशकुमार बासोरिया, डावखर ग्रुपचे संतोष डावखर, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर देखील या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

आजची जीवनशैली पाहता सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आणि चपळता वाढवण्यासाठी ‘पिकल बॉल’ हा खेळ देश विदेशात आवर्जून खेळला जातो. उद्घाटनाच्या दिवशी ‘डावखर करंडक २०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंड मधून खेळाडू या ठिकाणी स्पर्धेसाठी आले होते. ‘डावखर करंडक २०२३’ मध्ये एकूण १ लाख २५ हजार रुपयांची रोख बक्षिसे आणि पदकं विजेत्या स्पर्धकाला देण्यात आले.

‘ओपन मेन्स सिंगल’ मध्ये अनुक्रमे कुलदीप महाजन, गौरव राणे, हिमांश मेहता, ‘ओपन मेन्स डबल’ मध्ये अनुक्रमे तेजस मयूर, वंशिक रोनव, गौरव हिमांश आणि ‘३५ प्लस मेन्स डबल’ मध्ये  मिहीर हिमांशु, वैभव विकी, संदीप शैलेश यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले.

सानिया मिरझा विरुद्ध टेनिस खेळणारी नॅशनल खेळाडू ईशा लखानी व हिमांश मेहता आणि बहीण-भाऊ असलेले नॅशनल पिकल बॉल खेळाडू नैमी मेहता व हर्ष मेहता देखील उपस्थित होते व एक प्रात्यक्षिक मॅच खेळून प्रेक्षकांची दाद मिळवली तसेच ऑल इंडिया पिकल बॉल असोसिएशन अध्यक्ष अरविंद प्रभू है देखील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आले होते.

भारतात या खेळाची आवड निर्माण व्हावी त्यामुळे अल्पदरात प्रवेश असेल आणि सुरुवातीचे काही दिवस मोफत प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक वयोगटात हा ‘पिकल बॉल’ खेळला जाणार असून प्रत्येक वयोगटातील बेस्ट प्लेयर च्या ‘युएस चॅम्पियनशिप’ चा पूर्ण खर्च डावखर फाउंडेशन उचलणार आहे अशी माहिती डावखर फाउंडेशनचे संतोष डावखर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. आशियातील सर्वात मोठ्या पिकल बॉल स्टेडियमच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भामबुरे यांनी केले. संतोष डावखर आणि टीमने विशेष मेहनत घेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.