Home Blog Page 46

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते सत्कार!

महिला सफाई कर्मचाऱ्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या दूर केल्या तरच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा झाला असे मानले जाईल!

भाईंदर, प्रतिनिधी: दर वर्षी 08 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा विविध स्वरूपात सन्मान केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे महिला सफाई कामगारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (जनसंपर्क) संजय शिंदे, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, अधिकारी व महिला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वप्रथम आयुक्त यांनी उपस्थित महिला अधिकारी, महिला सफाई कर्मचारी यांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपले मिरा भाईंदर शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान हे महत्त्वाचे असल्याचे मत आयुक्त यांनी व्यक्त केले. कोरोना काळात सुद्धा आपले शहर स्वच्छ व सुदंर ठेवण्यासाठी महिला सफाई कर्मचारी यांनी महत्त्वाचे योगदान दिले. म्हणूनच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्य कार्यालयातील सर्व महिला अधिकारी यांचा देखील या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमासाठी सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली त्यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी केला असला तरी वर्षभर शहरातील सफाईचे कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य त्यांना दिले जात नाही, त्यांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी देखील केली जात नाही अशा अनेक समस्यांना या महिलांना तोंड द्यावे लागत आहे त्यावर महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन सुधारणा केल्या तरच खऱ्या अर्थाने हा जागतिक महिला दिन साजरा झाला असे मानले जाईल अशी प्रतिक्रिया उपस्थित काही महिलांनी यावेळी व्यक्त केली आहे.

आज पासून सूरू होणार डोंबिवली क्रीडा संकुलातील तरण तलाव..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव कोरोना काळात म्हणजेच २०२० पासून गेले ३ वर्ष बंद होता. आंतरराष्ट्रीय अश्या भव्य ह्या तरण तलावात एकूण ३ तलाव आहेत एक मुख्य तलाव, एक डायविंग साठी आणि तिसरा लहान मुलांसाठी असे तीन तरण तलाव आहेत. कोरोना काळात शेजारील बंधिस्त सभागॄह, व्यायाम शाळा व स्कॉश मैदानात महापालिकेचे कोरोना रुग्णालय उभारल्यामुळे व तरण तलावाच्या कार्यालयात डॉक्टरांच्या विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. ह्याच कारणांमुळे तरणतलावाचा व महत्त्वाचा फिल्टरेशन प्लांट चे मेंटनन्स करणे शक्य झाले नाही. नंतरच्या काळात फिल्ट्रेशन प्लांट मेंटेनन्स करिता ठेकेदार मिळत नव्हता त्या कारणाने तरण तलाव दुरुस्ती रेंगाळली होती. गेले वर्षभर तरण तलाव दुरुस्त व्हावा म्हणून महापालिका स्तरावर राजेश कदम, सागर जेधे ह्यांचा पाठपुरावा सुरु होता त्याचा अखेर काल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ह्यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यानी त्वरीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त श्री. भाऊसाहेब दांगडे ह्यांना भेटण्यास सांगितले.

त्यानुसार काल राजेश कदम, माजी ज्येष्ठ नगरसेवक रवी पाटील, शहर समन्वयक जितेन पाटील, शिवसेना युवासेना शहर अधिकारी सागर जेधे ह्यांनी काल कल्याण येथे महापालिकेत जाऊन आयुक्त श्री. भाऊसाहेब दांगडे ह्यांची भेट घेतली असता त्यानी तरण तलाव त्वरित उद्याच्या उद्या म्हणजेच गुरुवार दि. २ मार्च पासून सुरु करावा असे आदेश दिले, ह्या वेळी शिवसेना शिष्ठमंडळांने आयुक्त महोदय यांनी आयुक्त श्री.दांगडे साहेबांचे आभार मानले व तेथून थेट डोंबिवलीच्या क्रीडासंकुल तरण तलाव येथे जाऊन वरिष्ठ अभियंता श्री. सांगळे ह्यांची भेट घेतली. श्री. सांगळे ह्यांनी डोंबिवली क्रिडासंकुलातील तरण तलाव आज २ मार्च रोजी किरकोळ डागडुजी करुन क्रीडा प्रेमींच्या वापरासाठी सायंकाळच्या सत्रा पासून सुरु करण्यात येईल परंतु नेहमीप्रमाणे शुक्रवारी बंद असल्यमुळे तो शनिवार ४ मार्च पासून पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे असे प्रसिध्दी माध्यमांना सांगितले आहे.

तरण तलाव लवकरात लवकर सुरु व्हावा ह्यासाठी पाठपुरावा करत असलेले डोंबिवलीतील तमाम क्रिडा प्रेमींची प्रतीक्षा आता संपली असून महापालिकेचा तरण तलाव ऐन सुट्टीच्या हंगामात सुरु होणार आहे त्यामुळे त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा असे आवाहन शिवसेने तर्फे करण्यात आले असून क्रीडा प्रेमी नागरिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्यांचे व महापालिका आयुक्तांचे आभार मानत आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड ही समिती करणार!

नवी दिल्ली, प्रतिनिधी: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांच्या (EC) नियुक्तीसाठी कॉलेजियम सारखी यंत्रणा निर्माण करण्याच्या मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे.

न्यायमूर्ती के.एम.जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले आहे की, देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असलेली समिती निवड करेल. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त. मात्र त्यांच्या नियुक्तीचे अधिकार राष्ट्रपतींकडेच राहतील.

न्यायमूर्ती अजय रस्तोगी, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती सीटी रविकुमार यांचा या खंडपीठात समावेश आहे. गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी खंडपीठाने या मुद्द्यावर आपला निकाल राखून ठेवला होता. या खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले की, निवडणूक आयोगाने कायद्याच्या चौकटीत राहून स्वतंत्र आणि निःपक्षपातीपणे, घटनेच्या चौकटीत राहून काम केले पाहिजे.

अरुण गोयल यांच्या निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता. अरुण गोयल यांच्या निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीबाबत न्यायालयाने मूळ रेकॉर्ड मागवले होते. अरुण गोयल यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक कशी झाली, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला होता. केवळ यंत्रणा समजून घ्यायची आहे, असे खंडपीठाने म्हटले होते.

आतापर्यंत निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी झाली?

निवडणूक आयुक्तांची नियुक्ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती करतात. या शिफारशीला राष्ट्रपतींची मान्यता मिळते असे सर्वसाधारणपणे दिसून येते. त्यामुळे निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणूक आयुक्तांचा एक निश्चित कार्यकाळ असतो, ज्यामध्ये सेवानिवृत्ती 6 वर्षांनंतर किंवा त्यांच्या वयानुसार (जे जास्त असेल) दिली जाते. निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्तीचे कमाल वय ६५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच वयाच्या 62 व्या वर्षी कोणी निवडणूक आयुक्त बनले तर त्याला तीन वर्षांनी हे पद सोडावे लागेल.

एका अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे असेच म्हणावे लागेल कारण आज पर्यंतच्या इतिहासात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेत सत्ताधारी पक्षाचा थेट हस्तक्षेप असल्याचे दिसून येत होते परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येईल अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवृत्तीचे संकेत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, आपल्या राजकारणातील निवृत्तीबाबत सुचक असे विधान केले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले असून यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त ‘भारत जोडो यात्रे’ संदर्भातच होते, असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सबोधित करताना “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे.” या सुचक भाषणातून सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

 

वृद्ध दांपत्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाल्याने गमावले तब्बल ८ लाख रुपये..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

इंटरनेट बॅंकीगचा युगात वापर जेवढा सोपा तेवढाच त्याच्या वापराबाबत योग्य सावधगिरी न बाळगल्यास लुटले जाण्याच्या खूप घटनाही समोर येतात. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाते. नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडप्याला तब्बल ८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुगल सर्चमध्ये केलेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे.

नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडपे त्यांच्या डिश वॉशरसाठी कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधत होते. तिथे त्यांना एक नंबर सापडला जो आयएफबी कस्टमर केअरच्या नावाने नोंदणीकृत होता. सध्या हा नंबर बंधन बँकेचा कस्टमर केअर नंबर म्हणून नोंदणीकृत आहे. या नंबरवर कॉल केला असता एका महिलेने फोन उचलला व तिने आपल्या वरिष्ठांकडे फोन दिला.

वरिष्ठ महिलेने फोन करणाऱ्या वृद्ध महिलेला ‘एनीडेस्क’ हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर त्यात आपली माहिती भरण्यास व १० रुपये भरून तक्रार दाखल करण्यास सांगितले. या दरम्यान अनेकदा त्यांचा फोन कट झाला व समोरील महिलेने तिच्या वैयक्तिक नंबरवरून कॉल केला. त्याच दिवशी संध्याकाळी ४.१५ वाजता जोडप्याच्या बँक खात्यातून २.२५ लाख रुपये काढले गेले. दुसऱ्या दिवशी ५.९९ लाख रुपये काढल्याचा मेसेज आला. जोडप्याने पोलीसांकडे तक्रार केली, आपले बँक खातेही गोठवले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.