Home Blog Page 93

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात..

+
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली असून उमेदवार असलेल्या शशी थरुर यांनी आपल्यासोबत भेदभाव होत असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक या महिन्यात होत असून मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोन उमेदवार ही निवडणूक लढवीत आहेत. मात्र आपल्याला प्रदेश प्रतिनिधींच्या याद्याच दिल्या जात नाहीत, दिल्या तर त्यांचे संपर्क क्रमांक दिले जात नाहीत, प्रचाराला गेलो तर प्रदेशाध्यक्ष भेटत नाहीत अशा तक्रारी शशी थरूर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे केल्या आहेत. याउलट खरगे यांना मात्र संपूर्ण सहकार्य केले जाते, पक्षश्रेष्ठींनी कोणालाही पाठिंबा दिला नसताना हा भेदभाव का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मधुसूदन मिस्त्री यांनी मात्र हे आरोप फेटाळले असून सर्वांना समान संधी असल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्रात प्रचाराला आलेल्या शशी थरूर यांना राज्यातील कोणतेही प्रमुख नेते भेटले नाहीत मात्र प्रिया दत्त, सुशीलकुमार शिंदे, आशिष देशमुख, राजन भोसले आदींनी त्यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मुले म्हणजे कार्तीक चिदंबरम, संदीप दीक्षित आदी नवपिढी थरुर यांच्या प्रचारासाठी पुढे आली आहे. मात्र पक्षातूनच भेदभाव होत असल्याने ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

कल्याण ग्रामीण मधील २०० उत्तर भारतीयांचा विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सुरू असलेल्या पक्षांतर्गत राजकीय श्रेयवादाच्या जाचाला कंटाळून २०० उत्तर भारतीयांनी मनसेत पक्ष प्रवेश केला आहे. कल्याण ग्रामीण मधील सागाव चिरा नगर परिसरातील शेकडो उत्तर भारतीयांनी शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांच्या उपस्थितीत उत्तरभारतीयांनी मनसेत प्रवेश केला आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सत्तासंघर्ष आणि पक्षांतर्गत वाद उफाळुन आले आहेत. यामध्येच राजकीय नेत्यांच्या भांडणात सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र हैराण झाले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या या अंतर्गत वादांमुळे कल्याण ग्रामीण मध्ये हिंदुत्वाचा जयजयकार करत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन व मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या विकासकामांनी प्रेरित होऊन उत्तर भारतीयांनी शनिवारी मनसेत जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदारांच्या कार्यालयात किशोर महावर, मनोज सिंग, राजकुमार सिंग, संदीप पांडे, पवन शुक्ला, अजित चौबे यांसह कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला आहे. यावेळी मनसे उप जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत, दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, कल्याण ग्रामीण विधानसभा सचिव अरुण जांभळे, उप जिल्हा सचिव अनंता म्हात्रे, डोंबिवली शहर संघटक तकदीर काळण, उप शहर अध्यक्ष प्रभाकर जाधव, दिवा उप शहर प्रमुख दिनेश पाटील, विभाग अध्यक्ष शरद पाटील, रोहित भोईर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण ग्रामीण भागातील सागावं, चिरानगर परिसरातील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला नंतर पक्ष बांधणीसाठी जोमाने काम करण्याची तयारी सुरू करत असल्याचे देखील जाहीर केलं आहे. त्यामुळे ज्वलंत हिंदुत्वाच्या प्रश्नी परिसराच्या विकासासाठी कटीभद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत उत्तरभरतीयांनी प्रवेश केला आहे. यावेळी कार्यकर्ते व त्यांच्या परिसरातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कटीबद्ध असेल असं मनसेचे कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं आहे.

 

रेल्वे ऑफिसरचे घरफोडीमध्ये चोरीस गेलेले २८ तोळे सोन्याचे दागिने कार्यालयातील वायरमन कडून जप्त करत गुन्हे शाखेची दमदार कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सोलापूर शहरातील दमाणी नगर परिसरात ‘सोनी सिटी’ या नावाने सुसज्ज नविन वास्तु प्रकल्प आहे. सदर ठिकाणीचे एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये सोलापूर रेल्वे विभागातील इलेक्ट्रीक इंजिनिअर हे दि. ३१/०८/२०२२ पासून त्यांचे कुटुंबासह राहण्यास आहेत. दिनांक ०१/१०/२०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वाजण्याच्या सुमारास संबंधीत इलेक्ट्रीक इंजिनिअर हे त्यांचे कुटुंबासह फ्लॅटला लॅच-कुलुप लावून बाहेरगावी गेले. ते त्यांचे कुटुंबासह दि.०५/१०/२०२२ रोजी रात्री ०९:३० वा. सुमारास घरी परत आले. त्यावेळी त्यांनी त्यांचे फ्लॅटचे लॅच कुलुप उघडुन आत बेडरूम मध्ये गेल्या नंतर, त्याचे बेडरूम मधील कपाट उघडे दिसले, त्यांना त्या बाबत शंका आल्याने, त्यांनी कपाटाची पाहणी केली असता, त्याचे कपाटातून, २८.०५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ०२ तोळे वजनाचे चांदीचे दागिने, सँमसंग कंपनीचा टॅब अशी एकूण १२,४८,५००/- रुपयांची मालमत्ता चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लागलीच नियंत्रण कक्ष, सोलापूर शहर येथे याबाबत माहिती दिली. त्यानंतर फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे याबाबत गु.रजि.नं. ६०५/२०२२ भादंवि. कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये, अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर शहर नियंत्रण कक्ष येथून वरील प्रमाणे घरफोडी चोरीची माहिती मिळल्यानंतर घटनास्थळी, डॉ. प्रिती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) व प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर तसेच गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, सहा. पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, कर्मचारी दिलीप भालशंकर, योगेश बर्डे, वाजीद पटेल, संजय साळुखे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर फिर्यादीचे फ्लॅटचे लॅच कुलुप तोडले नसल्याचे निदर्शनास आले. मात्र, स्लायडिंग डोअर उघडे असल्याचे दिसून आले. घटनास्थळाचे निरीक्षण केल्यानंतर, सदरची घरफोडी चोरी ही, डुप्लीकेट चावीचा वापर करून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार, संबंधीत रेल्वे इंजिनिअर यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी फ्लॅटमध्ये राहणेस येण्यापूर्वी त्यांचे नविन फ्लॅट मध्ये फर्निचर, रंगाचे व इलेक्ट्रिकचे काम करून घेतले होते. सदरचे काम करताना, त्यांनी फर्निचर, रंगाचे व इलेक्ट्रिकचे काम करणारे कामगारांकडे फ्लॅटच्या चाव्या सोपविल्या असल्याचे निदर्शनास आले. तसेच फ्लॅटमध्ये साहित्य शिफ्ट करताना संबंधीत रेल्वे इंजिनिअरने त्याचेच कार्यालयातील शासकीय इलेक्ट्रीक वायरमनकडे फ्लॅटची चावी दिली असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, सपोनि. जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी संबंधीत फ्लॅटमध्ये फर्निचर, रंगाचे व इलेक्ट्रिकचे काम करणाऱ्या सर्व कामगारांकडे याबाबत चौकशी करण्यात आली. मात्र, त्यापैकी कोणीही त्याठिकाणी चोरी केली नसल्याचे दिसून आले. त्यानंतर, सबंधीत रेलवे इंजिनिअरकडे अधिक चौकशी करता, ते दि.०१/१०/२०२२ ते दि.०५/१०/२०२२ या कालावधीत रजेवर असल्याची माहिती त्यांचे कार्यालयातील कर्मचान्यांना असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर घरफोडी चोरी बाबत रेल्वे कार्यालयातील असे कर्मचारी की ज्यांनी फिर्यादी यांचे घरी भेट दिली होती आणि त्यांचेकडे फिर्यादी यांनी कामानिमीत्त फ्लॅटच्या चाव्या सोपविल्या होत्या, अशा कर्मचाऱ्यांच्या हालचालीवर गुन्हे शाखेकडील पोलीसांनी बारकाईने लक्ष ठेवले.

त्यानंतर, सपोनि. जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकास, गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, सोनी सिटी, दमाणी नगर, सोलापूर येथील रेल्वे इंजिनिअरच्या घरातील चोरीस गेलेला टॅब विकण्यासाठी म्हणून एक इसम हा सोलापूर शहरातील सिध्देश्वर मंदिर परिसरात येणार आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेकडील सपोनि. जीवन निरगुडे व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून संशयीत इसमास पकडले असता, त्याचे नाव भाऊराव अर्जुन वाघमोङे राहणार. १८० आदित्यनगर आर.टी.ओ. ऑफीस जवळ विजापूर रोड, सोलापूर असे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच तो सोलापूर रेल्वे मध्ये इलेक्ट्रीक वायरमन असल्याचे आणि त्याने फिर्यादी यांचे फ्लॅटला कामानिमित वेळोवेळी भेट दिल्याचे देखील निष्पन्न झाले. त्याचे अंगझडतीत, घरफोडी चोरीतील टॅब मिळून आला. संबंधीत भाऊराव अर्जुन वाघमाडे याचेकडे सखोल तपास करता, त्याने डुप्लीकेट चावीचा वापर करून गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानंतर नमूद आरोपीने गुन्ह्यातील चोरलेली २८.०५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ०२ तोळे वजनाचे चांदीचे दागिने, सॅमसंग कंपनीचा टॅब अशी एकुण १२,४८,५००/- रुपयांची मालमत्ता काढुन दिल्याने ती पोलीसांनी जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कामगीरी मा. डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, बापू बांगर, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रिती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे व सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. जीवन निरगुडे, पोहेकॉ. दिलीप भालशंकर, अंकुश भोसले, पोना योगेश बर्डे, वाजीद पटेल, पोशि. संजय साळुंखे, धायगुडे, प्रकाश गायकवाड व वसीम शेख यांनी केलेली आहे.

 

१२ आमदारांच्या नियुक्ती व राज्य सरकार शपथपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत 

शिवसेना पक्षात पडलेली उभी फूट व अद्यापही रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदार निवडीच्या प्रकरणावर सध्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रकाश टाकला आहे. संविधानात्मक बाबी हाताळण्यात जेव्हा दिरंगाई केली जाते तेव्हा वेळोवेळी सर्वोच्च न्यायालय या सर्व बाबींना कायद्याच्या चौकटीने हाताळत असते प्रसंगी खडेबोल सुनावत विचारणा देखील करते, याच मूळ हक्काला जपताना न्यायालय दिसत आहे. राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना महाविकास आघाडीने १२ आमदार नियुक्तीची यादी दिली असताना देखील अद्यापही या आमदारांची निवड प्रक्रिया रखडली आहे. दुसरीकडे शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने बंड करणाऱ्यांना न्यायालयात शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिल्यावर महिन्याभराचा अवधी पूर्ण होत असताना हे देखील कार्य थंडबस्त्यात पडून आहे. या सर्व बाबींचा परिपाक म्हणजे या दोन्ही प्रकरणावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात १२ आमदार नियुक्तीची यादी राज्यपाल भगत सिह कोश्यारी यांना पाठवण्यात आली असताना दरम्यानच्या काळात शिवसेनेत फूट पडल्याने राज्यात सत्तांतर झाले व शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट व उद्धव ठाकरे गट वाद सर्वोच्च न्यायालयाच्या दरबारी पोहोचल्याने ही १२ आमदारांची नियुक्ती रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी पर्यंत स्थगिती दिल्याने हे प्रकरण थंडबस्त्यात आहे. परंतु राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी १२ आमदार नियुक्ती प्रकरणी निवडीबाबत आपले मत सादर न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे शिंदे गटाकडून शपथपत्र सादर करण्यात यावे याबाबतीत न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अद्यापही ते सादर न झाल्याने न्यायालयाने सरकारचे कान टोचले आहे. तसेच न्यायालयाकडून नोटीस देण्यात आल्यानंतरही शपथपत्र प्रक्रिया पूर्ण न झाल्याने न्यायालयाकडून खडेबोल सुनावण्यात आले आहे. सध्यस्थितीनुसार नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यपाल आमदार नियुक्ती करू शकणार नाही तोपर्यंत राज्य सरकारला शपथपत्र दाखल करता येणार नाही. कारण नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यपर्यंत न्यायालयाकडून या सर्व बाबींवर स्थगिती देण्यात आली आहे.

मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश! मिरा-भाईंदर शहरात साकारणार भव्य मराठा भवन

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील मराठा समाजाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर यश आले असून महानगरपालिका कार्यक्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व माजी राज्यसभा सदस्य युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते घोडबंदर किल्ला बुरुजावरील 100 फूटी भगवा ध्वज व पांडुरंग वाडी येथे नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली 15 ऑक्टोबर रोजी गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या भव्य अशा कार्यक्रमात युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले, नितेश राणे, प्रताप सरनाईक, गीता जैन शिवसंग्रामचे अध्यक्ष स्व. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे, आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, डॉ. संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त, अनिकेत मनोरकर अतिरिक्त आयुक्त, मिरा भाईंदरचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या माता ज्योती राणे व पिता प्रकाश राणे, मराठा समाजाचे अध्यक्ष सुरेश दळवी, मराठा समाज संघाचे पदाधिकारी, महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात सर्वप्रथम युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते घोडबंदर किल्याच्या बुरुजावरून 100 फुटी ध्वजाचे भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर पांडुरंग वाडी येथील नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

मराठा भवनाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह इथे उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कलाकारांनी आपली कला सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथांची गाथा पोवड्यातून सादर केली. सांस्कृतिक कार्यक्रम समाप्तीनंतर बारवी धरणातील 210 धरणग्रस्त कुटुंबियांच्या सदस्यांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

सदर प्रसंगी सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, उपस्थित नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी वेळात वेळ काढून घोडबंदर किल्ला 100 फूटी ध्वज व नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.