Home Blog Page 92

हिमाचल प्रदेश राज्याची विधानसभा निवडणूक झाली जाहीर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा केली. आयोगाच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशात ६८ विधानसभा मतदारसंघांसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतलेल्या या पत्रकार परिषदेत आज मुंबई महानगर पालिका, गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूका जाहीर होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र आयोगाने आज फक्त हिमाचलचीच निवडणूक जाहीर केली. हिमाचल प्रदेश आणि गुजरात यांच्या विधानसभेच्या कार्यकाळात ४० दिवसांचं अंतर आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हवामानाची स्थिती महत्त्वाची आहे. विशेषत: या राज्याच्या उत्तर भागात जिथं बर्फवृष्टी होते, म्हणून हिमाचलची निवडणूक गुजरातच्या आधी जाहीर करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहे.

विशेष बाब म्हणजे या निवडणूकी दरम्यान निवडणूक आयोग ८० वर्षांवरील व्यक्ती, दिव्यांग किंवा कोविड बाधित मतदार मतदान केंद्रावर येऊ शकत नसतील, तर त्यांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान राज्यातील ठाकरे-शिंदे वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका यावर्षी खूपचं आव्हानात्मक ठरणार असून मतदार आणि राजकीय पक्ष सर्वांनाच या निवडणूका कधी जाहीर होतात याची उत्सुकता लागून राहीली आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले होते.

 

सिटबेल्ट लावणे बंधनकारक अन्यथा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात चारचाकी वाहनांमधील सहप्रवाशांना आता सीटबेल्ट लावणे सक्तीचं होणार आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांवर मुंबई वाहतूक पोलीस १ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करतील. ज्या वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल,असं वाहतूक पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सादर केलेल्या अलिकडच्या अहवालानुसार सीट बेल्ट न लावल्यामुळे २०२० मध्ये देशभरात झालेल्या अनेक वाहन अपघातांमध्ये १५ हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या लोकांनी सीट बेल्ट लावला असता तर त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळे मोटार वाहन चालक व सह प्रवासी यांना सिटबेल्ट लावणे बंधनकारक होणार आहे. मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) मध्ये चारचाकी मोटार वाहनातील वाहन चालक व इतर प्रवासी यांनी प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यास ते दंडास पात्र ठरणार आहे.

ज्या चारचाकी वाहनांमध्ये सर्व सहप्रवास्यांना सिटबेल्ट करिता सुविधा नसेल त्यांना १ नोव्हेंबर २०२२ पर्यत सीटबेल्ट बाबत आवश्यक ती सुधारणा करण्याकरिता अवधी देण्यात येत आहे. त्यानंतर मुंबई शहरातील रस्त्यावरून चारचाकी मोटार वाहनाने प्रवास करणाऱ्या चालक व इतर प्रवासी यांनी सिटबेल्ट लावणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांचेवर १ नोव्हेंबरपासून मोटार वाहन कायद्या नुसार कारवाई करण्यात येईल असे वाहतूक पोलीसांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन झालं. तेव्हापासून देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील वाहतूक पोलीसांनी रहदारीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचबरोबर सुरक्षित वाहन प्रवासासाठी नवीन नियम लागू केले आहेत. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सीट चालक आणि सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावणं बंधनकारक केलं आहे. आता असाच नियम मुंबईत देखील लागू करण्यात आला आहे.

 

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी काळे आणि पाटील यांच्यात लढत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात लढत होणार आहे.

या निवडणुकीसाठी भाजपाचे आशिष शेलार यांनी आधी अर्ज दाखल केला होता, मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्ष पदासाठी त्यांना संधी मिळाल्याने शेलार यांनी आपला अर्ज मुंबईतून मागे घेतला, शेलार यांना शरद पवार गटाचाही पाठिंबा होता.

शेलार यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर शेलार – पवार गटाकडून आता अमोल काळे हे मैदानात असून त्यांची थेट लढत संदीप पाटील यांच्याशी होईल. संदीप पाटील यांना अनेक माजी खेळाडूंचा पाठिंबा आहे असे वर्तविण्यात येत आहे.

 

पत्नीने दिले भूलीचे इंजेक्शन, डॉक्टर पतीचा मृत्यू..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक येथील म्हसरुळ भागात एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका महिलनेनं तिच्या पतीला भुलीचं इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पेशानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीवर जवळपास ३२ दिवस रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरचा मृत्यू झाला.

सतीश देशमुख असं मृत पावलेल्या डॉक्टरचं नाव आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराने डॉ. देशमुख यांना भुलीचे इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे इतर व्यक्तीशी संबंध असल्याचं डॉक्टर देशमुख यांना कळलं होतं. त्यानंतर देशमुखांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्यात वाद निर्माण झाला. १० सप्टेंबर रोजी देशमुखांची पत्नी आणि प्रियकर सतिश १० सप्टेंबर रोजी क्लिनिकमध्ये आले होते. त्यावेळी दोघांनी देशमुखांसोबत वाद सुरु केला.

त्यानंतर त्यांच्या पत्नीने भुलीचे इंजेक्शन देऊन देशमुखांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घडलेला संपूर्ण प्रकार देशमुखांनी त्यांच्या मुलाला सांगितला. त्यानंतर त्यांच्या मुलाने याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली. तेव्हापासून देशमुखांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

 

अंधेरीतली पोटणीवडणुकीची लढत आता कमळ आणि मशाल यांच्यात..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईतील अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवणुकीसाठी आजच्या शेवटच्या दिवशी भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी सरळ लढत होणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि आरपीआय चे उमेदवार म्हणून भाजपाच्या मुरजी पटेल यांनी आपला अर्ज दाखल केला, यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर आदी नेते उपस्थित होते.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके आणि पर्यायी उमेदवार म्हणून संदीप नाईक यांचे अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे, अनिल परब, दिलीप वळसे पाटील, भाई जगताप आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

दोन्ही बाजूने अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. मुरजी पटेल यांनी दोन अर्ज दाखल केले असून, दोन्ही बाजूने खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे. मनसे ने मात्र आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.