Home Blog Page 284

राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान जाहीर – परिवहनमंत्री अनिल परब

मिलन शाह, मुंबई प्रतिनिधी: राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.२०) परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात बैठक झाली.

राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी १५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल,’ असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. परब यांनी केले.

बनावट कोविड निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून जास्त किंमत घेऊन फसवणूक करणारे अटकेत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने कोविड-१९ च्या अनुषंगाने बनावट कोविड निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून नागरिकांकडून जास्त पैसे वसुलून फसवणूक करणाऱ्या दोन इसमांना कक्ष-१० गुन्हे शाखेने अटक केली आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे की मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुलाबा प्लॉट, जोगेश्वरी (पूर्व) मुंबई येथे काही इसम त्यांच्याकडील मोबाईल फोन व लॅपटॉपच्या साहाय्याने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना बनावट निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून देतात आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांकडून जास्त रक्कम वसुलून शासनाची व नागरिकांची फसवणूक करतात अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर दोन इसम KRSNAA DIAGNOSTICS व LIFE CARE DIAGNOSTICS या लॅबच्या मूळ कोविड रिपोर्ट मध्ये त्यांच्याकडील मोबाईल फोन व लॅपटॉपच्या साहाय्याने फेरफार करून कोविड निगेटिव्ह असल्याबाबतचे बनावट रिपोर्ट तयार करत असताना मिळून आले.

सदर प्रकरणी त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त करून त्यांच्याविरुद्ध मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर मानपाडा पोलिसांची कारवाई

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली)

वाढत्या महाभयंकर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने १५ एप्रिल ते ३१ एप्रिल पर्यत लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर पालिका आणि पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश देण्यात आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करत दंडात्मक कारवाई केली आहे.

मानपाडा पोलिसांनी गेल्या चार दिवसात डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर, खोणी नाका, लोढा जंकशन, लोढा पालावा या ठिकाणी २२९ जणांवर कारवाई करत त्यात काही दुकानात विनामास्क, सॅनेटाईजर, आरटीपीसीआर तपसणी न करणे या नियमाचे पालन न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. कल्याण परिमंडल-३ चे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री.दत्ता कराळे, पोलीस उपायुक्त श्री.विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. जयराम मोरे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि श्री.दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार, पो.कॉ. मंदार यादव, पो.ह. संतोष चौधरी आणि कर्मचारी यांनी सदरची कारवाई यशस्वी रित्या केली. या कारवाईत एकूण १ लाख १४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज राहून काम करत आहे.

नागरिकांनी आपल्या जबाबदारीनुसार गर्दी टाळावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क परिधान करणे, हात न मिळवता भारतीय संस्कृतीनुसार हात जोडावे, दोघांमध्ये कमीत कमी ३ फुटाचे अंतर ठेवावे, दुकानदारांनीही स्वतःचा आणि समाजाचा विचार करून सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे असे मार्गदर्शनपर आवाहन पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब पवार यांनी केले आहे.

कोरोना विरोधातील लढाईसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आमदार निधीतून ५० लक्ष रुपये.

मिलन शाह, मुंबई, प्रतिनिधी: सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढतो आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. भंडारा जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी अस्तित्वात असलेली साधनसामग्री देखील अपुरी पडत आहे. त्यामुळे कोरोनाशी लढण्याकरिता आवश्यक असलेली साधनसामग्री खरेदी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी आपल्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ५० लक्ष रुपये खर्च करण्याच्या सूचना भंडारा जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत.

या निधीतून जिल्हा प्रशासनाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर, हॉस्पिटल बेड, आय सी यू बेड, एन आय सी यु व्हेंटिलेटर्स, इमर्जन्सी ट्रॉली, फार्मास्युटिकल फ्रिज, व्हॅक्सिन बॉक्ससह इतर आवश्यक उपकरणे व औषधे यांची खरेदी करता येणार आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे भंडारा जिल्ह्याला कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये बळ मिळणार आहे.

कोरोनाविरोधातील या लढाईत नागरिकांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. ब्रेक द चेन अंतर्गत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाला सहकार्य करावे असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.

रात्रीच्या वेळीस लूटमार करणाऱ्या सराईत लुटमारांच्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण येथे रात्रीच्या वेळेस हायवे रोडवर लूटमार करणाऱ्या २ सराईत लुटमारांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, मुनवर हुसेन अब्दुल रहमान शेख हे ओला कॅब ड्रायव्हर डोंबिवली येथे पॅसेंजर सोडून कल्याणला जायला निघाले असताना गोविंदवाडी बायपास येथील ए.पी.एम.सी मार्केट गेट पासून पुढे गेल्यावर फानूस धाब्यासमोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकरजवळ कल्याण (प) येथे दोन अनोळखी इसमांनी त्यांना कॅब थांबविण्याचा इशारा करून ते ओला कॅब मध्ये बसले आणि थोड्यावेळाने त्यातील एका इसमाने त्यांच्या मानेवर चाकू लावून मारहाण करून त्यांच्याकडील २०४०/- रु. रोख रक्कम व २ मोबाईल फोन असा माल जबरीने काढून घेतला. त्यानंतर त्यातील एकाने कॅब चालविण्यास सुरुवात करून सदर ड्रायव्हरला आणखी पैशांची मागणी करून त्यांना एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी कल्याण स्टेशनच्या रस्त्यावर येत असताना कॅब चालकाला पोलीस दिसल्याने त्यांनी मदतीला आरडाओरड केली असता ड्रायव्हर सीट वर बसलेल्या इसमाने सदर ड्रायव्हरला मारहाण करून गाडीतून उतरून दिले आणि ते कल्याण स्टेशनच्या दिशेने पळून गेले. सदर २ इसमांनी ओला कॅब चालकाचा ५,६५,०३०/- रु. कीं माल जबरी चोरी करून नेला.

या घटनेबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून दुर्गाडी किल्ल्याच्या शेजारी असलेल्या जुन्या खाडी पुलाजवळ सापळा रचून सदर दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरी चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार देखील जप्त करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे शहर, सह पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला, ठाणे शहर, अति. पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय कराळे, युनिट ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहा.पोलीस आयुक्त कल्याण विभाग अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनिरी. यशवंत चव्हाण, पोनि. सुनील पवार, मसपोनिरी. कांदळकर, सपोनिरी अरुण घोलप, पोहवा. टी के पावशे, पोहवा. यु सावंत, पोहवा. लीकडे, पोलीस नाईक. सचिन साळवी, पोलीस नाईक. बी.आर.बागुल, पोलीस नाईक पी.बाविस्कर, पोलीस नाईक जी.पोटे, पोलीस शिपाई. आर.एम.सांगळे यांनी यशस्वीरित्या पार केली आहे.