Home Blog Page 285

.आणि आली झुक झुक गाडी!

….आणि आली झुक झुक गाडी!

आजचा दिवस भारतातील प्रवासी व माल वाहतुकीच्या इतिहासाला वेगळेच वळण देणारा ठरला. याच दिवशी १८५३ साली भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर धावली.

बैल किंवा घोडे यांच्याशिवाय ही गाडी धावताना पाहून हा ‘चमत्कार’ पाहणाऱ्या हजारो बघ्यांना ही ‘जादु’च वाटली. ‘या साहेबाचं पोर मोठं अकली रे, बिनाबैलानं गाडी कशी हाकली रे’ हे गाणे मोठ्या कौतुकाने गायले जाऊ लागले.

देशात रेल्वे सुरू झाली व देशाची प्रगती तशाच वेगाने धावू लागली. या १६८ वर्षांत रेल्वेने आपली रुपे परिस्थितीनुसार बदलली. वाफेच्या इंजिनावर धावणारी रेल्वे नंतर डिझेल, विजेवर धावू लागली.

उपनगरी गाड्या, नंतर जमीनीच्या खालून धावणाऱ्या मेट्रो गाड्या आल्या. रेल्वेचे जाळे देशभर पसरले व रेल्वे भारताची जीवन वाहिनी बनली.

आता रेल्वेचा परीघ इतका विस्तारला की, भारतीय रेल्वेचं नेटवर्क चीननंतर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं नेटवर्क मानलं जातं. भारतात एकूण ७, ८५३ रेल्वे स्टेशन आहेत. देशातील रेल्वे रुळांची एकत्रित लांबी पकडली तर ती जवळपास ७० हजार किलोमीटरपर्यंत जाते.

भारतात दररोज १४,४०० गाड्या रुळावरून धावतात. त्यापैकी ७ हजार प्रवासी गाड्या आहेत. त्यातून अडीच कोटी माणसं दररोज प्रवास करतात. हा आकडा अनेक छोट्या-मोठय़ा देशांच्या लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे.

भारतीय रेल्वेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल साडेसोळा लाख आहे.

जमिनीखालून धावणारी पहिली मेट्रो रेल्वे कोलकात्यात १९८४ मध्ये सुरू झाली. त्यानंतर राजधानी दिल्लीत २००२ मध्ये मेट्रो धावायला लागली. मुंबईतही आता मेट्रो सेवा सुरू झाली. मात्र सध्या ती जमिनीवरुनच धावते.

मुंबईतील मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे सर्वात गजबजलेले स्टेशन. इथून दररोज ३ लाख प्रवासी वेगवेगळ्या दिशेने प्रवासाला निघतात. या रेल्वे स्टेशनचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.

अशा भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस! आपण सारेजण रेल्वेचे अभिष्टचिंतन करूया!

Happy Birthday, Indian Railway!

– भारतकुमार राऊत

ठाणे महानगरपालिका उभारणार २० टन प्राणवायू क्षमतेचे प्रकल्प; ३० एप्रिलपर्यंत होणार कार्यान्वित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे मनपा ने प्राणवायू (Oxygen) चा होणारा तुटवडा व मर्यादित पुरवठा आणि त्यामुळे होणारी रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने प्राणवायू (Oxygen) निर्माण करणारे स्वतःचे दोन प्रकल्प उभारण्याचा महत्वाचा निर्णय हाती घेतला आहे.

या दोन प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत युद्ध पातळीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत होती. प्राणवायूअभावी रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी पार्किंग प्लाझामधील रूग्णांना ठाणे कोविड रूग्णालयामध्ये स्थलांतंरित करण्याचा निर्णय घेतला गेला होता.

त्यानंतरही ठाणे महापालिकेच्या कोविड रूग्णालयांना तसेच खासगी कोविड रूग्णालयांना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत होते. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेने पीएसए तंत्रज्ञानावर आधारीत स्वतःचे दोन प्रकल्प उभे करण्याचा ठाम निर्णय घेतला.

ठाणे महानगरापलिकेच्या ठाणे कोविड रूग्णालय आणि पार्किंग प्लाझा रूग्णालय या ठिकाणी हे दोन प्लांट उभे करण्यात येणार असून एका प्लांटमधून २४ तासामध्ये जवळपास १७५ सिलेंडर्स प्राणवायू (Oxygen) तयार होईल एवढी क्षमता आहे. त्यामुळे दोन प्लांटमधून दिवसाला अंदाजे २० टन प्राणवायू निर्माण होणार आहे.

औरंगाबाद स्थित आयरॅाक्स टेक्नॅालॅाजिज प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून हे दोन प्लांट उभारण्यात येणार असून यामध्ये प्रेशर स्विंग ॲबसॉर्प्शन (पीएसए) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सदर कंपनीने यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषद, मुंबई महानगरपालिका, सामान्य रूग्णालय, सिंधुदूर्ग, बीड या शासकीय ठिकाणी असे प्लांट उभे केले आहेत.

या प्लांटमधून २४ तासा मध्ये १७५ सिलेडंर्स प्राणवायू निर्माण करण्यात येणार आहे.सद्यस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे कोविड रूग्णालयासाठी २० टन तर पार्किंग प्लाझा रुग्णालयासाठी १३ टन प्राणवायुची आवश्यकता आहे. या दोन प्लांटमुळे या दोन्ही रूग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दहा हजार पदांची होणार तातडीने भरती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर..

सध्या राज्यात वाढत्या कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदभरती बाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील १० हजार १२७ पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.

सरकारतर्फे कोरोनाला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची १० हजार १२७ पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.

या पदांची होणार भरती..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत १० हजार १२७ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती होणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने १० हजार १२७ पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्तमंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

रेमडेसीवीर इंजेक्शन चा काळाबाजार; ५ हजार ४०० ला होतेय विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

बीड जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजारबद्दल मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. इथल्या लाईफ लाइन हॉस्पिटलशी संलग्न लाईफलाईन मेडिकलमध्ये रेमडेसीवीरचा काळाबाजार पाहायला मिळाला. इथे एका इंजेक्शनसाठी तब्बल ५ हजार ४०० रुपये किंमत अकरण्यात आली.

या किमतीवर दोन इंजेक्शन विकल्याचे गुरुवारी समोर आले आहे. या प्रकरणात इंजेक्शन खरेदी करणारे संतोष सोहनी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. बीड जिल्ह्यातच अन्न औषध प्रशासन विभागाच्या आशीर्वादानेच रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे गुरुवारी पुन्हा स्पष्ट झाले.

येथील लाईफ लाइन मेडिकलला रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा देण्यात आला होता. गुरुवारी संतोष सोहनी हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी मेडिकलवाल्याने इंजेक्शनवर ५ हजार ४०० इतकी किंमत असल्याचे सांगितले. आणि त्यांच्याकडून दोन इंजेक्शनसाठी १० हजार ८०० रुपये घेतले. या प्रकारानंतर संतोष सोहनी यांनी बीड शहर पोलीसात तक्रार दिली आहे. या प्रकरणात चौकशी करुन पुढील कारवाई होईल असे शहर पोलीसांनी सांगितले.

कोविड-१९ आजाराची खोटे निगेटिव्ह प्रमाणपत्र तयार करणाऱ्याला काशिमिरा पोलिसांनी केली अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मीरा भाईंदर : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच कोविड-१९ आजाराने ऍडमिट असलेल्या रुग्णांची नावे व आधार कार्डच्या साहाय्याने कोविड-१९ आजाराची खोटी निगेटिव्ह प्रमानपत्रे तयार करणाऱ्या एका इसमास काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, एस.आर.एल.लॅब, मिरारोड स्टेशन येथे काम करणारा एक इसम १०००/- रुपयांच्या बदल्यात त्याला लोकांच्या आधारकार्डचा फोटो पाठविल्यानंतर कोणत्याही प्रकारे
स्वॉब न घेता अथवा कोणतीही चाचणी न करता त्यांचे कोविड-१९ या आजाराचे बनावट निगेटिव्ह प्रमाणपत्र देत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांमार्फत काशीमीरा पोलिसांना मिळाली.

सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी बोगस गिऱ्हाईकाच्या मोबाईल फोन वरून कोविड-१९ या आजाराने वेगवेगळ्या दवाखान्यात ऍडमिट असलेल्या व रेमडेसीवीर सारखी इंजेक्शन घेत असलेल्या ५ पेशंटची व बोगस गिऱ्हाईक अशा एकूण ६ लोकांची नावे आणि आधार कार्डचे फोटो पाठवून दिले. त्यानंतर वरील ६ लोकांचे कोविड-१९ आजाराचे निगेटिव्ह प्रमाणपत्र बनवून त्याच्या मोबदल्यात प्रत्येकी रोख रक्कम ६,०००/- स्वीकारताना सदर इसम मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतले.

सदर प्रकरणी त्याच्याविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडून एस.आर.एल. डायनोस्टिक नाव असलेली कोविड-१९ आजाराची निगेटिव्ह ६ प्रमाणपत्र व एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून या प्रकरणामध्ये एखादी टोळी सक्रिय आहे की काय याचा तपास नयानगर पोलीस करीत आहेत.