Home Blog Page 91

शिवसेना कोपर शाखेने गेल्या १२ वर्षांची परंपरा कायम राखत केले हजारो लाभार्थींना मोफत दिवाळी किटचे वाटप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिमेकडील प्रभागातील गोरगरीबांची दिवाळी गोड व्हावी याकरिता कोपर येथील शिवसेना शाखेने आपली १२ वर्षाची परंपरा अखंडरित्या कायम ठेवली आहे. हजारो लाभार्थींना दिवाळीचे पदार्थ तयार करण्यासाठी विविध जिन्नस असलेले किट मोफत वाटण्यात येत आहेत. माजी नगरसेवक आणि माजी परिवहन सभापती संजय पावशे, अपर्णा पावशे यांच्या हस्ते किट वाटपाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला.

गेली १२ वर्ष शिवसेना कोपर शाखा आणि ‘कै.लक्ष्मण विष्णू पावशे प्रतिष्ठान’ च्या वतीने दोन वर्षांच्या कोरोनाच्या महाभयंकर संसर्गाच्या काळानंतर डोंबिवली येथील शिवसेना कोपर शाखेच्या वतीने दहिहंडी, गणेशोत्सव, दिवाळी इत्यादी सणांना विविध वस्तूंचे अन्यथा अन्नधान्य लाभार्थींना वाटण्यात येते. हिंदूह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारणाचे वैचारिक धोरण आम्ही राबवित आहोत.

धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डाॅ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखेच्या वतीने विविध सांस्कृतिक, सामाजिक, मदतीचे, विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात येते. दोन वर्षांच्या कोरोना नंतरची दिवाळी आनंदाची आणि समस्त गोरगरीब जनतेला गोड जावी याकरिता हजारो लाभार्थींना मोफत किट वाटण्यात येत आहेत. चार दिवस हा उपक्रम सुरु असेल असे संजय पावशे यांनी प्रसिद्धी माध्यमांना  सांगितले.

 

राजकीय ‘लव्ह मॅरेज’ आणि ‘अरेंज मॅरेज’; रावसाहेब दानवे आणि गुलाबराव पाटलांची एकाच मंचावर तुफान टोलेबाजी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकाच मंचावर नुकतेच एकत्र आले होते, यावेळी या दोन्ही मंत्र्यांनी तुफान टोलेबाजी करत वातावरण निर्मिती केली प्रसंगी अनेक जणांना हसू अनावर झाले. प्रसंग होता सिल्लोड येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा यावेळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एकत्रित या कार्यक्रमाला हजर होते.

या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आपले मत व्यक्त करताना गुलाबराव पाटील यांनी रावसाहेब दानवे तसेच भाजपला उद्देशून सुरुवातीला म्हटले होते की, “अडीच वर्षांपूर्वी आमची भाजपसोबत युती तुटली होती, लव्ह मॅरेज तुटलं होतं. परंतू योगायोगाने पुन्हा जुळून आलं. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे तसेच मिश्किल भाष्य करण्याच्या शैलीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या रावसाहेब दानवेंनी देखील गुलाबराव पाटलांच्या या वक्त्यव्याला तितकेच साजेसे प्रत्युत्तर दिले.

यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, ”गुलाबराव आपलं ‘लव्ह मॅरेज’ नव्हतं ‘अरेंज मॅरेज’ होतं, ‘लव्ह मॅरेज’ तर तुम्ही त्यांच्यासोबत केले होते. ‘लव्ह मॅरेज’ करताना तुम्ही ज्या खाणाखुणा केल्या होत्या त्या मला कळाल्या होत्या.” अशाप्रकारे टोला दानवेंनी गुलबराव पाटलांना लगावला व जमलेल्या लोकांना हसू अनावर झाले.

प्रसंगी गुलाबराव पाटलांनी आजवर शिवसेनेसाठी केलेल्या कार्याच्या आठवनींना उजाळा दिला, तसेच टीका करणाऱ्यांसाठी अनेक सवाल देखील उपस्थित केले. पाठीवर दफ्तर असताना पासून आपण शिवसैनिक असल्याचे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले. एकंदरीतच राजकीय टोलेबाजीने रंगलेला हा भूमिपूजनाचा कार्यक्रम जनतेचे चांगलेच मनोरंजन करणारा ठरला.

मिरा-भाईंदर शहरात लवकरच धावणार वातानुकूलित इलेक्ट्रिक बस! आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रवास करून घेतली बसची चाचणी

मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज आणि पर्यावरण पूरक 45 इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल होणार! – दिलीप ढोले, आयुक्त

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आरामदायी व सोयी सुविधांनी सज्ज अशी परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासन नेहमीच करत आले आहे. त्या अनुषंगाने परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी व शहरातील नागरिकांना आरामदायक परिवहन सेवेचा लाभ देण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले, परिवहन व्यवस्थापक अनिकेत मानोरकर यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत.

त्या अनुषंगाने मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात अत्याधुनिक व पर्यावरणपूरक अशा एकूण 45 इलेक्ट्रिक बसेस खरेदीची निविदा काढण्याची मंजुरी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या द्वारे देण्यात आली आहे.

19 ऑक्टोबर रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी इलेक्ट्रिक बसमध्ये प्रवास करून त्यास बसचा डेमो घेतला. सदर प्रसंगी परिवहन व्यवस्थापक अनिकेत मानोरकर, परिवहन उप-व्यवस्थापक स्वप्नील सावंत, प्रभारी प्रशासकीय अधिकारी दिनेश कानगुडे, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक महेश भोसले, बस उत्पादक व पत्रकार उपस्थित होते.

मिरा-भाईंदर परिवहन सेवेमार्फत प्रतिदिन 74 बसपैकी 70 बस नागरिकांच्या सेवेत दैनंदिन उपलब्ध आहेत. शहरातील दैनंदिन लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा आकडा वाढवण्याच्या दृष्टीने व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून 45 नवीन इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात 9 मीटर लांबीच्या एकूण 20 बस तर 12 मीटर लांबीच्या एकूण 25 बस शहरात येत्या काही काळात रुजू होणार आहेत. 12 मीटर लांबीच्या 25 बसपैकी एकूण 10 बस या वातानुकूलित असणार आहेत तर 15 बस या विना वातानुकूलित असणार आहेत. तसेच 9 मीटर लांबीच्या सर्व विना वातानुकूलित बसेस विकत घेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकामार्फत 45 इलेक्ट्रिक बससाठी काढण्यात आलेली नविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक 45 इलेक्ट्रिक बस मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेत अंदाजे 6 ते 7 महिन्यात दाखल होतील असे आयुक्तांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

मिरा-भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवेचा दैनंदिन लाभ घेणाऱ्या प्रवाशी संख्यांचा 85 हजार इतका टप्पा पार पडला असून सदर प्रवाशी संख्या ही 1 लाख 25 हजार इतकी नेण्याचा मानस मिरा भाईंदर महानगरपालिका परिवहन व्यवस्थापनने घेतला असून येणाऱ्या काळात मिरा भाईंदर शहरातील नागरिकांना आरामदायक आणि पर्यावरण पूरक अशा बसमधून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

डोंबिवलीतील माजी नगरसेवक महेश पाटील यांचे शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीने जंगी स्वागत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील काही काळ शहरापासून दूर असलेले माजी नगरसेवक महेश पाटील यांचे डोंबिवलीत विविध घटकांकडून जंगी स्वागत करण्यात आले. सागर्ली येथील त्यांच्या कार्यालयाबाहेर राजकीय पक्षातील पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते, मित्रमंडळी, हितचिंतक जेष्ठ नागरिक, महिला, ग्रामस्थ, नातेवाईक महेश पाटील यांच्या स्वागतासाठी आली होती. महेश पाटील यांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने पेढे वाटून करण्यात आले.

+

डोंबिवलीत येण्यापूर्वी महेश पाटील यांनी पलावा येथे ‘एकता रिक्षा चालक मालक’ संघटनेच्या स्टॅण्ड वर सदिच्छा भेट दिली आणि रिक्षाचालकांची आस्थेने चौकशी केली. शिवसेना शिंदे गटाचे जेष्ठ पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्या कार्यालयात सुद्धा त्यांनी भेट दिली. काटई येथील ‘युवा मोर्चा’च्या आंदोलनास भेट देऊन समस्या समजून घेऊन पुर्ण पाठिंबा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. एमआयडीसी येथे ‘महेश पाटील प्रतिष्ठान’ च्या वतीने जेष्ठ नागरिक कट्टा सुरु करण्यात आला असून येथे स्वागतासाठी जमलेल्या जेष्ठ नागरीकांनी महेश पाटील यांना सामाजिक सेवेसाठी आणि उज्ज्वल राजकीय कारकीर्दीस आशिर्वाद दिले.

सागर्ली गावातील घरात प्रवेश करण्यापूर्वी बहिण डॉ.सुनिता पाटील, इतर बहिणींनी, ग्रामस्थ महिलांनी महेश पाटील यांचे औक्षण केले. महेश पाटील यांच्या येण्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. महेश पाटील यांच्या वडीलांचा आज पाचवा स्मृतीदिन असल्याने, सागर्ली येथील घरात आई-वडीलांच्या प्रतिमेचे पूजन करुन महेश पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला.

डोंबिवलीत विविध चौकात महेश पाटील यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते.आपल्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्या सोबत भाजपला सोडचिठ्ठी दिल्या नंतर आता शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ढाल तलवारीचे राजकीय वार कुणावर करणार अशी चर्चा आता महेश पाटील यांच्या डोंबिवलीतील पुनश्च एन्ट्री मुळे सुरु झाली आहे

 

वोकहार्ड हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा चमत्कार! अपघातात गंभीर दुखापत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर केले यशस्वी उपचार!

पायांच्या हाडांमध्ये अनेक फॅक्चर झाल्यामुळे चालणेही शक्य नसलेला पोलीस कर्मचारी आता आपल्या पायावर उभे राहत पुन्हा सेवेत रूजू!

मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 44 वर्षीय अपघातात पायाला गंभीर दुखापत झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. अपघातानंतर चालता येत नसलेला रुग्ण आता पुन्हा आपल्या पायावर उभा आहे.

44 वर्षीय महामार्ग पोलीस शिपाई सचिन धनविरे, डहाणू येथील रहिवासी असून 22 एप्रिल रोजी कर्तव्यावर असताना त्यांचा भीषण अपघात झाला. बोईसर महामार्गावर त्यांना भरधाव वाहनाने (ट्रक) धडक दिली. हायवेवर उभे असलेले हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आणि त्यांना शरीरावर अनेक फ्रॅक्चर्ससह पायांना गंभीर इजा झाल्याने उभे राहणेही शक्य नव्हते.

त्यांच्या मांडीची दोन्ही हाडे (फिमर), शाफ्ट फ्रॅक्चर झाले; उजव्या प्रॉक्सिमल लेग बोन फ्रॅक्चर, उजव्या गुडघ्याची हाडे, स्नायू आणि इतर बाजूच्या ऊतींना दुखापत झाली तसेच हाताचे देखील फ्रॅक्चर झाले.

रुग्णाच्या उजव्या बाजूच्या खालच्या अंगाची संपूर्ण हाडे, त्वचा आणि रक्तवाहिन्यांवर या अपघातामुळे गंभीर परिणाम झाला होता. रूग्णावर प्रामुख्याने जवळच्या स्थानिक रूग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पंरतू अपघात गंभीर होता आणि ही परिस्थिती पाहून त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.

मिरारोड येथील वोकहार्ड हॉस्पिटलचे डॉ. गिरीश भालेराव, सल्लागार ऑर्थोपेडिक सर्जन माहिती देताना म्हणाले की, आपत्कालीन विभागात दाखल झालेल्या या रुग्णाला रुग्णवाहिकेत आणण्यात आले. त्यावेळी रुग्णाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्याचे मूल्यांकन करण्यात आले. त्याला प्रामुख्याने एएलटीएस (Advanced Trauma Life Support) प्रोटोकॉलनुसार स्थिर करण्यात आले.

निदानाची पुष्टी करण्यासाठी योग्य रेडिओलॉजिकल आणि प्रयोगशाळेच्या चाचण्या केल्या गेल्या आणि रुग्णाला पुढील हेमोडायनामिक स्टॅबिलायझेशन आणि निरीक्षणासाठी वॉर्डमध्ये हलवण्यात आले. पॉलीट्रॉमा म्हणजे ज्याला अनेक शरीरिक दुखापत झाली आहे. या प्रकरणात मस्क्यूकोस्केलेटल प्रणालीचे एकाधिक फ्रॅक्चर, परिधीय मज्जासंस्था- सामान्य पेरोनियल मज्जातंतूला दुखापत, जांघेच्या आणि पायांच्या वरच्या आणि खोल त्वचेच्या ऊतींना झालेली दुखापत आणि हेमोडायनामिक स्टॅबिलायझेशन यामुळे होते.

डॉ. सुशील नेहते, प्लॅस्टिक सर्जन यांच्या नेतृ्वाखाली जखमेवर उपचार करण्यात आले. आता रुग्ण फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशनने बरा होत आहे. सामान्य पेरोनियल मज्जातंतू अजूनही देखरेखी खालील नर्व्ह सिम्युलेशन आणि फिजिओथेरपी अंतर्गत बरे होत आहे.

अपघातामुळे हाडांचे स्नायू आणि रक्तवाहिन्यांना दुखापत झाली होती. सुरुवातीला रुग्ण वॉकरच्या मदतीने चालत होता आणि आता मात्र स्वतःच्या पायावर उभा राहिला. तो आता दुचाकी किंवा चारचाकीही चालवू शकतो. या प्रकरणामध्ये हाडांना पुन्हा जोडून आणणे अतिशय जोखमाचे काम होते, मात्र ते आव्हान स्विकारुन रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले. अपघा पतामध्ये गंभीर दुखापत झालेले रुग्ण वेळीच रुग्णालयात पोहोचले तर त्यामध्ये अवयव गमावण्याची शक्यता कमी होते.

पोलीस कर्मचारी सचिन धनविरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अपघातानंतर मला वाटले की आता माझे जग उद्ध्वस्त झाले आणि मी पुन्हा कधीही माझ्या पायावर उभे राहू शकणार नाही! पण मी एक पोलीस शिपाई आहे, आणि मला माझे कर्तव्य बजाविण्यासाठी शक्य तितक्या लवकर कामावर रुजू व्हायचे होते!

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरारोड येथील डॉक्टरांच्या टीमचे मी आभारी आहे की त्यांनी मला नवीन जीवन दिले आहे! आता, मी पुन्हा आपल्या कर्तव्यावर रूजू झालो असून कोणत्याही आधाराशिवाय दैनंदिन काम करु लागलो आहे. रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या प्रत्येकाने रस्त्यावरुन प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे मी आवाहन करतो!